सफदरजंग : (१५ डिसेंबर १७०८–५ ऑक्टोबर १७५४).

मोगल सम्राट अहमदशहा याचा वजीर व अवध प्रांताचा राज्यपाल. संपूर्ण नाव अबुल मन्सुर मिर्झा मुहम्मद मुकिम अली खान. त्याचा जन्म निशापूर, इराण येथे चौदाव्या शतकातील ओगुझ तुर्क मुस्लीम टोळीतील कारा युसुफ या टोळीप्रमुखाच्या वंशामध्ये झाला. मोगल बादशहा मुहम्मदशाह याने त्याला ‘सफदरजंगʼ हे नामाभिधान दिले. १७२२ मध्ये तो भारतामध्ये आला.

मुहम्मदशाह (कार. १७१९–४८) याच्या कालखंडातील अवध प्रांताचा सुभेदार सादत खान उर्फ बुऱ्हान-उल-मुल्क याचा सफदरजंग हा पुतण्या होता. त्याने सादत खानची ज्येष्ठ मुलगी आमत जहां बेगमशी लग्न केले. तिच्या पोटी १९ जानेवारी १७३२ रोजी शुजा-उद-दौलाचा जन्म झाला. सासरा सादत खानच्या मृत्यूनंतर १७३९ मध्ये सफदरजंग अवधचा सत्ताधीश झाला. १९ मार्च १७३९ ते ५ ऑक्टोबर १७५४ पर्यंत हा अवधचा नबाब होता. मोगल दरबारामध्ये इराणी, तुरानी, तुर्क आणि सुन्नी या मुस्लीम गटांचे वर्चस्व होते; तथापि सफदरजंग हा शिया मुस्लीमपंथीय होता. आपल्या कर्तबगारीच्या जोरावर तो मोगल दरबारामध्ये उच्च पदापर्यंत पोहोचला. नादिरशाहच्या दिल्लीलुटीनंतर मोगलांची हानी झाली होती. वजीर कमरुद्दीन खान याच्या मृत्यूनंतर वजीरपद रिकामे होते. मुहम्मदशहाच्या मृत्यूनंतर अहमदशहा (१७४८–५४) बादशहा बनला. त्याने प्रशासनाची घडी सुरळीत करण्यासाठी सफदरजंगला वजीरपदावर नेमले (२० जून १७५२). यापूर्वी त्याने अजमेर व काश्मीरचे  राज्यपालपद सांभाळले होते. जरी तो वजीर म्हणून दिल्लीला आला असला तरी, अवधचा राज्यकारभार साहाय्यकांच्या मदतीने चालविण्याची व्यवस्था त्याने केली होती. त्याच्या १५ महिन्यांच्या वजीरपदाच्या कारकिर्दीमध्ये मोगल दरबारामध्ये राजकीय अनागोंदी आणि यादवी युद्धाला प्रारंभ झाला. तो शियापंथीय असल्याने विरोधी गटाने त्याला मारण्याचाही प्रयत्न केला. तुर्क मुस्लीम हे युद्धतरबेज, युद्धसंचलनामध्ये पर्शियन शियांच्या पेक्षा वरचढ आहेत, अशी विरोधकांची समजूत होती.

वजीरपदाच्या कालखंडातील घडामोडी  :

सफदरजंग मोगल दरबाराचा वजीर असला, तरी दरबारामध्ये विरोधी गटही प्रबळ होता. त्यामध्ये अहमदशहाचा अत्यंत विश्वासू जावेद खान (नबाबबहादुर), इमाद-उल-मुल्क, इम्तियाज-उद-दौला, शोलापुरीबाई, बाळू जाट, उधमबाई या सर्वांचे गट होते. अहमदशहा बंगशविरुद्ध लढत असताना सफदरजंगच्या अखत्यारीतील बादशाही फौजेचा छोट्याशा अफगाणी तुकडीने पराभव केला (२३ सप्टेंबर १७५२). त्यामुळे त्याच्या विरोधात दरबारी वातावरण अधिकच चिघळले. अहमदशहा अब्दालीने मोगलांच्या सीमावर्ती भागांमध्ये प्रवेश केल्याने अहमदशहाने सफदरजंगला दरबारी बोलाविले; परंतु त्याने ही गोष्ट गांभीर्याने घेतली नाही. अवधची प्रशासनव्यवस्था सुरळीत लावून तो राजधानीमध्ये आला. सफदरजंग फेब्रुवारी १७५१ ते एप्रिल १७५२ दरम्यान रोहिले-पठाण आणि अहमदशहा बंगश-पठाण या अफगाण टोळ्यांशी लढण्यात गुंतला असता, विरोधी गटाने संधी साधून बादशाहाला त्याच्याविरुद्ध फितविले.

सफदरजंगविरुद्ध मोगल दरबाराचे डावपेच :

अहमदशहा अब्दालीने ६ मार्च १७५२ रोजी लाहोर ताब्यात घेतले. सफदरजंगने रोहिल्यांशी चाललेले युद्ध थांबवले व बादशहाच्या आदेशानुसार दिल्ली वाचवण्यासाठी मराठ्यांशी त्याने एक करार केला. अहमदशहा अब्दालीच्या बाह्य आक्रमणापासून वाचविण्यासाठी बादशाहाने पेशव्यांना ५० लाख रुपये; पंजाब, सिंध व गंगेचा दुआब यांत चौथाई वसुलीचा हक्क, तसेच अजमेर व आग्र्याची सुभेदारी देण्याचे मान्य केले. त्यानुसार सफदरजंग मल्हारराव होळकर व जयाप्पा शिंदे यांच्या फौजांनिशी दिल्लीला आला, परंतु त्याला उशीर झाला होता. कारण तो पोहोचण्याअगोदरच बादशहा अहमदशहाने घाबरून अब्दालीला पंजाब आणि सिंध हे प्रांत देऊन शांतता प्रस्थापित केली होती. मराठे सफदरजंगबरोबर केलेल्या कराराची अंमलबजावणी करावी म्हणून त्याच्या पाठीशी लागले. त्यामुळे तो तोंडघशी पडला. अखेर या सर्व कारस्थानाचा प्रमुख जावेद खान यालाच मात देण्याचे त्याने ठरविले.

सफदरजंगकडून जावेद खानचा खून :

जावेद खानने सफदरजंगविरुद्ध अनेक कारस्थाने केली. फरीदाबादचा चौधरी बलराम जाट याने मोगल प्रदेशाची लूट केली असतानाही जावेद खानने त्याचा बहुमान केला होता. दुसरीकडे सफदरजंगचा विश्वासू मित्र सलाबत खान यालाही मिरबक्षीपदावरून काढले होते. त्यांच्यातला वैरभाव वाढला होता. जावेद खान राज्यात खरा सत्ताधारी झाला होता. २७ ऑगस्ट १७५२ रोजी सफदरजंगने जावेद खानला मेजवानीनिमित्त बोलाविले आणि मुहम्मद अली जर्कीद्वारे त्याचा खून करविला. त्यामुळे बादशहा व दरबारी विरोधक त्याच्याविरुद्ध कारस्थान करू लागले. बादशाहने दरबार भरवूनदेखील सफदरजंगचा मित्रगट उपस्थित राहिला नाही. शेवटी त्याची वाढती प्रतिकूलता लक्षात घेऊन बादशहाने १३ मे १७५३ रोजी त्याला वजीर पदावरून बडतर्फ केले.

बादशहा-वजीर युद्ध :

दरबारामध्ये अंतर्गत यादवी सुरू झाली (१७५३). हे यादवी युद्ध सहा महिने चालू होते. सफदरजंगने सुरजमल जाट, सलाबत खान, राजेंद्रगिरी गोसावी यांच्या मदतीने बादशहाविरुद्ध युद्ध पुकारले. बादशहाने इम्तियाज खानला ‘कमरुद्दीन-खान-बहादूर’ आणि ‘इम्तियाज-उद-दौला’ या पदव्या देऊन वजीर बनविले, तर इमाद-उल-मुल्कला निजाम-उल-मुल्क आसफजहां ही पदवी देऊन त्याच्याकडे मिरबक्षीपद सोपविले. कमरुद्दीनला वजीरपद बहाल केल्यावर सफदरजंगने बादशहाला प्रत्युत्तर म्हणून शुजा-उद-दौलाने विकत घेतलेल्या एका गोंडस, सुंदर गुलाम मुलाला कामबक्षचा नातू ठरवून अकबर आदिलशहा या नावाने त्याला बादशहा घोषित केले. सफदरजंग स्वत: त्याचा वजीर आणि सलाबत खानला त्याचा मिरबक्षी केले. यादवी युद्धात बादशाहाच्या बाजूने नजीबखान रोहिला, मराठे प्रतिनिधी बापू महादेव हिंगणे व अंताजी माणकेश्वर लढले. बादशाहाने सफदरजंगविरुद्ध ‘जिहाद’ आणि ‘नमकहराम राफिजी’चा नारा दिला. १४ मार्च १७५३ च्या युद्धामध्ये राजेंद्रगिरी गोसावीच्या मृत्यूनंतर सफदरजंगचा आत्मविश्वास कमी झाला. शेवटी बादशाहाने सफदरजंगविरोधी युद्ध मिटवण्यासाठी जयपूरचा राजा माधोसिंगची मध्यस्थी घेतली आणि ५ नोव्हेंबर १७५३ रोजी त्यांच्यातील वाद मिटविला गेला. ७ नोव्हेंबर १७५३ रोजी सफदरजंग अवध राज्यात निघून गेला.

फैजाबाद जवळील सुलतानपूर येथे त्याचे निधन झाले. त्याच्या निधनानंतर दिल्ली येथे त्याचा पुत्र शुजा-उद-दौलाने त्याची कबर बांधली (१७५४).

संदर्भ :

  • Chandra, Satish, Medieval India, Vol-II, New Delhi, 2007.
  • Elphinstone, Mountstuart, The History Of India : The Hindu and Mohamedan Period, Alahabad,1966.
  • Sarkar, Sir Jadunath, Fall Of The Mughal Empire, Vol-1, New Delhi, 1971.
  • महाजन, व्ही.डी. मध्यकालीन भारत, नवी दिल्ली, २००९.
  • सरदेसाई, गो. स. मराठी रियासत, खंड-४, मुंबई, २००२.

समीक्षक – अरुणचंद्र पाठक