अलाउद्दीन हसन गंगू बहमनी : (कार. ऑगस्ट १३४७–फेब्रुवारी १३५८). मध्ययुगात दक्षिण भारतात स्थापन झालेल्या बहमनी सत्तेचा संस्थापक व एक कर्तबगार प्रशासक. तो अलाउद्दीन हसन गंगू बहमनी, अमीर जफरखान, अबुल मुज्झझफ्फर अलाउद्दीन बहमनशाह या नावांनीही ओळखला जातो. त्याच्या मूळ घराण्याविषयी तसेच नावाबद्दल इतिहासकारांत एकमत नाही. बुर्हाण-इ-मआसिर व निझामुद्दीन लिखित तबकात-इ-अकबरी  या ग्रंथांनुसार अल्लाउद्दीन हसन याच्या वंशाचा संबंध हा प्राचीन इराणचा पराक्रमी राजा बहमन (इस्पंदीयरचा पुत्र) याच्याशी असल्याचे मत व्यक्त करतात. पण हे दोन्ही ग्रंथ प्रसिद्ध फार्सी इतिहासकार फिरिश्ता (१५७०–१६२३) याच्या लिखाणापूर्वी लिहिले गेले आहेत. फिरिश्ताच्या मते, हसन हा मुळचा दिल्लीचा रहिवासी असून तो गंगू नावाच्या ब्राह्मणाकडे नोकरीस होता. पुढे हसनच्या प्रामाणिकपणावर खूश होऊन गंगू ब्राह्मणाने त्याची शिफारस दिल्लीचा सुलतान मुहम्मद बिन तुघलक (कार. १३२५–५१) याच्याकडे केली व हसन तुघलकच्या सेवेत रुजू झाला. पुढे तुघलक सैन्याबरोबर तो दिल्लीहून देवगिरी येथे आला आणि तेथेच स्थायिक झाला. त्याला रामबाग प्रांतातील कुंची या गावची जहागिरी देण्यात आली. हसनने आपला मूळ मालक गंगू याच्याविषयी कृतज्ञता म्हणून बहमन हे नाव धारण केले आणि त्यानंतर त्याच्या साम्राज्याला बहमनी साम्राज्य असे संबोधण्यात येऊ लागले.

अलाउद्दीन खल्जी याने दक्षिणेतील देवगिरीचा राजा रामचंद्रदेव यादव याविरुद्ध स्वारी करून त्याचा पराभव केला (१२९४). यामुळे उत्तरेतील मुस्लिम सत्तेचा दक्षिणेत प्रवेश झाला. दिल्लीच्या खल्जी घराण्याच्या कारकिर्दीत दक्षिणेतील काही सुभे मुस्लिम सरदार-उमराव यांच्या ताब्यात होते. खल्जींच्या अवनतीनंतर (१३२०) उत्तर भारतात दिल्लीचे तख्त तुघलक घराण्याच्या ताब्यात होते. घियासुद्दिन हा तुघलक घराण्याचा संस्थापक. त्याच्यानंतर मुहम्मद बिन तुघलक हा दिल्लीचा सुलतान झाला. त्याच्या काळात राज्यविस्तार झाला. दिल्लीवरील परकीय आक्रमणांचा धोका टाळण्यासाठी व दक्षिणेत होणाऱ्या बंडांमुळे मुहम्मदास आपली राजधानी मध्यवर्ती अशा ठिकाणी असावी, असे वाटले. म्हणून त्याने १३२७ मध्ये साम्राज्याची दुसरी राजधानी म्हणून देवगिरीची निवड केली. देवगिरीस दौलताबाद हे नाव देऊन सर्वांना तिकडे जाण्याचा हुकूम दिला आणि त्याची कठोरपणे अंमलबजावणी करण्यात आली. या स्थलांतराचे अनेक दूरगामी परिणाम दक्षिणेच्या राजकारणावर झाले. पुढे उत्तरेतून अनेक मुस्लिम सरदार, आमीर आणि सामान्य नागरिक दक्षिणेत येऊन स्थायिक झाले. कालांतराने दिल्लीच्या मध्यवर्ती सत्तेचा जाच सहन न होऊन दक्षिणेकडील मुस्लिम सरदारांनी एकत्र येऊन दिल्लीच्या सत्तेविरुद्ध बंड पुकारले. या सत्तासंघर्षात आपल्या शौर्य आणि पराक्रम या गुणांच्या जोरावर हसन हा सरदार नावारूपाला आला. त्याने आपल्या पराक्रमाच्या जोरावर दिल्लीच्या फौजांचा पराभव करून त्यांना उत्तरेकडे पिटाळून लावले. यामुळे दक्षिणेकडील इतर मुस्लिम सरदारांनी मिळून हसनची एकमुखाने दक्षिणेचा सुलतान म्हणून निवड केली आणि बहमनी राज्याची स्थापना झाली (३ ऑगस्ट १३४७).

हसनने उत्तरेच्या आक्रमणाचा धोका ओळखून आपली राजधानी दौलताबादहून आणखी दक्षिणेस गुलबर्गा येथे हलविली. गुलबर्गा येथून मराठी, कानडी तसेच तेलुगू मुलखावर लक्ष ठेवणे सोपे जाणार होते, शिवाय त्याची मिरज भागातील जहागिरीदेखील जवळ होती. त्याच्या हातात सत्ता आली, तरी दक्षिणेत अनेक बंडखोर निर्माण झाले होते. त्याने बंडखोरांना स्वतःच्या छत्राखाली आणण्याचे प्रयत्न सुरू केले. प्रसंगी युद्ध टाळून त्याने सामोपचाराचा अवलंब केला. याचे चांगले परिणाम दिसून आले. शरण आलेल्या अनेक जहागीरदारांना दयाळूपणाची वागणूक दिली. पुढे कोटगीर, कल्याणी व गुलबर्ग्याच्या आजूबाजूचा परिसर हे प्रदेश बहमनी साम्राज्यात समाविष्ट झाले. तेलंगण येथील जमीनदार आणि नायक यांनी बहमनी साम्राज्याचे मांडलिकत्व पतकरले. त्याचा सरदार किरखान याने बहमनी सत्तेविरुद्ध बंड पुकारले. हसनने हे बंड पूर्णपणे मोडून किरखानला ठार मारले. त्याने विश्वासू सरदार मलिक सैफुद्दिन घोरी याची साम्राज्याच्या वजीर पदावर नेमणूक केली. तसेच आपला आधीचा धनी गंगू ब्राह्मण याची हिशेब खात्याचा प्रमुख म्हणून नेमणूक केली. साम्राज्याची घडी नीट बसविण्यासाठी त्याने प्रशासनाच्या सोयीसाठी राज्याची चार सुभ्यांत विभागणी केली : १. गुलबर्गा, रायचूर, मुद्गल २. दौलताबाद, बीड, जुन्नर, चौल ३. बेरर, माहूर व ४. इंदूर, कौलास आणि तेलंगणाचा काही भाग. प्रत्येकावर एक स्वतंत्र अधिकारी नेमला. तो अधिकारी सुभ्यातील लष्करी व नागरी व्यवस्था पाहण्याबरोबरच साराही गोळा करीत असे.

हसनने आपले साम्राज्य उत्तरेत मांडूपासून ते दक्षिणेत रायचूरपर्यंत, तसेच पश्चिमेला चौलपासून ते पूर्वेला भोंगीरपर्यंत वाढवले. त्याने राज्य करताना सर्वांना समान न्याय दिला. अलाउद्दीन हसन हे नाव धारण करून त्याने स्वतःच्या नावाची नाणी पाडली. बहमनी सुलतानांनी तात्त्विक दृष्ट्या अब्बासी खलिफांचे वर्चस्व मानले होते. त्यामुळे त्यांच्या तख्तावर काळी छत्री आणि नाण्यांवर खलिफांचा उजवा हात असे. हसनने दक्षिणेतील हिंदू राजांना आपल्या पक्षाकडे वळविले. देशमुख-देशपांड्यांना वतने-इनामे दिली. अनेक नवीन वतनदार निर्माण करून राज्याचा विस्तार केला. उत्तरेकडील सुलतानी सत्तेचे दक्षिणेवरील प्रभुत्व पूर्ण नष्ट करून दक्षिणेत एक स्वतंत्र साम्राज्य उभे केले. त्याच्या धोरणी स्वभावामुळे अल्पकाळात बहमनी सत्तेचा लक्षणीय विस्तार झाला.

गुलबर्गा येथे तो मरण पावला. तेथे त्याची कबर आहे. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा ज्येष्ठ मुलगा पहिला मुहंमदशाह (कार. १३५८–१३७५) गादीवर आला.

संदर्भ :

  • Nayeem, M. A. The Heritage of the Bahmanis & The Baridis of the Deccan, Hyderabad, 2012.
  • कुंटे, भ. ग. फरिश्ता लिखित गुलशन ई इब्राहिमी, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, १९८२.
  • खरे, ग. ह. मध्ययुगीन महाराष्ट्राचा इतिहास (इ.स.१२९६ ते १६३६), महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, २००१.
  • फडके, य. दी.; माटे, म. श्री.; कंटक, मा. रा.; कुलकर्णी, गो. त्र्यं. शिवछत्रपती इतिहास आणि चरित्र,खंड :१, शिवपूर्वकाल, पुणे, २००१.

                                                                                                                                                                               समीक्षक :  प्रमोद जोगळेकर