मुस्लिम अथवा हिजरी कालगणनेनुसार रमजान हा २९-३० दिवसांचा नववा चांद्रमास. त्याचा रमजान हा शब्द कडक अथवा भाजून होरपळून टाकणारी उष्णता या अर्थी असलेल्या ‘रमीद’ अथवा ‘अर-रमद’ या अरबी धातूपासून तयार झाला आहे. तो रमझान किंवा रमदान या नावानेही रूढ आहे. इस्लाम धर्माच्या श्रद्धा (शहद), प्रार्थना किंवा नमाज (सलत), दानधर्म (जकात), उपवास (सवम), आणि मक्केची यात्रा (हज) या पाच मुख्य तत्त्वांपैकी रमजान महिन्यातील उपवास हे एक तत्त्व आहे.

इस्लामच्या पाच स्तंभांपैकी एक असल्याने कुराणात (कुरआनात) याविषयीची आज्ञा खालीलप्रमाणे आहे :

“हे ईमानवाल्यांनो तुमच्याकरिता रोजे अनिवार्य ठरविले गेले. ज्याप्रमाणे तुमच्या पूर्वीच्या पैगंबरांच्या अनुयायांवर अनिवार्य केले गेले होते. अपेक्षा आहे की, यामुळे तुमच्यात ईश्वराचे भय निर्माण होईल… रमजान तो महिना आहे, ज्यामध्ये कुराणाचे अवतरण झाले. जो मानवाकरिता पूर्ण मार्गदर्शन आहे व त्यात अशा स्पष्ट शिकवणी समाविष्ट आहेत ज्या सरळ मार्ग दाखविणा-या आणि सत्य व असत्य यांमधील फरक उघड करून दाखविणाऱ्या आहेत. म्हणून यापुढे ज्या व्यक्तीला हा महिना मिळेल त्याला हे आवश्यक आहे की, त्याने या पूर्ण महिन्याचे रोजे (उपवास) करावेत आणि जो कोणी आजारी असेल किंवा प्रवासात असेल, त्याने इतर दिवसांत सुटलेले उपवास पूर्ण करावेत. अल्लाह तुमच्याशी सौम्य व्यवहार करू इच्छितो, कठोर व्यवहार करू इच्छित नाही म्हणून ही पद्धत तुम्हाला दाखविली जात आहे की, ज्यामुळे तुम्ही उपवासांची संख्या पूर्ण करू शकाल आणि ज्या मार्गदर्शनाने अल्लाहने तुम्हाला गौरवान्वित केले आहे, त्याबद्दल अल्लाहच्या महानतेचा मनापासून स्वीकार करा, कृतज्ञ बना आणि अल्लाहच्या महानतेचे गुणगान करा.” (सूरह अल बक्रआयती १८३…८४…८५).

रमजान महिन्यात इस्लामचा पवित्र धर्मग्रंथ कुराणाच्या अवतरणाचा प्रारंभ झाला, म्हणून या महिन्यात उपवास केले जातात. त्यांना ‘रोजे’ असे म्हणतात. उपवासाची सुरुवात रमजान महिन्यात प्रथम चंद्रदर्शन झाल्यानंतर येणाऱ्या पहाटेपासून होते. या महिन्यात सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत अन्न-पाणी सेवन न करता कडक उपवास केले जातात. सर्व मुस्लिम स्त्री-पुरुषांना हे उपवास बंधनकारक आहेत. लहान मुले, वेडसर व्यक्ती यांना उपवास न करण्याची सवलत असते. तसेच गर्भवती वा तान्हे मूल असलेल्या व मासिक पाळीत असलेल्या स्त्रिया; आजारी व प्रवासी यांनाही या नियमांत थोडीफार सूट मिळू शकते. त्यांनी त्या काळात दानधर्म करावा आणि अन्य काळात उपवास करावेत अशी अपेक्षा आहे.

उपवास करणाऱ्या व्यक्तीने उपवासाच्या प्रारंभी आणि उपवास सोडताना उपवासाचा हेतू (नियत) स्पष्ट केला पाहिजे, अशी ईश्वरी आज्ञा आहे. रमजानच्या उपवासात उद्देश (निय्यत) महत्त्वाचा आहे. तुम्ही दिवसभर काही न खाता, पिता उपाशी राहिले, तर ती उपासमार आहे. ‘रोजा’ म्हणजे ईश्वराचे सानिध्य (उप-वास) मिळविण्याकरिता उपाशी राहणे आणि सत्कृत्ये करून अल्लाहला प्रसन्न करणे होय. उपवास करण्याचा मुख्य हेतू चित्तशुद्धी व्हावी, मनावरील संयम वाढावा आणि वाईट गोष्टींना दूर ठेवण्याची क्षमता प्राप्त व्हावी, हा असतो. म्हणून या महिन्यात वाईट अथवा खोटे बोलणे, धूम्रपान-मद्यपान करणे, दुसऱ्याला त्रास देणे, प्रणय करणे निषिद्ध मानले आहे. मुहंमद पैगंबरांनी सांगितले आहे की, “माणसाने उपवासाच्या काळात वाईट मनोवृत्तीपासून अलिप्त राहिले पाहिजे, इतकेच नव्हे तर संतापून जाता कामा नये. खोटे बोलणे किंवा दुसऱ्याची निंदा करणे यांपासून दूर न जाणाऱ्यांचा उपवास परमेश्वराच्या दृष्टीने व्यर्थ आहे.” अर्थात, या काळात अधिकाधिक सद्वर्तन अपेक्षित आहे.

रमजानच्या काळात विशेष प्रार्थना म्हटल्या जातात. प्रतिदिन उपवास सोडल्यानंतर रात्री जी प्रार्थना केली जाते, तिला ‘तराविह’ अशी संज्ञा आहे. अनेक मुसलमान या महिनाभराच्या काळात काही विशिष्ट काळासाठी मशिदीमध्ये एकांतात बसून कुराणाचे पठन करतात. या एकांतवासामध्ये ते आवश्यक कारणाशिवाय आपले स्थानही सोडत नाहीत. संपूर्ण काळ ते ईश्वराच्या सान्निध्यात राहतात. तसेच या काळात गोरगरिबांना दानधर्मही केला जातो.

रमजानच्या काळात सूर्योदयापूर्वी जे भोजन केले जाते त्याला ‘सहरी’ असे म्हटले जाते, तर सूर्यास्तानंतर जे भोजन केले जाते त्याला ‘इफ्तार’ असे म्हटले जाते.

या महिन्याच्या सत्ताविसाव्या दिवसाच्या रात्रीला ‘लैलतुलकद्र’ अथवा ‘शब-इ-कद्र’ म्हटले जाते. ही रात्र पुण्यप्रद हजार महिन्यांपेक्षाही उत्तम असते, असे कुराणात सांगितले आहे. या वेळी ऊद-उदबत्त्या पेटविल्या जातात. प्रार्थना, कुराणाचे पठन होते. या रात्री जे लोक रात्रभर जागे राहतात, त्यांना स्वर्गातून देवदूत आशीर्वाद देतात. ही रात्र मंगलप्रद असून अभय व शांतीची रात्र आहे, असे समजले जाते.

रमजानच्या पवित्र मासात स्वर्गाची द्वारे सताड उघडली जातात. तसेच ह्या मासात श्रद्धेने उपवास पाळणारास गतजीवनात त्याने केलेल्या सर्व पापांना परमेश्वर क्षमा करतो. या महिन्यात उर्मट सैतानास जखडून ठेवले जाते. ‘रमजान’ या अरबी शब्दात समाविष्ट असलेल्या पाच वर्णाक्षरांवरून त्याचा महिमा पुढीलप्रमाणे स्पष्ट होतो : परमेश्वराची इच्छा, त्याचे प्रेम, त्याचे अभयदान, त्याचा स्नेह (करुणा) व त्याचा दैवी प्रकाश या सर्व गोष्टींचा समावेश म्हणजे पवित्र रमजान मास होय.

रमजानचा पवित्र व शुभ महिना संपल्यावर चंद्रदर्शन होताच ‘शव्वाल’ ह्या दहाव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी महिनाभराच्या उपवासाचे पारणे फेडताना ‘रमजान ईद’ किंवा ‘ईद उल्‌-फित्र’ साजरी केली जाते. शव्वालची चंद्रकोर एकीकडे ईद उल्‌-फित्रच्या आनंदाची ग्वाही देते, तर दुसरीकडे रमजानचे उपवास संपल्याचे सांगते. ईदचा अर्थ पूर्वपदावर येणे असा आहे. म्हणजे उपवास इ. विधी सोडून नेहमीचे जीवन जगणे. आनंदोत्सवात ईमानधारकांनी पैशाची उधळपट्टी करू नये, आपले वर्तन संयमी, विनयशील आणि कृतज्ञतेचे ठेवावे म्हणून ईदच्या दिवशी ईदगाहवर जाऊन दोन रकात नमाज अल्लाहचे आभार आणि कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता पढली जाते. ईदगाहला येण्यापूर्वी उपवास धारकाच्या परिसरातील दुर्बल व्यक्तींना प्रत्येक उपवासधारकाच्या वतीने किमान दोन किलो गहू शक्य तितके लपवून दिले जातात. याचा हेतू हाच की, त्याने खाऊन-पिऊन ईदगाहला नमाजीकरिता यावे. या दोन किलो गव्हाच्या (किंवा प्रचलित धान्याच्या) हिश्याला ‘फित्रा’ असे म्हणतात. म्हणूनच या ईदला फित्रा वाटप करण्याची ईद म्हणून ‘ईदुल-फित्र’ असे म्हणतात.

संदर्भ :

  • अमीन सय्यद अहंमद, इस्लाम, सांगली, १९६९.
  • सूर्यवंशी, अ. प. अनु. इस्लामची जीवनपद्धती, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई, १९७६. (मूळ लेखक व ग्रंथनाम – शरीफ जफर, कानून-इ-इस्लाम).

                                                                                                                                            समीक्षक : गुलाम समदानी