सामाजिक आणि सांस्कृतिक भवतालाचे वस्तुनिष्ठ आकलन व विश्लेषण करणारी भाषावैज्ञानिक पद्धती. भाषा ही चिन्हव्यवस्था आहे आणि या व्यवस्थेतून सूचित होणारं सामाजिक, सांस्कृतिक वास्तव या दोहोंतील आंतरसंबंधांचा ही पद्धती शोध घेते. संदेशप्रबंधक किंवा भाषेचा समाजातील प्रत्यक्ष वापर हा तिच्या निरीक्षणाचा गाभा आहे. पण केवळ प्रत्यक्ष भाषा वापराचे निरीक्षण करून ती थांबत नाही,तर त्याहीपलीकडे जाऊन एखाद्या विशिष्ट सामाजिक – संस्थात्मक परिसरात घडणाऱ्या संज्ञापनांच्या रूढ पद्धतीतच अनुस्यूत असणाऱ्या मानसिकतेचा, विचार-प्रणालीचा वेध घेणे हा तिचा मूलभूत उद्देश असतो.

कल्पनाचित्र

संदेशप्रबंधकाचा अभ्यास हा केवळ त्यातील भाषेच्या अभ्यासापुरता मर्यादित न राहता संदेशप्रबंधकाची भौगोलिक, कालिक, सामाजिक किंवा वर्तन-मूलक पार्श्वभूमीही विचारात घेतली जाते. त्यामुळे या पद्धतीची ‘आंतरशाखीय अभ्यास पद्धती’ अशी ओळख दृढ होते. सामाजिक संरचना आणि सिद्धांत, सामाजिक संबंध आणि संघर्ष व त्यातून उद्भवणारे बदल आणि आधुनिकोत्तरता (postmodrnity) यांच्याशी संबंधित सर्व समाजशास्त्रांशी तिचा निकटचा संबंध येतो,त्यांच्या आधारेच ती आपली विश्लेषण साधने विकसित करते.

१९व्या शतकापासून भाषाविज्ञान व त्याच्याशी संलग्न अशा शैलीविज्ञानाच्या क्षेत्रात सैद्धांतिक आणि संशोधनाच्या पातळीवर अनेक बदल होत गेले. या बदलांतून घडत गेलेल्या भाषावैज्ञानिक व शैलीवैज्ञानिक विकासाचा उच्चतम बिंदू म्हणून चिकित्सक संदेशप्रबंधक विश्लेषण पद्धतीचा निर्देश करता येईल. २०व्या शतकाच्या दुसऱ्या अर्धकात भाषाविज्ञानात तोपर्यंत प्रचलित असलेली भाषेची व्याकरणाधिष्ठित नियमांची अमूर्तव्य व्यवस्था – जी ध्वनी, शब्द, वाक्य आणि वाक्यबंधांच्या स्वरूपात अभ्यासली जाऊ शकते – ही कल्पना संकुचित असल्याची जाणीव भाषावैज्ञानिकांना होऊ लागली. एखाद्या भाषक जमातीत भाषा प्रत्यक्षात कशी वापरली जाते, याकडे भाषावैज्ञानिकांचे लक्ष वेधले गेले. प्रत्यक्षात वापरली जात असताना भाषा समाजात एखादी ‘कृती’ करत असते. कधी ती अभिवादन करते, आज्ञा करते किंवा विनंती करते. त्यामुळे ध्वनी, व्याकरण, अर्थ एवढ्या पुरताच भाषेचा विचार मर्यादित न ठेवता तिच्या प्रत्यक्ष वापराचे शक्य ते सर्व संदर्भ भाषाभ्यासाच्या कक्षेत येणे गरजेचे आहे अशी जाणीव भाषावैज्ञानिकांना होऊ लागली. एखाद्या संदेशप्रबंधकाचे प्रत्यक्ष भाषक (वक्ता आणि श्रोता), त्यात घडणारी कृती, त्याचे निकटचे तसेच दूरचे स्थल-कालादि, सामाजिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक इ. संदर्भ या सर्वांचा विचार भाषिक संप्रेषणाचे संपूर्ण आकलन होण्यासाठी आवश्यक आहे. भाषाविचार अशा रीतीने सर्वसमावेशक करण्याच्या गरजेतूनच भाषेच्या कार्यलक्ष्यी (functional), प्रत्यक्ष प्रयोगलक्ष्यी (pragmatic), संदेशप्रबंधक (discourse) अशा विचारप्रणाली अस्तित्वात आल्या. केवळ वैय्याकरणी पुरस्कृत भाषापद्धती पासून सुरू झालेला भाषाविज्ञानाचा प्रवास व्यक्ती-व्यक्तीमधील संवाद (interaction), भाषित (अटरन्स), भाषाकृती (speech act) किंवा सामाजिक कृती (social act) असे विविध टप्पे पार करून चिकित्सक संदेशप्रबंधक विश्लेषण पद्धतीच्या उत्कर्षबिंदूपर्यंत ठेपतो. संदेशनिर्मिती आणि संदेश आकलन यांच्यादरम्यान घडणाऱ्या सर्वप्रक्रियांचा व घटकांचा वेध घेतघेत संदेशाचा उगमच मुळी ज्यातून होतो, त्या मानसिकतेला किंवा विचारप्रणालीला जाऊन भिडणे हे चिकित्सक संदेशप्रबंधक विश्लेषण पद्धतीचे उद्दिष्ट आहे.भाषा ही चिन्हव्यवस्था व या चिन्हव्यवस्थेने संकेतित केलेली समाजव्यवस्था यातील आंतरसंबंध प्रथापित करणे हा चिकित्सक संदेशप्रबंधक विश्लेषण पद्धतीचा प्रधान अभ्यास विषय आहे.

चिकित्सक संदेश प्रबंधक विश्लेषण पद्धतीचा गाभा ‘संदेशप्रबंधक’ व ‘चिकित्सक विश्लेषण’ या दोन संकल्पनांशी निगडित आहे. संदेशप्रबंधक ही पारिभाषिक संज्ञा सर्वसामान्य भाषेत ‘भाषेचा समाजातील प्रत्यक्ष वापर’ अशी अनुवादित करता येते. समाज हा वस्तुतः विवाह, कुटुंब, शाळा, विद्यापीठे, न्याय, शासन इ. अनेक सामाजिक संस्थांनी विणलेले एक जाळेच असतो. यातील प्रत्येक संस्था व तिच्या सभासदांचे परस्परसंबंध हे कृत्रिमपणे संरचित असतात. त्यांचे संरचित स्वरूप जास्त बळकट व शाश्वत केले जाते,ते प्रत्येक सामाजिक संस्थेशी निगडित अशा वैशिष्ट्यपूर्ण पण साचेबद्ध भाषा-व्यवहारांनी. सामाजिक संस्थांशी निगडित अशा साचेबंद भाषाव्यवहारांचे किंवा संदेशप्रबंधकांचे अगणित प्रकार पाहावयास मिळतात उदा.औपचारिक-अनौपचारिक संभाषणे, वर्गातील शिक्षक-विद्यार्थी संवाद, वृत्तपत्रातील, रेडिओ-दूरदर्शनवरील जाहिराती, मुलाखती इ. अशा संदेश प्रबंधकांचे संपूर्ण आकलन होण्यासाठी त्यांच्या भाषिक वैशिष्ट्यांबरोबरच त्यांचे सामाजिक संदर्भही लक्षात घ्यावे लागतात. प्रत्यक्ष भाषावापराच्या संदर्भांचे हॅलीडे आणि हसन (१९७६) या कार्यलक्ष्यी भाषावैज्ञानिकांनी तीन शीर्षकांखाली वर्गीकरण केले आहे: १)संदेशप्रबंधकांत गुंतलेल्या व्यक्ती (टेनर) २) संदेश प्रबंधकाचा विषय (फिल्ड), ३)माध्यम (मोड). लिखित, मौखिक किंवा दृक-श्राव्य संदेशाच्या आकलनात निकट तसेच दूरस्थ संदर्भांचे महत्व उदाहरण देऊन स्पष्ट करता येईल. “चला थोडासा धूर काढू तोपर्यंत!” या भाषिताचे पूर्ण आकलन होण्यासाठी केवळ त्यातील ध्वनी, शब्द, वाक्य समजावून घेणे पुरेसे नाही. या भाषिताचा वक्ता (तरुण खेळाडू मुलगा), श्रोते (इतर तरुण खेळाडू मुले), स्थळ (खेळाचे मैदान), निकालाची पूर्वघटना (प्रशिक्षकाच्या आगमनास उशीर), आंतरपाठ्यता (‘अरे, सर अजून आलेच नाहीत’ हा आधीचा पाठ),आंगिक हावभावांची साथ (मधले बोट व तर्जनी मिळवून ओठांकडे नेणे) इ. संदर्भ-तपशील लक्षात घेतल्यानंतरच ‘धूर काढणे’  हा सामान्य भाषेतील ‘सिगरेट ओढणे’ किंवा औपचारिक’ धूम्रपान करणे’ यांचा तरुण मिश्किल कट्टाबोलीय अवतार आहे हा महत्वाचा अर्थ-तपशील लक्षात येतो. चिकित्सक विश्लेषक संदेशप्रबंधकांकडे अशा व्यापक दृष्टीने पाहतो.तो आपली आधार-सामुग्री दृक-श्राव्य फितीच्या, संहितांच्या किंवा नोंदींच्या स्वरूपात गोळा करतो आणि त्याचे चिकित्सकपणे विश्लेषण करतो.

चिकित्सक संदेशप्रबंधक विश्लेषण पद्धतीच्या  संदर्भात ‘चिकित्सा’  या शब्दाला चिकित्सक संदेशप्रबंधक विश्लेषक संदेशप्रबंधकाकडे चिकित्सकपणे पाहतो याचा अर्थ निव्वळ गुण-दोष दर्शनाच्या किंवा टीका करण्याचा मर्यादित हेतूने पाहतो असा होत नाही. पाठाचे किंवा संदेशाचे त्याचे विश्लेषण संदेशात अनुस्यूत असलेला एखादा गर्भितार्थ, एखादे छुपे कथानक उघड करण्याच्या उद्देशाने प्रेरित झालेले असते. चिकित्सा या शब्दाचा संबंध विश्लेषणाच्या या मूलभूत उद्देशाशी आहे. फेअरक्लो या भाषावैज्ञानिकाने दाखवून दिल्याप्रमाणे ‘समाजाचे घटक असलेल्या सर्व संस्थांमधील सभासदांचे नातेसंबंध हे समतेपेक्षा असमतेवर, सत्तेच्या किंवा अधिकारांच्या असमतोल विभागणीवर आधारलेले असतात’.आतंरसंबंधांच्या या संरचना अधिक बळकट व जमल्यास शाश्वत करण्याकडे सत्ताधाऱ्यांचा कल असतो, हे उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रभावी मार्ग म्हणजे या कनिष्ठ-वरिष्ठ नातेसंबंधांचे प्रथम साचेबंदीकरण (formulation) करून मग त्या साच्यांचे प्रमाणीकरण (standardization) करणे. नात्यांचं साचेबंदीकरण साध्य करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे सभासदांतील भाषाव्यवहार पद्धतींचे म्हणजेच संदेशप्रबंधकांचेही ढाचे तयार करणे.’संबोधनव्यवस्था’ (समाजघटकांनी एकमेकांना हाक मारण्याच्या पद्धती) या भाषेच्या छोट्याशा अंगाचा विचार करून हे सत्य पडताळून पाहता येईल. लंडनमधील रिऍलिटी शोमध्ये एखाद्या ब्रिटिश स्त्रीने भारतीय अभिनेत्रीचा उल्लेख ‘दॅट इंडियन!’ असा करणे, पारंपरिक मराठी कुटुंबात बायकोने नवऱ्याला ‘अहो’ अशी हाक मारणे, बांधकामावरील मजुराने त्याला शिवीनेच संबोधणाऱ्या मुकादमाला ‘आलो शेठ’ असा प्रतिसाद देणे ही उदाहरणे अनुक्रमे वांशिक, लैंगिक आणि वर्गीय असमानतेची दर्शक आहेत. दीर्घकालीन वापरामुळे हे संरचित भाषा वापराचे ढाचे ‘रूढी’मध्ये रूपांतरित होतात आणि नैसर्गिकच वाटायला लागतात. वास्तविक या संरचनेचे खरे स्वरूप उघड करून त्या मोडीत काढल्या जाऊ शकतात. आधुनिक मराठी कुटुंबातील नवरा-बायकोतील बदललेल्या संबोधनपद्धतीवरून हे सिद्ध होते. शाळा, पोलीस, न्याय, प्रसारमाध्यमे इ. इतर सामाजिक संस्थांतील वर्चस्वधारकही अशा भेदाधारित संरचनावर्चस्व ही नवर्गावर लादत असतात. एका विद्यापीठाने वितरित केलेल्या माहिती पत्रकातील हे वाक्य पहा -‘प्रस्तुत विद्यापीठातून पदवी घेणारे स्नातक खालील नियमांशी बांधील राहतील’.- अशासारख्या त्रयस्थ वाक्यरचनेतून अधिकारी व्यक्तींचे व अधिकार ज्यांवर गाजवायचा त्यांचेही निर्व्यक्तीकरण केले जाते. वरील सूचनेत विद्यार्थी विद्यापीठाच्या नियमांनी बांधले गेले आहेत व त्यांची जबाबदारी विद्यापीठ नावाच्या अ व्यक्तीवर दिसते. चिकित्सक संदेशप्रबंधक विश्लेषक अशा सूक्ष्म भाषिक संरचनांचा अभ्यास व भाषिक विश्लेषण करतो व प्रचलित प्रथा पद्धतींना शह देऊ शकतो. चिकित्सक संदेशप्रबंधक विश्लेषण पद्धतीचे हे एक सामाजिक योगदानच म्हटले पाहिजे.

चिकित्सक संदेशप्रबंधक विश्लेषक समाजातील भाषाव्यवहारांकडे, प्रचलित संदेशप्रबंधकांकडे डोळसपणे पाहतो. भाषावापराच्या भाषागत व भाषेतर सर्व संयुक्तिक संदर्भांचे परीक्षण व विश्लेषण करून त्यातील गर्भित मूल्यव्यवस्थेचा व मानसिकतेचा शोध घेतो.चिकित्सक संदेशप्रबंधक विश्लेषकाचा हा प्रयत्न संदेशप्रबंधकाचे निर्रचनीकरण (deconstruction), निर्गुढीकरण (demystification), निर्नैसर्गीकीकरण (de-naturalization), निर्मुखवटीकरण (unmasking) अशा वेगवेगळ्या शब्दांनी व्यक्त केले जाते.

आजच्या स्पर्धात्मक जगात टिकून राहण्यासाठी धडपडणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी, कोर्पोरेट्सनी आणि उद्योगधंद्यांनी भाषेच्या वापराचे एक नवीनच दालन खुले केले आहे. ते म्हणजे सर्व प्रसारमाध्यमांतून आकर्षक दृश्य, संगीत आणि चपखल भाषा वापरून उत्पादनांची जाहिरात करण्याचे व त्यांची विक्री वाढवण्याचे. केवळ भौतिक मूर्त उत्पादनेच नव्हेत तर कल्पना, श्रद्धा, प्रवृत्ती यांनाही बाजाराच्या कक्षेत आणले गेले आहे. ही मूर्त-अमूर्त उत्पादने विकण्यासाठी भाषेचे नवनवे अवतार अस्तित्वात आले आणि भाषा हीच एक विकाऊ वस्तू बनली.उपभोक्त्याला केंद्रस्थानी मानून त्याचा अनुनय करू पाहणारी ही आधुनिकोत्तर काळातील संस्कृती ‘उपभोक्तावाद’ म्हणून ओळखली जाते. फेअरक्लोच्या (१९९५) मते भांडवलशाहीचेच हे एक परिपक्व रूपआहे.बाजारीकरणामुळे राजकरणाच्या क्षेत्रातही मोठ-मोठे फलक,भाष्ये, आश्वासनांच्या जाहिराती, प्रचारकी गाणी इ. माध्यमातून ‘राजकीय जाहिरात’ हा नवाच संदेश प्रबंधक अस्तित्वात आला आहे. चिकित्सक संदेशप्रबंधक विश्लेषकासाठी आधुनिकोत्तर काळातील असे संदेशप्रबंधक हे एक आव्हान ठरू शकतात. जाहिराती व लोकांना भुरळ घालून चुकीचे संदेश पोहोचवणाऱ्या संदेश प्रवाहकांचे चिकित्सक परीक्षण करणे ही आजच्या काळाची गरजच ठरते. अशा संदेशप्रबंधकांची मांडणी, रचना, संहिता, भाषा-शैली, दृश्य व श्राव्य वैशिष्ट्ये आणि सामाजिक-सांस्कृतिक संदर्भ यांचे विश्लेषण करून जनजागृती करणे हा चिकित्सक संदेशप्रबंधक विश्लेषकासाठी  समाजपरिवर्तनाचा एक प्रभावी प्रयत्न ठरू शकतो.

संदर्भ :

  • Jowarski,Adam,Coupland,Nikolas (Edi),The Discourse Reader,London,1999.

#Critical Discourse Analysis, #Discourse Analysis, #Marathi, Pragmatics.