सजीवांच्या पंचसृष्टीपैकी एक सृष्टी. वनस्पती, प्राणी, प्रोटिस्टा आणि मोनेरा या सृष्टींपेक्षा फंजाय सृष्टी वेगळी मानली गेली आहे. या सृष्टीत दृश्यकेंद्रकी व एकपेशीय यीस्ट आणि बुरशी या सूक्ष्मजीवांचा तसेच दृश्यकेंद्रकी व बहुपेशीय कवकांचा म्हणजे अळिंबांचा समावेश होतो. या सृष्टीतील सजीवांची पेशीभित्तिका कायटीन, प्रथिने आणि मेद यांपासून बनलेली असते. पेशीभित्तिकेत कायटीन असणे, हे या सजीवांचे मुख्य लक्षण आहे. ते प्राण्यांप्रमाणे परपोषी असून अन्नाचे पचन करण्यासाठी पर्यावरणातील पदार्थांवर पाचक विकरे स्रवतात आणि अन्न शोषून घेतात. त्यांच्यात हरितलवके नसल्यामुळे प्रकाशसंश्लेषण घडून येत नाही. त्यामुळे ते परजीवी, सहजीवी किंवा मृतोपजीवी म्हणून जगतात. त्यांच्यात होणारी वाढ हीच त्यांची हालचाल असते.
बहुतेक कवके कवकतंतूच्या स्वरूपात वाढतात. कवकतंतू धाग्यांसारखे असून नळीप्रमाणे पोकळ असतात. त्यांचा व्यास २–५ मायक्रॉन (१०-६ मी.) असून लांबी कित्येक सेंमी. पर्यंत असू शकते. कवकतंतू टोकाला वाढत राहतात. कवकतंतूची टोकाला झालेली वाढ आणि टोकाला फुटलेल्या शाखा यांच्या एकत्रीकरणाने कवकजाल बनते आणि ते बहुधा कसेही वेडेवाकडे पसरलेले असते. कवकतंतू पटयुक्त किंवा बहुकेंद्रकीय असतात. काही कवकतंतू त्यांच्यात असलेल्या उभ्या भित्तिकेसारख्या संरचनेमुळे अनेक कप्प्यांमध्ये विभागलेले असतात. या भित्तिकेसारख्या संरचनेला पट म्हणतात आणि अशा कवकतंतूंना पटयुक्त म्हणतात. अशा कवकतंतूंमध्ये प्रत्येक कप्प्यात एक किंवा अनेक केंद्रके असतात. पटांवर छिद्रे असल्यामुळे त्यातून पेशीद्रव्य, अंगके आणि केंद्रके एका कप्प्यातून दुसऱ्या कप्प्यात जातात. बहुकेंद्रकी कवकतंतूंमध्ये कप्पे नसतात.
कवकांचे कवकजाल नुसत्या डोळ्यांना दिसू शकते. ओलसर भिंतींवर किंवा कुजलेल्या अन्नावर अनेकदा कवकजाल वाढलेले दिसते; त्यालाच सामान्यपणे बुरशी म्हणतात. प्रयोगशाळेत आगर जेलच्या माध्यमामध्ये वाढ केलेल्या कवकजालाला कवकाची वसाहत (निवह) म्हणतात. वसाहतींचा आकार आणि त्यांच्यातील रंगद्रव्ये यांनुसार कवकांच्या जाती ओळखता येऊ शकतात. उदा., आर्मीलेरिया सॉलिडिपस या जातीच्या कवकाची वसाहत ९०० हेक्टर क्षेत्रफळावर पसरली असून ती सु. ९,००० वर्षे जुनी आहे. लैंगिक प्रजनन करणारी कवके विशेष संरचना असलेले फलकाय (बीजाणू निर्माण करणारी संरचना) तयार करतात. उदा., अॅस्कोमायकोटा संघातील काही कवकांमध्ये अशी काही फलकाये छत्रीच्या आकाराची व मोठी असतात. त्यांना अळिंबे म्हणतात. बेसिडिओमायकोटा संघातील काही कवकांमध्येही अशी अळिंबे दिसून येतात.
कवकांच्या अनेक जातींमध्ये आश्रयीपासून अन्न मिळविण्यासाठी कवकतंतूंच्या संरचनेत बदल झालेले असतात. उदा., वनस्पतींवर वाढणाऱ्या कवकांना शोषकांगे असतात आणि वनस्पतींच्या मुळांवर वाढणाऱ्या कित्येक कवकांवर गाठी असतात. पदार्थावर किंवा पदार्थामध्ये कवकतंतूंच्या स्वरूपात होणारी वाढ किंवा आर्द्र वातावरणात पेशी म्हणून होणारी कवकांची वाढ ही पोषक पदार्थांचे शोषण प्रभावीपणे होण्यासाठी अनुकूलित झालेली असते. उदा., वनस्पतींमध्ये रोगकारक म्हणून वाढणारी अॅस्कोमायकोटा संघातील मॅग्नोपोर्थे ग्रीसिया कवके अशी शोषकांगे तयार करतात आणि त्यांच्याद्वारे ती पेशींमध्ये आत शिरतात.
कवकजालाने पर्यावरणातून मिळविलेल्या पोषक द्रव्यांमुळे कवके वाढत राहतात आणि वाढीच्या एका टप्प्यावर प्रजननक्षम पेशींची म्हणजे बीजाणूंची निर्मिती करतात. त्यांचा प्रसार वेगवेगळ्या प्रकारे घडून येतो. हे बीजाणू मुक्त होऊन योग्य आश्रयींवर जाऊन पडल्यावर बीजाणूंचे अंकुरण होते आणि कवकतंतू विकसित होतात. हेच कवकतंतू वाढत जाऊन त्यांचे रूपांतर कवकजालात होते.
कवकांचे प्रजनन गुंतागुंतीचे असते. त्यांच्यात अलैंगिक आणि लैंगिक प्रजनन घडून येते. बहुतेक कवकांमध्ये एकापेक्षा जास्त प्रजननाच्या पद्धती आढळतात आणि पर्यावरण स्थितीनुसार या पद्धती अवलंबिल्या जातात. बीजाणुनिर्मिती म्हणजेच बीजाणुकजनन हे कवकांच्या प्रजननाचे मुख्य उद्दिष्ट असते.
अलैंगिक प्रजननात कवकतंतूमध्ये सूत्री विभाजन घडून येते आणि कवकतंतूच्या टोकाला हजारो बीजाणू तयार होतात. हे बीजाणू एकसारखे असतात. काही कवकांमध्ये अनेक बीजाणू पिशवीसारख्या कोशात तयार होतात, त्यांना बीधाबीजाणू म्हणतात. काही कवके एखाद्या आधारावर बीजाणू तयार करतात, त्यांना कोनिडिओबीजाणू म्हणतात. काही कवकांमध्ये कवकतंतूचे तुकडे होऊन बीजाणू तयार होतात, त्यांना खंडबीजाणू म्हणतात. कवकांचे बीजाणू हलके असल्याने ते हवेत सहज पसरतात.
यीस्टसारख्या कवकामध्ये मुकुलन म्हणजेच अलैंगिक प्रजनन होते. या प्रक्रियेत पेशी एका कडेला फुगते आणि नवीन म्हणजे मुकुलबीजाणू पेशी तयार होते. अशा प्रकारे तयार झालेला नवीन मुकुल मूळ पेशीपासून वेगळा होऊन स्वतंत्रपणे वाढतो आणि मूळ पेशी मुकुलबीजाणूंची निर्मिती करीत राहते. योग्य पर्यावरणात या बीजाणूंचे अंकुरण होऊन नवीन कवके वाढीला लागतात.
ग्लोमेरोमायकोटा वगळता सर्व कवकांमध्ये अर्धसूत्री विभाजनाने लैंगिक प्रजनन घडून येते. प्राणी किंवा वनस्पती यांच्यातील लैंगिक प्रजननापेक्षा हे भिन्न असते. कवकांच्या वेगवेगळ्या गटांत बीजाणूंची संरचना, प्रजननाच्या पद्धती या बाबतींत फरक आढळतो आणि त्यानुसार त्यांच्या जाती ओळखता येतात. लैंगिक प्रजनन होताना काही जातींमध्ये दोन भिन्न संगमक्षम कवकांपासून आलेल्या केंद्रकांपासून बाह्यप्रजननाद्वारे युग्मक तयार होते, तर काही जातींमध्ये सारख्याच कवकांमधील दोन्ही केंद्रकांपासून युग्मक तयार होते.
बहुतेक कवके ऑक्सिजीवी असतात, तर काही कवके विनॉक्सिजीवी असतात. यीस्टसारखी कवके ऑक्सिजनच्या उपस्थितीत किंवा किण्वन क्रियेत वाढतात. बहुतांशी कवके साधारणपणे २३° से. तापमानाला वाढतात. परंतु रोगकारक कवके साधारणपणे ३७°से. म्हणजे मानवी शरीराच्या तापमानाला वाढतात. माध्यमाचा सामू (पीएच मूल्य) ५–६ असताना कवकांची वाढ जोमाने होते. म्हणूनच लिंबू वर्गातील फळे, भाज्या आणि योगर्ट यांवर बुरशी वाढलेली दिसून येते.
वर्गीकरण : कवकसृष्टीचे वर्गीकरण प्रामुख्याने पुढील संघांत केले जाते.
मायक्रोस्पोरीडिया : या संघात बीजाणुनिर्मिती करणाऱ्या एकपेशीय, परजीवी कवकांचा समावेश होतो. त्यांचा आकार १–४॰ मायक्रॉन असतो. त्यांच्यात तंतुकणिकांऐवजी तंतुकाय (मायटोसोम) असतात. कशाभिका नसल्यामुळे ते अचल असतात. ते कीटकांना बाधा पोहोचवितात. तसेच कवचधारी संधिपाद व मासे यांमध्येही ते रोग पसरवितात. त्यांच्या काही जाती मनुष्यांमध्ये आजार पसरवितात. हे बीजाणू आश्रयीशिवाय अधिक काळ तग धरून राहू शकतात. या संघात आंबिलीस्पोरिया सॅलिनेरिया, ग्लुगिया स्टेफनी, वावराइया क्युलिसीस इ. कवकांचा समावेश होतो.
कायट्रीडिओमायकोटा : या संघाचे नाव ‘कायट्रीडिऑन’ या ग्रीक शब्दावरून पडले आहे. या कवकांचे चलबीजाणू म्हणजे झूस्पोर्स हे वाडग्यासारख्या संरचनेत असतात. ही संरचना एखाद्या लहान वाडग्यात गोट्या ठेवल्यासारखी दिसते. म्हणून या संरचनेला ‘कायट्रीडिऑन’ म्हणतात. हे कवक मृतोपजीवी असून कायटीन व केराटीनयुक्त पदार्थांचा ऱ्हास करतात, तर काही परजीवी म्हणून वाढतात. हे बीजाणू अलैंगिक प्रजननातून निर्माण होतात. फक्त याच कवकांचे चलबीजाणू असतात, कारण त्यांना कशाभिका असतात. या संघात बॅट्रॅकोकायट्रीयम डेंड्रोबॅटिडीस व सिनकायट्रीयम एंडोबायोटिकम या कवकांचा समावेश होतो.
ब्लास्टोक्लॅडिओमायकोटा : या संघातील कवके परजीवी म्हणून वाढतात. ही कवके बीजाणू आणि कशाभिका असलेल्या युग्मकांची निर्मिती करतात. त्यांच्या काही जाती मृतोपजीवी, तर काही जाती अपृष्ठवंशी प्राण्यांमध्ये आणि वनस्पतींमध्ये रोग निर्माण करतात. या कवकांमध्ये पिढ्यांचे एकांतरण म्हणजे एका पिढीत अलैंगिक प्रजनन, तर पुढच्या पिढीत लैंगिक प्रजनन होण्याची प्रक्रिया दिसून येते. या संघात अॅलोमायसिस मॅक्रोजिनस आणि ब्लास्टोक्लॅडिला एमरसोनाय या कवकांचा समावेश होतो.
निओकॅलिमॅस्टिगोमायकोटा : या संघात विनॉक्सिजीवी कवकांचा समावेश होतो. ही कवके शाकाहारी प्राण्यांच्या पचनमार्गात आढळून येतात आणि बहुकेंद्रकी कवकतंतूंपासून लहानलहान कवकजाल तयार करतात. बीजाणूंना एक ते अनेक कशाभिका असतात. त्यांच्यात तंतुकणिका नसतात. या संघात सायलामायसेस अबॅरेन्सिस व निओकॅलिमॅस्टीक्स फ्रंटॅलिस या कवकांचा समावेश होतो.
ग्लोमेरामायकोटा : या संघात भूपृष्ठावरील परिसंस्थांच्या कार्यात उपयुक्त असलेल्या कवकांचा समावेश होतो. त्यांच्या काही जाती वनस्पतींच्या मुळांवर वाढतात व गाठी तयार करतात. अशा कवकांमध्ये आणि वनस्पतींमध्ये सहजीवन असते. वनस्पतींपासून या कवकांना शर्करा मिळते, तर ही कवके मुळांवाटे फॉस्फेट व इतर खनिजे पुरवितात. त्यांच्यात अलैंगिक प्रजनन होऊन बीजाणू तयार होतात. बीजाणू आकाराने मोठे व बहुकेंद्रकी असून त्यांचे कवकतंतू पटविरहित असतात. क्वचितच पटयुक्त असतात. या संघात जिओसायफन पायरीफॉर्मिस व गिगास्पोरा मार्गारेटा या कवकांचा समावेश होतो.
अॅस्कोमायकोटा : या संघातील कवके लैंगिक प्रजननात पिशवीसारख्या कोशात (अॅस्कस) बीजाणू तयार करतात, म्हणून त्याला अॅस्कोमायकोटा हे नाव दिले आहे. ही कवके मृतोपजीवी असून त्यांचे कवकजाल पटयुक्त असते. त्यांच्या सु. ६४,००० जाती आहेत. त्यांच्यात अलैंगिक तसेच लैंगिक पुनरुत्पादन होते. अलैंगिक प्रजननात कवकजालातील कवकतंतूंच्या टोकाला कोनिडीयाधर तयार होतात. त्यांमध्ये विबीजाणू (कोनिडीया) असतात. ते अचल असतात. लैंगिक प्रजननात दोन कवकजालांमध्ये मीलन घडून येते आणि पिशवीसारखा कोश म्हणजे अॅस्कस निर्माण होतो. एका कोशात सामान्यपणे आठ अॅस्कोबीजाणू असतात. या संघात उस्निया बार्बेटा, न्यूरोस्पोरा क्रासा, पेनिसिलियम क्रायसोजिनम व सॅकॅरोमायसीज सेरेव्हिसिआय (यीस्ट) या कवकांचा समावेश होतो.
बेसिडिओमायकोटा : या संघात सु. ३०,००० जाती आहेत. त्यांच्या लैंगिक प्रजननात कवकतंतूंच्या टोकाला गदेच्या आकाराच्या पेशी तयार होतात. या पेशींमध्ये चार बीजाणू असतात. त्यांच्यातील काही जाती मृत प्राणी, गवत, नाशवंत वनस्पती किंवा कुथित मृदा (ह्यूमस) यांपासून अन्न मिळवितात. कवकजाल अनेक शाखा असलेले व पटयुक्त असते. त्यांच्यात अलैंगिक बीजाणू निर्माण होत नाहीत; परंतु कवकतंतूंचे खंड होऊन अलैंगिक प्रजनन होते. लैंगिक प्रजननात दोन पेशी एकत्र येऊन पेशीद्रवाचे मीलन होते. नंतर फलकाय तयार होऊन केंद्रकांचे स्थलांतरण होऊन केंद्रकांचे मीलन होते. मीलनानंतर झालेल्या द्विगुणित पेशीचे अर्धसूत्री विभाजन होऊन एकगुणित बेसिडियम बीजाणू तयार होतात. या बीजाणूंच्या अंकुरणाने नवीन कवक तयार होतात. या संघात अगॅरीकस बायस्पोरस, युस्टिलॅगो सिटॅमिनी (ज्वारीवरील काणी रोग) व पक्सिनिया ग्रॅमिनीस (गव्हावरील तांबेरा) या कवकांचा समावेश होतो. या संघात मोठ्या संख्येने अळिंबे असल्याने या गटाला ‘अळिंबांचा संघ’ असेही म्हणतात.