मोरेसी कुलातील हा सदाहरित वृक्ष असून त्याचे शास्त्रीय नाव आर्टोकार्पस हेटरोफायलस आहे. वड, अंजीर, उंबर इ. वनस्पती याच कुलात मोडतात. फणसाचे मूलस्थान भारतीय द्वीपकल्प आहे, असे मानतात. आशियातील भारत, बांगला देश, श्रीलंका, व्हिएतनाम, थायलंड, मलेशिया व इंडोनेशिया तसेच आफ्रिकेतील युगांडा, मॉरिशस आणि दक्षिण अमेरिकेतील ब्राझील इ. देशांमध्ये फणस लागवडीखाली आढळतो. भारतात दक्षिण भागातील किनारी प्रदेश, बिहार आणि पश्‍चिम बंगाल येथे त्याची लागवड केली जाते. फणस हे बांगला देशाचे राष्ट्रीय फळ आहे.

फणस (आर्टोकार्पस हेटरोफायलस) : वृक्षाच्या खोडावर आणि फांद्यांवर लागलेली फळे (फणस).

फणस वृक्ष १८–२५ मी. उंच वाढतो. खोडाची साल जाड, काळसर व भेगाळलेली असते. पाने साधी, मोठी, गर्द हिरवी, वरून चकचकीत तर खाली फिकट, लंबगोल व गुळगुळीत असतात. फुले एकलिंगी असतात. नर-फुले व मादी-फुले वेगवेगळ्या फुलोऱ्यांत येतात. नर-फुलांचे गुच्छ नलिकाकृती असून ते पानांमागे दडलेले दिसतात. मादी-फुलांचे फुलोरे मोठे व काटेरी असतात. फळे मोठी, गोल किंवा लंबगोल आणि बाहेरून काटेरी असतात. फणसाचे संयुक्त फळ हे अनेक फुलांपासून तयार झालेले असते. याला सरसाक्ष प्रकार म्हणतात. फळे झाडाच्या मुख्य खोडावर आणि फांद्यांवर येतात. फळ वजनदार असते. सुरुवातीला हिरवे असणारे फळ पिकले की पिवळसर किंवा तपकिरी दिसते. फळात लहानलहान कप्पे असतात. त्या प्रत्येक कप्प्यात एक बी असते. बी आठळीसारखी असून तिच्याभोवती मृदू पिवळसर रंगाचा गोड गर असतो. बी  आणि गर यांना एकत्रितपणे गरा म्हणतात. बियांमध्ये पिठूळ व तेलकट खाद्य भाग असतो.

भारतात लागवडीखाली असलेल्या फणसाच्या फळांचे ढोबळमानाने कापा व बरका असे दोन प्रकार मानले जातात. कापा प्रकारच्या फळातील गरे कडक, खुसखुशीत, चवीला जास्त गोड व रुचकर असतात. बरका प्रकारातील फणसांचे गरे नरम, बिळबिळीत, चवीला कमी गोड किंवा सपक असतात. कापा फणसावरील काटे चपटे, लांबट व निमुळते असतात; तर बरका फणसावरील काटे आखूड व पसरट असतात. याखेरीज तमिळनाडूत लागवड होणारा रुद्राक्षी हा एक प्रकार आहे. त्याची फळे लहान व सालीवर कमी काटे असलेली असतात. श्रीलंकेमधून सिंगापुरी नावाचा प्रकार भारतात आला आहे. त्याची फळे सामान्य फणसाच्या हंगामापेक्षा वेगळ्या हंगामात येतात.

फणसाचे पिकलेले गरे खातात. गऱ्यांच्या मांसल भागात ७८·२% जलांश, १८·५% कर्बोदके तसेच आणि जीवनसत्त्वे असतात. त्यापासून जॅम, जेली, लोणची व पाक हे खाद्यपदार्थ तयार करतात. कोवळा फणस भाजीसाठी वापरतात. फणसाचे लाकूड जॅकवूड नावाने प्रसिद्ध असून ते फर्निचरसाठी वापरतात. त्याला वाळवी लागत नाही. काळ्या मिरीची वेल आधारासाठी बऱ्याचदा फणसाच्या झाडावर चढवितात.

https://www.youtube.com/watch?v=WdnQ7Axewcg

प्रतिक्रिया व्यक्त करा