स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी बालचित्रपट समितीची स्थापना केली. नेहरू यांना लहान मुलांविषयी विशेष प्रेम होते. पूर्णपणे भारतीय जाणिवांचे बालचित्रपट भारतातच तयार व्हावेत आणि या चित्रपटांतून मुलांच्या सर्जनशीलतेला प्रेरणा मिळावी, अशी पं. नेहरूंना अपेक्षा होती.

संस्थेचे अध्यक्ष : संस्थेच्या अध्यक्षांची निवड तीन वर्षांसाठी केली जाते. अनेक मान्यवरांनी या संस्थेचे अध्यक्षपद भूषविले आहे. यांमध्ये सई परांजपे, नफिसा अली,  नंदिता दास, अमोल गुप्ते यांचा समावेश आहे.

वाटचाल : पंडित हृदयनाथ कुंझरू यांच्या अध्यक्षतेखाली स्वायत्त संस्था म्हणून ही संस्था १९५५ मध्ये सुरू झाली. ही संस्था माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीत होती. संस्थेने निर्मिती केलेल्या जलदीप या पहिल्याच चित्रपटाने १९५७ च्या व्हेनिस चित्रपटमहोत्सवात सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा पुरस्कार पटकावला. तेव्हापासूनच ही संस्था मुलांच्या दर्जेदार चित्रपटांची निर्मिती, प्रदर्शन आणि वितरणाच्या क्षेत्रात कार्यरत आहे. लघुपट, दूरचित्रवाणीसाठी ॲनिमेशनपट (सचेतनीकरणपट) आणि माहितीपटांची निर्मिती ही संस्था करते. भारतीय चित्रपटसृष्टीत मोठे वलय असलेल्या मृणाल सेन, सत्येन बोस, तपन सिन्हा, के अब्बास, श्याम बेनेगल, एम्. एस्. सथ्यू, सई परांजपे, राम मोहन, ऋतुपर्ण घोष, संतोष सिवन, पंकज अडवाणी यांच्यासारख्या मान्यवरांनी संस्थेच्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्यांच्यासह नव्या आणि कल्पक चित्रकर्त्यांनी मुलांसाठी आशयसंपन्न चित्रपट निर्माण केले.

मुलांचे मनोरंजन करणाऱ्या, त्यांचा दृष्टिकोन विस्तारणाऱ्या, त्यांच्या अवतीभवतीच्या विश्वाचे प्रतिबिंब असलेल्या चित्रपटांना ही संस्था प्राधान्य देते. संस्थेने आतापर्यंत १० भाषांत २५० हून अधिक चित्रपटांची निर्मिती केली आहे. यांतील बहुतांश चित्रपटांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. दक्षिण आशियातील बालचित्रपटांची निर्मिती करणाऱ्या देशांमध्ये या संस्थेचे नाव महत्त्वाचे आहे. देशातील मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी ही संस्था दरवर्षी विविध ठिकाणी चित्रपट दाखवते. भारतातील बालचित्रपट चळवळीला प्रोत्साहन देऊन भारतीय बालचित्रपट जगभरात पोहोचविण्यासाठी ही संस्था कटिबद्ध आहे. उत्तम बालचित्रपट देशाच्या कोनाकोपऱ्यांतील बालप्रेक्षकांना उपलब्ध करून देणे, हे या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे. शहरी गरीब, ग्रामीण आणि आदिवासी मुले अशा क्रमाने ही संस्था ठिकठिकाणी नियमितपणे चित्रपट दाखवण्याची व्यवस्था करते. संस्थेचे बहुतांश चित्रपट प्रमुख भारतीय भाषांत भाषांतरित करण्यात आले आहेत. त्यामुळे विविध प्रांतांतील बालप्रेक्षक या चित्रपटांचा आनंद घेऊ शकतात.

कार्यपद्धती : बालचित्रपटनिर्मितीचे प्रस्ताव वर्षभर स्वीकारले जातात. संहितेच्या गुणवत्तेनुसार दिग्दर्शकांकडे चित्रपट तयार करण्याची जबाबदारी सोपवली जाते. भारतीय चित्रपटसृष्टीतील मातब्बर दिग्दर्शकांसह पहिलाच चित्रपट दिग्दर्शित करणाऱ्या दिग्दर्शकांनाही ही संधी देण्यात आली आहे. नव्या आणि कल्पक कथा-आशयाच्या पाठीशी उभे राहण्याला ही संस्था प्राधान्य देते. स्वतंत्रपणे चित्रपटनिर्मिती करण्याबरोबरच ही संस्था सहनिर्माती म्हणून कार्यरत आहे. संस्था दरवर्षी चाळीस लाखांहून अधिक मुलांसाठी प्रादेशिक चित्रपटमहोत्सव आयोजित करते, तसेच विशेष व्यवस्थेच्या माध्यमातून मुलांना विनामूल्य चित्रपट दाखवते. त्यासाठी स्वयंसेवी संस्था, राज्यसरकार, खासगी संस्था यांचे सहकार्य घेतले जाते.

संस्थेचे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे. तर चेन्नई (मद्रास) आणि दिल्ली येथे विभागीय कार्यालये आहेत. संस्थेच्या चित्रपटांचे हक्क भारतीय आणि परदेशातील निर्मात्यांना विकणे हा या संस्थेच्या महसुलाचा मुख्य स्रोत आहे. या हक्कांमध्ये दूरचित्रवाणी, चित्रपटप्रदर्शन, आंतरजाल (इंटरनेट) आदींचा समावेश असतो. स्वत:  निर्मिती केलेल्या चित्रपटांशिवाय उत्तमोत्तम परदेशी आणि देशातील चित्रपटांचे हक्क संस्था विकत घेते. हे चित्रपट प्रदर्शित केले जातात. मुलांनी उत्तमोत्तम परदेशी चित्रपट पहावेत, या उद्देशाने ते मुलांपर्यंत पोहचविले जातात. डीव्हीडीच्या माध्यमातून संस्था चित्रपट उपलब्ध करून देते. या डीव्हीडी संस्थेच्या निवडक दुकानांमध्ये उपलब्ध असतात.

उपक्रम : बालचित्रपटांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी संस्थेतर्फे आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय बालचित्रपट महोत्सव आयोजित करण्यात येतो.

उल्लेखनीय चित्रपट :

पहले आप (१९९९), हाथी का अंडा  (२०००), सिक्सर  (२००१), गुंजन (२००४), गिली गिली आट्टा  (२००५),  हयात  (२००६), गट्टू (२०११), वो (२०११)

समीक्षक – गणेश मतकरी

This Post Has One Comment

  1. Pandurang shrimandilkar

    Very nice wrote this type of cinema and thereimplimentation

प्रतिक्रिया व्यक्त करा