चित्रपटांचे प्रकार :

१८९५ मध्ये ल्युमेअरबंधूंनी फ्रान्समध्ये मूक-चलचित्रनिर्मिती सुरू केली, तेव्हा घडणारी घटना कॅमेऱ्याने मुद्रित करून हुबेहूबपणे दाखविणे एवढाच हेतू होता. परंतु या तंत्रज्ञानाचा विकास होताना त्यात नाट्य आणि कथनकलेच्या शक्यता दिसू लागल्या. व्यवसाय-धंदा म्हणूनही याकडे पाहिले जाऊ लागले. संस्थात्मक स्टुडिओपद्धतीने निर्मिती होऊ लागली. पुढे ध्वनीची जोड मिळाली. त्यातील आर्थिक गुंतवणूक वाढत गेली. त्यामुळे कोणत्या प्रकारचे चित्रपट केले म्हणजे कोणत्या प्रकारचा, किती प्रेक्षकवर्ग मिळतो, आर्थिक परतावा मिळतो, या सर्वांचा विचार प्रबळ होत गेला. जे आशयसूत्र मांडावयाचे आहे त्याला कोणत्या प्रकारची रचना, तंत्र योग्य ठरेल, याचाही अभिव्यक्तीच्या अंगाने विचार होऊ लागला. महत्त्वाच्या घटनांची मुद्रण-नोंदणी, दृक्-श्राव्य माहितीसंकलन या हेतूंबरोबरच वैविध्यपूर्ण विषयांवरचे, वेगवेगळ्या धाटणीचे ललित चित्रपट प्रचंड संख्येने निर्माण होऊ लागले. चित्रपटांचे रंजनमूल्य, कलामूल्य, समाजमान्यता आणि लोकप्रियता वाढली. त्यामुळे कोणत्या प्रकारचे चित्रपट बघायचे हे ठरविण्यासाठी प्रेक्षकांनाही वर्गीकरणाची गरज वाटू लागली. जनसंवादाचे माध्यम म्हणूनही स्थान मिळाल्यामुळे चित्रपटांचा औपचारिक अभ्यास होऊ लागला. अभ्यासात कोणती संकल्पना कोणत्या चित्रपटासाठी प्रस्तुत ठरते हे समजण्यासाठी वर्गीकरण लागते. ललित कथापट म्हणून चित्रपट तयार झालेला असेल, तर ऐतिहासिक सत्याच्या निकषावर त्याकडे बघणे चुकीचे ठरते, तसेच ‘सत्य’ गोष्ट म्हणून सादर केलेल्या कथेत वास्तवाचा पुरावा बघणे अगत्याचे ठरते. कलात्मक निर्मितीबरोबर चित्रपट हा तंत्राधिष्ठित आर्थिक व्यवहार-व्यवसायही असल्याने, त्याची भौगोलिक विभागांतील वितरणव्यवस्था लावण्यासाठीही वर्गीकरण गरजेचे असते. हे वर्गीकरण मुख्यतः तंत्रज्ञानावर आधारित आणि आशय-रचना-मांडणी (treatment) असे निकष वापरून केले जाते.

तंत्राधारित वर्गीकरणाचे निकष वापरून पुढील प्रकार सांगता येतात :

१. मूक किंवा दृक्-श्राव्य चित्रपट (ध्वनिवापराचे उपप्रकार – मोनो, स्टीरिओ, डॉल्बी, सराउंड साउंड इत्यादी).

२. कृष्णधवल किंवा रंगीत (यातही रंगतंत्र, रंगांचे पोत यांवर आधारित प्रकार – टेक्निकलर, ईस्टमनकलर इत्यादी).

३. चित्रचौकटीच्या आकारावर आधारित प्रकार – ३५/७५ मिमी., सिनेमास्कोप, आयमॅक्स इत्यादी.

४. चित्रणपद्धती – अभिनेत्यांचे जिवंत चित्रण, सचेतनीकरण (ॲनिमेशन) किंवा दोहोंचे मिश्रण.

५. चित्रीकरण आणि प्रक्षेपणपद्धतींवर आधारित – द्विमिती, त्रिमिती इत्यादी.

६. चित्रपटांची लांबी – पूर्ण लांबीचा कथापट  (८० मिनिटांपेक्षा जास्त ) किंवा लघुपट, लघुकथापटांचा गुच्छ इत्यादी.

७. अपेक्षित प्रेक्षकाधारित प्रकार – बालकांसाठी, कुमारांसाठी, सर्वांसाठी, प्रौढांसाठी इत्यादी.

चित्रपटनिर्मितीच्या हेतूवर आधारित मुख्य दोन प्रकार :  १. माहितीपट (nonfiction) – नोंदपट किंवा दस्तऐवजीकरण करणारे चित्रपट, शैक्षणिक चित्रपट, प्रचारपट इत्यादी.      २. कल्पित (fiction) किंवा ललित चित्रपट – (कलात्मक, व्यावसायिक-करमणूकप्रधान किंवा मध्यममार्गी इत्यादी.)

कल्पित किंवा ललित चित्रपटांत आशयसूत्र, कथेतील पर्यावरण, वातावरणनिर्मिती, अभिवृत्ती (मूड), प्रेक्षकांवर विशिष्ट मनोकायिक परिणाम करण्याची अपेक्षा ठेवून केलेली रचना यांवर आधारित उपप्रकार असतात. त्यांना ‘प्रकार’ न म्हणता ‘genre’ (फ्रेंच शब्द) म्हणजे ‘विधा’  ही संज्ञा वापरली जाते. विधा ही चित्रपटाची ‘मुख्य ओळख’ असते. त्यात इतर बाबी येतात; पण त्यांना दुय्यम स्थान असते. चित्रपट-अभ्यासासाठी वापरली जाणारी ‘विधा’ ही संकल्पना साहित्याच्या अभ्यासातून आलेली आहे.

ललित चित्रपटांच्या काही मुख्य विधा :

१.      देमार (ॲक्शन) – शक्ती-शौर्यप्रदर्शन, घटनांचा वेग, संकलनाद्वारे वेग, चांगल्या-वाइटाचा संघर्ष.

२.      साहसपट (ॲडव्हेंचर) – पर्वत, समुद्र, जंगल, वाळवंट इत्यादींवरच्या साहसी मोहिमा.

३.      विनोदपट (कॉमेडी) – प्रसंगाधिष्ठित, शारीर हालचालींवर आधारित, विसंगत व्यक्तिमत्त्वांच्या एकत्र येण्याने सातत्याने होणारी हास्यनिर्मिती.

४.      गुन्हेगारीपट-टोळीपट (क्राइम-गँगस्टर) – गुन्हा घडणे आणि गुन्हेगाराचा शोध हे आशयसूत्र धरून गुन्हा सिद्ध होणे, गुन्हेगारांना शिक्षा होणे, त्यांचा नायनाट करणे, बदला घेणे इत्यादी उपप्रकार हाताळले जातात.

५.      नाट्यपट (ड्रामा) – ही सगळ्यांत जास्त वापरली जाणारी विधा आहे. संविधानकाला धरून मांडणी करताना जीवनव्यवहारांना धरून येणारी सविस्तर व्यक्तिचित्रणे, त्यांचे नातेसंबंध-आंतरक्रिया, घडणाऱ्या बऱ्यावाईट घटना यांना किंवा चरित्रकथनाला महत्त्व दिलेले असते. वातावरण बरेचसे वास्तवदर्शी असते. विशेष परिणामासाठी (स्पेशल इफेक्ट) तंत्रज्ञानाचा वापर मर्यादित असतो.

६.      ऐतिहासिक/भव्य चित्रपट (एपिक) – यामध्ये ऐतिहासिक, पौराणिक घटना किंवा व्यक्तिरेखा कथेच्या केंद्रस्थानी असतात. स्थलकालाचा विस्तार मोठा असतो. निर्मिती भव्य स्वरूपाची आणि चित्रपटांची लांबीही बहुतांश वेळा मोठी असते.

७.      युद्धपट – ऐतिहासिक युद्ध, काल्पनिक देशांमधील युद्ध किंवा युद्धाची योग्यायोग्यता हे आशयसूत्र केंद्रस्थानी असते. कथाविस्तारात युद्धाचे सविस्तर चित्रण वापरलेले असते.

८.      भयपट – यामध्ये आशयसूत्र कोणतेही असले, तरी प्रेक्षकांवर भीतीचा मनोकायिक परिणाम घडविण्यासाठी विशिष्ट कथनशैली, वातावरणनिर्मिती आणि चित्रपटीय तंत्रे वापरलेली असतात.

९.      संगीतिका – बहुतांश वेळा मुख्य पात्रांपैकी काही पात्रे गायन, वादन, नृत्य यांत पारंगत असतात. त्यांच्या जीवनातील नाट्य रोचकपणे दर्शविण्यासाठी, कथा-विस्तारासाठी गायन, वादन, नृत्य यांना महत्त्वाचे आणि मुबलक स्थान दिलेले असते.

१०.  पाश्चात्त्य-हॉलिवुडमधील विधा – जगभर पसरलेली, अजूनही जिवंत असलेली खूप जुनी विधा. यामध्ये धूळभरली अन्यायग्रस्त गावे, भव्य आसमंत, चांगल्या-वाइटाचा संघर्ष (मूळ विधेत काउबॉइज-अमेरिकन इंडियन्स यांच्यातला संघर्ष), नव्या भूभागाचा-साधनसंपत्तीचा शोध इत्यादी आशय असतो.

विशिष्ट विधांमधे सातत्याने निर्मिती होताना पात्रांचे, घटनांचे, वृत्तिप्रवृत्तींचे साचेही  तयार होत जातात. (उदा., जुन्या हिंदी चित्रपटांतील डाकू, मराठी तमाशापटातील गावचा पाटील इ.)

बहुतांश  चित्रपट  हे  दोन  किंवा  अधिक  विधांचे  मिश्रण  असतात. विधा ही तशी सुस्पष्ट, साचेबंद संकल्पना नाही. मोठ्या संख्येने निर्माण होणाऱ्या चित्रपटांच्या वर्गीकरणासाठी योजलेले ते एक साधन आहे.

समीक्षक – अभिजित देशपांडे

प्रतिक्रिया व्यक्त करा