वक्रोक्तिजीवितम् : काव्यशास्त्रावरील एक संस्कृत ग्रंथ. कुंतक हा लेखक. भामहाने बीजरूपाने सांगितलेली वक्रोक्ति संकल्पना कुंतकाने सिद्धांत म्हणून प्रस्थापित केली. वक्रोक्ति हा काव्याचा महत्त्वाचा धर्म आहे आणि त्याच्या खेरीज काव्य संभवतच नाही असे तो मानतो. कुंतकाचा काल नवव्या शतकाच्या उत्तरार्धाचा असावा असे निश्चितपणे म्हणता येते. कुंतकाने ध्वन्यालोक या ग्रंथामधील एक कारिका, राजशेखराच्या काव्यातील उदाहरणे इ. उद्धृत केली आहेत. त्यावरून हा काळ ठरवला जातो.

या ग्रंथात चार उन्मेष आहेत. यातील चौथा उन्मेष अपूर्ण असावा, असे दिसते. ग्रंथाची रचना कारिका, वृत्ति आणि उदाहरणे या तीन भागात विभागलेली आहे. प्रथम उन्मेषात सुरूवातीला काव्याची पुरुषार्थचतुष्टयसिद्धी, व्यवहारबोध आणि आनंद ही तीन प्रयोजने सांगितली आहेत. पुढे काव्याचे लक्षण स्पष्ट केले आहे, ‘शब्दार्थौ सहितौ वक्रकविव्यापारशालिनि। बन्धे व्यवस्थितौ काव्यं तद्विदाल्हादकारिणि।’ सहृदय वाचकाला आल्हादित करणारे, वक्रकविव्यापाराने सुशोभित, आणि विशिष्ट बन्धामध्ये गुंफलेले, परस्परांशी सहितत्वाने जोडलेले शब्द आणि अर्थ म्हणजे काव्य होय. ‘अलंकृत’ म्हणजेच अपूर्व सौंदर्याने संपन्न असलेले शब्द आणि अर्थ मिळून काव्य होत असले तरी त्या दोन्हीसाठी ‘अलंकार’ म्हणजे फक्त वक्रोक्ति असते हे कुंतकाने ठामपणे मांडले आहे. आधी काव्य केले आणि मग त्यावर अलंकार चढवले असे होत नसते; काव्य आणि त्याचा अलंकार म्हणजे सौंदर्य दोन्ही एकजीव असतात हे कुन्तकाचे मत फ़ार मूलभूत विचार मांडणारे आहे.

कुंतकाने वक्रोक्ति हे व्यापक काव्यतत्त्व मानले. हे काव्याचे जीवित आहे, तसेच वक्रोक्ति हाच एकमेव अलंकार आहे हे आग्रहाने सांगताना वक्रोक्तिची व्याख्या केली आहे –‘वैदग्ध्यभङ्गीभणितिस्वरूपविचित्रैवाभिधा।’कविच्या कुशलतेमुळे उत्पन्न होणारे चमत्कृतिपूर्ण, वेगळेपणामुळे उठून दिसणारे शब्द आणि त्याचा अर्थ म्हणजे वक्रोक्ति होय. कवी नेहमीपेक्षा वेगळ्याप्रकारे कौशल्यपूर्ण अशी जी काव्यरचना करतो ती वक्र असल्यामुळे अधिक शोभायुक्त होते. त्याच्या मते काव्यामध्ये शब्द आणि अर्थ अलंकार्य होतात म्हणजेच त्या दोन्हीचा अलंकार केवळ वक्रोक्ति हाच असतो. ‘शब्दार्थांचे साहित्य’ ही कल्पना कुन्तकाच्या अगोदरच्या अनेक काव्यशास्त्रज्ञांनी मांडली, पण तिचे सुसंगत स्पष्टीकरण कुन्तकानेच प्रथम केले. कविप्रतिभा आणि कविव्यापार यांचे विश्लेषण, तसेच कवीला काव्यनिर्मितिप्रक्रियेत मध्यवर्ती स्थान देऊन केलेली त्या प्रक्रियेची मांडणी हे कुन्तकाच्या ग्रंथाचे विशेष होत.

कविगणिक प्रतिभेचे स्वरूप वेगळे, त्यामुळे वक्रतेचे असंख्य प्रकार होऊ शकतात; पण मुख्यत्वेकरून वक्रतेचे सहा प्रकार कुन्तकाने दाखविले आहेत. द्वितीय उन्मेषात वर्णविन्यासवक्रता, पदपूर्वार्धवक्रता, आणि पदपरार्धवक्रता(प्रत्ययवक्रता), तृतीय उन्मेषात वाक्यवक्रता, चतुर्थ उन्मेषात प्रकरणवक्रता आणि प्रबन्धवक्रता यांचे विवेचन आहे. वर्णांचा काव्यात भिन्नप्रकारे केलेला सौंदर्यपूर्ण उपयोग म्हणजे वर्णविन्यासवक्रता होय. अनुप्रास किंवा यमक यांचा समावेश यामध्ये होतो. प्रातिपदिक किंवा क्रियापदातील मूळ धातू यांच्या उपयोगामध्ये आणलेले वेगळेपण, वैशिष्ट्य किंवा सौंदर्य ही पदपूर्वार्धक्रता होय. त्याचे पाच उपप्रकार सांगितले आहेत. विशेषणवक्रता म्हणजे विशेषणामुळे विशेष्याचे सौंदर्य वाढणे, संवृतिवक्रता म्हणजे वैचित्र्यनिर्मितीसाठी किंवा काहीतरी विशेष अर्थ सूचित करण्यासाठी सर्वनाम इ. वापरून मूळ नाम लपवणे, वृत्तिवैचित्र्यवक्रता म्हणजे समास, तद्धित वगैरे वृत्तींच्या उपयोजनामुळे वैचित्र्य निर्माण होणे, भाववैचित्र्यवक्रता म्हणजे क्रियापदाला साध्यरूपाने दाखवल्यामुळे येणारे वैचित्र्य, लिंगवैचित्र्यवक्रता म्हणजे पुंलिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग यांची विशिष्ट प्रकारे योजना केल्यामुळे येणारे वैचित्र्य. त्यानंतर क्रियावैचित्र्यवक्रतेचे पाच प्रकार कुंतकाने स्पष्ट केले आहेत. क्रिया म्हणजेच धातू. धातूची वेगवेगळ्या पद्धतीने केलेली रमणीय रचना आणि तिचे पाच प्रकार यात सांगितले आहेत. नामाचा धातूशी असलेला संबंध यावर आधारित हे पाच प्रकार आहेत.

शब्दांना लागणाऱ्या प्रत्ययांच्या सौंदर्यपूर्ण वापरावरून प्रत्ययाश्रयवक्रतेचे सहा प्रकार केले आहेत. काळ, कारक, वचन, पुरुष, आत्मनेपद-परस्मैपद आणि प्रत्यय यातील औचित्यानुरूप वैचित्र्यामुळे काव्याचे सौंदर्य वाढते. उपसर्ग आणि निपात यांच्यामुळे येणाऱ्या वक्रतेचीही उदाहरणे कुंतकाने दिली आहेत. तृतीय उन्मेषात वाक्यवक्रतेच्या अंतर्गत वस्तु अथवा पदार्थ याच्या ठिकाणी जी सौंदर्यनिर्मिती करता येते त्याची मांडणी केली आहे. वस्तु याचा येथील अर्थ वर्णनाचा विषय असा आहे. रमणीय पद्धतीने केलेले, उत्कृष्टतेने परिपूर्ण, अत्यधिक सुकुमारता असलेले वैचित्र्यपूर्ण वर्णन म्हणजे वस्तुवक्रता होय. यामध्ये उपमा इ. अलंकारांचा वापर केलेला नसतो कारण त्यामुळे त्या विषयाची स्वाभाविक सुकुमारता कमी होण्याची शक्यता असते. हे वर्णन स्वभावोक्तिचे आहे असा आक्षेप काहीजण घेतात. पण कुंतकाला हे मत मान्य नाही. ध्वनि आणि व्यंजनावृत्ती यांचा समावेश वक्रोक्तित होतो याचे त्याने आग्रहाने प्रतिपादन केले आहे.

चौथ्या उन्मेषात प्रकरणवक्रता हा विषय आहे. अनेक वाक्यांचा समूह असलेला संपूर्ण प्रबंधाचा एक अंश म्हणजे प्रकरण. त्याचे नऊ प्रकार त्याने केले आहेत. कवी आपल्या प्रतिभेने कथानकात एखादे नवीन, वेगळे इतिवृत्त किंवा कथाभाग जोडतो ती प्रकरणवक्रता होय. त्या कथाभागामुळे मूळ कथावस्तू अधिक रमणीय किंवा अर्थपूर्ण होते. उत्तररामचरित या नाटकाच्या प्रथम अंकात चित्रदर्शनाचा कथाभाग योजून कवीने सीतेच्या भावी पुत्रांना रामाद्वारे दिलेल्या जृम्भकास्त्रांचा उल्लेख खुबीने केला आहे, हे याचे उदाहरण आहे. प्रबन्धवक्रता या भागात प्रबन्ध म्हणजेच संपूर्ण नाटक किंवा महाकाव्य यातील वैचित्र्य कशामुळे वाढते त्यासंबंधी विस्तृत वर्णन आले आहे. कथानकात केलेले बदल, विशिष्ट ठिकाणी काव्य समाप्त करणे, काही भाग गाळणे किंवा संक्षिप्त करणे, नीतीचा उपदेश अशा प्रकारे प्रबंधात म्हणजेच कथानकात वक्रता येते. रामायण-महाभारत या काव्यात अनुक्रमे असणारा करुण किंवा शांत रस यांचा समावेश त्याने प्रबंधवक्रतेत केला आहे. कुन्तकाने पूर्वोक्त अलंकारांतील फक्त वीस अलंकारांचा आपल्या ग्रंथात समावेश केला आहे. आणि त्यांचे विवेचन वेगळया पद्धतीने केले आहे. तसेच पूर्व स्वीकृत रसवत्, प्रेयस्, ऊर्जस्वि इ. १९ अलंकारांचे खंडन केले आहे.

कुतंकाने सुकुमार, विचित्र आणि मध्यम असे तीन मार्ग मानले आहेत. कवी त्यांच्या त्यांच्या स्वभावधर्माप्रमाणे काव्य लिहितात म्हणून मार्गांचे प्रकार कविस्वभावावर आधारित असतात, असे त्याचे प्रतिपादन आहे. मार्गांचे प्रसाद, माधुर्य, लावण्य आणि आभिजात्य हे चार गुण सांगितले आहेत. त्याने देशविभागावर आधारित रीतींचे खंडन केले आहे. देशाच्या आधारे रीती ठरवल्या तर देश तितक्या रीती मानाव्या लागतील, काव्यरचना ही काही त्या त्या देशाविशेषावर अवलंबून नाही त्यामुळे रीती देशाप्रमाणे ठरवू नयेत. तसेच रीतींमध्ये उच्च-नीचता मानणे अनावश्यक आहे असे कुन्तक सांगतो. सौभाग्य आणि औचित्य या दोन गुणांना कुंतकाने महत्त्व दिले आहे. काव्याचे उत्तम, मध्यम, अधम असे प्रतवार प्रकार करण्यास कुन्तकाचा विरोध आहे. जे उत्तम आहे, तेच काव्य या संज्ञेला पात्र ठरते, जे उत्तम नाही ते काव्यच नव्हे असे तो ठामपणे सांगतो.

संदर्भ : मिश्र,राधेश्याम, वक्रोक्तिजीवितम्,चौखम्बा प्रकाशन,१९६७.

समीक्षक : मंजुषा गोखले