काव्यादर्श : आचार्य दंडीरचित संस्कृत काव्यशास्त्राच्या परंपरेतील एक ग्रंथ. काव्यशास्त्रातील मूलभूत संकल्पना जाणून घेण्याच्या दृष्टीने हा ग्रंथ अतिशय अभ्यसनीय आहे. काव्यशास्त्राच्या इतिहासाच्या दृष्टीने इ. स. सहाव्या–सातव्या शतकांतील भामह व दंडी यांचे ग्रंथ हे आरंभीच्या काळातील महत्त्वाचे ग्रंथ आहेत. या ग्रंथाचे तीन परिच्छेद (विभाग) असून त्यात सुमारे ६६० श्लोक आहेत. काव्यादर्श  हा ग्रंथ कांचीच्या राजकुमाराला साहित्यशास्त्र शिकविण्यासाठी दंडीने रचला असे म्हटले जाते. दंडीने यामध्ये काव्याची व्याख्या पुढीलप्रमाणे केली आहे – ‘शरीरं तावदिष्टार्थव्यवच्छिन्ना पदावली।’ कवीला अभिप्रेत असलेला आशय प्रकट करणाऱ्या शब्दरचनेला काव्याचे शरीर असे म्हणतात. नैसर्गिक देणगी असलेली ‘प्रतिभा’, ‘श्रुत’ म्हणजे विद्वत्ता तसेच ‘अभियोग’ म्हणजे सराव हे दंडीने काव्यहेतू किंवा काव्यरचनेसाठी आवश्यक असलेले घटक मानले आहेत.

यातील प्रथम परिच्छेद ‘ मार्गविभाग ’ हा आहे. यामध्ये काव्याचे तीन भेद सांगितले आहेत – गद्य, पद्य आणि मिश्र. पद्याच्या प्रकारांपैकी महाकाव्य या महत्त्वाच्या प्रकाराचे दण्डीने केलेले विवेचन पुढील काळातील ग्रंथकारांनीही मान्य केले आहे. गद्याचे ‘आख्यायिका’ आणि ‘कथा’ हे दोन प्रकार सांगितले आहेत. कथा व आख्यायिका यांत मूलभूत भेद नसल्याचे दंडीचे मत आहे. मिश्र प्रकारात नाट्याचे विविध प्रकार व चम्पू हा काव्यप्रकार येतो. दंडीने भाषा या निकषाच्या आधारे साहित्याचे चार प्रकार मानले आहेत- ‘संस्कृत’, ‘प्राकृत’, ‘अपभ्रंश’ आणि ‘मिश्र’.

मार्ग म्हणजेच शैली बाबतचे दंडीने केलेले विवेचन महत्त्वाचे आहे. नंतरच्या काळात वामनाने त्याच्याच आधाराने ‘रीति’ ही संकल्पना विकसित केली. दंडीच्या मते सूक्ष्म भेदांमुळे वाणीचे म्हणजेच भाषेचे अनेक मार्ग तयार होतात. त्यांपैकी ‘वैदर्भी’ आणि ‘गौड़ी’ या दोन मुख्य व परस्परविरुद्ध असणाऱ्या मार्गांबद्दल विवेचन केले असून दहा गुणांचा परिचय दिला आहे व गुणांशी मार्गाची सांगड घातली आहे. श्लेष, प्रसाद, समता, माधुर्य, सुकुमारता, अर्थव्यक्ति, उदारता, ओज, कांति आणि समाधि हे दहा काव्यगुण होत. वैदर्भी या दहाही गुणांनी संपन्न असते ; तर गौडी प्रायः या दहा गुणांच्या विरुद्ध गुणांनी युक्त असते. असे स्पष्ट करत गुणांची व मार्गाची उदाहरणे दिली आहेत.

‘अर्थालंकार’ नामक दुसऱ्या परिच्छेदात अलंकारांचे विवेचन आले आहे. अलंकार हे काव्याला शोभा आणणारे धर्म आहेत (काव्यशोभाकरान् धर्मान् अलङ्कारान् प्रचक्षते ι) असे दंडी मानतो व अलंकार या काव्यघटकाला सर्वाधिक महत्त्व देतो. त्यामुळे गुण सुद्धा अलंकारांच्या कक्षेतच येतात. दंडीने अलंकाराची परिभाषा, लक्षण आणि उद्देश्य याबद्दल चर्चा केली आहे आणि मग स्वभावोक्ति, उपमा, रूपक, दीपक, आक्षेप, अर्थातरन्यास, व्यतिरेक, विभावना, समासोक्ति, अतिशयोक्ति, उत्प्रेक्षा, हेतु, सूक्ष्म, लेश, क्रम (यथासंख्य), प्रेयस्, रसवत्, ऊर्जस्वी, पर्यायोक्त, समाहित, उदात्त, अपह्नुति, श्लेष, विशेषोक्ति, तुल्ययोगिता, विरोध, अप्रस्तुतप्रशंसा, व्याजस्तुति, निदर्शना, सहोक्ति, परिवृत्ति, संसृष्टि, भाविक इत्यादी ३५ अलंकारांची लक्षणे, भेद आणि उदाहरणे दिली आहेत. यातील अनेक उदाहरणे दंडीने स्वतः रचलेली आहेत. रसापेक्षाही त्याने अलंकारांना महत्त्व दिले. त्यामुळे अलंकार हे रसाच्या संचाराचे साधन मानले आहे. तसेच रसवत् हा एक अलंकार मानून त्यात रसांचा समावेश केला आहे.

‘शब्दालंकार-दोष’ या तिसऱ्या परिच्छेदात ‘यमक’ अलंकाराचे सांगोपांग विवेचन आहे. आणि चित्रकाव्य, गोमूत्रिका, अर्धभ्रम, सर्वताभेद्र, स्वरनियम, स्थाननियम, वर्णनियम तसेच प्रहेलिका या शब्दालंकारांची लक्षणे व उदाहरणे दिली आहेत. ग्रंथाच्या शेवटी काव्यदोषांचे वर्णन केले आहे.

दंडीचे ३५ अलंकारांचे, विशेषत: शब्दालंकारांचे, विस्तृत विवेचन पुढील काळातील अलंकार चर्चेचा आधार ठरले आहे. दंडीचा महत्त्वाचा विचार काव्यमार्गासंबंधीचा आहे. त्याच्या वैदर्भ आणि गौड या काव्यमार्गांत केवळ प्रांतीय विशेषांची किंवा विशिष्ट रचनापद्धतीची नोंद घेण्याची दृष्टी नाही; काव्यमार्गाचा संबंध गुणांशी आहे हे त्याचे मत पुढील रीतिमार्गाला उपकारक ठरले. काव्यमार्गाचा अवलंब करून, विशिष्ट  गुणांची योजना आणि दोषांचा परिहार करून, लेखनास काव्यत्त्व येते असा त्याचा विचार आहे. वामनाने हा विचार पुढे नेऊन रीति-तत्त्व मांडले. तसेच पुढील कालखंडात आचार्य आनंदवर्धन यांनी मांडलेल्या संघटनादी कल्पनांचा संबंध दंडीच्या काव्यमार्गाशी आहे. पुढील काळातील काव्यचर्चेला दिशा देण्याच्या दंडीच्या क्षमतेमुळे संस्कृत साहित्यशास्त्राला त्याने दिलेले योगदान महत्त्वाचे ठरते.

संदर्भ :

  • शर्मा, योगेश्वरदत्त, काव्यादर्श, नाग पब्लिशर्स, १९९९.
  • Gupta, D. K.,A Critical Study of Dandin, Meharchand Lachhmandas, Delhi, 1970.
  • Kane, P. V., History of Sanskrit Poetics, Delhi, 1961.

समीक्षक : मंजुषा गोखले