वैद्यनाथ प्रासाद प्रशस्ति : देवकुमारिका ह्या स्त्री कवयित्रीने रचलेले संस्कृत काव्य (रचनाकाळ इ.स. १७१६). १८ वे शतक हा कवयित्रीचा कालखंड. ती चित्तोड येथील राणा अमरसिंहांची पत्नी, राणा जयसिंहांची सून आणि राणा संग्रामसिंहाची आई आहे. तिने मेवाड मधील राजघराण्याचा १३व्या शतकापासूनचा इतिहास ह्यामध्ये काव्यबद्ध केला आहे. देवकुमारिकेच्या पतीच्या निधनानंतर तिच्या मुलाला राज्याभिषेक झाला आणि त्याच सुमारास तिने वैद्यनाथाचे मंदिर बांधून घेतले. त्याच्या प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने देवकुमारिका हिने ह्या काव्याची रचना केली. ऐतिहासिकदृष्ट्या यातील माहिती पुष्कळ बरोबर असल्यामुळे ही रचना महत्त्वाची आहे. यातील कवींच्या उल्लेखांवरून ही रचना देवकुमारिका हिची आहे का आणखी कोणाची याबद्दल शंका निर्माण होते. काही श्लोकांवरून ही रचना हरिश्चंद्र याची असावी असे वाटते. तर श्रीनिवास राय याने ही रचना केली असावी असे काही उल्लेखांवरून वाटते. या रचनेतील काही श्लोक वैद्यनाथाच्या देवळातही कोरलेले सापडतात. त्याचे कर्तृत्व देवकुमारिका हिला दिले आहे. मात्र हस्तलिखातातील प्रकरणांच्या शेवटी येणाऱ्या माहितीतून हे स्पष्ट होत नाही की ही रचना देवकुमारिका यांनी स्वतः केली आहे की रचना करून घेतली आहे. किंवा यातील काही भाग हा हरिश्चंद्र आणि श्रीनिवास राय यांनी रचलेला असावा असेही वाटते.
या काव्याची एकूण पाच प्रकरणे आहेत – वंश प्रकरण, संग्रामसिंह अभिषेक प्रकरण, दान प्रशंसा, चाहुवानोद्भव, आणि वैद्यनाथ प्रशस्ति प्रकरण.याच्या पहिल्या प्रकरणात अमरसिंहाचा वंश आणि महत्त्वाच्या घटना यासंबंधी माहिती आहे. १२व्या शतकातील बाप्पा रावळ यांच्यापासून सुमारे २३ राजांची माहिती यात संकलित केली आहे. उदयपूर ह्या सुंदर शहराची निर्मिती उदयसिंह या राजाने केल्याचा उल्लेख यात केला आहे.राणा हे पद राहप्पा या राजाने भारतात प्रथम वापरले; कारण या वंशातले राजे रणामध्ये कुशल होते.अशाप्रकारे देवकुमारिकेने मेवाड राजांची नावे अशा पद्धतीने गुंफली आहेत की नावातून प्रत्येक राजाचे कार्य लक्षात येईल. दुसऱ्या प्रकरणात देवकुमारिकेचा मुलगा संग्रामसिंह ह्याच्या राज्याभिषेकाचे वर्णन आहे. या प्रकरणातून राज्याभिषेकाच्या रीतिरिवाजांची उत्तम माहिती मिळते.तसेच संग्रामसिंहाच्या पराक्रमाचे वर्णन केले आहे. शेवटच्या लढाईत संग्रामसिंह आणि दलेरखान या दोघांना वीरगती प्राप्त झाली. राजा संग्रामसिंह दानधर्मपरायण राजा होता. तिसऱ्या प्रकरणात राणा संग्रामसिंहाने केलेल्या दानधर्माचे स्वरूप कळते. तो नेहमी पंडित आणि विद्वानांना दान देत असे.
चौथ्या प्रकरणात संग्रामसिंहाच्या आजोळच्या राजघराण्याची म्हणजेच कवयित्रीचे माहेर चाहुवान यातील राजांसंबंधी तसेच देवकुमारिका राणीची वैयक्तिक माहिती आली आहे.तिच्या वडिलांचे नाव सबलसिंह तर भावाचे नाव सुलतानसिंह असे होते. राणा अमरसिंहाच्या मृत्यूनंतर देवकुमारिका विधवेचे जीवन जगताना अधिक धार्मिकवृत्तीची झाली. तिने तीन वेळा तुलादान केले. तिने शिवाचे एक मंदिर तयार करून घेतले. या मंदिरात एक विहिर खोदली. या मंदिराचा वरचा भाग सोन्याने मढलेला होता आणि त्यावरील काम फार सुंदर होते. अशी सर्व माहिती चौथ्या प्रकरणात आली आहे. पाचव्या आणि शेवटच्या प्रकरणात वैद्यनाथाच्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेबद्दलचा वृतांत सविस्तर लिहिला आहे. देवकुमारिका राणीला कोणीकोणी मदत केली, पौरोहित्य कोणी केले असे तपशील सुमारे २४ श्लोकांमधून दिले आहेत. यावेळी राणीने चौथे तुलादान केले.
या काव्याची भाषा सोपी आणि सुबोध आहे. अनुष्टुभ, वसंततिलका, इन्द्रवज्रा, उपजाति, भुजंगप्रयात यासारख्या छंदांमध्ये रचना लिहिली आहे. कवयित्रीने अतिशयोक्ती जाणीवपूर्वक टाळली आहे. काही ठिकाणी व्याकरणाच्या तसेच वृत्ताच्या थोडया चुका सोडल्या तर बाकी काव्य प्रासादिक आहे. काव्याचा खरा विषय पाचव्या प्रकरणात आला असला तरी, पहिली चार प्रकरणे ऐतिहासिकदृष्टया महत्त्वाची आहेत. या काव्याचे संपूर्ण हस्तलिखित सापडले; परंतु ते फार सुस्थितीत नाही. त्याचा रंग काही ठिकाणी फिका झाला असून काही भाग गाळला गेला होता. अशुद्ध लेखनामुळे अनेक दुरुस्त्या करण्याचीही गरज होती. आकाराने लहान असलेले हे काव्य मेवाडच्या इतिहासाच्या दृष्टिने आणि एका कवयित्रीने केलेली रचना यादृष्टीनेही महत्त्वाचे ठरते.
संदर्भ : Chaudhuri,J.B.,Sanskrit Poetesses – Part B,1940.
समीक्षक : शिल्पा सुमंत