उणादिसूत्रे : संस्कृत भाषेमध्ये साधित शब्द दोन प्रकारे तयार होतात. धातूला प्रत्यय लागून साधलेले शब्द व नामाला प्रत्यय लागून साधलेले शब्द. हे ते दोन प्रकार होत.त्यातील धातूला प्रत्यय लावून साधलेल्या रूपांना कृदन्त रूपे म्हणतात व त्या प्रत्ययांना कृत्प्रत्यय असे म्हणतात. कृत् प्रत्ययांमधील प्रत्ययांच्या एका गटाची सुरुवात उण् या प्रत्ययापासून केलेली आहे. जी सूत्रे या उण् पासून सुरु होणाऱ्या कृत् प्रत्ययांचे विधान करतात, त्यांना उणादिसूत्रे असे म्हणतात. हे उणादिप्रत्यय लागून तयार होणाऱ्या रूपांमध्ये अनियमितता असते, म्हणून यांना अव्युत्पन्न प्रातिपदिके असे सर्वसाधारपणे म्हटले जाते. पाणिनीय अष्टाध्यायीमध्ये उणादिसूत्रे येतात.
उणादिसूत्रांची रचना कोणी केली असावी याबद्दल बरेच तर्क लढवले जातात. त्यातील काही मते पुढीलप्रमाणे आहेत १. उणादिसूत्रांची रचना पाणिनीय सूत्रांशी मिळती जुळती असल्याने पाणिनी हाच उणादिसूत्रांचा रचनाकार असावा. २. उणादिप्रत्यय लागून तयार होणाऱ्या शब्दांमध्ये तांबूल,दीनार इत्यादि शब्दांचा समावेश असल्याने हे प्रत्यय पाणिनीनंतरच्या काळात सांगितले गेले असावेत.३. महाभाष्यकार पतंजली मुनींच्या मते उणादिसूत्रांचा कर्ता शाकटायन आहे.
४. इसवी सनाच्या चौदाव्या शतकातील विमल सरस्वती आणि नंतरचे दुर्ग आचार्य हे उणादिसूत्रांना वररुची कात्यायनाचे मानतात.
उणादिसूत्रांच्या रचनाकाराबद्दल असे अनेक भिन्न मतप्रवाह आहेत. पाणिनीय परंपरेतील सिद्धांतकौमुदी या ग्रंथात एकूण ७५९ उणादिसूत्रे समाविष्ट आहेत. ती पाच पादांमध्ये विभागली आहेत. पञ्चपादीतील उणादिसूत्रांवर ज्ञानेन्द्रस्वामी,उज्ज्वलदत्त व भट्टोजी दीक्षित यांचे टीकाग्रंथ मिळतात. पाणिनीय संप्रदायाप्रमाणे कातन्त्र, आपिशली, चान्द्र, शाकटायन,हैम,पद्मनाभ इत्यादी व्याकरण संप्रदायांमध्येही उणादिसूत्रे सापडतात. व्याकरणाच्या निरनिराळ्या संप्रदायांमध्ये फार तर्काला न धरता व व्यवस्थित रीतीने रूपे साधता न येणाऱ्या शब्दांचा समूह आहे. तो निरनिराळ्या उणादिसूत्रांनी सिद्ध केलेला आहे.
भाष्यकार पतञ्जलि मुनींच्या वेळी शब्दसिध्दीच्या संदर्भाने व्युत्पन्न पक्ष आणि अव्युत्पन्न पक्ष अशी दोन मते प्रचारात होती. व्युत्पन्नपक्ष असे मानतो की नामे ही धातूपासून साधलेली असलीच पाहिजेत. अव्युत्पन्न पक्ष असे मानतो की नामे ही धातूपासून साधलेली असलीच पाहिजेत असे नाही. संज्ञावाचक नामे व इतरही काही नामे ही धातुसाधित नसतात. या दोन्ही पक्षांचा विचार करताना असे दिसते की भाष्यकारांचा कल उणादि प्रत्ययांनी दिलेली व्युत्पत्ती काल्पनिकच आहे असे सुचवण्याकडे दिसतो. वार्तिककार कात्यायन वररुचिनेही हेच मत मांडलेले आहे. त्यांनी दाखविले आहे की उणादिसूत्रांना लागू न होणारे असे पाणिनीचे काही नियम आहेत. पाणिनीच्या विरुद्धही काही रूपे उणादि प्रत्ययांनी साधलेली दिसतात, याकडेही ते लक्ष वेधतात.
उणादिसूत्रांवर आधारित निरनिराळ्या रचना उपलब्ध आहेत. त्या पुढीलप्रमाणे आहेत :
- पञ्चपादी —सिद्धान्तकौमुदी ग्रंथात.
- दशपादी — प्रक्रियाकौमुदी ग्रंथात
- भोजकृत सरस्वती कंठाभरणातील पहिल्या तीन पादांमध्ये उणादिसूत्रे मिळतात.
- रामतर्कवागीश यांनी रचलेला उणादिकोश पद्यरचना संग्रह. यात उणादि प्रत्ययांनी साधेलेले शब्दांचे अर्थही आहेत.
- महान गणिती आर्यभट्ट यांचा मुलगा श्वेतवनवासिन् याची उणादि सूत्रांवरील व्याख्या –उणादिसूत्रवृत्ति नावाने उपलब्ध आहे
संदर्भ :१. अभ्यंकर, का. वा., श्रीमद्भगवत्पतञ्जलिकृत व्याकरणमहाभाष्य (मराठी अनुवादासह प्रस्तावना खण्ड , भाग ७), संस्कृत विद्या परिसंस्था, पुणे, २००६. २.भागवत, वा. बा.,पाणिनीय व्याकरणाचे अंतरंग, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ,पुणे, १९८८. ३. साठे,म. दा.,आठलेकर श्री.ल., लघुसिद्धान्तकौमुदी , संस्कृत विद्या परिसंस्था, पुणे, १९९८.
Keywords: #Paňcapādī,#uņādi,#kŗtpratyaya,#vyutpannapakşa,#avyutpannapakşa