समास : संस्कृतव्याकरणात कृदन्त, तद्धितान्त, समास, एकशेष, सनाद्यन्त धातु या पाच वृत्ती सांगितल्या आहेत. अवयव-पदांच्या अर्थाहून भिन्न असा अर्थ प्रतिपादित करणारी ती वृत्ती होय. या वृत्तिंपैकी समास हा शब्द सम् उपसर्गपूर्वक अस् धातूला घञ् हा प्रत्यय लागून झाला आहे. ‘एकत्र ठेवलेला’ असा त्याचा साधारण अर्थ होतो. म्हणून दोन किंवा जास्त शब्द एकत्र करून त्यांचा एकसंघ शब्द तयार करणे व विशिष्ट अर्थ प्राप्त करणे असा सर्वसामान्यपणे समासाचा हेतू असतो. समास हे संक्षिप्त, अलंकृत व विविधांगी अशा विशेष-अर्थप्राप्तीचे स्वरूप आहे. कमीत कमी शब्दांत भाषेला प्रौढी व आशयघनता देणे हे त्याचे वैशिष्ट्य. अर्थात अतिसामासिक रचना व दीर्घसमास यांमुळे भाषेत क्लिष्टता येते व अर्थप्राप्ती सुकर होत नाही. त्यामुळे अतिसमासप्रचुर अशी रचना हा साहित्यातील एक दोष मानला गेला आहे.

सामासिक शब्द तयार करताना त्यांतील शब्दांत सामर्थ्य म्हणजे आर्थिक (अर्थदृष्ट्या) संबंध असणे महत्त्वाचे. उदा. राज्ञः पुरुषः – राजपुरुषः – राजाचा सेवक. येथे राजन् व पुरुष या शब्दांत आर्थिक सामर्थ्य आहे. पण भार्या राज्ञः, पुरुषः देवदत्तस्य या वाक्यात राज्ञः पदाचा आर्थिक संबंध भार्या या शब्दाशी, तर पुरुषः पदाचा आर्थिक संबंध देवदत्त या शब्दाशी आहे. त्यामुळे राज्ञः पुरुषः यांच्यात जरी सान्निध्य असले तरी त्यांचा समास होऊ शकत नाही. जी पदे अर्थदृष्ट्या एकमेकांवर अवलंबून असतात अशा पदांचा समास होतो.

समासाचा अर्थ स्पष्ट करणाऱ्या वाक्याला विग्रह असे म्हणतात. सामासिक पदातील पदे वापरूनच हा विग्रह केला जातो. उदा. राजपुरुषः या समासाचा राज्ञः पुरुषः हा विग्रह आहे. परंतु काही समासांचा विग्रह या पद्धतीने होऊ शकत नाही. त्यांना नित्यसमास असे म्हणतात. उदा. कुपुरुषः या समासाची फोड म्हणजेच विग्रह करायचा झाल्यास कुत्सितः पुरुषः असा तो होईल. तिथे कु या पदाबद्दल कुत्सितः या  समासाबाहेरील पदाचा आधार घ्यावा लागतो. म्हणून नित्य समासांच्या अशा विग्रहांना अस्वपद विग्रह असेही म्हणतात.

समास बनवताना विग्रहातील  पदांच्या विभक्ति-प्रत्ययांचा लोप होतो. उदा. राज्ञः पुरुषः – राजपुरुषः – राजाचा सेवक. पण कधीकधी विभक्ति-प्रत्ययांचा लोप न होता ते प्रत्यय सामासिक शब्दांतही तसेच राहतात. उदा. युधि स्थिरः – युधिष्ठिरः । वाचः पतिः – वाचस्पतिः । कण्ठे कालः यस्य सः – कण्ठेकालः । कधी कधी एखाद्या संपूर्ण शब्दालाच दुसरा आदेश होऊन वेगळे रूप बनते. उदा. दम्पती(प्रथमा द्विवचन) – जाया च पतिः च । येथे जाया या शब्दाला दम् असा आदेश होऊन दम्पती असा समास झाला आहे.

समास झाल्यावर सामासिक पदामध्ये चार गुणधर्म येतात – ऐकपद्य, एकार्थ, एकविभक्तित्व व एकस्वरत्व. सामासिक पद हे अनेक शब्दांनी युक्त असे एकच पद मानले जाते, त्याला संघटित असा एकच अर्थ प्राप्त होतो, संपूर्ण सामासिक शब्दाला मिळून एकच विभक्ती मिळते व एकपदत्व मिळाल्याने (वेदांमध्ये) एकच (उदात्त) स्वर प्राप्त होतो.

पहा : समासाचे प्रकार

संदर्भ :

  • अभ्यंकर, काशिनाथ वासुदेव  (संपा.), श्रीमद्भगवत्पतञ्जलिविरचित व्याकरणमहाभाष्य, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे, १९६४.
  • साठे, म. दा., सिद्धान्तकौमुदी (मराठी भाषांतर – भट्टोजी दीक्षित),संस्कृत विद्यापरिसंस्था संस्कृत पाठशाला, पुणे, १९६५.

Keywords : #वृत्ति,#समास, #सामर्थ्य, #विग्रह, #ऐकपद्य