वर्तनवाद : मानव आणि प्राण्यांमधील वर्तनाला समजून घेण्यासाठी उभी राहिलेली सैद्धान्तिक चौकट. यात विचार, भावना, विवेक या गोष्टींचा प्राधान्याने विचार न करता अभिसंधानाच्या माध्यमातून मानवी वर्तनाची संगती लावली जाते. मानसोपचारांतही वर्तन बदलून मानसिक व्याधींवर इलाज करता येतो या धारणेतून मानसोपचार पद्धती विकसित झालेली आहे, तिला वर्तननिष्ठ मानसोपचार पद्धती म्हणतात. या अंतर्गत कोणतेही वर्तन हे कोणत्यातरी उद्दीपन- अनुक्रिया यांच्या साहाय्याने स्पष्ट केलेले असते.

भाषाभ्यासात या भूमिकेचे महत्त्व असे की, भाषा या घटिताला वर्तनवादी भूमिकेतून पाहू जाता भाषिक आकलन म्हणजे एक विशिष्ट प्रकारचे वर्तन ठरते. मानवी जीवनाच्या भाषिक समस्या मानसशास्त्राच्या आधारे सोडविता आल्या पाहिजेत,ही वर्तनवादाची अपेक्षा आहे.या वर्तनवादाची संगती लावण्यासाठी भाषा संपादनात  देखील केवळ उद्दीपन-अनुक्रिया यांचे क्रम ठरवले जातात. येथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, भाषा या घटिताला कोणतेही ज्ञानेन्द्रियनिष्ठ स्थान बहाल न करता एक वर्तनशृंखला म्हणून गृहीत धरले जाते. ज्ञानेन्द्रियनिष्ठ स्थान म्हणजे भाषा आत्मसात होण्यासाठी मेंदूमध्ये स्वतंत्र व्यवस्था असावी लागते असे गृहीत धरणे. माणसाला जशी पाच ज्ञानेन्द्रिये असतात,तद्वतच भाषा संपादनासाठी लागणारे इंद्रिय मेंदूमध्ये जैविक स्वरूपात उपस्थित असते असे ते गृहीतक आहे.[पाहा मनोवाद].

वर्तन म्हणून भाषा अभ्यासताना भाषा म्हणजे एक सवय किंवा अनेक सवयींचा ऐवज म्हणून लक्षात घेतली जाते आणि भाषेचा अभ्यास, तिचे विश्लेषण म्हणजे या दृश्य अभ्यासयोग्य भौतिक सवयींचे स्पष्टीकरण अशी भाषिक अभ्यासाची कल्पना वर्तनवादात केली जाते. या विशिष्ट सवयी म्हणजे अमुक एक भाषा असे का तर या सवयी आत्मसात होण्यामागे काही भाग प्रोत्साहनाचा म्हणजे अमुक एक प्रकारच्या वर्तनाला प्रवृत्त करण्याचा आणि तमुक एक प्रकारच्या वर्तनापासून परावृत्त करण्याचा भाग असतो. यांना अनुक्रमे प्रबलन (योग्य भाषिक सवयीला प्रोत्साहन) आणि व्यापारक अभिसंधान (अमान्य भाषिक सवयींपासून परावृत्त करणे) असे म्हणतात. थोडक्यात भाषा म्हणजे प्रबलन आणि व्यापारक अभिसंधान यांच्या साहाय्याने आत्मसात केलेल्या सवयी. इतर अनेक सवयी अशाप्रकारे आत्मसात केल्या जात असतात, भाषाही त्यांतील एक सवय असते. हातवारे, खानपान,  शिवाय वर्तनवादी भूमिकेतून भाषिक वर्तन हे उद्दीपक किंवा चेतक आणि अनुक्रिया किंवा प्रतिसाद यांची मालिका म्हणून लक्षात घेतले जाते.

भाषेचा अभ्यास करत असताना भाषा म्हणजे काय; याबरोबरच भाषा कशी आत्मसात होत असते हे पाहणे उद्बोधक ठरेल. एका टोकावर भाषा हे वर्तन असते अशी वर्तनवादी कल्पना तर दुसरीकडे भाषा ही उपजत असते आणि मेंदूतच भाषा आत्मसात करण्यासाठी जैविक व्यवस्था असते अशी मनोवादी कल्पना. यांच्या शिवाय ज्ञानात्मक भाषाविज्ञानात भाषा आत्मसात होण्यासाठी अशा स्वायत्त जैविक व्यवस्थेची कल्पना केलेली नाही.जे.आर.फर्थ यांच्या कार्यवादी भूमिकेत वर्तनवाद आणि मनोवाद यांचा समन्वय साधून भाषिक देवाणघेवाण आणि उपजत ज्ञानात्मक क्षमता यांच्या साहचर्यातून भाषा आत्मसात होत असते अशी भूमिका घेतलेली आहे.

एखाद्या अनुक्रियेला प्रोत्साहन अगर प्रबलनाची जोड मिळाल्यास तिचे (अनुक्रियेचे) रूपांतर सवयीत होते.प्रबलन सम्मत भाषिक अनुक्रिया ही मुलांमध्ये स्पष्ट स्वरूपात दिसू लागते ती त्यामुळेच. पूर्वीचे वर्तन पुन्हा होऊ शकेल अशी संभाव्यता ज्यातून वाढते अगर दुजोरा मिळतो त्यास प्रबलन म्हणतात. प्रबलन घडवून आणणार्‍या, म्हणजे प्रबलनाचे जे कारक त्यास प्रबलक म्हणतात. यात सकारात्मक आणि नकारात्मक प्रबलक असे दोन प्रकार असतात. स्तुती, पुनरुक्ती, वारंवारता किंवा काहीतरी भौतिक अनुमोदन (खाऊ, बक्षीस असे लहान मुलांना प्रोत्साहनार्थ दिले जाणारे काहीही) ही सकारात्मक प्रबलनाची उदाहरणे. तर नकारात्मक प्रबलनात परावृत्त करणे, रागावणे, दटावणे, एखाद्या कृतीवर, वर्तनावर निषेध नोंदवणे, प्रसंगी शिक्षा देणे इ०प्रकार मोडतात. अर्थात प्रत्येकच नकारात्मक प्रबलन म्हणजे काही शिक्षा नव्हे. शिक्षा ही वर्तन घडल्यानंतर होत असते, नकारात्मक प्रबलन हे मात्र कृतीच्या आधी, कृतीच्या वेळेसही घडू शकते.व्यापारक अभिसंधान हे प्रस्थापित झालेल्या किंवा आत्मसात झालेल्या वर्तनाला बदलण्यासाठी वर्तनाला दुजोरा देणे किंवा त्याचा निषेध करणे आणि वर्तनाआधी वर्तन नियंत्रित करण्यासाठी काही मोजकीच निवडक उद्दीपके वापरून अपेक्षित वर्तनाचा परिणाम साधलेला असतो. एकुणात वर्तनवादाने भाषेला संपूर्णपणे वर्तन म्हणून अभ्यासल्याने भाषेच्या सर्जनशील प्रयोगाचा,अश्रुतपूर्व, नवी वाक्ये बनवण्याची क्षमता यांचा मात्र खुलासा होत नाही.

संदर्भ : स्किनर, बी.एफ़ ,वर्बल बिहेवियर, अ‍ॅपलटन सेंचुरी क्रॉफ़्ट्स, न्यूयॉर्क, १९५७.

Keywords:#Behaviorism,#Mentalism,