आंतरराष्ट्रीय व्यवहारात वापरले जाणारे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे चलन. हे चलन यूरोपीयन संघ राष्ट्रांचे अधिकृत चलन आहे. यूरोपीयन संघाच्या २८ सदस्य राष्ट्रांपैकी एकूण १९ सदस्य राष्ट्रे या चलनाचा अधिकृतपणे वापर करतात. त्यांमध्ये कॅनडा, स्वित्झर्लंड, ॲम्स्टरडॅम, ब्रूसेल्स, पॅरिस आणि लंडन हे युरो चलन बाजारातील प्रमुख केंद्र आहेत. युरो चलन ‘€’ या चिन्हाने दर्शविले जाते.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळापर्यंत ब्रिटिश पौंड-स्टर्लिंग हे चलन जागतिक चलन म्हणून मान्यता प्राप्त होते आणि ब्रिटिश अर्थव्यवस्था ही जागतिक वित्तीय क्षेत्रात केंद्रस्थानी होती. दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक वित्तीय केंद्र अटलांटिकच्या पश्चिमेकडे सरकून जागतिक व्यापाराची उलाढाल अमेरिकन डॉलर या चलनात होऊन जागतिक व्यवहारातील आर्थिक नेतृत्व अमेरिका या देशाकडे आले. डॉलर हे सोने या धातुशी परिवर्तनशील होते. त्यामुळे अमेरिकन डॉलर या चलनाची मागणी अतिशय वाढली होती. यूरोपीय देशांनी सोन्याच्या साठ्याबरोबर डॉलरचा साठासुद्धा ठेवण्यास सुरुवात केली. डॉलरचा वापर इतर परकीय चलन मिळविण्यासाठीही करण्यात येत होता. अमेरिकेने विविधी देशांना डॉलरच्या स्वरूपात आर्थिक साह्य देण्यास सुरुवात केली. त्यामुळे काही यूरोपीयन राष्ट्रांकडे डॉलरचा अतिरिक्त साठा जमा होऊन युरो-डॉलरचा उद्भव झाला. १९७१ मध्ये अमेरिकेने डॉलरचे अवमूल्यन केल्याने युरोपीयन व इतर देशांतील निर्यात्तीत वृद्धी झाली. युरो-डॉलरचे महत्त्व कमी होऊन मार्क (जर्मन), येन (जपान), लीरा (इटाली), फ्रँक (स्वीत्झर्लंड) इत्यादी चलनांचे महत्त्व आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढले आणि युरो-डॉलर बाजाराने युरो चलनाचे स्वरूप घेतले.

७ फेब्रुवारी १९९२ रोजी मास्ट्रिक्ट (नेदर्लंड्स) येथे एक करार होऊन यूरोपीयन संघाने समान चलन वापरण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने १६ डिसेंबर १९९५ रोजी माद्रिद येथील बैठकीत चलनाला युरो असे नाव देण्यात आले. त्यानंतर ३१ डिसेंबर १९९८ रोजी युरोचा विनिमय दर ठरविण्यात येऊन १ जानेवारी १९९९ पासून विनिमयाचे सामायिक चलन म्हणून युरोचा स्वीकार करण्यात आला; मात्र सुरुवातीला त्याचा वापर केवळ इलेक्ट्रॉनिक स्वरूपाचाच होता. नंतर १ जानेवारी २००० रोजी युरोच्या नोटा व नाणी व्यवहारात अधिकृतपणे वापरात आली.

युरो चलन बाजार हे यूरोपमधल्या व्यापार केंद्रात सीमित न राहता अंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त झाला  आहे. हा बाजार सर्व प्रकारच्या बंधनापासून मुक्त असा बाजार आहे. यूरोपीय संघ राष्ट्रांनी यूरोपीय चलनविषयक व्यवस्था अनुसरलेली असून त्यांच्या चलनाच्या विनिमयदराचे सापेक्ष स्थर्य आणि त्याद्वारे परस्परांना लाभ ही त्या चलन व्यवस्थेची प्रमुख उद्दिष्ट आहे. युरो चलन बाजार हे स्पर्धात्मक आणि संवेदनशील आहे. यूरोपीय मध्यवर्ती बँक ही युरो चलन व्यवस्थेची शिखर बँक म्हणून काम पाहते. या बँकेमार्फत एक दुसऱ्यांना युरो चलन हे डॉलर चलनामध्ये देण्याघेण्याचे व्यवहार करते. संघराष्ट्रांच्या मध्यवर्ती बँकांचे अध्यक्ष हे यूरोपीय संघाच्या आर्थिक धोरणासंबंधी सल्लामसलत करीत असतात. सामाजिक चलनविषयक अथवा मौद्रिकविषयक धोरणाची जबाबदारी संघराष्ट्रांच्या मध्यवर्ती बँकांच्या सर्वोच्च मंडळांकडे आहे. सध्या युरो चलनाचा व्याप्त ५५ देशांतल्या ६०० हून अधिक बँकांपर्यंत झालेला आहे. टोक्यो (जपान), हाँगकाँग (चीन), न्यूयॉर्क (अमेरिका) या शहरांत युरो चलनात व्यवहार करणाऱ्या मोठ्या बँका अस्तित्वात आहेत. उदा., जर पॅरिसमधली एखादी बँक फ्रान्समधल्या बिगर रहीवाश्यांकडून डॉलर, मार्क, लीरा इत्यादी परिवर्तनशील परकीय चलन ठेवीच्या स्वरूपात स्वीकारत असेल, तर ते चलन युरो चलन म्हणून ओळखले जाते. तसेच ही ठेवी डॉलरच्या स्वरूपात असेल, तर त्याला ‘युरो डॉलर’,  मार्कच्या स्वरूपात असेल, तर त्याला ‘युरो मार्क’ असे म्हणतात. अशा प्रकारे युरो चलनात युरो डॉलर, युरो मार्क, युरो पौंड-स्टर्लिंग इत्यादी विदेशी चलनांचा समावेश होतो. युरो चलनात युरो डॉलरचे प्रमाण जात असून ९०% पर्यंत व्यवहार युरो डॉलरमध्ये केले जाते.

युरो चलन बाजारातील मागणी करणारे पक्ष व पुरवठा पुरवणारे पक्ष सारखेच असून त्यात बिगर-बँकिंग संस्था, केंद्रीय बँक,व्यापारी बँकिंग संस्था, परकीय व्यापारी संस्था, परकीय चलन विनिमय व्यापारी, निर्यातकार-आयातकर इत्यादीचा समावेश केला जातो.

युरो चलन बाजाराची व्याप्ती व त्याची कारणे : १९६०च्या काळात बाजारात युरो चलनाचा साठा १ अब्ज डॉलर एवढा होता जे १९९९च्या काळात वाढून अंदाजे ४५०० अब्ज डॉलर एवढा झाला. युरो चलनाच्या साठ्यात जी वाढ झाली, त्याची कारणे पुढीलप्रमाणे :

  • (१) नियंत्रण मुक्तता : युरो चलन बाजार सरकारी नियंत्रण मुक्त असल्याने त्यावरील व्याजाचे दर सरकारद्वारे नियंत्रित केले जात नाही. त्यामुळे या बाजाराची मोठी वाढ होऊन युरो चलनात वाढ झाली आहे.
  • (२) परकीय व्यापार व्यवहारातील वृद्धी : परकीय व्यापार व्यवहारात मोठी वृद्धी झाल्याने या व्यवहाराच्या पूर्ततेसाठी युरो चलनाच्या मागणीचीही वाढ झालेली आहे.
  • (३) चलन दरातील स्थिरता : युरो चलनातील दर सामान्यपणे हे व्याज दरावर अवलंबून असून त्याचे चलन दर जास्त स्थिर मानले जाते. त्यामुळे युरो चलनातील वाढ झालेली दिसून येते.
  • (४) युरो-बॉन्ड्स : १९६३ पासून युरो-बॉन्ड्स बाजार विकसित झाल्याने युरो चलनाची विश्वतता वाढलेली आहे.
  • (५) व्याज दरातील विभिन्नता : डॉलरवर मिळणारे व्याजदर युरोपियन बँकेत अमेरिकेतील बँकाहून जास्त असल्याने युरोपीयन बँकेत युरो चलनाचा साठा वाढलेला आहे.
  • (६) युरो चलन बाजाराची कार्यपद्धत : युरो चलन बाजारातील सौदे सरकारी नियंत्रणाखाली येत नसल्याने ते असुरक्षित ऋणाच्या स्वरूपात असतात. त्यामुळे अल्पकालीन व्यापार व्यवहारात युरो चलनाचा मोठा वापर केला जातो. युरो चलन बाजारातील सौदा-व्यवहार मोठ्या प्रमाणात मध्यस्त असलेल्या व्यक्ती किंवा संस्थांद्वारे दूरध्वनी, टेलेक्स इत्यादींद्वारे केला जातो.

युरो चलनाच्या वाढीचा तक्ता

वर्ष युरो चलन साठा (अब्ज डॉलरमध्ये)
१९६०
१९७० ५७
१९८० १५२५
१९९० ३३५०
१९९९ ४५००

 

युरो चलन बाजाराचे महत्त्व : युरो चलन बाजारामुळे आंतरराष्ट्रीय चलन बाजारात वेगवेगळ्या देशांच्या चलनाचा समावेश झाल्यामुळे देशांतील परस्पर संबंध मजबूत झालेले दिसून येते. युरो चलन बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना उच्च व्याजदरामुळे मोठा लाभ मिळत असतो. युरो चलनाचा एका बाजारातून दुसऱ्या बाजारात सुरळीतपणे विनिमय करणे तसेच स्थानांतरण करणे शक्य असल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात व्याजदरातील स्थिरता ठेवणे शक्य असते. विकसनशील देशांना युरो चलन बाजारातून परकीय चलन मिळविणे सोयीस्कर आणि स्वस्त असल्यामुळे विकासासाठी लागणारी गुंतवणूक करणे शक्य होते.

युरो चलन बाजार आणि भारत : भारताच्या ऑईल ॲण्ड नॅचरल गॅस कंपनीने (ONGC) सर्वप्रथम १९७७ मध्ये आपल्या गुंतवणूकीच्या गरजा भागविण्यासाठी युरो चलन बाजारातून ५० कोटी डॉलरचे कर्ज घेतले. त्यानंतरच्या काळात भारताने युरो चलन बाजारातून घेतलेल्या कर्जाचे प्रमाण सातत्याने वाढत गेले आहे.

भारताने घेतलेल्या युरो चलन कर्जाचा तक्ता

वर्ष घेतलेले ऋण (अंदाजित किंमत दश लक्ष डॉलरमध्ये)
१९७७ ५०
१९८० ६०.७
१९८२ ९९९
१९८३ ७९०
१९८५ १९०६
१९८८ २६५४
१९९९ १८८०

वरील तक्त्यानुसार भारताने १९८१-८२ या आर्थिक वर्षात युरो चलन बाजाराकडून सुमारे ९९९ दश लक्ष डॉलर इतके ऋण मिळवले होते. त्यांपैकी भारत सरकारने नॅशनल ॲल्युमिनियम कंपनीला ६८० दश लक्ष डॉलर एवढे ऋण दहा वर्षांच्या कालावधीसाठी दिले होते. याच प्रमाणे १९८२-८३ या आर्थिक वर्षात पाराद्वीप स्टील या योजनेसाठी ७१५ दश लक्ष डॉलरचे ऋण देण्यात आले होते.

युरो चलन बाजाराविषयी आशावादी आणि निराशावादी असे दोन विभिन्न मते दिसून येतात. आशावादींच्या मते, अमेरिकेने डॉलर व्यवहारात काही नियंत्रण/मर्यादा घातल्या असल्या, तरी युरो चलन बाजारात डॉलरचा प्रभाव कमी होत चालला आहे. आंतरराष्ट्रीय चलन बाजार व्यवहारात युरो मार्क, युरो पौंड-स्टर्लिंग इत्यादी चलनांचा वापर ३०% ते ३५% पर्यंत वाढला असल्याने युरो चलन बाजार सैदव अस्तित्वात राहील. या व्यतिरिक्त युरो चलन बाजारातील व्यवहार व्यवस्थीत रित्या राबविल्यास याचा उत्तोरत्तर विकास होत जाईल. याउलट निराशावादींच्या मते, युरो चलन बाजारातील ७०% व्यवहार डॉलरमध्येच होतो. अमेरिकेचे व्यवहार शेष नकारात्मक दराने वाढत गेला किंवा अमेरिकेने बिगर रहिवाश्यांच्या डॉलरमधील व्यवहारात नियंत्रण टाकले, तर युरो चलन बाजारात मोठी घडामोडी घडू शकते. याशिवाय युरो चलन बाजारात सरकारी नियंत्रण नसल्यामुळेसुद्धा संघटनात्मक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

संदर्भ : Mckinnon, Ronald Ian, The Eurocurrency Market, New Jersey, 1977.

समीक्षक : अनील पडोशी