कुरका : (तमिळ आणि मल्याळी कुरका, किसंगू; इं. कंट्री पोटॅटो; लॅ. कोलियस पार्व्हिफ्लोरस, को. ट्यूबरोझस ; कुल-लॅबिएटी). या वर्षायू (एक वर्ष जगणाऱ्या) ओषधीचे  खोड ३० – ६० सेंमी. उंच, बळकट व मांसल असते. मुळे ग्रंथिल असतात. पाने सदेठ, गोलसर-अंडाकृती, विशालकोनी, ओबडधोबड दातेरी, केसहीन किंवा जवळजवळ तशी असतात. फुलांच्या मंजिऱ्या विरळ असून त्यांत पुष्कळ फुले असतात. वरच्या पुष्पकोशाचा ओठ अंडाकृती असतो,  तर खालच्याचा विशालकोनी किंवा सर्वांत खालच्याचा सुईच्या टोकासारखा असतो.

हे एक बटाट्यासारखे पीक आहे. याचे मूलस्थान आफ्रिका असून अरबांनी ते मलबार किनाऱ्याद्वारे प्रथमतः भारतात आणले. केरळ राज्यात कुरक्याची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यांतही थोड्याफार प्रमाणावर कुरक्याची लागवड करतात. महाराष्ट्रात ते विशेष परिचित नाही, फक्त पुणे विभागात काही थोड्या प्रमाणात त्याची लागवड करण्यात येते. भारताशिवाय श्रीलंका, जावा, इंडोचायना, उष्णकटिबंधीय आफ्रिकेच्या काही भागांत याची लागवड करतात.

हवामान व जमीन : उष्ण व दमट हवामान या पिकाला चांगले मानवते. सर्वसाधारणपणे १५०–१७५ सेंमी. वार्षिक पर्जन्यमान लागते.

मध्यम प्रतीची, ३०–४० सेंमी. खोलीची जमीन या पिकास चांगली मानवते. जमीन खोल नांगरून हेक्टरी ३०–३५ टन शेणखत घालून तीनचार कुळवाच्या पाळ्या देऊन भुसभुशीत करून सऱ्या पाडून अगर वाफे करून त्यांत लागवड करतात.

लागवड : मे-जूनमध्ये वेलाचे तुकडे अगर कंद लावून तयार केलेली रोपे २०–२५ सेंमी. अंतरावर पाचसहा सेंमी. खोल लावतात. पिकाच्या दोन ओळींतील अंतर ६० ते ९० सेंमी. ठेवतात. एका हेक्टरला पुरेशी रोपे मिळविण्याकरिता २०० चौ. मी. क्षेत्राच्या गादीवाफ्यावर १५ ते २० सेंमी. अंतराने लहान आकाराचे एकूण १८ ते २० किग्रॅ. वजनाचे कंद लावतात.  एका महिन्यात त्यांच्यापासून १० ते १५ सेंमी. उंचीची, चारपाच पानांची लागणीलायक रोपे तयार होतात. त्यांना जरूरीप्रमाणे पाणी देतात. एकेका कंदापासून बरीच रोपे मिळतात. लागवडीचा दुसरा प्रकार म्हणजे पूर्ण वाढलेल्या वेलाचे २० ते २५ सेंमी. लांब तुकडे सऱ्यांतील वरंब्यांच्या दोन्ही बाजूंना त्यांची दोन्ही टोके बाहेर ठेवून मधला भाग जमिनीत पुरून अगर त्या तुकड्याचे कडे करून जमिनीत पुरून लावतात.

आंतर मशागत : लागवडीनंतर तीनतीन आठवड्यांच्या अंतराने दोनतीन वेळा निंदणी करतात. उथळ खांदणी करून पिकाला मातीची भर देतात. अमोनियम सल्फेटसारख्या नत्रयुक्त खतामुळे पिकाला बराच फायदा मिळतो. बागायती पिकाला हेक्टरी ५० किग्रॅ. नत्र वरखताच्या रूपाने देऊन खांदणी करतात. यामुळे कंद भरपूर येतात. आवश्यकतेप्रमाणे पिकाला पाणी देतात.

काढणी : लागवडीपासून ६-७ महिन्यांनी पिकाची पाने पिवळी पडू लागली म्हणजे ते तयार झाले असे समजतात. कंद जमिनीत फार खोल लागत नसल्यामुळे लहानशा कुदळीने ते ऑक्टोबर–नोव्हेंबरमध्ये खणून काढतात.

उत्पन्न : चांगल्या पिकापासून हेक्टरी ८–१० टन कंद मिळतात. सामान्यतः हेक्टरी सरासरी ६–७ टन उत्पन्न येते. कंद काळसर पिंगट रंगाचे असून त्यांना वास चांगला येतो. पुढील पिकासाठी बेणे म्हणून वापरण्याकरिता निवडक कंद थंड आणि हवेशीर जागेत स्वच्छ रेतीच्या सु. २.५ सेंमी. जाडीच्या थराखाली झाकून ठेवतात.

उपयोग : कंद बटाट्याप्रमाणे भाजीसाठी अगर उकडून खाण्यासाठी वापरतात. कंदात १९·७% स्टार्च, १·३% प्रथिने, ०·१% वसा (स्निग्ध पदार्थ), ०·९% खनिज पदार्थ आणि ७७·६%  जलांश असतो.

कीड व रोग : यांचा उपद्रव विशेषेकरून या पिकाला होत नाही. कदाचित वाफ्यातील रोपांवर पाने खाणाऱ्या अळ्या पडल्यास गॅमेक्झिन भुकटी हेक्टरी २०–२५ किग्रॅ. प्रमाणे पिकावर पिस्कारतात.

संदर्भ :  Panniker, M.R., Koorka (Coleus parviflorus), Indian Farming, Novemeber-December Issue,New Delhi, 1950.