कोहळा : (भुरा कोहळा; हिं. कुम्हडा, पेठा; गु. भुरा कोळू; क. संडिगे बुडेकुंबकलाई; सं. कुष्मांड; इं. व्हाइट गोर्ड मेलॉन, ॲश गोर्ड; लॅ. बेनिन्कॅसा सेरीफेरा; कुल-कुकर्बिटेसी). ही मोठी व वर्षायू (एक वर्ष जगणारी) वेल मूलतः जपान व जावा येथून आली असून नंतर तिचा प्रसार आशिया, आफ्रिका व अमेरिका येथे झाला. भारतात बंगाल व पंजाब येथे महाराष्ट्रापेक्षा अधिक लागवड केली जाते. हिची अनेक शारीरिक लक्षणे  कुकर्बिटेसी  कुलाच्या वर्णनाप्रमाणे आहेत. फुले मोठी, एकलिंगी, एकएकटी व पिवळी; फळे लंबगोल, रसाळ, लवदार व पूर्ण पिकल्यावर पांढऱ्या मेणचट थराने आच्छादलेली; फळाचे वजन जास्तीत जास्त दोन किग्रॅ.; फळ शीतल, पौष्टिक, सारक, मूत्रल (लघवी साफ करणारे) व वाजीकर (कामोत्तेजक) असते. पंजाबात याची मिठाई व महाराष्ट्रात कोहाळेपाक करतात. मगज (गर) भाजी, सांडगे, पापड इत्यादींकरिता उपयोगात आहे. बियांचे तेल कृमिनाशक असते. फळांचा रस चित्तभ्रम, अपस्मार इ. तंत्रिका (मज्जा) दोषजन्य विकारांवर गुणकारी आहे.

समुद्रसपाटीपासून १,२०० मी. हून जास्त उंचीवरील गरम हवामानात हे पीक चांगले वाढते. जमिनीत आळी करून भरपूर शेणखत घालून पावसाळ्यात प्रत्येक आळ्यात चारपाच बिया लावतात. दोन-तीन आठवड्यांनी आळ्यात दोन जोमदार रोपे ठेवून बाकीची काढून टाकतात. पुढे जरूरीप्रमाणे पाणी देतात.फळे दोन-अडीच महिन्यांनी येतात. ती पुढे दोन-अडीच महिन्यांत पक्व होतात. वेलावरच पक्व झालेली फळे जास्त टिकतात. हेक्टरी ५,०००–६,००० किग्रॅ. फळे मिळतात.