दक्षिण अमेरिकेच्या उष्णकटिबंधीय पश्चिम किनार्यावरील महासागरी प्रदेश दर काही वर्षांनी असंगत असा उबदार राहतो. या असंगत आविष्काराला महासागरविज्ञान आणि हवामानशास्त्रात एल निनो म्हणून ओळखले जाते. पृथ्वीचे वातावरण आणि पॅसिफिक महासागराच्या उष्णकटिबंधीय भागातील पाणी यांच्यामधील आंतरक्रिया हा एक वातारणीय आविष्कार एल निनोच्या रूपाने घडत असतो. २०० उत्तर ते २०० दक्षिण या अक्षांशांदरम्यान घडणारा हा आविष्कार दर सु. २ ते ७ वर्षांनी घडतो. सर्वसाधारणपणे याची सुरुवात एका वर्षाच्या उन्हाळ्याच्या प्रारंभी होते व पुढील वर्षातील वसंत ऋतूपर्यंत तो असतो. एल निनोचा परिणाम जगभरातील जलवायुमानावर (हवामानावर) होतो. उदा., अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या दक्षिण भागातील जलवायुमान नेहमीपेक्षा अधिक आर्द्र (दमट) होते, तर वायव्य पॅसिफिक महासागरात ते नेहमीपेक्षा अधिक कोरडे (शुष्क) होते. सु. १९८२-८३ पासून हा आविष्कार अधिक वेळा व अधिक प्रखर होत गेलेला आहे. एल निनोचा हा वैशिष्ट्यपूर्ण आविष्कार सु. १८ महिने राहतो आणि पुष्कळदा त्याच्यानंतर विरुद्ध प्रकारचा ‘ला निना’ (La Nina) हा आविष्कार घडतो. ला निनाचा प्रभाव सामान्यपणे डिसेंबर ते मार्च दरम्यान असतो. विसाव्या शतकात एल निनो २३ वेळा व ला निनो १५ वेळा घडल्याचे मानतात.
दर हिवाळ्यात दक्षिण अमेरिकेतील एक्वादोर व पेरू या देशांच्या समुद्रकिनार्यालगत उबदार सागरी प्रवाह दक्षिणेकडे वाहतो. या प्रवाहासाठीच सुरुवातीला एल निनो ही संज्ञा वापरली जात होती; कारण हा प्रवाह बहुधा ख्रिसमस (नाताळ)च्या सुमारास उद्भवतो. एल निनो हा मुलगा या अर्थाचा स्पॅनिश शब्द असून तो बाल येशू (ख्राइस्ट चाइल्ड) या संदर्भात वापरला जातो. एकोणिसाव्या शतकात स्थानिक मच्छीमारांनी या प्रवाहाला एल निनो हे नाव दिले. दर २ ते ७ वर्षांनी येथील उष्ण प्रवाह नेहमीपेक्षा प्रबळ होऊन तो दीर्घकाल टिकतो. या कारणांमुळे संपूर्ण उष्णकटिबंधीय पॅसिफिक महासागरी प्रदेशातील वारे व वर्षण यांच्यात खूप बदल होतात. अशा नेहमीपेक्षा प्रबळ व दीर्घकालीन उष्ण प्रवाहांच्या कालावधीतील वातावरण व महासागर यांच्यातील संपूर्ण आंतरक्रियेसाठी हळूहळू एल निनो ही संज्ञा वापरली जाऊ लागली. स्पॅनिश वसाहतकार फ्रांथीस्को पिझारो इ. स. १५२५ मध्ये पेरूच्या उत्तर भागात उतरले होते. त्या वेळी त्यांनी तेथील वाळवंटी प्रदेशातील असामान्य पर्जन्यवृष्टी अनुभवली. या आविष्काराबद्दल त्यांनी केलेल्या नोंदी हाच एल निनोबद्दलचा पहिला लिखित पुरावा होय. ब्रिटिश हवामानशास्त्रज्ञ सर गिल्बर्ट वॉकर यांनी १९३० च्या दशकात या आविष्कराला सदर्न ऑसिलेशन [so] (दक्षिणी दोलायमानता) ही संज्ञा वापरली. एल निनो आविष्कार असतानाच्या आणि नसतानाच्या आधीच्या आणि नंतरच्या बदलास सदर्न ऑसिलेशन असे म्हटले जाते. नंतरचे शास्त्रज्ञ या आविष्काराचा उल्लेख एल निनो सदर्न ऑसिलेशन (El Nino Southern Oscillation : ENSO) असा करू लागले. एल निनो आणि सदर्न ऑसिलेशन हा महासागरीय आणि वातावरणीय आविष्कार आहे.
एल निनो नसतानाचे जलवायुमान : एल निनो नसताना उष्ण कटिबंधात सर्वाधिक उबदार पाणी पॅसिफिक महासागराच्या पश्चिम बाजूला इंडोनेशियालगत असते. येथील पाण्यावर हवेचा दाब कमी असतो. पॅसिफिकच्या पूर्व बाजूला दक्षिण अमेरिकेलगत पाण्यावरील हवेचा दाब उच्च असतो. उष्ण कटिबंधातील वारे उच्च दाबाच्या क्षेत्रांकडून कमी दाबाच्या क्षेत्राकडे वाहतात. त्यामुळे उष्ण कटिबंधीय पॅसिफिकवरील वारे सामान्यपणे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात.
उष्णकटिबंधीय पॅसिफिकवरील वार्यांमुळे समुद्राच्या पृष्ठभागालगतचे पाणी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. पूर्वेला अधिक खोलवर असलेले थंड पाणी उसळून पृष्ठभागी येते व वाहून गेलेल्या पाण्याची जागा घेते. थंड पाण्यात खनिजे व इतर पोषक द्रव्ये विपुल प्रमाणात असतात. त्यामुळे पाण्याचा पृष्ठभाग व त्याच्याजवळ वाहत जाणार्या पाण्यातील प्लवकांसारख्या सूक्ष्मजीवांना मुबलक खाद्य मिळते आणि त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. तसेच यामुळे माशांच्या संख्येतही मोठी वाढ होते. परिणामी एक्वादोर व पेरु यांच्या समुद्रकिनार्यावरील पाणी हे जगातील सर्वांत मोठ्या व प्रसिद्ध व्यापारी मासेमारी केंद्रांपैकी एक बनले आहे. पॅसिफिकच्या पश्चिम भागातील उबदार सागरी पाण्याने त्याच्यावरील हवा तापते व ती तिच्याभोवतीच्या अधिक थंड हवेपेक्षा हलकी होते. त्यामुळे ती हलकी व बाष्पयुक्त हवा वर जाऊन ढग निर्माण होतात व पॅसिफिकच्या पश्चिम भागात पाऊस पडतो. येथील पाणी अधिक उबदार होत जाऊन माशांची संख्या कमी होत जाते.
एल निनो असतानाचे जलवायुमान : एल निनो असताना पॅसिफिकच्या पश्चिमेला हवेचा दाब नेहमीपेक्षा उच्च असतो, तर पूर्वेस अतिशय कमी असतो. त्यामुळे पॅसिफिकच्या उष्णकटिबंधीय भागातील पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारे वारे कमजोर होतात किंवा उलट्या दिशेतही वाहू शकतात. या दोन्ही परिस्थितींत एक्वादोर व पेरू यांच्या समुद्रकिनार्यालगतचे पाणी अतिशय उबदार होते. तेथे विपुल पोषक द्रव्ययुक्त थंड पाणी उसळून वर येत नाही. यामुळे माशांची संख्या खूप कमी होते.
एल निनो आविष्कार असताना मुख्यत: पूर्व पॅसिफिकमधील अधिक उबदार पाण्याच्या वर ढग तयार होतात व तेथे जोराचा पाऊस पडतो. त्यामुळे दक्षिण अमेरिकेचा पश्चिम समुद्रकिनारा नेहमीपेक्षा अधिक आर्द्र होतो. याउलट पॅसिफिकच्या पश्चिम भागातील इंडोनेशिया व आग्नेय आशियातील इतर देशांत, ऑस्ट्रेलियात जलवायुमान अतिशय शुष्क होऊन अवर्षणाची परिस्थितीही निर्माण होऊ शकते. तसेच उत्तर अमेरिकेत हिवाळ्यातील वातावरण अपसामान्य बनते.
ला निना असतानाचे जलवायुमान : ला निना हा मुलीसाठी असलेला स्पॅनिश शब्द आहे. ला निनाशी निगडित असलेले जलवायुमान हे एल निनोशी निगडित असलेल्या जलवायुमानाच्या उलट असते. उदा., ला निना असताना पश्चिम पॅसिफिकमधील पाणी हे जेव्हा तेथे केवळ एल निनो नसताना असणार्या उबदार पाण्यापेक्षाही जादा उबदार असते.
एल निनोचे परिणाम : अनेक वर्षे एल निनो हा स्थानिक आविष्कार मानीत असत. १९६० – १९७० दरम्यान शास्त्रज्ञांना एल निनो आणि उष्णकटिबंधीय पॅसिफिक महासागरावरील नेहमीच्या व्यापारी वार्यांमधील बदल यांच्यातील परस्पर संबंध लक्षात आला. एल निनो घडून येण्यासाठी उष्णकटिबंधीय पॅसिफिक महासागर व वातावरण यांच्यामधील आंतरक्रिया कशा प्रकारे घडतात, हे अभ्यासण्यासाठी शास्त्रज्ञांनी १९९० – २००० दरम्यान विविध प्रकाराची संशोधन जहाजे, कृत्रिम उपग्रह, संगणक, विद्युतीय साधने, उपकरणे व तंत्रे वापरली. त्यावरून पुढील गोष्ट त्यांच्या लक्षात आली. एल निनो व त्यानंतर घडणारा ला निना हा विरुद्ध आविष्कार हे दक्षिणी दोलायमानता (सदर्न ऑसिलेशन) या अधिक मोठ्या आविष्काराचे भाग आहेत. या अभ्यासावरून शास्त्रज्ञांना एल निनो आविष्कार व त्यांचे परिणाम यांचे भाकीत ६ ते १८ महिने आधी करता येऊ लागले.
वरील अभ्यासामुळे पृथ्वीवरील हवामान व जलवायुमान प्रणालींमधील एल निनोच्या परिणामांची अधिक चांगली माहिती झाली. दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनार्यावरील उत्तरेस एक्वादोरपासून दक्षिणेस चिलीपर्यंतच्या प्रदेशातील मासेमारी, कृषी आणि स्थानिक वातावरणावर एल निनोचा विपरित परिणाम होतो. विषुवृत्तीय पॅसिफिक, उत्तर अमेरिका आणि आशियातील हवामान असंगत बनते. हिंदी महासागरावरील वायुच्या दाबाच्या परिस्थितीवर एल निनोचा परिणाम होतो. त्यामुळे भारतातील मॉन्सून पर्जेन्यमानाचा अंदाज किंवा प्राक्कलन करताना एल निनोचे परिणाम विचारात घ्यावे लागतात. एल निनोचा अटंलांटिक महासागरावरील हरिकेन वादळांच्या निर्मितीवर परिणाम होतो. दक्षिण पॅसिफिकमधील व्यापारी वार्यांवरही त्याचा परिणाम होतो. एल निनोमुळे सागरी प्रवाहांत बदल होतात. जलवायुमान एकदोन वर्षे बदलू शकते. वारंवार होणारी चक्री वादळे, टायफून, तसेच पॅसिफिक महासागरातील बेटांजवळची समुद्रपातळी यांच्यातही एल निनोमुळे बदल होतात. विशेषत: शुष्क भागांत एकसारखा धुवांधार पाऊस कोसळू शकतो. अवर्षणाची परिस्थिती, दुष्काळ, पूर हेही याचे परिणाम होऊ शकतात. परिस्थितिवैज्ञानिक परिस्थिती, स्थानिक पर्यावरण, अन्नसाखळी, जैव विविधता, वारे यांच्यावर एल निनोचे परिणाम होतात. कधीकधी याच्यामुळे जमिनीची धूप व भूमिपात होण्यास चालना मिळते.
प्रत्येक वेळचा एल निनोचा कालावधी आणि त्याची तीव्रता यांमध्ये फार मोठी तफावत आढळते. सौम्य एल निनोचा परिणाम केवळ स्थानिक प्रदेशावर होतो; परंतु तीव्र एल निनोचा परिणाम संपूर्ण जगाच्या हवामानावर होतो. तीव्र एल निनो परिस्थिती निर्माण होण्याचे प्रमाण तुलनेने कमी असते. इ. स. १९५७, १९६५, १९७२, १९७६, १९८२-८३, १९९७-९८ आणि २०१४ – २०१६ मध्ये एल निनोच्या तीव्र आविष्कारांमुळे अपसामान्य वातावरणीय परिस्थिती निर्माण झाली होती.
समीक्षक : वसंत चौधरी