मका उत्पादक पट्टा. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील मका उत्पादक प्रदेशासाठी वापरात असलेली पारंपरिक संज्ञा. पूर्वीपासून ‘कृषिप्रदेश’ म्हणून हा भाग प्रसिद्ध असून देशाच्या अर्थव्यवस्थेत याचा मोठा वाटा आहे. कॉर्न बेल्टमध्ये देशाच्या उत्तर-मध्य मैदानी प्रदेशातील राज्यांचा समावेश असून मिसिसिपी नदीच्या वरच्या टप्प्यातील हा भाग समृद्ध प्रदेश म्हणून ओळखला जातो. सर्वसाधारणपणे पूर्वेकडून पश्चिमेकडे अनुक्रमे ओहायओ, इंडियाना (पश्चिम भाग), इलिनॉय, विस्कॉन्सिन, आयोवा, मिसूरी, नेब्रॅस्का (पूर्व भाग), मिशिगन, मिनेसोटा, कॅनझस (पूर्व भाग) इत्यादी राज्यांचा यामध्ये समावेश होतो. या प्रदेशाने सु. २,०२,३४,३०० हे. क्षेत्र व्यापलेले आहे. येथील जमीन सखल, सुपीक, सेंद्रीय द्रव्ये व नायट्रोजनयुक्त असून मका व सोयाबीन ही येथील प्रमुख नगदी पिके आहेत. येथील हवामान मका उत्पादनासाठी अत्यंत पोषक आहे. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ९० ते १०० सेंमी. असून त्याचे वितरण सर्वत्र सारखे आहे. त्यामुळे देशातील एकूण मका व सोयाबीन यांच्या उत्पादनापैकी सु. ८०% उत्पादन या प्रदेशातून घेतले जाते. याशिवाय ओट, गहू, अल्फाल्फा यांच्या उत्पादनासाठीही हा प्रदेश प्रसिद्ध आहे. भाजीपाला, फळे इत्यादींचे उत्पादन घरगुती वापरासाठी घेतले जाते.

आयताकाराची व सु. ६५ ते १६० हे. क्षेत्र असलेली मोठमोठी शिस्तबद्ध शेते हे या प्रदेशाचे वैशिष्ट्य आहे. शेतीची मशागत व उत्पादनांवरील प्रक्रीया यांसाठी पारंपरिक पद्धतींबरोबरच आधुनिक साधनांचाही वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. कॉर्न बेल्टमधील व त्याच्या उत्तरेकडील गवताळ प्रदेशातील गुरेपालन, कोंबड्या व वराहपालन व्यवसायाला येथील शेती उत्पादनांचा (विशेषता मका) पुरवठा मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे दूध व दुग्धजन्य पदार्थ, मांस उत्पादन व आनुषंगिक व्यवसायांचा या प्रदेशात विकास झाला आहे. मका विक्रीतून पैसा मिळविणे तसेच डुकरे व गुरे यांना चारा म्हणून त्याचा वापर करून मांसोत्पादनासाठी त्यांना पुष्ट करणे अशा दुहेरी हेतूने येथील मक्याची शेती कौशल्याने केली जाते. मांसोत्पादक गुरे प्रथम प्रेअरी गवताळ प्रदेशात पोसून नंतर मका उत्पादक पट्ट्यात आणून अधिक पुष्ट केली जातात व मांसोत्पादन वाढविले जाते. येथील मक्याच्या शेतीचा अशा पद्धतीचा वापर एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापासून प्रचलित झाला आहे. या व आनुषंगिक व्यवसायांपासून देशाला मिळणार्‍या एकूण उत्पन्नापैकी सु. ४५% उत्पन्न या प्रदेशातून मिळते. या व्यवसायांसाठी मुख्यत्वे आयोवा व इलिनॉय राज्यांतील शहरे तसेच कॅनझस सिटी, इंडियानापलिस, ओमाहा इत्यादी औद्योगिक शहरे प्रसिद्ध आहेत. सांप्रत हा प्रदेश नुसता ‘मका उत्पादक’ म्हणून राहिलेला नसून अन्य उत्पादनांसाठीही प्रसिद्ध आहे. त्यामुळे आता ‘धान्योत्पादक व पशुपालन प्रदेश’ हे नाव याला समर्पक ठरते.

समीक्षक : वसंत चौधरी