कर्णभारम् : महाभारतातील कथा भागावर आधारित भासरचित एकांकी नाटक.महाभारतातील वनपर्वात कर्णाची कवचकुंडले इंद्रघेऊन जातो अशी कथा येते, तर कर्णपर्वात अर्जुनाकडून कर्णाचा वध होतो ही कथा आहे. अशा दोन ठिकाणी विभागलेली महाभारतातील कथा भासाने एकत्र सांधून कर्णाचा गंभीरपणा, उदारता आणि उदात्त व्यक्तिमत्त्व अतिशय प्रभावीपणे या नाटकात चित्रित केले आहे. आकाराने लहान असलेली ही एकांकिका कलेच्या दृष्टीने खरोखरच महान आहे. यातील कथानक महाभारतातील कथानकाशी फारसे विसंगत नसले तरी क्वचित प्रसंगी भासाने आपल्या कल्पनाशक्तीने अनुरूप असा थोडासा फेरबदल केलेला दिसून येतो.
प्रस्तुत नाटकात पाच पात्र आहेत ते पुढीलप्रमाणे सैनिक ,कर्ण ,शल्य ,शक्र ,देवदूत.प्रस्तावना होवून सैनिकाकारवी युद्धाचे निवेदन होते. त्यानंतर शल्य आणि कर्ण रंगमंचावर प्रवेश करतात. कर्ण शल्यास सांगतो, ‘अर्जुन असेल तिकडे रथ घेऊन चल’. रथात त्या दोघांमध्ये संवाद चालू असतांनाच ब्राह्मणरुपात इंद्र उपस्थित होतो. तो दान घेऊन गेल्यावर त्याचा दूत वासवीशक्ती देवून जातो. त्यानंतर पुन्हा एकदा शेवटी कर्ण शल्यास् सांगतो, अर्जुनाकडे म्हणजेच जणुकाही साक्षात् आपल्या मृत्यूकडे रथ हाक.
‘सूत्रधारकृतारंभै…’ या उक्तीला अनुसरून प्रस्तुत एकांकिकेची सुरवात होते. त्यानंतर प्रस्तावना झाल्यावर सैनिक प्रवेश करून युद्धसमय आला आहे असे निवेदन करतो.तो फिरून इकडे तिकडे पाहत असतांनाच त्याला कर्ण शल्यास हरणांगणाकडे चाललेला दिसतो. पण नेहमीसारखं तेज कर्णाच्या चेहऱ्यावर दिसत नाही, तो खिन्न आहे.कौरव आणि पांडव यांच्यात चालू असलेल्या युद्धात कौरवांचे सेनापती भीष्माचार्य आणि द्रोणाचार्य यांच्यानंतर सेनेचं नेतृत्व कर्णाकडे आलं आहे. कर्णाच्या आयुष्यातील हा सर्वोच्च सन्मानाचा क्षण, कारण ‘सूतपुत्र’ म्हणून जो सतत हिणवला गेला तोच आता सर्वश्रेष्ठ सत्तेच्या रक्षणासाठी नेतृत्व करणार असतो. दुर्योधनाने केलेल्या उपकाराची परतफेड करण्यासाठी आणि पांडवांनी केलेल्या अपमानाचा बदला घेण्याची ही योग्य संधी आहे, परंतु पूर्वायुष्यातील रहस्यमय घटनांनी त्याच्या मनावर खिन्नतेच मळभ आलेलं आहे. त्याची ही खिन्नता चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येते.आजपर्यंत त्याच्या बाणांच्या तावडीत सापडलेले जिवंत राहिले नाहीत, असा त्याचा पराक्रम. आजही कदाचित शत्रू समोर आल्यावर हे शुद्र हृदयदौर्बल्य नाहीसे होईल, असा विचार करून तो शल्यास म्हणतो, ‘यत्रासावर्जुनस्तत्रैव चोद्यतांमेरथः’ अर्थात जिकडे अर्जुन आहे तिकडे माझा रथ घेऊन चल. तो मोठ्या अवसानाने केवळ अर्जुनाचाच निर्देश करतो, कारण अर्जुनाखेरीज इतरांना जीवदान देईन असे वचन त्याने कुंतीला दिले आहे. रणांगणावर येण्यापूर्वी कुंती त्याला भेटून त्याचे जन्मरहस्य कथन करते. तो राधा आणि अधिरथ यांचा पुत्र नसून कुंतीपुत्र आहे, आजपर्यंत त्याने ज्या पांडवांशी वैर धरले ते त्याचे लहान भाऊ आहेत.या दुःसह सत्याच्या जाणीवेने त्याचा रणावेश क्षीण झाला, इर्षा ओसरली, हिंमत,नीतिधैर्य खचले होते. नातं की मैत्री या द्वंद्वातून सुटण्यासाठी तो कुंतीकडून अर्जुनाशी लढण्याची अनुमती घेतो.कारण दुर्योधनाला दिलेले वचन पाळण्यासाठी त्याला लढणे भाग होते. जन्मरहस्य समजल्याने त्याचे शौर्य क्षीण झाले असतांनाच त्याला अस्त्र प्राप्तीचा वृत्तांत आठवतो. निर्वाणीच्या प्रसंगी कधीकधी जे हवे ते विसरायला होते आणि जे नको ते आठवते, त्यानुसार कर्णाला तो वृत्तांत आठवतो. ते तो शल्याला ऐकण्यास सांगतो.शल्य देखील त्याविषयी उत्सुकता दर्शवितो.
लहान असतांना कर्ण शस्त्रास्त्रविद्या शिकण्यासाठी द्रोणाचार्यांचे गुरु असलेल्या परशुरामांकडे जातो. जमदग्नीपुत्र असलेल्या परशुरामांच्या मस्तकावर विद्युल्लतेसारखा पिंगट रंगाचा जटाभार शोभून दिसत असतो, भृगुवंशात जन्मलेल्या या ऋषींच्या हातात तळपणारा धारधार परशु क्षत्रियांचा काळ ठरला होता, त्यांच्या दर्शनाने कर्णाचे डोळे दिपले आणि तो निशब्द झाला. अखेर त्याने कसेतरी शस्त्रास्त्र विद्या शिकण्याची इच्छा व्यक्त केली, त्यावर त्यांनी आपण क्षत्रियांना विद्या शिकवत नाही, केवळ ब्रह्मजनांस शिकवतो असे सांगितले. तेव्हा कर्णाने आपण क्षत्रिय नाही असे सांगून शिष्यत्व मिळवले. पुढे काही काळ लोटल्यानंतर एकदा गुरु कंदमूळ, फळ आणण्यासाठी अरण्यात गेले, त्यांच्याबरोबर कर्णही गेला. बराच वेळ हिंडल्याने गुरूंना थकवा आला म्हणून ते कर्णाच्या मांडीवर डोके ठेवून झोपले. त्यावेळी वज्रमुखनामक रानकिड्याने कर्णाच्या मांडीचा चावा घेतला आणि केवळ तो चावून थांबला नाही, तर त्याने कर्णाची मांडी पोखरण्यास सुरुवात केली. गुरूंची झोप मोडू नये यासाठी कर्णाने मांडी किंचित देखील हलवली नाही.मांडीतून निघालेल्या रक्ताच्या उष्म स्पर्शाने गुरूंना जाग आली. त्याचा हा कणखरपणा पाहून तो क्षत्रिय कुळातील आहे हे त्यांनी ओळखले आणि कर्णास शाप दिला की माझ्याकडून मिळवलेली अस्त्र युद्धप्रसंगी विफल होतील. शापाने डागाळलेली अस्त्रविद्या घेऊन कर्ण परतला. या प्रसंगाचे स्मरण झाले तेव्हा त्याने अस्त्र न्याहाळली तर ती सामर्थ्यहीन झालेली दिसली.
परशुरामापासून प्राप्त झालेली अस्त्रविद्या त्यांच्याच शापाने निष्फळ झाली आहे, या प्रसंगाचे वर्णन कर्णाच्याच तोंडून ऐकतांना शल्य हळहळला. त्यानंतर त्याने सैन्याकडे नजर टाकली तर हत्ती, घोडेसुद्धा भीतीने डोळे मिटून ठेचकाळत असल्याचे भासले, शंख-दुदुंभी यांचा नादही वेगळाच भासला. निष्प्रभ झालेली अस्त्रे, अडखळणारे घोडे, स्तब्ध झालेली दुदुंभी जणु काही अपशकुनच करत आहेत. त्याची खिन्न मानसिकता आगामी विनाश सूचवित असावीत, तरीही रणांगणात मृत्यु आल्याने स्वर्गप्राप्ती होते, म्हणून तो मनास आवर घालून युद्धास सज्ज होतो आणि पुन्हा एकदा शल्यास म्हणतो, ‘यत्रासावर्जुनस्तत्रैव चोद्यतां मेरथः’. इतक्यात इंद्र वृद्ध ब्राह्मणाच्या रुपात येऊन उपस्थित होतो. कर्णाने त्याला नमस्कार केल्यावर तो ‘दीर्घायु हो’ असा आशीर्वाद न देता, ‘तुझी कीर्ती अखंड राहो’ असा आशीर्वाद देतो, तेव्हाच कर्णाच्या मनात शंका उत्पन्न होते. कर्ण त्याला गायी, घोडे, हत्ती, सोने अशी एकापेक्षा एक उत्कृष्ट दाने देऊ पाहतो, पण इंद्र ती नाकारतो. अखेर कर्ण जन्मजात शरीराबरोबर मिळालेली कवच-कुंडले देऊ करतो, तत्क्षणी ब्राह्मण खुश होतो. शल्य त्याला आकांताने अडविण्याचा प्रयत्न करतो, तरी कर्ण आपला शब्द मोडत नाही. त्याला त्याचे वैषम्य न वाटता कृतकृत्यताच वाटते. तो मनोमन समजून चुकतो की, हा कृष्णाचा डाव आहे. नंतर लज्जित झालेला इंद्र दूताकरवी त्याला ‘वासवीशक्ती’(आकाशातील विजेच्या शक्तीचे सामर्थ्य असलेला भाला) पाठवतो. प्रथम तो ती नाकारतो, परंतु ब्राह्मण वचनाचा आदर करण्यासाठी ती स्वीकारतो. सर्व बाजूनी रिता झालेला कर्ण पुन्हा अर्जुनाकडे म्हणजेच आपल्या मरणाकडे जाण्यास सिद्ध होतो. ‘यत्रासावर्जुनस्तत्रैव चोद्यतांमेरथः’ याच वाक्याने नाटकाचा शेवट होतो. हे वाक्य या लहानशा एकांकिकेत कर्णाच्या तोंडी परत-परत आले आहे. वाक्यामागचा संदर्भ बदलला तरी त्याचा अर्थ अधिक गहन आणि गंभीर होत गेला आहे. कर्णाचा प्रत्यक्ष अंत न दाखविता तो अशाप्रकारे व्यंजनेने सूचित करून भासाने कलेची परिसीमा गाठली आहे.
संदर्भ :
• गोखले, मंजुषा, माहुलीकर, गौरी वैद्य, उमा अभिजात संस्कृत साहित्याचा इतिहास, मुंबई विद्यापीठ, मुंबई, २००४.
• शेवाळकर ,राम, भासाची भारत नाट्ये, प्रसाद प्रकाशन, पुणे, १९९६.
समीक्षक : अंजली पर्वते