बालचरित : कृष्णाच्या बालजीवनावर आधारित भासाचे पाच अंकी नाटक.महाभारत हा ह्या नाटकाचा उपजीव्य ग्रंथ होय. कंसवध हा ह्या नाटकाचा मुख्य विषय असून कृष्णाच्या बाललीलांचे वर्णनही यात आहे.देवकीच्या पोटी कृष्णाचा जन्म झाल्यावर त्याच्या दर्शनासाठी नारदमुनी पृथ्वीवर अवतरतात इथून नाटकाला सुरुवात होते. साक्षात विष्णूने अवतार घेतल्याने शुभचिह्ने उमटतात. त्याचे प्राण वाचवण्यासाठी वसुदेव त्याला नंदगोपाकडे घेऊन जातो. तेव्हा घडणारी सर्व आश्चर्ये भासाने नाटकाच्या पहिल्या अंकात वर्णिली आहेत. गडद अंधारात बालकृष्णाचा प्रकाश वसुदेवाला वाट दाखवतो. वसुदेव पाण्यात शिरताच पाणी दुभंगते. आपल्या मृत बालिकेला हातात घेतल्याने अमंगळ झालेला देह शुद्ध करण्यासाठी नंद खाली वाकून धूळ घेतो तेव्हा तिथे अचानक जलधारा प्रकट होते. नंदाने कृष्णाला हाती घेताच गरुड, चक्र, शार्ङ्ग, कौमोदकी, शंख आणि नंदक ही विष्णूची आयुधे प्रकट होतात. नंदाच्या मृत बालिकेला वसुदेव घेऊन जात असता ती जीवित होते. आपल्याला परिचित असणारी ही आश्चर्ये नाटककार अद्भूत रसाचा परिपोष करण्यासाठी वापरतो.

कल्पनाचित्र

दुसर्‍या अंकाच्या सुरुवातीला रात्रीच्या वेळी कंसाच्या महालात काळ्याकभिन्न चांडालकन्या प्रकटतात आणि कंसाच्या मागेमागे जात त्याला म्हणतात की तुझा आमच्याशी विवाह होवो. तेव्हा संतापाने तो त्यांना म्हणतो की ‘मी यमाचाही यम आहे. भयालाही माझे भय वाटेल. इथून चालत्या व्हा.’ त्या गुप्त झाल्यावर मधूक ऋषींनी कंसाला दिलेला शाप मानवी रूपात कंसासमोर येतो. ह्या शापाचे नाव वज्रबाहू असे आहे. ह्या शापामुळेच त्याला ठार करण्यासाठी विष्णूने हा कृष्णावतार घेतला आहे. तो चांडालवेषात कंसाच्या शरीरात शिरू पाहतो. पण कावळ्याच्या पंखाच्या वार्‍याने मेरूजसा हलणार नाही, ओंजळीने समुद्र जसा पिता येणार नाही
तसे कंसाचे हृदय कोणाच्या अंकित होणार नाही असा कंसाला विश्वास आहे. ‘वेळ आल्यावर कळेल’ असे म्हणून शाप अदृश्य होतो. कंस बिछान्यावर झोपतो. त्यानंतर हा वज्रबाहू शाप आपल्याबरोबर अलक्ष्मी, खलती, कालरात्री, महानिद्रा, पिङ्गलाक्षी या संहारक साथीदारांना पाचारण करतो. कंस झोपला असताना ते त्याच्या अंतर्गृहाचा ताबा घेतात. तेव्हा तिथे राजश्री प्रकट होते व त्यांना विरोध करते. राजलक्ष्मीचा निवास जिथे आहे तिथे कोणत्याही विनाशक शक्तीला स्थान नाही असे राजश्री सांगते. वज्रबाहू शाप राजश्रीला समजावून सांगतो की तिने कंसाचे शरीर सोडून जावे,अशी विष्णूची आज्ञा आहे. या आज्ञेपुढे तिचा नाईलाज होऊन ती विष्णूकडे निघून जाते आणि वज्रबाहू शाप आणि त्याचे साथीदार कंसाच्या महालाचा ताबा घेतात. पहाटे उठल्यावर ह्या घटना खरेच घडल्या की स्वप्न होते असा प्रश्न कंसाला पडतो. वसुदेव-देवकीला मुलगी झाल्याचे कंचुकी कंसाला सांगतो. मुलीच्या जन्माच्या वेळी अशी चिह्ने प्रकटावीत ह्यावर कंसाचा विश्वास बसत नाही. तो वसुदेवाला विचारून पडताळणी करतो व मुलीला आणण्यास सांगतो. मुलीचे लोभस रूप पाहून क्षणभर कंसही लोभावतो;परंतु शाप टाळण्यासाठी तिला मारणे कंसाला क्रमप्राप्तच असते. तिला शिळेवर आपटल्यावर तिच्या शरीराचा एक अंश जमिनीवर पडतो व एक अंश आकाशात जातो. त्या अंशाची भयावह आकृती बनते. ती आकृती म्हणजे शुंभ-निशुंभाचा वध करणारी कार्त्यायनी आहे.त्या आकृतीच्या हातांत लखलखणारी विविश आयुधे आहेत. कंसाच्या वधासाठीच विष्णूने जन्म घेतला असून तो गोकुळात वाढत असल्याचे ती सांगते. मनःशांती मिळावी ह्या आशेने कंस गृहशांती करवतो.

तिसर्‍या अंकापासून परिचित असणार्‍या कृष्णलीला भासाने वर्णिल्या आहेत.गौळवाड्यात समृद्धी येणे, पूतना दानवीचा वध, शकट नावाच्या दानवाचे अक्षरशः चूर्ण करणे, वृक्षरूपात असणार्‍या यमल व अर्जुन नावाच्या राक्षसांना ठार करणे, धेनुक नावाच्या दानवाला तालवृक्षावर आदळून मारणे, घोड्याचे रूप घेतलेल्या केशी राक्षसाला तोंडात कोपर घालून उभा चिरणे इत्यादी अनेक अद्भुते दामोदर व त्याचा भाऊ संकर्षण यांनी केली आहेत. गोपींबरोबर हल्लीसक नृत्य करत असतानाच अरिष्ट नावाचा वृषभ वृंदावनात शिरून कृष्णाच्या रोखाने येत असल्याची बातमी येते. कृष्ण त्याला ठार करतो. तेवढ्यात यमुनेच्या डोहात कालिय नाग आल्याची बातमी येते.

चौथ्या अंकात कालिय नागाच्या मर्दनाची कथा येते.तेव्हाच सैनिक निरोप आणतो की मथुरा नगरीत धनुर्मह नावाचा उत्सव होणार आहे. त्यासाठी दामोदर व संकर्षण यांना बोलावणे आले आहे. ‘देवरहस्याचा काळ’ आला असल्याचे कृष्ण ओळखतो व कंसाला मारण्याची प्रतिज्ञा करूनच दामोदर प्रस्थान ठेवतो. कंसाने दामोदराचा घात घडवून आणण्यासाठीच हा धनुर्मह नावाचा उत्सव आयोजित केलेला असतो . उतावीळपणे तो ध्रुवसेन नावाच्या सैनिकाला कृष्णाच्या आगमनाच्या बातम्या आणण्यासाठी पाठवतो. धनु:शालेतील सिंहबल नावाच्या रक्षकाने रोखल्यावर दामोदराने त्याच्या कानावर फटका मारून त्याला मारल्याचे व धनुष्याने त्याचे दोन तुकडे केल्याचे ध्रुवसेन कंसाला सांगतो. कंसाला जणू आपला काळ आला असे वाटते. कंस मल्लयुद्ध पाहण्यासाठी प्रासादाच्या सज्जावर जाऊन बसतो व चाणूर आणि मुष्टिक यांना आपल्यासमोर येण्याची आज्ञा देतो. दामोदराकडून चाणूर तर संकर्षणाकडून मुष्टिक मारले जातात व दामोदर आपला मोर्चा कंसाकडे वळवतो. कंसाला प्रासादावरून खाली भिरकावून दामोदर त्याला ठार करतो. ते बघून प्रमुख वृष्णियोद्धे दामोदराला मारण्यासाठी धावतात; परंतु संकर्षण त्यांचा समाचार घेतो. वसुदेव समोर येतो. तो आपल्या दोन्ही पुत्रांची ओळख करून देतो. कंसाचे पिता उग्रसेन यांना बंधनातून मुक्त करण्यात येते व त्यांचे राज्य सुरू होते.

भासाच्या इतर नाटकांच्या मानाने हे नाटक तितकी उंची गाठत नाही. चरित्रात्मक नाटक हेच त्याच्यामागचे मुख्य कारण असावे. चरित्र नायकाला दैवी व्यक्तिमत्त्व लाभले असेल तर नाटककाराचे हात बांधल्यासारखे होतात. नायकाचे चरित्र प्रसिद्ध असल्याने त्यात नाटककार स्वतः काही वैविध्य आणू शकत नाही.बालचरिताच्या बाबतीत भासाचे तसेच काहीसे झालेले दिसते. तरीही त्याने ह्या नाटकात काही बदल केलेले दिसतात. उदा. नंदगोप हा वसुदेवाचा दास असल्याचे भास म्हणतो. कंसाच्या आज्ञेवरून नंदाच्या काही अपराधाबद्दल वसुदेवाने नंदाला यापूर्वी शासन केले आहे. नंदाची मुलगी जन्मतः मृत होती. बालकांची अदलाबदल केल्यावर ती जिवंत झाली. कृष्ण हा वसुदेव-देवकीचा सातवा मुलगा असल्याचा उल्लेख नाटकात आहे. वास्तविक तो आठवा मुलगा असल्याचे परंपरा सांगते. हा बदल करण्यामागचे भासाचे प्रयोजन मात्र कळत नाही. आपण अवतारी पुरुष असल्याची जाणीव भासाने रंगवलेल्या कृष्णाला आहे.त्यामुळे त्याच्यात अधिक आत्मविश्वास जाणवतो.

दैवी आणि अद्भूत दृश्यांनी भरलेले असे हे एक नाटक आहे. नाटककाराने कथानकाच्या विकासासाठी लोकसमजुतींचा उत्तम उपयोग करून घेतला आहे. मधूक ऋषींच्या शापाला वज्रबाहू हे नाव देऊन त्याला भासाने मनुष्यरूपात रंगमंचावर आणले आहे. मानवी मनातील अर्धजागृत अवस्थेतील जाणिवा मूर्त करण्याचे धाडसही भासाने यात दाखवले आहे आणि तरीही प्रामाणिक भावनांची गुंफण त्यात केलेली आहे. नाट्यशास्त्रातील वर्ज्यावर्ज्यतेचे संकेत भास पाळत नाही हे या नाटकातही दिसून येते. हल्लीसक हे गोपनृत्य भासाने रंगमंचावर दाखवले आहे. प्रत्येक अंकात मृत्यूशी संबंधित घातपाती प्रसंग रंगमंचावर दाखवले आहेत. सूचकदृश्ये  दाखवलेली नाहीत.

भास जाणीवपूर्वक खल प्रवृत्तीच्या पात्रांना सकारात्मक पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करतो. ह्या नाटकातही त्याने कंसाचे पात्र उजळण्यासाठी त्याच्या पूर्वजन्माचे कारण दिले आहे.कंस हा पूर्वजन्मी असुर होता. त्या वेळी केलेली पापकृत्ये त्याच्याकडून पुन्हा पुन्हा पापाचरण करवून घेत आहेत. अशाप्रकारे भासाने कंसाच्या व्यक्तिरेखेद्वारे पूर्वजन्म, कर्म ह्या गोष्टींवर भाष्य केले आहे. खल प्रवृत्तीच्या पात्रांचे सकारात्मक चित्रण हा भासाच्या नाट्यकलेचा वैशिष्टयपूर्ण गुण आहे.

संदर्भ : १.उपाध्याय बलदेव, महाकवि भासः एक अध्ययन, चौखम्बा विद्याभवन , वाराणसी.२.देवधर सी. आर., भासनाटकचक्रम् , पुणे ओरिएन्टल बुक एजन्सी,१९३७.३.भट गो. के. संस्कृत नाटके आणि नाटककार, श्रीविद्या प्रकाशन ,पुणे, १९८०.

समीक्षक : शिल्पा सुमंत