अभिषेकनाटकम् : रामायणकथेवर आधारित भासाचे सहा अंकी नाटक.रामायणातील किष्किंधा कांडापासून युद्ध कांडापर्यंतची म्हणजेच वालीवध ते रामराज्याभिषेक अशी रामकथा यात येते. सुग्रीव, बिभीषण आणि राम या तिघांचा राज्याभिषेक या कथानकात आला आहे, त्यामुळे नाटकाचे अभिषेक हे शीर्षक समर्पक ठरते. भासाने रामायण कथेवर इतरही अनेक नाटके लिहिली असून त्याच्या या नाटकांच्या शृंखलेमधून संपूर्ण रामायणाची कथा नाटयरूपाने मांडण्याचा त्याने प्रयत्न केला आहे. भासाच्याच प्रतिमा या नाटकाचा अभिषेकनाटकम्  हा पूर्वार्ध असावा असे एक मत आहे.मर्यादापुरूषोत्तम रामाकडून केला गेलेला वालीचा वध न्याय होता असे दाखवण्याचा प्रयत्न नाटककाराने या नाटकाद्वारे केला आहे.पारंपरिक रामायणकथेमध्ये ज्या पद्धतीचे पात्रवर्णन आढळते तेच काही अंशाने या नाटकातही आढळते.लक्ष्मणाची व्यक्तिरेखा एका आज्ञाकारी सेवक तसेच रामाच्या विनीत भक्ताच्या स्वरूपात रंगविली आहे. तर बिभीषण हा रामाचा न्यायप्रिय भगवद् भक्त असल्याचे दाखवले आहे. भासाने रावणाचे चित्रण क्रूर, दुराचारी तसेच परस्त्रीच्या बाबतीत लंपट असणारा असे केले आहे. या नाटकातील प्रधान रस वीररस आहे.

पहिल्या अंकात वानरराज वालीचा रामाच्या हातून वध होऊन सुग्रीवाला राज्याभिषेक करणे हा प्रसंग येतो. दुसर्‍या अंकात सुग्रीव सीतेच्या शोधार्थ सर्व दिशांना आपले दूत पाठवतो व त्यामुळे हनुमानाला जटायूकडून सीतेचे रावणाने हरण केल्याचे समजते. हनुमान लंकेला जातो व तिथे अशोकवाटिकेत त्याला सीता भेटते. तिसर्‍या अंकात हनुमान अशोकवाटिकेचा विध्वंस करतो. त्याला पकडण्यासाठी रावण आपली सेना पाठवतो. हनुमान ती नष्ट करतो. मग रावण आपला मुलगा अक्षयकुमार याला पाठवतो. हनुमान त्याला मारतो.रावण आपला मोठा मुलगा मेघनाद याला पाठवतो.मेघनाद हनुमानाला पकडून रावणासमोर हजर करतो.तेव्हा हनुमान त्याला रामाचा संदेश सांगतो.तो ऐकून रावण चिडतो.त्याला शांत करण्यासाठी बिभीषणाला बोलावले जाते.बिभीषण रावणाला सल्ला देतो की त्याने रामाला सीता परत करावी. त्यावर रावण तो पक्षपाती असल्याचा आरोप करतो. चौथ्या अंकात हनुमान परत आल्यावर सुग्रीव सैन्याची रचना करतो. सैन्य समुद्रतटावर पोहोचते. रामाला घाबरून समुद्र वानरसेनेला मार्ग मोकळा करून देतो. बिभीषण रामाचा आश्रय घेतो. शुकसारक नावाचे दोन राक्षस वानररूप घेऊन रामाच्या सैन्यात दाखल होतात; परंतु ते पकडले जातात. उदार मनाचा राम त्यांना दंड न करता सोडून देतो आणि त्यांच्याकरवी रावणाला युद्धाचा संदेश पाठवतो. पाचव्या अंकात राम-रावणाच्या सेनेचे युद्ध वर्णिले आहे. कुंभकर्ण आणि इंद्रजित मारले गेल्यावर रावण खडबडून जागा होतो. भीतीच्या व शंकेच्या भरात तो सीतेचाच वध करण्याचे पाऊल उचलतो; परंतु त्याचे मंत्री त्याला स्त्रीवध करण्यापासून अडवतात. मग तो एक चाल खेळतो. रामाच्या व लक्ष्मणाच्या मस्तकाची प्रतिकृती करून ती तो सीतेला दाखवतो व राम आपल्याकडून मारला गेला असल्याचे भासवतो. ‘आता तू माझा स्वीकार कर’, असे तिला सांगतो; परंतु सीता आपल्या निश्चयावर अचल राहते. शेवटी सहाव्या अंकात राम-रावण युद्ध होते. रावण मारला जातो. सीता राक्षसाच्या घरी राहिली असल्यामुळे राम तिच्या चारित्र्याबद्दल शंका घेतो व तिला स्वीकारण्यास नकार देतो. सीता अग्निपरीक्षा देते. तेथे साक्षात् अग्नी प्रकट होतो व रामाला सांगतो की ‘सीता लक्ष्मी आहे, तिचे चारित्र्य शुद्ध आहे. तुम्ही तिचा स्वीकार करा. तुमच्या वडिलांनी तुमच्या अभिषेकाची इच्छा व्यक्त केली आहे.’ त्यानुसार राम सीतेचा स्वीकार करतो व आयोध्येला परत आल्यानंतर त्यांना अभिषेक केला जातो.जनमानसात रुळलेली रामकथा भासाने या नाटकात साकारली आहे. नाटकातील संवाद लहान आणि प्रभावी आहेत.भासाच्या इतर नाट्यकृतींच्या तुलनेत हे नाटक विशेष वेगळे नाही. यातील व्यक्तिरेखा सामान्य आहेत.

संदर्भ :

• आचार्य श्रीरामचन्द्रमिश्र, अभिषेकनाटकम् ( विद्याभवन संस्कृत ग्रन्थमाला), चौखम्बा विद्याभवन, वाराणसी, १९९५.

• देवधर ,सी. आर.,भासनाटकचक्रम्,ओरिएन्टल बुक एजन्सी, पुणे,१९३७.

समीक्षक : सुनीला गोंधळेकर