प्रतिज्ञायौगंधरायण : भासरचित चार अंकी नाटक. उदयन (वत्स देशाचा राजा) यास अवंतीराज महासेन याने कपटाने बंदी केले त्यावेळी आपण जिवंत असतांना वत्सराज संकटात सापडावा याचे वैषम्य वाटून उदयनाचा अमात्य यौगंधरायण त्याला सोडवण्याची प्रतिज्ञा करतो हे प्रस्तुत नाटकाचे कथानक आहे. कथानक लहान असले,तरी त्याची घडण सुव्यवस्थित व क्रमशः उकललेली दिसते.

प्रस्तुत नाटकात सतरा पात्र आहेत. ती पुढीलप्रमाणे : यौगंधरायण – वत्सराज उदयनाचा अमात्य,सालक – यौगंधरायणाचा नोकर,निर्मुंडक – यौगंधरायणाचा नोकर,हंसक – वत्सराजाच्या सन्निध असणारा परिजन,ब्राह्मण – यौगंधरायणाचा मित्र,राजा – महासेन नावाने प्रसिद्ध असणारा अवंतीराज प्रद्योत,कांचुकीय – महासेन राजाचा कंचुकी,विदुषक – वत्सराजाचा मित्र वसंतक ही त्यातील काही महत्त्वाची पात्रे आहेत.

‘सूत्रधारकृतारंभै…’ या उक्तीला अनुसरून प्रथम अंकाची सुरवात होते. वत्सराज उदयन शिकारीसाठी वनात गेला आहे, वीणावादन, मृगया व जंगली हत्तींना वीणेच्या द्वारा माणसाळवणे या कलांमध्ये तो प्रवीण आहे. याचा उपयोग करून अवंतीराज महासेन खोट्या नीलगजाचे कपट रचून उदयनाला बंदी करण्याचे कारस्थान योजतो. हे कारस्थान दूतांकरवी यौगंधरायणायास आधीच समजते. तेव्हा त्यावर मात करण्यासाठी तो उपाययोजनाही रचतो, आणि अंतःपुरातून उदयनासाठी रक्षासूत्र मागवतो; परंतु ते येण्याआधीच उदयन बंदी झाल्याची वार्ता येते. उतावीळपणामुळे उदयनास अवंतीचा कारावास भोगावा लागतो. तेव्हा ज्या गजछलाने आपला राजा बंदिवासात सापडला त्याच गजछलाने त्यास सोडवून प्रतीपक्षावर मात करण्याची प्रतिज्ञा यौगंधरायण करतो. वत्सराज उदयन व अवंतीराज महासेन यांच्यात स्वाभाविक तणाव आहे. महासेन उदयनाच्या गुणांचा चाहता आहे;पण उदयनाचा मानी स्वभाव त्यांच्यातील संबंध सुधारण्यास आड येतो. दुसऱ्या अंकात मुलीच्या लग्नाच्या काळजीत असलेला राजा महासेन व राणी अंगारवती यांचा कौटुंबिक हृदयसंवाद चालू असतांनाच उदयनाला बंदी करून आणल्याची वार्ता कांचुकी याकडून महासेनाला समजते व त्याला अत्यानंद होतो. आपली कन्या वासवदत्ता हिच्यासाठी उदयन हाच योग्य वर आहे असे त्यांस वाटते. इतर अनेक राजांकडून वासवदत्तेस मागणी येत असते; परंतु उदयनाकडून प्रस्ताव येत नाही. उदयन वीणावादन करण्यात निपुण आहे आणि वासवदत्तेला वीणावादन शिकण्याची हौस आहे, तर आता उदयनच तिला वीणावादन शिकवेल असे मनोरथही तो रचतो.हे त्याचे मनोरथ तृतीय अंकात पूर्ण झाल्याचे दिसते. याच अंकात उदयानाचा अमात्य यौगंधरायण, वसंतक आणि रूमण्वान हे वेष पालटून अवंतीनगरीत प्रवेश करतात आणि उदयनाची सुटका करण्यासाठी कारस्थान रचतात. त्याचवेळी विदुषकाचे सोंग घेतलेला वसंतक सांगतो, उदयनाचे वासवदत्तेवर मन जडले आहे. हे समजताच ते उभयंताची सुटका करून त्यांना वत्सदेशात नेण्याची योजना आखतात. चौथ्या अंकात यौगंधरायण वासवदत्तेसह उदयनाची सुटका करून वत्सदेशाला धाडतो, आणि स्वतः पकडला जातो तेव्हा भरतरोहक आणि त्याच्यात झालेला खटकेबाज संवाद नाटकाची रंगत वाढवतो, तसेच यौगंधरायणाच्या अचल, तेजस्वी स्वाभिमानावर व राजनिष्ठेवर झगझगीत प्रकाश टाकतो. शौर्य, प्रसंगावधान, नीतिमत्ता, राजकारणपटुत्व हे त्याचे गुण उदयनाची सुटका करतांना दिसून येतात. तो धोरणी, मुत्सद्दी असला तरी माणुसकीला पारखा नाही. त्याने रचलेल्या डाव प्रतीडावांनी नाटकाची वीण भरलेली आहे. यौगंधरायणाच्या गुणांची प्रशंसा करून महासेन त्याला सन्मानाने तलवार बहाल करतो, आणि उदयन-वासवदत्तेच्या गांधर्वविवाहास मान्यता देतो.

वत्सराज उदयन युद्धवीर तसेच प्रेमवीरही आहे, प्रस्तुत नाटकात उदयन व वासवदत्ता यांच्या गांधर्वविवाहाचे कथानक असले तरी शृंगारापेक्षा राजकारणाचे रंग अधिक गडद व वेधक आहेत. उदयन-वासवदत्ता यांच्यातील अथांग प्रीती, भावनिक आंदोलने दर्शवण्यासाठी भासाने स्वप्नवासवदत्त या स्वतंत्र नाटकाची रचना केली आणि उदयनकथेला राजकारणी रूप देण्याची हौस प्रस्तुत नाटक लिहून पूर्ण केली. रुढार्थाने उदयन-वासवदत्ता हे दोघे नायक-नायिका असले तरी ते रंगमंचावर येत नाहीत, हे या नाटकाचे वैशिष्ट्य होय.राजनिष्ठेसाठी एक राजाचा अमात्य कोणकोणत्या प्रकारची राजकीय व्यूहनीती आखतो याचे चित्रण यौगंधरायणाच्या निमित्ताने भासाने या नाटकात केले आहे.

संदर्भ :

• गोखले, मंजुषा;माहुलीकर, गौरी;वैद्य, उमा; अभिजात संस्कृत साहित्याचा इतिहास, मुंबई विद्यापीठ, मुंबई, २००४.

• भट, गोविंद केशव संस्कृत नाटके आणि नाटककार, श्रीविद्या प्रकाशन, पुणे, १९८०.

समीक्षक : शिल्पा सुमंत