प्रतिमानाटकम् : रामायणकथेवर आधारित भासरचित सात अंकी संस्कृत नाटक. भासाने प्रस्तुत नाटकात रामायणाच्या कथानकात किंचित बदल करून स्वप्रतिभेने काही नवीन प्रसंग योजल्याने रामायणातील दुष्ट चित्रण सुष्ट आणि सुष्ट चित्रण निष्कलंक झाले असे दिसून येते. हरवलेल्या राज्याची पुनःप्राप्ती हे भास रचित नाटकांचे मध्यवर्ती सूत्र याही नाटकात आढळते. प्रस्तुत नाटकात सत्तावीस पात्र आहेत. सर्व पात्र हे रामायण या उपजीव्य महाकाव्यातील आहेत.

सूत्रधाराच्या प्रवेशाने अंकाची सुरूवात होते. रामाच्या राज्याभिषेकाची तयारी, वल्कलप्रसंग, अभिषेक थांबणे, लक्ष्मणाचा संताप, राम, सीता, लक्ष्मण यांचे वनात प्रस्थान इत्यादी कथाभाग प्रथम अंकात आहे. द्वितीय अंकात दशरथाचा विलाप, तृतीय अंकात भरताचा अयोध्या प्रवेश, प्रतिमागृह प्रसंग, कैकयीला दुषणे देऊन भरताचे रामास भेटायला जाणे, चतुर्थ अंकात राम-भरत भेट, रामाच्या पादुका घेऊन भरताचे अयोध्येस परतणे ह्या बाबी आहेत. पाचव्या अंकात राम-सीता दशरथाच्या श्राद्धाविषयी बोलत असतांना संन्यासी रुपात रावणाचा प्रवेश, श्राद्धासाठी कांचनपार्श्व उत्तम असल्याचे रावणाकडून समजल्यावर राम ते मिळवण्यासाठी जाताच रावणाकडून सीतेचे अपहरण, रावण-जटायु युद्ध, जटायुचा मृत्यु हे प्रसंग वर्णित आहेत. सहाव्या अंकात तपस्वीकडून रावण-जटायु युद्धाचे वर्णन, विष्कंभक, जनस्थानातून सुमंत्राचे आगमन, सीतापहरणाची वार्ता समजल्यावर भरतकडून कैकयीची निर्भत्सना, कैकयीचे स्पष्टीकरण, भरताला पश्चाताप, रामाच्या मदतीसाठी सैन्य पाठवणे हे प्रसंग आहेत. सातव्या अंकात लंकेतून विजयी होऊन राम सीतेसह जनस्थानात येतो, तेथे तीनही राजमातांना घेऊन भरत शत्रुघ्नासह येतो. रामास अभिषेक होऊन सर्वजण अयोध्येस परततात.

तृतीय अंकातील प्रतिमागृह प्रसंगावरून भासाला प्रस्तुत नाटकाचे नाव सुचले असावे, कारण या प्रसंगाचे त्याला विशेष महत्त्वही आहे. हा प्रसंग एक छोटीशी घटना म्हणून आलेला नाही तर तो अंकव्यापी आहे. या प्रसंगाने भासाला खुप काही सुचवायचे आहे. राजवाड्यातील घडामोडी, रामाचा वनवास, दशरथाचा मृत्यु या घटना आजोळी असणाऱ्या भरताला ठाऊक नाहीत. घरच्या भेटीची सुखद चित्र रंगवीत तो अयोध्येस निघाला. त्याला अयोध्येस घेऊन येणारा सारथी अशुभ घटनांची वाच्यता करत नाही. शुभ नक्षत्रावर नगरात प्रवेश करावा या कुलगुरूंच्या आदेशानुसार तो काही काळ नगराबाहेर प्रतीक्षा करत असतांना त्याला प्रतिमागृह दृष्टीस पडते. दिवंगत इक्ष्वाकु राजांच्या पाषाण प्रतिमांचे हे मंदिर आहे. येथेच दशरथाच्या मृत्यूची वार्ता आणि त्याला कारण झालेल्या घटना तेथील अबोल प्रतिमेने भरताला सांगितल्या. इक्ष्वाकु राजांशी भरताचे शरीरसाम्य प्रथम पुजाऱ्याच्या लक्ष्यात येते. त्याचा आवाज ऐकून सुमंत्राला दशरथाची प्रतिमाच आपल्याशी बोलत असल्याचा भास होतो, तर पुढे चवथ्या अंकात त्याच्या आवाजाने लक्ष्मणाला दशरथाची आठवण येते आणि समोर भरताला पाहताच त्याला तो राम भासतो, ते रूपसदृश पाहून लक्ष्मण म्हणतो, ‘दशरथासारखे भरताचे रूप म्हणजे जणू आरशात पडलेली रामाची प्रतिमाच’. प्रतिमागृहातील दशरथाची प्रतिमा हे जर राज्यविहीन अवस्थेचे प्रतिक, तर या साम्यामुळे राम आणि भरत हेही अराजकतेच्या चालत्या-बोलत्या जिवंत प्रतिमाच ठरतात, कारण वनवासी राम राजा नाही आणि भरताला राजा व्हायचे नाही, तसेच भरताचे रामाच्या रूपाशी आणि दशरथाच्या आवाजाशी साम्य दाखवून या तीनही एकमेकांच्या प्रतिमाच असल्याचे भासाने सूचित केले आहे. त्याबरोबरच रामायणाच्या कथानकामुळे कैकयीची जनमानसात असलेलेली प्रतिमा प्रस्तुत नाटकात पूर्णपणे बदलेली दिसते. येथील कैकयीच्या प्रतिमेने वाचकांच्या मनात आदराचे स्थान मिळवले आहे. रामायणाच्या कथानकात काही बदल करत भासाने कल्पनेची उत्तुंग भरारी घेऊन प्रस्तुत नाटकातील पात्रांच्या प्रतिमा अत्युच्च स्थानी नेऊन ठेवल्या आहेत.

प्रथम अंकातील वल्कलप्रसंग हा भासाच्या प्रतिभेची स्वतंत्र निर्मिती आहे. रामास वनवास घडणार हे प्रस्तुत प्रसंगातून भासाने आधीच सुचित केले आहे. सीतेनी उत्सुकता आणि कुतुहलापोटी परिधान केलेली वल्कल पाहून रामासही ती परिधान करण्याचा मोह होतो, पुढे तीच वल्कलं घालून ते वनात जातात. इश्वाकु वंशातील वृद्धपणाचा अलंकार राम-सीतेला तारुण्यातच परिधान करावा लागला. या प्रसंगाच्या निर्मितीने भासाने मोठेच नाट्यछलित साधले आहे. राम, लक्ष्मण आणि सीता हे दशरथाचा निरोप न घेताच वनात निघून गेल्याने दशरथ शोकसागरात बुडाला, त्याच्या शोकाने संपूर्ण द्वितीय अंक व्यापला. राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या वनगमनाची वार्ता सांगताना सुमंत्राने उच्चारलेला क्रमही दशरथाला सहन झाला नाही. शोकाग्नीने जळत त्याचा मृत्यु होतो. गादीवरच्या राजाचा मृत्यु हे तत्कालीन महान संकट होय. या संकटाची भीषणता दिसावी यासाठी भासाने स्वतंत्र अंक रचला. दुसऱ्या अंकातील दशरथाचा मृत्यु हे परचक्राचे दृश्य रूप मानले तर याच भीषणतेचे प्रतीकात्मक रूप तिसऱ्या अंकातील प्रतिमागृह प्रसंग. तृतीय अंकातील प्रतिमागृहाच्या प्रसंगातून दशरथाच्या मृत्यूची वार्ता भरताला समजणे ही भासाच्या कल्पनाशक्तीची स्वतंत्र निर्मिती आहे.

पाचव्या अंकात राम वनवासात असतांना राम आणि रावण एकमेकांसमोर येणे व त्यांच्यातील संभाषण हा संपूर्ण प्रसंग नवीन आहे. सीता अपहरणानंतरचे मूळ रामायणात आलेले प्रसंग म्हणजे सुग्रीवाशी रामाची मैत्री, वालीवध, सुग्रीवाला राज्याभिषेक, लंकेचे युद्ध, रावणवध हे सगळे ओझरत्या निवेदनात आले आहे. भासाने हे प्रसंग अभिषेक या नाटकात विस्ताराने वर्णन केले असल्याने येथे पुनरुक्ती टाळली असावी.

सहाव्या अंकात रामाचे क्षेमकुशल विचारण्यासाठी सुमंत्राला वनात पाठवणे, सीतापहरणाची वार्ता समजल्यावर जेव्हा भरत कैकयीची निर्भत्सना करतो. ती दुषणे असह्य झाल्यावर कैकयी सत्य परिस्थिती निवेदन करते. या प्रसंगातून भासाने कैकयीची प्रतिमा पूर्ण बदलून टाकली आहे. प्रतिमेतील कैकयी लोभी नाही. भरतास राज्य मिळावे ही तिची महत्त्वाकांक्षा नाही की प्राणप्रिय पुत्रास वनात धाडण्याची मनोमन इच्छाही नाही. श्रावणाच्या चुकून झालेल्या वधामुळे दशरथाला जो शाप मिळाला तो तर थांबवता येण्यासारखा नव्हता, पण त्याला निमित्त होणारा पुत्रविरह हा पुत्राच्या मृत्युने न घडता दुसऱ्या काही प्रकारे सिद्ध करण्यासाठी ती प्रयत्न करते. दशरथाला भरताचा विरह हा नैसर्गिक होता, या विरहाने त्याचा देहांत होण्याचा संभव नव्हता; परंतु त्याचे रामावर इतके प्रेम होते की त्याचा थोडासा विरह देखील सहन झाला नसता म्हणून कैकयी रामास वनात पाठवण्याचे योजते. राम दुरावला तर दशरथ जिवंत राहणार नाही, शापाची सिद्धी झाली म्हणजे निवृत्तीही होईल. निर्घृण नियतीला समाधान देऊनही हुलकावणी देण्याचा हा डाव ती कुलगुरूंच्या संमतीने रचते. ती रामाला चौदा दिवसच वनात पाठवणार असते; परंतु तणावपूर्ण मानसिकतेतून चौदा वर्ष बोलून जाते,हे कैकयीने दिलेले स्पष्टीकरण ऐकून भरतास पश्चाताप होणे, रामाच्या मदतीसाठी सैन्य पाठवणे इत्यादी नवीन कथाभाग योजून भासाने भरताच्या व्यक्तिरेखेस उठाव दिला आहे. सातव्या अंकातील जनस्थानात झालेला रामाचा अभिषेक हे सर्वच प्रसंग भासाने आपल्या उत्तुंग प्रतिभेतून व कल्पनाशक्तीतून चित्रित केले आहेत.

प्रस्तुत सात अंकी नाटकात रामकथेचा भासाने स्वतंत्रपणे केलेला सखोल अभ्यास, त्यातील पात्रांच्या मनोभूमिकांचे विश्लेषण करण्याचे सामर्थ्य आणि परंपरेपेक्षा निराळी मांडणी करण्याची धिटाई हे गुण प्रकर्षाने जाणवतात.

संदर्भ  :

• भट,गोविंद केशव, संस्कृत नाटके आणि नाटककार, श्रीविद्या प्रकाशन, पुणे,१९८०.

• मिरासदार,मंगला,  प्रतिमानाटकम् – भास लिखित प्रतिमा नाटकाचे मराठी भाषांतर,डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे.

• हिवरगांवकर,बळवंत रामचंद्र, भास कवीचीं नाटके, अहमदनगर,१९२६.

समीक्षक : अंजली पर्वते