दशवैकालिक सूत्र : अर्धमागधी प्राकृत भाषेतील महत्त्वाचे सूत्र. मुनिधर्मास योग्य अशा आचाराचे महत्त्व या ग्रंथातून सांगितले आहे. अर्धमागधी भाषेमध्ये एकूण ४५ आगम आहेत. त्या ४५ आगमांची अंग, उपांग, छेदसूत्र, मूलसूत्र, प्रकीर्णक अशी विभागणी केली आहे. दशवैकालिक सूत्र हे मूलसूत्रामध्ये येते. आचार हा जैन धर्माचा पाया आहे. या आचाराचे वर्णन दशवैकालिक सूत्र, उत्तराध्ययन सूत्र, आवश्यक सूत्र, पिंडनिर्युक्ति सूत्र, ओघनिर्युक्ति सूत्र, नंदी सूत्र व अनुयोगद्वार सूत्र यांमध्ये आले आहे.
दश म्हणजे दहा व वैकालिक म्हणजे संध्यासमय. दशवैकालिक हा ग्रंथ संध्यासमयी रचून पूर्ण झालेला असल्याने या ग्रंथाला दशवैकालिक हे नाव देण्यात आले. या ग्रंथाची रचना शय्यंभवाचार्य यांनी केली. शय्यंभवाचार्य यांना आपला पुत्र शिष्य मनक याचे आयुष्य केवळ ६ महिने राहिल्याचे ध्यानाने समजले होते. मनक यास कमीत कमी वेळेत मुनिधर्मास योग्य अशा आचाराचे महत्त्व सांगण्यासाठी या ग्रंथाची रचना केली. हा ग्रंथ गद्य-पद्य मिश्रित आहे. या ग्रंथाची रचना करताना शय्यंभवाचार्य यांनी पूर्वाचार्यांच्या ग्रंथातील काही भाग घेतल्यामुळे दशवैकालिक ही रचना स्वतंत्र न समजता निर्यूहण (संपादन) स्वरूपाची समजली जाते.
दशवैकालिक ह्या ग्रंथाचा अभ्यास जैन साधू-साध्वींमध्ये मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे हा ग्रंथ अतिशय महत्त्वाचा आहे. हा ग्रंथ १० अध्याय व दोन चूलिकांमध्ये विभागला आहे. त्यांची नावे पुढीलप्रमाणे – दुमपुप्फिया (द्रुमपुष्पिका), सामण्णपुव्वयं (श्रामण्यपूर्वकम्), खुड्डियायारकहा (क्षुल्लिकाचारकथा), छज्जीवणिया (षट्- जीवनिका),पिंडेसणा (पिण्डैषणा), महायारकहा (महाचारकथा), सुवक्कसुद्धी (सुवाक्यशुद्धी), आयारप्पणिही (आचारप्रणिधी), विणयसमाही (विनयसमाधी), आणि सभिक्खू (सभिक्षू). दोन चूलिकांची नावे रतिवाक्या आणि विविक्तचर्या अशी आहेत. पहिल्या अध्यायाच्या सुरुवातीला अहिंसा, संयम व तप या तिन्हींना खरा धर्म मानला आहे व हा धर्म मंगल आहे असे सांगितले आहे. त्यानंतर माधुकरी वृत्ती सांगितली आहे. माधुकरी वृत्ती म्हणजे भुंग्याची आहारपद्धती. भुंगा ज्याप्रमाणे झाडावरील फुलांना इजा न पोहचवता अनेक फुलांमधील रस गोळा करतो त्याप्रमाणे साधुनेही एकाच गृहस्थाकडून भिक्षा न मागता इतर गृहस्थांकडूनही थोडी थोडी भिक्षा ग्रहण करावी हे या अध्यायात सांगितले आहे. जो संयमामध्ये श्रम करतो तो श्रमण व जो श्रमणाचा भाव ते श्रामण्य होय. ह्या श्रामण्याचा स्वीकार करण्याआधी कोणत्या गोष्टीचा त्याग करायचा आहे हे श्रामण्यपूर्वकम् नावाच्या दुसऱ्या अध्यायात सांगितले आहे. ह्या अध्यायाच्या पहिल्याच श्लोकात म्हटले आहे की जो मुनी काम-भोगांचा (इंद्रिय विषयांचा) त्याग करत नाही, तो श्रामण्याचे पालन कसे करेल ? हे समजून सांगण्यासाठी शय्यंभवाचार्य राजीमती-रथनेमींचा दृष्टांत सांगितला आहे. इंद्रिय विषयांच्या आधीन गेलेले मुनी रथनेमी साध्वी राजीमतीला विषय सेवनाची इच्छा दर्शवितात. त्यावेळी साध्वी राजीमती रथनेमींना संयमामध्ये दृढ करण्यासाठी उपदेश देते. राजीमतीचा उपदेश ऐकून रथनेमी संयमामध्ये स्थिर होतात. तिसरा अध्याय आहे क्षुल्लिकाचार कथा. ह्या अध्यायामध्ये निर्ग्रंथ महर्षिंसाठी असलेल्या अयोग्य आचरणाचे अर्थात ५२ अनाचारांचे वर्णन केले आहे. हे ५२ अनाचार द्रव्यहिंसा व भावहिंसेवर आधारलेले आहेत.
षट्- जीवनिका नावाच्या चवथ्या अध्यायामध्ये आचार्यांनी सहा प्रकारच्या जीवांचे स्वरूप सांगून त्यांचे रक्षण करण्यास सांगितले आहे. पृथ्वीकायिक, अप्कायिक, तेजोकायिक, वायुकायिक, वनस्पतिकायिक आणि त्रसकायिक हे सहा प्रकारचे जीव आहेत. जर या जीवांचे स्वरूप माहीत नसेल तर चालताना, बसताना, उठताना, झोपताना, जेवताना, बोलताना जीवांची हिंसा होऊ शकते. ही हिंसा होऊ नये म्हणून या सर्व जीवांचे स्वरूप माहीत असणे आवश्यक आहे. याशिवाय या अध्यायात अहिंसा, सत्य, अचौर्य, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह या पाच महाव्रतांचेही वर्णन येते.
पाचवा अध्याय आहे पिण्डैषणा. पिंड म्हणजे आहार व एषणा म्हणजे शोध. या अध्यायामध्ये दोन उद्देशक आहेत. दोन्हीही उद्देशकांमध्ये आहार (भिक्षा) घेण्याची पद्धती सांगितली आहे. पहिल्या उद्देशकाच्या सुरुवातीच्या २६ गाथांमध्ये भिक्षा मागण्यासाठी कोणत्या मार्गाने जावे, जाताना काय काळजी घ्यावी आहे हे सांगितले. यानंतर भिक्षेमधे कोणत्या प्रकारचा आहार घ्यावा म्हणजे कल्पित आहार कोणता व अकल्पित आहार म्हणजे घेऊ नये असा आहार याचे वर्णन आहे. सहाव्या महाचारकथा नावाच्या अध्यायामध्ये मुनींच्या समस्त आचारांचे थोडक्यात वर्णन केलेले आढळते. त्यामुळे या अध्यायाला महाचार असे नाव देण्यात आले आहे. या अध्यायामध्ये साधूंचा एकूण १८ प्रकारचा आचार सांगितला आहे. या १८ प्रकारच्या आचारांमध्ये सहा व्रतांचे पालन (५ महाव्रते व रात्री भोजनत्याग व्रत), षट्-कायिक जीवांची रक्षा, अकल्पित आहार न घेणे, गृहस्थाच्या भांड्यात आहार न घेणे, पलंगावर न झोपणे, गृहस्थाच्या आसनावर न बसणे, स्नान तसेच शरीर शोभेचा त्याग करणे या सर्व क्रियांचा समावेश होतो. सुवाक्यशुदधी नावाच्या सातव्या अध्यायामध्ये चार प्रकारच्या भाषेचे स्वरूप सांगितले आहे. सत्य, असत्य, मिश्र आणि व्यवहार या चार प्रकारच्या भाषा आहेत. या चार भाषांपैकी सत्य आणि व्यवहार या दोन भाषा मुनींनी बोलण्यास योग्य आहेत व असत्य व मिश्र भाषा अयोग्य आहेत.
आठवा अध्याय आचारप्रणिधी नावाचा आहे. आचार म्हणजे आचरण तर प्रणिधी म्हणजे भांडार (मोठा साठा). आचरणाचे मोठे भांडार असलेले जे साधुत्व आहे त्याचा स्वीकार केल्यानंतर कसे आचरण करायला हवे ते या अध्यायामध्ये सांगितले आहे. विनय समाधी नावाच्या नवव्या अध्यायामध्ये ४ उद्देशक आहेत. अनेक मुनींच्या समूहाला संघ असे म्हणतात. ह्या संघाच्या प्रमुख मुनीला आचार्य किंवा धर्माचार्य असे म्हणतात. त्या धर्माचार्यांच्या बाबतीत इतर मुनींचे आचरण कसे असावे त्याचे वर्णन या अध्यायाच्या चारही उद्देशकांमध्ये केले आहे. सभिक्खू नावाच्या दहाव्या अध्यायामध्ये कोणाला भिक्षू म्हणावे याची व्याख्या सांगितली आहे. रतिवाक्या नावाच्या पहिल्या चूलिकेमध्ये मुनीने गृहस्थ आश्रमामध्ये जाण्याची इच्छा झाली असता किंवा संयम सोडण्यापूर्वी धर्मामध्ये स्थिर होण्यासाठी कोणत्या अठरा गोष्टींचा विचार करायचा आहे ते सांगितले आहे. दुसऱ्या विविक्तचर्या चूलिकेमध्ये पुण्यवान जीवांची धर्मामध्ये श्रद्धा उत्पन्न होईल अशा गोष्टी सांगितल्या आहेत.
या ग्रंथावर निर्युक्ती, भाष्य, चूर्णि, टीका, निर्युक्ति-दीपिका, दीपिका, वृत्ति, वार्तिक, या जैन साहित्यातील टीका प्रकारात लिहलेले आहे. अगस्त्यसिंह स्थविर व जिनदास महत्तर यांनी लिहलेल्या चूर्णि आणि हरिभद्रसूरि यांची टीका व अपराजित सूरि/विजयाचार्य यांची विजयोदया टीका जास्त महत्त्वाची आहे.या ग्रंथाचे जर्मन, इंग्रजी, हिन्दी, गुजराती, कन्नड अशा अनेक भाषांमध्ये भाषांतर झाले आहे.
संदर्भग्रंथ :
• नथमल, मुनी (संपा. आणि विवेचक), दसवेआलियं, जैन विश्व भारती, राजस्थान,१९६४.
• नेमिचंद्रशास्त्री (संपा), प्राकृत भाषा और साहित्य का आलोचनात्मक इतिहास, तारा बुक एजेन्सी, वाराणसी, १९८८.
समीक्षक : कमलकुमार जैन