तिलोयपण्णत्ति : दिगंबर जैन ग्रंथकार यतिवृषभ ह्याने जैन शौरसेनीत लिहिलेला भूगोल-खगोलविषयक ग्रंथ. ‘तिलोयपण्णत्ति’- संस्कृत रूप त्रिलोकप्रज्ञप्ती – म्हणजे त्रिलोकाविषयीचे ज्ञान. ह्या ग्रंथाचा रचनाकाल निश्चितपणे सांगता येत नसला, तरी त्यात आलेल्या ग्रंथकारांच्या आणि राजांच्या उल्लेखांवरून इसवी सनाचे पाचवे ते सातवे शतक एवढ्या कालावधीत तो केव्हा तरी रचिला गेला असावा. त्यातील ८,००० गाथा व पद्ये (प्रकाशित ग्रंथात ९,३४० गाथा आढळतात) पुढील नऊ महाधिकारांत किंवा प्रकरणांत विभागलेल्या आहेत : (१) सामान्यलोक, (२) नारकलोक, (३) भवनवासीलोक, (४) मनुष्यलोक, (५) तिर्यक्‌लोक, (६) व्यंतरलोक, (७) ज्योतिर्लोक, (८) देवलोक आणि (९) सिद्धलोक. ह्या ग्रंथात काही गद्य भागही आहे.

तिलोयपण्णत्तिमध्ये मुख्यतः भूगोल–खगोलविषयक माहिती आलेली असली, तरी जैन सिद्धांत, पुराणे, इतिहास आदी विषयही प्रसंगोपात्त हाताळलेले आहेत. जैनांच्या श्वेतांबर आगमातील सूरपन्नत्ति, चंदपन्नत्ती, जंबुद्दीवपण्णत्ति  ह्या ग्रंथांतील विषयांशी तिलोयपण्णत्तितील विषय मिळते-जुळते आहेत. ह्या ग्रंथातील अनेक गाथा लोकविभाग, मूलाचार, आराधना, प्रवचनसार  ह्यांसारख्या जुन्या दिगंबर ग्रंथात आढळतात. जैनांच्या श्वेतांबर आणि दिगंबर पंथांतील सामान्य परंपरा तिलोयपण्णत्तिमध्ये ग्रथित केलेली असावी,असा अभ्यासकांचा तर्क आहे. अग्रायणीय, दृष्टिवाद, लोकविनिश्चय  ह्यांसारख्या आज लुप्त असलेल्या प्राचीन ग्रंथांचे उल्लेख ह्या ग्रंथात आढळतात. वीरसेनादी ग्रंथकारांनी ह्या ग्रंथाच्या आदरपूर्वक केलेल्या उल्लेखांवरून दिगंबर जैनपरंपरेतील त्याचे महत्त्व दिसून येते. आ. ने. उपाध्ये आणि हिरालाल जैन ह्यांनी हा ग्रंथ दोन भागांत संपादिला आहे (१९४३,१९५१). त्याचे हिंदी भाषांतरही त्यांत आहे.

संदर्भ :

  • https://epustakalay.com/sanskrit/wp-content/uploads/2020/07/tiloya-pannatti-part