भक्तपरिज्ञा प्रकीर्णकम्‌ : (भत्तपरिन्नापइन्नय). अर्धमागधी भाषेतील पंचेचाळीस आगमांच्या दहा प्रकीर्णकांतील हे चौथे प्रकीर्णक आहे. भक्त म्हणजे आहार व परिज्ञा म्हणजे आहाराचा त्याग करणे. आहाराचा क्रमाक्रमाने त्याग करून मरणसमाधिकडे जाणे हा या ग्रंथाचा विषय आहे. यात १७३ गाथा आहेत. परलोक सिद्धीचे वर्णन आहे. अभ्युद्युत मरणाचे भत्तपरिज्ञा, इंगिनी व पादोपगमन असे तीन प्रकार सांगितले आहेत. भक्तपरिज्ञा मरणाचे सविचार आणि अविचार हे दोन प्रकार आहेत. आचार्यांनी भक्तपरिज्ञा समाधी मरणाच्या विवेचनामध्ये दर्शनभ्रष्ट अर्थात श्रद्धाभ्रष्ट व्यक्तीला मुक्तीचा अधिकार नाही असे म्हटले आहे.

दंसणभट्ठो भट्ठो दंसणभट्ठस्स नत्थि निव्वाणं। सिज्झंति चरणरहिआ दंसणरहिआ न सिज्झंति।।

यामध्ये दर्शन म्हणजे श्रद्धा याला जास्त महत्त्व दिले आहे. जो दर्शनापासून भ्रष्ट होतो त्याला निर्वाण प्राप्ती होऊ शकत नाही. बंध व मोक्षाचे कारण श्रम आहे. म्हणून त्याला वश करण्याकरता अनेक दृष्टांत दिले आहेत. मन एक क्षणभर सुद्धा शांत बसू शकत नाही म्हणून मनाला वानराची उपमा दिली आहे. स्त्रियांना भुजंगीची उपमा दिली आहे. या प्रकीर्णकाचे रचयिता वीरभद्राचार्य मानले जातात. १७३ गाथांचे वर्ण्य विषय असे आहेत. १ व २ गाथांमध्ये मंगलाचरण, ३ व ४ गाथांमध्ये ज्ञानमाहात्म्य, ५व्या गाथेमध्ये अशाश्वत सुखाचे निष्फलत्व, ६ व ७ गाथांमध्ये जिनाज्ञेचे आराधन करण्याचे शाश्वत सुख, ८ व ९ गाथांमध्ये अभ्युद्यत मरणाचे ३ प्रकार, १० व ११ गाथांमध्ये भक्तपरिज्ञा मरणाचे २ प्रकार, १२ ते १९ गाथांमध्ये भक्तपरिज्ञा घेणाऱ्या मुनींची गुरूंकडे विनंती व गुरूंचा आलोचना देण्याचा उपदेश, २०-२३ गाथांमध्ये भक्तपरिज्ञा घेणाऱ्या मुनींची आलोचना व प्रायश्चित, २४ ते २८ गाथांमध्ये गुरूने भक्तपरिज्ञा घेणाऱ्या मुनींना पंचमहाव्रते देणे, २९ ते ४७ गाथांमध्ये भक्तपरिज्ञा घेणाऱ्या मुनींचे देशविरतीचे आचरण व गुरूंनी सामायिक देणे, ४८ ते ५२ गाथांमध्ये भक्तपरिज्ञा घेणाऱ्याची क्षमापना, ५३-१५३ गाथांमध्ये क्रमाक्रमाने चतुर्विध आहारत्याग करणाऱ्याला गुरूंचा सविस्तर उपदेश, १५४ ते १५५ गाथांमध्ये अन्नत्याग करणाऱ्याला गुरूंच्या उपदेशाचे ज्ञान होणे, १५६ ते १७१ गाथांमध्ये अन्नत्याग करणाऱ्या वेदनाग्रस्त मुनींना गुरूपदेश, १७२ ते १७३ गाथांमध्ये अन्नत्याग करण्याचे माहात्म्य व अंतिम फलप्राप्ती ह्या विषयांचे विवेचन आहे. यावर गुणरत्नांची अवचूरी आहे.

संदर्भ :

  • जैन,जगदीशचंद्र  मेहता,मोहनलाल, जैन साहित्य का बृहद् इतिहास – भाग 2, पार्श्वनाथ विद्याश्रम शोध संस्थान, वाराणसी, १९६६,

समीक्षक : कमलकुमार जैन