योगवासिष्ठ  या ग्रंथामध्ये वसिष्ठ मुनींनी श्रीरामाला साधनेतील अवस्थेला अनुसरून सात भूमिका विशद करून सांगितल्या आहेत. यांचा निर्देश ज्ञानाच्या भूमिका (योगवासिष्ठ, उत्पत्तिप्रकरण ११८.१) आणि योगाच्या भूमिका (योगवासिष्ठ, निर्वाणप्रकरण, पूर्वार्ध १२६.१, अक्षि-उपनिषद् १०, १५) असा दोन्ही प्रकारे केलेला आढळतो. या चित्तवृत्तिलयाच्या (एकाग्रतेच्या) चढत्या पायऱ्या आहेत. चित्तवृत्ती म्हणजे चित्ताला एखाद्या पदार्थाचे होणारे भान किंवा ज्ञान. त्यातून त्या पदार्थाविषयी निर्माण होणारी प्रेरणा व ओढ होय. बाह्य पदार्थ अथवा विषयाचे ज्ञान हे त्या विषयाशी निगडीत क्रियेला जन्म देते आणि कर्मानुरूप जन्माच्या शृंखलेत  जीव बद्ध होतो. मोक्षप्राप्तीसाठी चित्ताची बाह्याभिमुखी वृत्ती अंतर्मुख करण्याचा प्रयत्न आणि क्रमाक्रमाने संपूर्ण वृत्तिलय होईपर्यंत साधना करणे आवश्यक आहे. सात भूमिकांच्या दृढ अभ्यासाने ते शक्य होते. ह्या सात भूमिकांचा दृढ अभ्यास योग्याला मोक्ष प्राप्त करून देतो. याठिकाणी अभ्यास ही संज्ञा साधनेच्या पुनरावृत्तीला अनुलक्षून योजली आहे.

मोक्षासाठी ज्ञान प्राप्त करणे आवश्यक आहे. चित्तवृत्ती अखंड आत्म्यावर एकाग्र (आत्माकार) करण्याचे ज्ञान योग्याला उत्तरोत्तर वेगवेगळ्या भूमिकांमधून प्राप्त होते. या एकूण सात भूमिका मानल्या असून त्यांची नावे योगवासिष्ठ  आणि अक्षि-उपनिषद्  या आणि अन्य काही ग्रंथांत पुढीलप्रमाणे आढळतात — (१) शुभेच्छा,  (२) विचारणा/विचार, (३) तनुमानसा/असंसर्गा  (४) सत्त्वापत्ति,  (५) असंसक्ति,  (६) पदार्थाभाविनी आणि (७) तुर्यगा.

(१) शुभेच्छा : अंत:करणात शुभ इच्छा किंवा सद्भावना निर्माण होणे हे ह्या भूमिकेचे लक्षण आहे. या भूमिकेत साधकाच्या मनामध्ये शास्त्राभ्यास, सत्संग, सद्गुरु, आत्मसाक्षात्कार, ईश्वरदर्शन याविषयी जिज्ञासा आणि आस्था निर्माण होते. या भूमिकेत साधकाला भोगाऐवजी अपवर्ग म्हणजे मोक्ष महत्त्वाचा वाटू लागतो. प्रपंचापासून त्याचे मन विरक्त होऊ लागते व सत्त्वगुण लागल्यामुळे चित्तास विक्षेप (एकाग्रतेकडे होणारी प्रवृत्ती) उत्पन्न होतो. म्हणून ह्या भूमिकेस विक्षेपता असेही म्हणतात. संक्षेपाने सांगावयाचे तर या भूमिकेत साधकाला आत्मसाक्षात्काराची ओढ लागते व त्याच्या मनामध्ये मुमुक्षुत्व म्हणजे मोक्षाची इच्छा उत्पन्न होते.

(२) विचारणा / विचार : अंत:करणात सद्भावना उत्पन्न झाल्यावर सारासार विचारशक्तीचा उदय होतो. या भूमिकेत साधक वैराग्य आणि अभ्यास यांच्या योगाने शास्त्राचे श्रवण, मनन करताना जे वाचतो व ऐकतो त्याचा अर्थ व रहस्य जाणून त्यानुसार कृती करण्यास प्रवृत्त होतो. शास्त्रांचे परिशीलन, सत्संग, गुरूंचे मार्गदर्शन यांच्या साहाय्याने साधक प्रत्यक्ष आचरणाला प्रारंभ करतो. शुद्ध व सात्त्विक कर्म करण्याकडे त्याचा कल होतो. शुभेच्छेला विचार व कृती यांचे अधिष्ठान लाभते. साधक सात्त्विक आहाराकडे वळतो. त्याचे मन ईश्वराच्या आराधनेत रमते. परिणामी  स्वभावातील चंचलता कमी होत जाते. ध्यान करताना चित्ताची बाह्यवृत्ती अंतर्मुख होऊ लागते. तरी सुद्धा तिचे बाह्य पदार्थाकडे जाणे व आत्म्याकडे येणे सुरू असते. म्हणूनच या भूमिकेस ‘गतायाता’ (गता गेलेली, आयाता आलेली) असेही म्हणतात.

(३) तनुमानसा : ज्या स्थितीत साधक आत्मा हाच केवळ ध्यानाचा विषय (ध्येय) मानून त्याच्या चिंतनात सर्वस्वी गढून जातो त्या स्थितीला तनुमानसा हे नाव दिलेले आहे. या ठिकाणी तनुता म्हणजे इंद्रियांची त्यांच्या विषयांमध्ये आसक्ती नसणे. (योगवासिष्ठ, उत्पत्तिप्रकरणम् ११८.१०)

या भूमिकेत साधक चित्तलयाच्या निरनिराळ्या उपायांनी अथवा योगाभ्यासाने इंद्रिये विषयांपासून माघारी आणतो. वृत्ती संपूर्ण अंतर्मुख करून ती हृदयाकाशात नेतो. हृत्कमलाचे ठिकाणी ब्रह्मतत्त्वावर (आत्मतत्त्वावर) धारणा करतो. त्यामुळे त्याचे चित्त ब्रह्ममय आणि ब्रह्माकार होते. ते अखंड आनंदात मग्न होते. हृदयाकाशात आत्म्याचे अर्थात् स्वस्वरूपाचे दर्शन झाले म्हणजे साधकाला होणाऱ्या आनंदाला विस्मयानंद म्हणतात. त्या आनंदात वृत्ती तटस्थ होऊन स्तब्ध होते. आजपर्यंत सुप्त असणारी अपवर्गप्रवृत्ती अर्थात् मोक्षप्रवृत्ती अधिकाधिक प्रगल्भ  होऊन तनुमानसा अवस्था निर्माण होते. शास्त्रश्रवण, मनन, ध्यान, धारणा यामध्ये व्यक्तीला वाढता आनंद जाणवतो. ही  भूमिका योग्याला आत्मसाक्षात्कार घडविते. या भूमिकेत साधकाचे चित्त आत्म्याशी जुळल्यामुळे तिला ‘संश्लिष्टता’ (श्लिष्-जुळणे)  असेही नाव आहे. या भूमिकेत साधकाला उन्मनी अवस्था साध्य होते. उन्मनी अवस्था म्हणजे साधक ब्रह्माशी एकाकार होणे. या अवस्थेत योगी संप्रज्ञात किंवा सविकल्पसमाधीमध्ये स्थिर होतो.

(४) सत्त्वापत्ति : आपत्ति शब्द ‘आ+पद्’ (प्राप्त करणे) या पासून तयार झाला आहे. सत्त्वगुणाचा उत्कर्ष होणे असा त्याचा अर्थ आहे. वस्तुत: सत्त्वापत्ति ह्या चौथ्या भूमिकेनेच साधकाच्या साक्षात्कारी जीवनाला खऱ्या अर्थाने प्रारंभ होतो. या अवस्थेत पूर्वजन्मातील संस्कार क्रमश: लोप पावतात आणि साधकाचा देहाभिमान गळून पडतो व त्याला असंप्रज्ञात अथवा निर्विकल्प समाधीचा अनुभव येतो. हा अनुभव म्हणजे ब्रह्म आणि जीवात्मा यांच्या ऐक्याची अनुभूती होय. हिला अपरोक्षानुभूती म्हणजे प्रत्यक्ष अनुभूती म्हणतात. या भूमिकेवर स्थिर असणाऱ्या योग्यास ‘ब्रह्मवेत्ता’/‘बह्मविद्’ (ब्रह्म जाणणारा) अशी संज्ञा प्राप्त होते. निर्विकल्प समाधीद्वारा आत्मदर्शन घडून साधक स्वरूपाशी समरस होतो.चित्तवृत्ती स्वरूपात पूर्णपणे लीन होते म्हणून या भूमिकेस ‘सुलीनता’ असेही  म्हणतात.

(५) असंसक्ति : ‘असंसक्ति’ शब्द ‘न (अ) सञ्ज् (चिकटणे) यापासून तयार झाला आहे. बाह्य पदार्थांविषयी आसक्ती नसणे असा त्याचा अर्थ आहे. या भूमिकेत साधकाचा सविकल्प समाधीचा अभ्यास पूर्ण होतो आणि चित्ताचा निरोध घडून साधकाच्या निर्विकल्प अवस्थेतील स्थैर्याला प्रारंभ होतो. त्याला निरनिराळ्या सिद्धीदेखील प्राप्त होतात. त्याचा अहंभाव पूर्णपणे नष्ट होतो. त्याचे विश्वात्मक चैतन्यशक्तीशी तादात्म्य घडत असल्यामुळे केवळ संकल्प स्फुरणाने त्याला जी जी इच्छा होईल तशा तशा घटना घडून येतात. ब्रह्माचा अपरोक्ष (प्रत्यक्ष) साक्षात्कार होतो. योगी ‘स्व’ म्हणजे ब्रह्मरूपाशी ऐक्य पावल्यामुळे जे सुख मिळते त्याचा अनुभव  प्राप्त करतो. परंतु, पूर्व संचितामुळे तो पुन्हा देहप्रारब्ध भोगण्यास सिद्ध होतो. हठयोगानुसार साधक समाधीतून व्युत्थान दशेस येतो. मात्र हे व्युत्थान स्वसंकल्पाने घडते. पाचव्या भूमिकेप्रत पोहोचलेल्या योग्याला ‘ब्रह्मविद्वर’ (ब्रह्म जाणणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ) ही संज्ञा प्राप्त होते. या अवस्थेला जीवन्मुक्ताची जागृतावस्था म्हटले जाते.

(६) पदार्थाभाविनी : (पदार्थ + अभाविनी) हे नाव देण्याचे कारण या भूमिकेत चित्त आभ्यन्तर किंवा बाह्य पदार्थात रमत नाही. साधकाला त्यांचे अस्तित्व जाणवत नाही (योगवासिष्ठ, उत्पत्तिप्रकरणम् ११८.१४). या अवस्थेत योग्याचे मन संकल्प-विकल्परहित होते. तो परब्रह्मपदाची प्राप्ती झाल्यामुळे त्या आनंदात सदैव मग्न असतो. या अवस्थेत योगी चित्रातील दिव्याप्रमाणे स्थिर असतो. समुद्रातील घडा ज्याप्रमाणे पाण्याने पूर्ण भरलेला असतो व त्याच्या सभोवताली पाणीच पाणी असते त्याप्रमाणे तो अंतर्बाह्य ब्रह्माने परिपूर्ण असतो. ज्याप्रमाणे अवकाशातील घडा आतून व बाहेरून रिकामाच राहतो. त्याप्रमाणे तो आतून बाहेरून शून्यवत् असतो. त्याचे चित्त उन्मनी अवस्थेत असते आणि त्याचे लौकिक व्यवहार निद्रेत असल्याप्रमाणे घडतात. भगवद्गीतेमध्ये यालाच ‘जी सर्वसामान्य माणसांची जागृतावस्था असते ती ज्ञानी योग्यासाठी निद्रा असते’, असे म्हटले आहे (२.६९). या भूमिकेत स्थिर झालेल्या योग्यास ‘ब्रह्मविद्वरीयान्’ असे म्हणतात.

(७) तुर्या / तुर्यगा : या अवस्थेत जीवात्मा आणि परमात्मा यांच्या ऐक्याचे ज्ञान झाल्यामुळे चित्त अखंड स्वरूपनिष्ठ राहू लागते. तुर्यगा ही भूमिका स्वयंप्रकाशित आहे. मन आणि वाणी तिच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. ही तुर्यावस्था योग्याला तो जिवंत असतानाच प्राप्त होते. तर विदेहमुक्ति ही देहत्यागानंतरची स्थिती असून तिलाच मुक्ती अथवा तुर्यातीत स्थिती म्हणतात. स्थूलदेह, सूक्ष्मदेह  या तीनही देहांपासून तुर्य अवस्थेतील योगी मुक्त होतो. तो निरंतर सर्वनिरोधरूप निर्विकल्प समाधीत राहतो. परिणामी तो परब्रह्माशी संपूर्ण एकरूप झालेला असतो. ‘सोऽहम्’ (‘तो आत्माच मी आहे’) या जाणीवेत तो स्थिर असतो. त्याची वृत्ती पुन: केव्हाही व्युत्थान (उत्थान) दशेस येत नाही.

‘पुरुषार्थशून्यानां गुणानां प्रतिप्रसव: कैवल्ये स्वरूपप्रतिष्ठा वा चितिशक्तिरिति |’ (योगसूत्र ४.३४) या अंतिम योगसूत्रात सांगितलेली त्रिगुणातीतता, स्वरूपप्रतिष्ठा किंवा केवळ चैतन्यरूपात उरणे असे केलेले वर्णन या अवस्थेला लागू होते. या भूमिकेत स्थिर झालेल्या योग्याला ‘ब्रह्मविद्वरिष्ठ’ ही संज्ञा प्राप्त होते. योगसूत्रात (१.३०) साधेनेतील अडथळ्यांपैकी  ‘अलब्धभूमिकत्व’  (भूमिकेत स्थिर न  होणे) हा एक अडथळा सांगितला आहे.

शुभेच्छा, विचारणा/विचार, तनुमानसा/असंसर्गा या तीन भूमिका जीवाच्या जाग्रत् अवस्थेशी संबद्ध आहेत, सत्त्वापत्ति ही भूमिका स्वप्न अवस्थेशी, तर असंसक्ती ही सुषुप्ती अवस्थेशी संबद्ध आहे. पदार्थाभाविनी या भूमिकेत जीवाला कोणतीही संवेदना होत नाही, कारण तो तुर्यावस्थेत असतो. या अवस्थेत त्याचे स्थूल, सूक्ष्म आणि कारण शरीर विलीन झालेले असते. (योगवासिष्ठ, निर्वाणप्रकरणपूर्वार्ध १२०.७-९).

एका जन्मामध्ये साधक किती भूमिका साध्य करू शकेल हे त्याच्या उपासनेवर अवलंबून आहे. योगवासिष्ठात वसिष्ठ मुनी असे म्हणतात की, साधनेच्या मार्गावर अनेक प्रकारच्या भूमिकांचे वर्णन आढळते, परंतु वर निर्देश केलेल्या भूमिका त्यांना प्रिय आहेत. (योगवासिष्ठ, उत्पत्तिप्रकरणम् ११८.२)

भूमिकांचे हे वैविध्य बौद्ध दर्शनातही आढळते. उदा., महायानसूत्रालंकारामध्ये बोधिसत्त्वाच्या मुदिता, विमला, प्रभाकरी, अर्चिष्मती, दुर्जया, अभिमुखी, दूरङ्गमा, अचला, साधुमती, धर्ममेघा अशी भूमिकांची नावे आढळतात; तर महावस्तु  आणि प्रज्ञापारमिता  सूत्रामध्ये भूमिकांची नावे निराळी दिली आहेत. सारांश, कोणतीही साधना ही दीर्घकाळ, निरंतर आणि टप्प्या-टप्प्याने विकसित झाल्यावर फलदायी ठरते.

                                                                                          समीक्षक : उदय कुमठेकर