प्राण, अपान, समान, उदान, व्यान हे पाच प्रमुख प्राण तसेच नाग, कूर्म, कृकल, देवदत्त आणि धनंजय हे पाच उपप्राण मानवी देहातील नाड्यांमध्ये संचार करतात. प्राणवायू हृदयात, अपानवायू गुदास्थानामध्ये, समानवायू नाभिप्रदेशामध्ये, उदानवायू कंठामध्ये आणि व्यानवायू शरीरात सर्वत्र राहतो (घेरंडसंहिता ५.६१-६२). प्राणवायू मुख, नासिका, कंठ, नाभी, पायाचे अंगठे आणि कुंडलिनी शक्तीच्या शाण्डिल्यउपनिषद १.४.१३). वरच्या व खालच्या भागात संचार करतो. कान, डोळे, कंबर, घोटे, नाक, गळा आणि नितंब या स्थानी व्यानवायू संचार करतो (शाण्डिल्यउपनिषद १.४.१३). गुदास्थान, लिंग, मांड्या (ऊरू), गुडघे, उदर, अंडकोश, कंबर, पोटऱ्या, नाभी आणि गुदास्थानी असलेला अग्नी येथे अपानवायू संचार करतो. शरीरातील सर्व सांध्यांमध्ये उदान वायू संचार करतो. समानवायू हा हात, पाय इत्यादी संपूर्ण अवयवांना व्यापून राहतो. हा ग्रहण केलेल्या अन्न, रस इत्यादींना संपूर्ण शरीराकडे पोहचवितो.

श्वास, प्रश्वासव खोकला येणे हे प्राणवायूचे कार्य आहे. मल-मूत्र इत्यादींचे विसर्जन करणे हे अपानवायूचे कार्य आहे. ग्रहण करणे, टाकून देणे हे कार्य व्यानवायूचे आहे. देहाचे उन्नयन करणे अर्थात देह ताठ ठेवणे हे उदानवायूचे कार्य आहे. शरीराचे पोषण करणे हे समानवायूचे कार्य आहे. त्यासाठी तो अन्नापासून रस, रक्त, वीर्य, विष्ठा, मूत्र इत्यादी बनवितो (वेदान्तसार १७). नाग हा उचकी, ढेकर आणि वांतीला कारणीभूत होतो (शिवसंहिता ३.८). या वायूद्वारे शरीरात चैतन्य निर्माण होते. पापण्यांची उघडझाप करणे हे कूर्मवायूचे कार्य आहे. कृकल हा भूक आणि तहान उत्पन्न करतो. तंद्री लागणे (सुस्ती येणे) जांभई देणे हे देवदत्त वायूचे कार्य आहे. श्लेष्म (कफ), ध्वनी निर्माण करणे इत्यादी धनंजय वायूचे कार्य आहे. धनंजयवायू हा मृत्युनंतरही देह सोडून जात नाही (घेरंडसंहिता  ५.६४-६५).

वस्तुत: वायू हा एकच असला तरी कार्य, स्थान व संचारक्षेत्रामुळे त्याला वेगवेगळी नावे प्राप्त झाली आहेत.

संदर्भ :

  • आचार्य श्रीनिवास शर्मा, घेरण्ड-संहिता, चौखम्बा विद्याभवन, वाराणसी, २००६.
  • आचार्य श्रीराम शर्मा, १०८ उपनिषद्, ब्रह्मवर्चस्, हरिद्वार, २००३.
  • स्वामी महेशानन्दजी, शिवसंहिता, कैवल्यधाम, लोनावला, १९९९.
  • Hiriyanna M, Vedāntasāra, Oriental Book Agency, Poona, 1962.

समीक्षक : रुद्राक्ष साक्रीकर