निम्नव्होल्टता वितरण पद्धती (Low-Voltage Distribution System -LVDS) : प्रचलित विद्युत पद्धतीप्रमाणे दुय्यम वितरण प्रणालीमध्ये ११ kV उच्च व्होल्टता तारमार्गाचे शेवटी ११ kV / ४१५ V गुणोत्तराचे ६३, १०० किंवा २०० kVA क्षमतेचे अवरोहित्र बसविले जाते. तेथून निम्न व्होल्टता तारमार्गाने अनेक ग्राहकांना विद्युत पुरवठा केला जातो. या पद्धतीस निम्न-व्होल्टता वितरण पद्धती म्हटले जाते.

आ. १. निम्न-व्होल्टता वितरण पद्धती.

निम्न-व्होल्टता वितरण पध्दतीमधील समस्या : या पद्धतीत निम्न व्होल्टता तारमार्गाची लांबी जास्त असल्याने रोहित्रापासून जसजसे दूर जाऊ तसतसा विद्युत दाब कमी होत जातो. प्रसंगी ग्राहकाला निर्धारित पातळीपेक्षा दाब कमी मिळाल्याने उपकरणाच्या चालनात अडचणी येतात. तसेच जास्त लांबीच्या निम्न व्होल्टता तारमार्गावर गैरमार्गाने त्यावर आकडे टाकून विजेची चोरी करणारे ग्राहकही अनेक असतात. तारमार्गाची लांबी बरीच असल्याने त्यावर नियंत्रण करणेही दुरापास्त होते.  आ. १ मध्ये नमुन्यादाखल निम्न-व्होल्टता वितरण पद्धती दाखवली आहे.

 

आ. २. उच्च-व्होल्टता वितरण पद्धती.

उच्चव्होल्टता वितरण पद्धती (High-Voltage Distribution System – HVDS) : ही पध्दती वापरून या समस्यांवर मात करता येते. या पद्धतीत ११ kV तारमार्ग ग्राहकाच्या स्थानापर्यंत टाकला जातो व १ / २ ग्राहकांसाठी कमी क्षमतेचे अवरोहित्र बसविले जातात. ११ kV / ४१५ V गुणोत्तराचे १०, १६ किंवा २५ kVA क्षमतेचे अवरोहित्र बसविले जाते. आ. २ मध्ये नमुन्यादाखल उच्च-व्होल्टता वितरण पद्धती  दाखवली आहे.

 

 

उच्चव्होल्टता वितरण पद्धतीचे फायदे :

(१) विद्युत भारामुळे वाहणारा विद्युत प्रवाह हा विद्युत दाबाच्या व्यस्त प्रमाणात बदलतो. ह्या कारणाने इच्छित भारास उच्च-व्होल्टता वितरण पद्धतीत विद्युत प्रवाह निम्न-व्होल्टता वितरण पद्धतीपेक्षा कमी असतो.

विद्युत हानी = (प्रवाह) × विद्युत रोध

या सूत्राप्रमाणे विद्युत हानी (Line losses) मोजली जाते. परिणामतः उच्च-व्होल्टता वितरण पद्धतीत विद्युत हानी कमी होते

(२) ११ kV तारमार्ग ग्राहकाच्या स्थानापर्यंत असल्याने विद्युत दाब योग्य प्रमाणात मिळतो. त्यामुळे ग्राहकाचे उपकरण योग्य पद्धतीने चालून ग्राहकाचे समाधान मिळते.

(३) ह्या पद्धतीत अवरोहित्रापासून ग्राहकाला सरळ वीज पुरवठा होत असल्याने निम्न व्होल्टता तारमार्गाची लांबी नगण्य असते. त्यामुळे अनधिकृतपणे विजेची चोरी करणे अशक्य होते.

(४) निम्न-व्होल्टता वितरण पद्धतीत अवरोहित्रात काही कारणाने बिघाड झाल्यास १०-१५ ग्राहकांना झळ पोहोचते. नागरी विभागात घरगुती ग्राहकांची संख्या १०० पर्यंतही असू शकते. उच्च-व्होल्टता वितरण पद्धतीत अशा परिस्थितीत केवळ १-२ ग्राहकांनाच ह्याची झळ पोहोचू शकते.

(५) केंद्रीय विद्युत प्राधिकरण, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश इ. ठिकाणी केलेल्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, अस्तित्वात असलेली निम्न-व्होल्टता वितरण पद्धती बदलून त्या जागी उच्च-व्होल्टता वितरण पद्धतीची रचना केल्यास झालेला खर्च व विद्युत हानीतील होणारी बचत ह्यायोगे मुद्दल परतीचा काल (pay-back period) २-३ वर्षांचा असतो.

महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गुजरात, पश्चिम बंगाल, केरळ, तमिळनाडू, कर्नाटक इ. राज्यांत उच्च-व्होल्टता वितरण पद्धती काही भागात अवलंबिली आहे.

 

संदर्भ :

• Central Electricity Authority, Guidelines for Distribution Utilities for Development of Distribution Infrastructure, June 2018, New Delhi.

• Suresh V., Benefits of HVDS for Agriculture, July 2018, Electrical India, Navi Mumbai.

 

 

समीक्षक : गीतांजली वैद्य