वर्तमान, भूत, भविष्य, तास, मिनिट, सेकंद, वर्ष, महिने, दिवस इत्यादी अनेक शब्दांद्वारे आपण काळाविषयी व्यवहार करीत असतो. ‘काल’ या तत्त्वाविषयी सर्व भारतीय दर्शनांमध्ये विशेषत्वाने विचार करण्यात आलेला आहे. महर्षि पतंजलींनी योगसूत्रांमध्ये काळाची व्याख्या केलेली नाही, पण काही सूत्रांमध्ये त्यांनी कालवाचक शब्दांचा उल्लेख मात्र केलेला आहे. व्यासभाष्यामध्ये काळाचे स्वरूप स्पष्ट करताना त्याचे यथार्थ आणि काल्पनिक असे दोन प्रकार केलेले आहेत –
(१) यथार्थ (वास्तविक) काल : क्षण हेच फक्त काळाचे वास्तविक रूप आहे. क्षण म्हणजे नक्की काय, याविषयी व्यासभाष्यात (३.५२) दोन प्रकारे विवेचन केलेले आहे.
(अ) ज्याप्रमाणे एखाद्या पदार्थाचे विभाजन करीत गेल्यास सर्वांत सूक्ष्म अंश म्हणजे परमाणु होय, त्याचप्रमाणे काळाचे विभाजन करीत गेल्यास काळाचा जो सूक्ष्मतम अंश आहे, त्याला क्षण असे म्हणतात. परमाणु हा द्रव्याचा सूक्ष्मतम अंश आहे, त्याचे अधिक विभाजन करणे शक्य नाही; तसेच क्षण हा काळाचा ज्ञानगम्य असा सूक्ष्मतम अंश आहे, त्याचे अधिक विभाजन करणे शक्य नाही.
(आ) गतिमान परमाणूला एका स्थानापासून (अगदी शेजारच्या) दुसऱ्या स्थानापर्यंत जाण्यासाठी जेवढा कालावधी लागतो, तो कालावधी म्हणजे क्षण होय.
या दोन व्याख्यांमधील पहिली व्याख्या क्षणाची सूक्ष्मता सांगते, तर दुसरी व्याख्या ‘क्षण’ कसा मोजता येऊ शकतो, याविषयी विवेचन करते.
(२) काल्पनिक काल : क्षण हा काळाचे यथार्थ (वास्तविक) रूप आहे, परंतु अनेक क्षणांचा समूह/संघात असलेली व व्यवहारामध्ये काल मोजण्यासाठी वापरली जाणारी विविध परिमाणे काल्पनिक आहेत. कारण ही परिमाणे मानवनिर्मित आहेत. उदाहरणार्थ, एका दिवसात २४ तास असतात हे आपण जाणतो, परंतु जर ठरविले तर एका दिवसाचे विभाजन ३० तासांमध्येही करता येऊ शकते. तसे केल्यास ४८ मिनिटांचा एक तास होईल किंवा १ मिनिट ६० सेकंदांचा असतो, त्याऐवजी तो १०० सेकंदांचाहीकरता येऊ शकतो. म्हणजे अनेक क्षणांचा समूह करून बनलेली जी परिमाणे व्यवहारात आपल्याला काळाचा बोध करवून देतात, ती वास्तविक नसून आपल्या कल्पनाबुद्धीतून निष्पन्न होतात. जुन्या काळी वापरली जाणारी घटिका, पळे, प्रहर, मुहूर्त इत्यादी अनेक परिमाणे आज वापरली जात नाहीत. जर ती काळाचे वास्तविक स्वरूप असती, तर ती कधीच कालबाह्य झाली नसती.
क्षण हे काळाचे यथार्थ रूप आहे परंतु, अनेक क्षणांचा संघात होऊन बनलेली इतर परिमाणे काळाचे यथार्थ रूप नाहीत, कारण प्रत्यक्षात क्षणांचा संघात कधीच होऊ शकत नाही. उदाहरणार्थ, एखाद्या खोलीत २० माणसे बसली आहेत, तर त्यांच्यासाठी आपण संघात किंवा समूह असा शब्दप्रयोग करू शकतो. कारण २० जण एका ठिकाणी एकाच वेळी उपस्थित आहेत. परंतु, खोलीत एका व्यक्तीने प्रवेश केला, नंतर ती व्यक्ती निघून गेली आणि दुसऱ्याने प्रवेश केला; दुसरा निघून गेल्यावर तिसऱ्याने प्रवेश केला, अशा पद्धतीने २० जणांनी एकानंतर एक असा त्या खोलीत प्रवेश केल्यास त्या २० लोकांना आपण ‘एक समूह’ अशी संज्ञा देऊ शकत नाही; कारण ते सर्व त्या ठिकाणी एकाच वेळी उपस्थित नाहीत. त्याचप्रमाणे क्षणांचा समूहसुद्धा खरा समूह नसून काल्पनिक समूह आहे, कारण अनेक क्षण एकाच वेळी अस्तित्वात असू शकत नाहीत. एक क्षण व्यतीत झाल्यावर दुसरा क्षण उदित होतो, दुसरा क्षण व्यतीत झाल्यावर तिसरा क्षण, याप्रकारे क्षणांचा निरंतर क्रम आहे. एक तास म्हणजे अनेक क्षणांचा समूह असे आपण समजतो, परंतु क्षणांचा समूह होणे शक्य नाही कारण क्षण हे क्रमाक्रमाने अस्तित्वात असतात. त्यामुळे क्षण-समूह किंवा क्षण-समाहार हा ‘वस्तु-समाहार’ नसून तो ‘बुद्धि-समाहार’ आहे असे व्यास म्हणतात. म्हणजे क्षणांचा समूह फक्त जाणणाऱ्याच्या बुद्धीमध्येच आहे, प्रत्यक्षात नाही.
जर क्षणांचा समूह प्रत्यक्षात अस्तित्वात नाही, तर त्याचे ज्ञान कसे होऊ शकते, याचे स्पष्टीकरण एका उदाहरणाद्वारे देता येते – एखादे वाक्य उच्चारत असताना वाक्यातील सर्व शब्द किंवा सर्व ध्वनी एकाच वेळी उच्चारता येऊ शकत नाहीत. ‘भारत माझा देश आहे’ हे वाक्य उच्चारताना ज्या क्षणी ‘भा’ उच्चारले जाते, त्यावेळी ‘र’ ध्वनी अस्तित्वात नाही. जेव्हा ‘र’ उच्चारला जातो, त्यावेळी ‘भा’ ध्वनी नष्ट झालेला आहे आणि ‘त’ अजून उच्चारले जाणे बाकी आहे. याचप्रमाणे एका वेळी एकच ध्वनी उच्चारला जाऊ शकतो. त्यामुळे वाक्याला शब्दांचा किंवा ध्वनींचा समूह म्हटले जाऊ शकत नाही, कारण सर्व ध्वनी एकाच वेळी अस्तित्वात नाहीत. परंतु, तरीही सर्व ध्वनी ऐकल्यानंतर श्रोत्याच्या बुद्धीमध्ये त्या सर्व ध्वनींचा एकीभाव होऊन शब्दांचे समूहरूपाने ज्ञान होते. त्याचप्रमाणे जरी अनेक क्षण एकाच वेळी अस्तित्वात नसले तरीही अनेक क्षणांचा एकीभाव होऊन समूहरूपाने त्यांचे तास, मिनिट इत्यादी रूपांमध्ये ज्ञान होते.
यथार्थ कालाचे (क्षणाचे) ज्ञान प्रमाण वृत्तीद्वारे होते तर काल्पनिक कालाचे ज्ञान विकल्प वृत्तीद्वारे होते, असे व्यास म्हणतात. जरी योगदर्शनामध्ये ‘क्षण’ हेच काळाचे यथार्थ रूप आहे, असे मानले असले तरीही बौद्धदर्शनामध्ये मानलेल्या क्षणिक वादाच्या सिद्धांतापेक्षा योगाचे मत वेगळे आहे. क्षणिक वादानुसार सर्व पदार्थ हे केवळ एक क्षण अस्तित्वात असतात व दुसऱ्या क्षणाला ते नष्ट होतात. योगदर्शनानुसार पदार्थ हे क्षणिक नसून नित्य आहेत; त्यांमध्ये केवळ परिवर्तन, परिणाम होतात.
सांख्य आणि योगदर्शनामध्ये मानलेल्या २५ तत्त्वांमध्ये काळाची गणना स्वतंत्र तत्त्व म्हणून केलेली नाही; तर त्याचा समावेश ‘आकाश’ या महाभूतामध्ये करण्यात आला आहे. न्याय आणि वैशेषिक दर्शनांनुसार काल हे एक द्रव्य असून ते नित्य आणि विभु (सर्वव्यापी) आहे. वेदान्तानुसार काल नित्य नसून मायाशक्तीमुळे उत्पन्न होतो व व्यावहारिक सत्तेमध्ये त्याचे अस्तित्व असते. याप्रमाणे भारतीय दर्शनांमध्ये ‘काल’ या तत्त्वाविषयी वेगवेगळे विचार दिसून येतात.
संदर्भ : स्वामी श्री ब्रह्मलीनमुनि, पातञ्जलयोगदर्शन, वाराणसी, २००३.
समीक्षक : कला आचार्य