ऋतंभरा या शब्दाची व्युत्पत्ती ‘ऋतं बिभर्ति’ अर्थात् वैश्विक सत्य धारण करते ती प्रज्ञा अशी आहे. वेदानुसार ऋत ही वैश्विक सत्याची संकल्पना आहे; पण ती सत्यापेक्षाही व्यापक व उदार आहे. सत्य ही असत्याला सापेक्ष अशी संकल्पना आहे. सत्य तर्काच्या साह्याने व बुद्धीने जाणता येते; परंतु ऋत हे परिपूर्ण असून ते जाणण्यासाठी वेगळ्या प्रज्ञेची आवश्यकता आहे.

ऋतंभरा प्रज्ञेचा उदय ही साधकाच्या संप्रज्ञात अर्थात् सबीज समाधिकडून असंप्रज्ञात म्हणजे निर्बीज समाधीकडे जाण्याच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा आहे. महर्षी पतंजलींच्या मते वस्तूचे प्रकृष्ट अर्थात् परिपूर्ण ज्ञान म्हणजे प्रज्ञा होय. सामान्यपणे व्यवहारदशेत ज्ञान प्रत्यक्ष, अनुमान आणि आगम (शब्द) या प्रमाणांनी उत्पन्न होते. योगसाधनेने निर्विचार समाधीत रजोगुण आणि तमोगुण यांनी कलुषित न झालेली शुद्ध सात्त्विक बुद्धी म्हणजेच वैशारद्य प्राप्त झाले असता अध्यात्म प्रसाद होतो व योग्याची प्रज्ञा ऋतंभरा होते असे पतंजलींनी सांगितले आहे. निर्विचार समाधीत जेव्हा परिपक्वता लाभते तेव्हा योग्याचे चित्त प्रशांत व स्वच्छ होते. या स्थितीत चित्त साक्षात्काराला सिद्ध होते. यालाच अध्यात्म-प्रसाद म्हटले आहे– निर्विचारवैशारद्येऽध्यात्मप्रसाद:| (योगसूत्र १.४७). आत्म्यासंबंधी सर्व विकल्प दूर होऊन चित्त निर्मळ होते. त्यावेळी उदयाला येणारी प्रज्ञा ऋताने परिपूर्ण झालेली असते.

ही प्रज्ञा निर्विचार समापत्तीच्या अविरत साधनेने प्राप्त होते. या प्रज्ञेचा विषय लौकिक प्रत्यक्षप्रमाणाने, शब्दप्रमाणाने किंवा अनुमानाने प्राप्त होणाऱ्या ज्ञानापेक्षा वेगळा असतो असे पतंजली म्हणतात– श्रुतानुमानप्रज्ञाभ्यामन्यविषया विशेषार्थत्वात्| (योगसूत्र १.४९). या प्रज्ञेने वस्तुमात्राच्या विशेष अर्थाचे ज्ञान प्राप्त होते. ऋतंभरा प्रज्ञेतून होणाऱ्या विशेष अर्थज्ञानाचाही संस्कार उत्पन्न होत असतो; पण हा संस्कार अन्य सर्व संस्कारांना प्रतिबंध करतो– तज्ज: संस्कारोऽन्यसंस्कारप्रतिबन्धी| (योगसूत्र १.५०). या संस्काराचाही प्रतिबंध होतो तेव्हा सर्व संस्कारांचा व त्यातून उत्पन्न होणाऱ्या वृत्तींचा निरोध होऊन निर्बीज समाधी सिद्ध होते असा साधकाच्या पुढील प्रगतीचा आलेख पतंजलींनी मांडला आहे.

पहा : असम्प्रज्ञात समाधि, सम्प्रज्ञात समाधि.

संदर्भ :

  • कोल्हटकर, कृ. के., भारतीय मानसशास्त्र अथवा सार्थ आणि सविवरण पातञ्जल योगदर्शन, आदित्य प्रतिष्ठान पुणे, २००३.
  • स्वामी आनंद ऋषि, पातंजल योगदर्शन – एक अभ्यास, घंटाळी मित्र मंडळ, ठाणे, २०१३.
  • Acharya Kala and others, Essentials of Yoga – A  Glossary of Yogic Terms, Somaiya Publications Ltd., Mumbai, 2016.

समीक्षक : कला आचार्य