हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या कुमाऊँ (उत्तर प्रदेश) प्रदेशातील एक प्राचीन वंश. आयरिश वैज्ञानिक इ. टी. अत्कीन्सन (१८४०-१८९०) यांच्या मते, कत्युरी हे कुमाऊँ येथील मूळ रहिवासी असावेत आणि गोमती नदीच्या काठावर उजाड झालेल्या करवीरपूर शहरामध्ये त्यांचे मूळ वास्तव्य असावे. तर भारतीय इतिहासकार बद्रीदत्त पांडे (१८८२-१९६५) यांच्या मते, कत्युरी हे अयोध्येतील शालिवाहन राजवटीनंतर आले असावेत. तसेच वेदांच्या रचनेपूर्वी स्थायिक असलेल्या खासास या हिमालयीन प्रदेशातील मूळ रहिवाशांना जिंकून कत्युरींनी आपले साम्राज्य स्थापन केले असावे, असे पांडे यांचे मत आहे.  ह्या वंशातील राजे नवव्या शतकाच्या अखेरीपासून दहाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत राज्य करीत होते. या वंशाला हे नाव त्या प्रदेशातील कत्यूर खोऱ्यावरून पडले आहे; पण ते त्यांच्या कोरीव लेखांत आढळत नाही.

कत्यूरी राजवंशाच्या काळातील बैजनाथ मंदिर, बागेश्वर (उत्तराखंड).

यांचे फक्त सहा कोरीव लेख आतापर्यंत उपलब्ध झाले आहेत. त्यांपैकी एका ताम्रपटाचे जर्मन प्राच्यविद्यापंडित फ्रांट्स किलहोर्न (१८४०-१९०८) यांनी चिकित्सक रीतीने संपादन केले असून दुसऱ्याचे फक्त वाचन प्रसिद्ध झाले आहे; इतर चार लेख अद्यापि अप्रसिद्धच राहिले आहेत.

कत्यूर हा प्रदेश सम्राट समुद्रगुप्त (३३५-३७५) याच्या प्रयाग येथील लेखात नेपाळबरोबरचा सीमाप्रदेश म्हणून उल्लेखिलेला कर्तृपुर देश असावा. तेथील तत्कालीन राजाने समुद्रगुप्ताचे आधिराज्य स्वीकारून त्याला खंडणी दिली होती; पण त्याच्याविषयी अधिक माहिती उपलब्ध नाही.

यानंतर गढवाल जिल्ह्यातील पांडुकेश्वर येथील योगबदरी या शिवालयात सापडलेल्या दोन ताम्रपटांवरून खालील वंशावळ समजली : निंबर (राणी नाशुदेवी) → इष्टगणदेव (राणी वेगादेवी) → ललितशूरदेव.

ललितशूरदेवाने आपल्या कारकीर्दीच्या एकविसाव्या व बाविसाव्या वर्षी दिलेली ही दानपत्रे आहेत. त्यांत कोणत्याही संवताचा उल्लेख नाही; पण त्यांतील एकविसाव्या वर्षी दिलेल्या ताम्रपटातील उत्तरायण संक्रांतीच्या उल्लेखाचे गणित करून किलहोर्नने त्याची मिती २२ डिसेंबर ८५३ निश्चित केली आहे. त्यावरून या घराण्याचा मूळ पुरुष निंबर हा ७९० च्या सुमारास उदयास आला असावा. त्याच्यानंतरच्या राजांनी परमभट्टारक, महाराजाधिराज, परमेश्वर इ. सम्राटपदनिदर्शक पदव्या धारण केल्या होत्या. त्यावरून त्यांनी सभोवारचा प्रदेश जिंकून आपल्या राज्याचा विस्तार केलेला दिसतो. त्यांची राजधानी कार्तिकेयपुर (उत्तर प्रदेशाच्या अलमोडा जिल्ह्यातील गोमतीतीरावरील बैजनाथ) ही होती. त्यानंतर आणखी एका लेखात ललितशूरदेवाच्या भूदेवदेव या उत्तराधिकारी पुत्राचे नाव मिळते.

यानंतर त्या राज्यात क्रांती होऊन दुसरा राजवंश उदयास आला. त्याचा सर्वांत प्राचीन ताम्रपट अलमोडा जिल्ह्यातील बागेश्वर (व्याघ्रेश्वर) देवालयात सापडला आहे. दुसरे दोन ताम्रपट पांडुकेश्वरच्या देवळात सुरक्षित आहेत. त्यांवरून खालील वंशावळ तयार होते :

वासुदेव →बसंताना देव →खार्पर देव → अभिराज देव → त्रिभुवनराज देव → निंबर्त देव → इस्तंगा देव → ललितपुत्र देव → भूदेव → सलोणादित्य → इच्छटदेव → देसटदेव → पद्मटदेव → सुभिक्षराजदेव.

सलोणादित्याने भूदेवदेवानंतर गादी बळकाविली असे दिसते. पद्मटदेवाच्या ताम्रपटात त्याच्या कारकीर्दीच्या पंचविसाव्या वर्षी सुभिक्षराजदेवाने कार्तिकेयपुराजवळ सुभिक्षपुर असे नवे नगर स्थापून तेथे आपली राजधानी नेली असा उल्लेख आहे. त्यांनीही पूर्वोक्त सम्राटपदनिदर्शक पदव्या धारण केल्या होत्या. यानंतरचा कत्यूरी प्रदेशाचा इतिहास ज्ञात नाही.

 

संदर्भ :

  • Majumdar, R. C., Ed. The Age of Imperial Kanauj, Bombay, 1964.