विषय प्रवेश : हवाई शक्तीचा सर्वांत महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे तिचे सर्वगामित्व. त्यामुळे तिचा वापर केवळ प्रत्यक्ष युद्धभूमीवरच नव्हे, तर शत्रूचे सर्वांगीण लष्करी सामर्थ्य वृद्धिंगत करणाऱ्या दूरदूरच्या केंद्रांवरही करता येतो आणि शत्रूच्या संपूर्ण लष्करी किंवा सागरी ताकदीचा वापर होण्यापूर्वीच तिचा निःपात, किंवा तिला गंभीर क्षती पोहोचविता येते. शिवाय युद्धाचे मूळ उद्दिष्ट ध्यानात घेऊन हवाई शक्तीचा स्वतंत्रपणे वापर करणेदेखील उपयुक्त ठरते. अशा वापरात चुकून आपल्याच सैन्यावर आघात होण्याची शक्यता तर उरत नाहीच; शिवाय लक्ष्याची वैयक्तिक सुरक्षाव्यवस्था, शत्रूप्रदेशातील हवाई सुरक्षा प्रणाली इत्यादी गोष्टी विचारात घेऊन आघात करण्याचा योग्य मार्ग, शस्त्रास्त्रे व वेळ ठरविण्याचे स्वातंत्र्य आपल्या हाती राहते.
हवाई हस्तक्षेप : युद्धजन्य परिस्थितीत आपल्या लष्कराच्या वापराची गरजही निर्माण होऊ न देता आघाडीच्या सैन्याला साहाय्य करण्यासाठी शत्रूचे ध्यान विचलित करणे किंवा त्याच्या अंत:स्थ शक्तीचा शक्य तेवढा नाश करण्यासाठी आपल्या हवाई सामर्थ्याचा वापर करणे, याला ‘हवाई हस्तक्षेप’ म्हणता येईल. शत्रूच्या सैन्याला रसद पुरविणारी गोदामे व लष्करी तळ उध्वस्त करणे, आघाडीच्या सैन्याला रसद पुरविण्याचा थेट मार्ग व वाहने खंडित करणे किंवा रसद आघाडीपर्यंत पोहोचविण्यात विलंब निर्माण करणे, ही अशा हस्तक्षेपाची प्रमुख उद्दिष्टे असतात. उदा., एयर पॉवर ॲट १८००० फीट : द आयएएफ इन द कारगिल वॉर या पुस्तकात लेखक बेन्जामिन लॅम्बेथ लिहितात, “पाकिस्तानी घुसखोरांना नॉर्दर्न लाईट इन्फन्ट्रीच्या मुन्थो धालो तळावरून मिळणारी मदत बंद करण्यासाठी भारतीय वायूसेनेने तो संपूर्ण तळच उध्वस्त केला. नंतर शत्रूच्या अंतर्छेद केलेल्या संभाषणावरून तेथे पाकिस्तानचे शेकडो सैनिक मारले गेल्याचे समजले. शिवाय भारतीय हद्दीत मुसंडी मारून बसलेल्या जखमी सैनिकांना अन्न, दारूगोळा किंवा औषधोपचार वेळेवर न मिळाल्यामुळे उपचारासाठी सुरक्षित स्थळी नेणे कठीण झाले”.
युद्धभूमीवरील हस्तक्षेप : युद्धभूमीवरील हस्तक्षेप दोन प्रकारे केला जातो. एक, प्रत्यक्ष रणांगणातील हस्तक्षेप. दोन, दूरच्या (रणांगणापासून दूर‒Depth) लक्ष्यांविरुद्ध केलेले हल्ले. आघाडीवरील शत्रूला पोहोचणारी रसद तोडून त्याच्या आक्रमणाला खीळ घालून हाती घेतलेली मोहीम पूर्णत्वास नेण्यास अवघड करणे, हे रणांगणावरील हस्तक्षेपाचे प्राथमिक उद्दिष्ट असते. असा विलंब जरी काही तासांपुरताच झाला, तरी त्याकरवी आपल्या सेनांना प्रत्युत्तर देण्यास पुरेसा अवसर मिळतो. परंतू असे हल्ले करताना आपलेच सैनिक किंवा अन्य सामुग्रीला हानी पोहोचणार नाही याची खबरदारी घेणे आवश्यक असल्यामुळे आपल्या सैन्यप्रमुखाशी सतत संपर्कात राहणे महत्त्वाचे ठरते.
दूरच्या लक्ष्यात शत्रूचा दीर्घ पल्ल्याचा तोफखाना, जमिनीवरून मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांचा समूह, रणगाडे किंवा तत्सम वाहनांना इंधन व दारूगोळा पुरविणाऱ्या केंद्रे यांचा समावेश होतो. असे हल्ले पूर्वसुनिश्चीत किंवा ऐनवेळी ठरविलेल्या लक्ष्यांविरुद्ध करता येतात.
दोन्ही प्रकारच्या हल्ल्यांत तत्त्वतः काहीच फरक नसतो. म्हणून कित्येक तज्ञ रणांगणावरील हस्तक्षेप व दूरवरच्या लक्ष्यांवरील हस्तक्षेप यांत फरक मानत नाहीत; कारण पूर्वनियोजन आणि तदनुसार अंमलबजावणी करण्यात शत्रूच्या विमानविरोधी यंत्रणेपासून उद्भवणारा धोका दोहींकडे सारखाच असतो. उदा., १९७३ मधील अरब-इझ्राएल लढ्यात युद्धभूमीवरील इझ्राएलच्या ह्स्तक्षेपात ईजिप्त आणि सिरिया यांनी सोव्हिएट संघाकडून मिळवलेल्या सॅम‒६ व सॅम‒७ या विमानविरोधी क्षेपणास्त्रांना निष्प्रभ करणारी यंत्रणा जवळ नसल्यामुळे अनेक विमाने नष्ट झाली.
दूरावकाशी ह्स्तक्षेप : शत्रूप्रदेशातील दूरवरच्या लक्ष्यांविरुद्ध केलेल्या हल्ल्यांचा उद्देश रणांगणावरील हल्ल्यांपेक्षा निराळा असतो. शत्रूच्या आघाडीवरील सैन्याला रसद किंवा लष्करी कुमक पोहोचविणाऱ्या मार्गातील मोक्याची अरुंद ठिकाणे किंवा त्याचे राखीव सैन्य दल, दारूगोळ्याची भांडारे, बिनतारी संदेशवहन यंत्रणा, दळणवळणाची साधने, नदीवरील महत्त्वाचे पूल आणि रेल्वेचे रूळ यांवर केले जातात. त्यांचा परिणाम तात्कालिक नसतो. परंतू तो आघाडीच्या संपूर्ण सामग्रीवर आणि सैन्यावर होत असल्याने अधिक दूरगामी ठरतो. असे हल्ले यशस्वी होण्यासाठी प्रथम क्षेत्रीय हवाई वर्चस्व प्रस्थापित करणे आणि निवडलेल्या लक्ष्याबद्दल अचूक माहिती प्राप्त करून तदनुसार शस्त्रप्रणालीची निवड करणे आवश्यक असते. यशस्वी ठरलेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण युद्धाला निर्णायक वळण लागू शकते. परंतु त्यासाठी झालेल्या नुकसानाची टेहळणी करून तेथे डागडुजी होण्यापूर्वी पुन्हा हल्ला करणेही गरजेचे ठरते. उदा., दुसऱ्या महायुद्धात उत्तर आफ्रिकेच्या किनारपट्टीवरून होणाऱ्या ‘अक्ष’ देशांच्या रसद पुरवठ्यावर आणि भू-मध्य समुद्रातील आरमारावर केलेल्या हल्ल्यांमुळे आफ्रिकी आघाडीवरील त्यांच्या लष्कराला घ्याव्या लागलेल्या माघारीमुळे झालेला पराभव. तरीही प्रत्येक वेळी असे हल्ले यशस्वी होतातच असे नाही. १९५०‒५२ च्या कोरियन युद्धात किंवा १९७०‒७२ च्या व्हिएटनामच्या लढाईत अमेरिकेच्या भीषण हवाई हल्ल्यानंतरही आघाडीच्या कम्युनिस्ट सेनांची रसद तोडता आली नाही; कारण त्या जंगलयुक्त प्रदेशात पुरवठ्याचा एक मार्ग खंडित होताच शत्रू लगोलग दुसरा मार्ग प्रस्थापित करीत असे.
आरमाराविरुद्ध ह्स्तक्षेप : शत्रूच्या स्थलसेनेविरुद्ध केल्या जाणाऱ्या ह्स्तक्षेपाहून आरमाराविरुद्धचा हस्तक्षेप अत्यंत वेगळ्या तऱ्हेने करावा लागतो; कारण अथांग सागरात पर्यायी मार्ग प्रस्थापित करणे सहज शक्य असल्याने असे हल्ले मार्गावरील अरुंद सामुद्रधुनी किंवा जहाजांना पुरवठा करणारी भांडारे असलेल्या बंदरावर करावे लागतात. खुल्या समुद्रातील आरमारी युद्धात जहाजांना पुरवठा करणाऱ्या बोटी व इंधन पुरवठा केंद्रांनाही लक्ष्य करता येते. नौदलाच्या वैमानिक शक्तीविरुद्धचा हस्तक्षेप मात्र त्याची मालवाहू आणि हेलिकॉप्टर स्थानके, इंधन व दारूगोळा पुरवठा केंद्रांपुरताच मर्यादित राहतो.
समारोप : संग्रामात गुंतलेल्या सेनेच्या मदतीसाठी प्रत्यक्ष केला जाणारा किंवा शत्रूप्रदेशातील मोक्याच्या ठिकाणांवर केलेला हवाई हस्तक्षेप जर अचूकपणे केला, तर संक्षिप्त लढाईत त्याचे परिणाम ताबडतोब दिसतात. संग्राम जर वाळवंटी प्रदेशात होत असेल, तर शत्रूच्या आघाडीच्या सेनांना दारूगोळा, रसद वगैरे पुरवठा करणाऱ्या मार्गावरील हवाई हल्ले शत्रूला जेरीस आणण्यात अत्यंत प्रभावी ठरतात. अन्य तऱ्हेच्या प्रदेशात मात्र पुरवठ्याचा संपूर्ण मार्गच बदलून गुपचूपपणे पुरवठा चालू ठेवणे शक्य असल्याने हवाई हस्तक्षेप तेव्हढासा प्रभावी ठरत नाही. तरीही युद्धावरील एकूण परीव्यय वाढल्यामुळे शत्रूच्या युद्ध क्षमतेवर नकारात्मक प्रभाव निश्चित पडतो. खुल्या समुद्रातील प्रदीर्घ आरमारी लढाईत हवाई हस्तक्षेप परिणामकारक ठरू शकतो; अन्यथा जरुरीनुसार मदत कार्य करण्यापुरताच तो मर्यादित ठेवणे अधिक फायद्याचे ठरते.
संदर्भ :
- Chun, Clayton K S. Aerospace Power in the Twenty-First Century : A Basic Primer, U.S. Air Force Academy, 2001.
- Lambeth, Benjamin S. Airpower at 18000 ft : The Indian Air Force in the Kargil War, Washington, 2012.
- Dupuy, Richard Ernest; Dupuy, Trevor N. The Encvclopedia of Military History : From 3500 B.C. to the Present, New York, 1986.
- https://www.e-ir.info/2013/05/20/israeli-air-power-1973-1982-how-did-the-israeli-air-force-recover-after-the-october-war/
समीक्षक : शशिकांत पित्रे
भाषांतरकार : उत्तम पुरोहित