एकप्रतिनिधी मतदारसंघ : निवडणूकीसीठीची प्रतिनिधी मतदारसंघ पध्दती. या पद्धतीमध्ये एका मतदारसंघातून एकच प्रतिनिधी निवडून येतो. ज्यावेळी सर्वाधिक मतांनी प्रतिनिधी निवडण्याची पद्धत असते तेव्हा असे मतदारसंघ असतात. उमेदवाराचा मतदाराशी सतत संपर्क राहावा, या दृष्टीने मतदारसंघ आटोपशीर असावा, असे सर्वसाधारण धोरण लोकशाहीत अवलंबिले जाते. त्यादृष्टीने मतदारसंघ एकेरी अथवा एकप्रतिनिधी मतदारसंघ अथवा बहुप्रतिनिधी मतदारसंघ असू शकतात. एकप्रतिनिधी मतदारसंघात निवडून येण्यासाठी निव्वळ बहुमत अथवा साक्षेपी बहुमत या दोन्ही पद्धती प्रचलित आहेत. निव्वळ बहुमताची पद्धत आता फार अवलंबिली जात नाही. भारतीय संसदीय शासनव्यवस्थेत एक प्रतिनिधी मतदार संघाची व्यवस्था आहे. या संघातून अनेक उमेदवारांपैकी सर्वाधिक मते मिळवणारा उमेदवार बहुमत मिळवून निवडून आला असे म्हटले जाते. अमेरिका आणि इंग्लंडच्या धर्तीवर शासनव्यवस्था असणाऱ्या ऑस्ट्रेलिया, कॅनडा, भारत या प्रजासत्ताक देशांत राजकीय प्रतिनिधी निवडण्यासाठी एकप्रतिनिधी मतदार संघांची आयोजना केली आहे.

संदर्भ :  पळशीकर,वसंत ; व्होरा, राजेंद्र, राज्यशास्त्र कोश, दास्ताने रामचंद्र आणि कं., पुणे.