नाझीवादजर्मनीत विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात अडोल्फ हिटलरच्या प्रभावाने निर्माण झालेली पक्ष प्रणाली. नॅशनल सोशॅलिस्ट वर्कर्स पक्षाच्या मूळ जर्मन आद्याक्षरावरून त्याला नाझी पक्ष असे नाव रूढ झाले. १९२० साली हिटलर या पक्षाचा सभासद आणि नंतर एकमेव नेता झाला. तत्पूर्वी इटलीत मुसोलिनीच्या फॅसिस्ट पक्षाने सत्ता काबीज करून फॅसिझमच्या हुकूमशाही तत्त्वज्ञानाला सत्ता मिळवून दिली होती, म्हणून काही काळ नाझींना फॅसिस्ट म्हटले जात असे. मुसोलिनीचा फॅसिझम आणि हिटलरचा नाझीवाद यांच्यात बरेच साम्य असले, तरी नाझीवाद पुष्कळसा स्वतंत्र व वेगळ्या प्रकारचा आहे.

हिटलरने आत्मचरित्रात व निरनिराळ्या प्रसंगी केलेल्या भाषणांत आपले विचार आणि कल्पना मांडल्या आहेत. नाझीवादाच्या दृष्टिकोनाचा, विचाराचा प्रांरभ व्यक्तीपासून होत नाही. राष्ट्र हा या प्रणालीचा केंद्रबिंदू आहे. राष्ट्रीय समाज रक्ताच्या बंधनाने एकात्म झालेला असतो, असे त्याचे म्हणणे. व्यक्ती ही या समाजापासून स्वतंत्र वा वेगळी नसते. समाजाचे मन व इच्छा यांचे स्वातंत्र्य हे सर्व व्यक्तींच्या इच्छा वा मने यांच्या स्वातंत्र्यापेक्षा भिन्न व अधिक महत्त्वाचे आहे. हिटलरचा हा विचार म्हणजे अमेरिकन आणि फ्रेंच क्रांतीने मानवतेला दिलेल्या व्यक्तिस्वातंत्र्याच्या, व्यक्तीच्या माणूस म्हणून प्रतिष्ठेच्या, संकल्पनांचा संपूर्ण धिक्कार होता. हिटलरने हे एका भाषणात स्पष्टच केले होते. तो म्हणतो की, नाझीवादाच्या कार्यक्रमातील महत्त्वाचा भाग व्यक्तीची उदारमतवादी संकल्पना आणि मानवतेची मार्क्सवादी संकल्पना नष्ट करणे हा आहे.

हिटलर समाज अथवा लोक (मूळ ‘जर्मन फोक’) हा शब्द वापरीत असला, तरी त्याला संपूर्ण जर्मन समाज अभिप्रेत नव्हता. मानववंशाची उच्चनीचता गृहीत धरूनच त्याने आपल्या तत्त्वज्ञानाची उभारणी केली. नॉर्डिक वंश हाच जगातील सर्वश्रेष्ठ वंश आहे. अन्य वंशांतील लोक हे दुय्यम दर्जाचे मानव आहेत व त्यांच्यावर राज्य करण्याचा नॉर्डिक वंशाचा म्हणजे जर्मनांचा ते श्रेष्ठ वंशीय असल्यामुळे हक्कच आहे, हा त्याचा सिद्धांत होता. या नॉर्डिक वंशालाच तो आर्य वंश म्हणत असे. भिन्नभिन्न मानववंशांत समानता मानणे हा त्याला गुन्हा वाटे. वंशावंशांतील समानतेप्रमाणेच मानवा-मानवांतील समता हाही हिटलरच्या दृष्टीने भयंकर गुन्हा होता. भिन्न मानवसमाजांतील व भिन्न व्यक्तींतील असमानता हाच हिटलरच्या वंशसिद्धांताचा अर्थ होता.

जो लायक तो जीवनकलहात टिकेल, या डार्विनच्या सिद्धांताचा तो एक प्रकारे पुरस्कार करीत असे. संघर्ष हा जीवनाइतकाच प्राचीन असल्यामुळे जे प्रबळ तेच टिकतील आणि दुर्बळ ते नाश पावतील, हा निसर्गाचाच क्रम आहे. मनुष्य, हा मानव्यतेच्या तत्त्वानुसार प्राणिजगात श्रेष्ठ होत नाही, तर अत्यंत पाशवी लढ्यानेच तो स्वतःला जिवंत ठेवू शकतो, हा त्याच्या नाझीवादाचा विचार होता. त्याला सिलेक्शन ऑफ द फिटेस्ट, म्हणजे जे लायक तेच जगण्यासाठी निवडले जातात, असे सूत्ररूप त्याने दिले.

वंशश्रेष्ठत्वाच्या, असमानतेच्या, अन्य वंशीयांना दुय्यम दर्जाचे मानव समजण्याच्या नाझी विचारप्रणालीत त्याचा ज्यू-द्वेष हा विशेष भाग होता. ज्यू हे सैतान आहेत. श्रेष्ठ वंशीय जर्मनांचा पुरुषार्थ खच्ची करण्यासाठी त्यांनी निरनिराळ्या प्रकारची कारस्थाने रचली. ख्रिस्ती धर्म हेही असेच एक कारस्थान होते. मार्क्सवादी बोल्शेव्हिझम हेही नाझींच्या मते ज्यूंचे कारस्थान होते. कम्युनिझमपासून वेश्याव्यवसायापर्यंत सर्व भ्रष्ट व अधःपाताचे मूळ ज्यू लोकच आहेत, अशी एक पिसाट श्रद्धा नाझीवादाच्या प्रणेत्यांची होती. यातूनच ज्यूंच्या शिरकाणाची भीषण कृत्ये निर्माण झाली. नाझींची बंधनागारे व संहारकेंद्रे हा या मानवताविरोधी व ज्यू द्वेष्ट्या विचारसरणीचाच परिपाक होता. ही बंधनागारे माणसांची केवळ हत्या करण्यासाठी नव्हती. माणसांची नुसती कत्तलच करावयाची असती, तर या छावण्यांची जरूर नव्हती पण नाझींना नुसती कत्तल करावयाची नव्हती. अमानुष शारीरिक छळ व विटंबना करून माणसाची माणुसकी नष्ट करावयाची होती. त्याचा मानवी आत्मा, त्याची आत्मप्रतिष्ठा प्रथम संपूर्ण नष्ट केल्यानंतरच गॅसच्या मोठ्या शेगड्यांत टाकून त्यांची अक्षरशः राख करण्यात आली. म्हणजे ज्या मानवी मूल्यांचा नाझीवाद तिरस्कार करीत होता, ती मूल्ये त्यांनी भस्मसात केली. हा नाझीवादातील नाशवादाचा भीषण आविष्कार होता.

नाझीवादाने व्यक्तिस्वातंत्र्याचे मूल्य झिडकारले, तसाच लोकशाही शासनपद्धतीचा अव्हेर केला. हिटलरला १९३३ मध्ये सर्वाधिकार मिळताच त्याने कायदा करून नाझी पक्ष हाच जर्मनीचा एकमेव राजकीय पक्ष म्हणून जाहीर केले. दुसरा कोणताही राजकीय पक्ष अस्तित्वात आणण्याचा प्रयत्न करणे हा राजद्रोह ठरविण्यात आला आणि पक्षातही अन्य प्रतिस्पर्धी नेता असणे हिटलरला मान्य नव्हते. त्याच्या नाझीवादात नेतृत्वाच्या या तत्त्वाला असाधारण महत्त्व होते. कारण एक जरी विरोधी वा बंडखोर पुढारी निर्माण झाला, तरी सर्वाधिकारशाहीचा सर्व डोलारा कोसळून पडण्याची भीती होती. म्हणून पक्ष आणि नेता यांची एकात्मता व एकनेतृत्वाचे तत्त्व प्रस्थापित करण्यात आले. सर्व जर्मन राष्ट्राचे त्याने नाझीकरण केले. वृत्तपत्रांचे नाझीकरण केले व ज्यांचे नाझीकरण करता येत नव्हते, ती वृत्तपत्रे बंद केली. बालवर्गापासून विद्यापीठापर्यंत सर्व शिक्षण नाझीवादाच्या प्रभुत्वाखाली आणले. तरुणांची एकमेव राष्ट्रीय हिटलर युवक संघटना स्थापन करण्यात आली. सर्व कामगार संघटना बेकायदेशीर करून त्याऐवजी कामगार व मालक यांची संयुक्त कामगार आघाडी निर्माण करण्यात आली.

नाझीवादी हुकूमशाहीचे आणखी एक वैशिष्ट्य नमूद करण्यासारखे आहे. सामान्यतः हुकूमशाही वा सर्वाधिकारशाही म्हणजे अल्पसंख्यांकांची बहुसंख्यांवर त्यांच्या इच्छेविरुद्ध लादलेली सत्ता, असा अर्थ केला जातो पण हिटलरच्या नाझी पक्षाला जर्मनीत १९३३ मध्ये झालेल्या शेवटच्या खुल्या निवडणुकीत ४४ टक्के मतदान झाले होते. नाझी पक्षासारखीच विचारसरणी असलेल्या अन्य पक्षांचे मतदान हिशेबात घेतले, तर नाझीवादाला पन्नास टक्क्यांच्यावर जर्मन मतदारांनी पाठिंबा दिला होता. बहुसंख्य मतदारांच्या संमतीने स्थापन झालेली आणि त्यावेळच्या वायमार प्रजासत्ताकाच्या संसदेने अधिकृत रीत्या मान्य केलेली आधुनिक काळातील ही एकमेव बहुमताची हुकूमशाही होती.

नाझीवादाने खून व दहशत हे आपले अधिकृत धोरण ठरविले होते; कारण चर्चा व वादविवाद यांवर त्यांचा विश्वास नव्हता. सॉक्रेटीसने बुद्धिवाद प्रथम प्रसृत केला. मूलभूत प्रश्न चर्चेने व वादविवादाने सोडवावे हा सिद्धांत त्यानेच प्रस्थापित केला. म्हणून सॉक्रेटीस हा पहिला सोशल डेमोक्रॅट होता, असे नाझीवादाचा श्रेष्ठ सैद्धांतिक आर्थर रोझेनबर्ग म्हणत असे. एकंदरीत सर्व उदारमतविरोधी प्रवृत्तीचे व भूमिकांचे अंतिम व एकान्तिक पर्यवसान नाझीवादात झाले होते. आक्रमक नाझीवाद हा १९१९च्या व्हर्साय तहात जर्मनीत झालेल्या अन्यायांमुळे उदयास आला अथवा १९२९–३२ सालांतील आर्थिक मंदीच्या परिणामामुळे पराभूत झालेल्या व बिकट अर्थसंकटांत ग्रासलेल्या जर्मनीत निर्माण झाला, असे एक मत आहे. व्हर्सायच्या तहापेक्षा द्वितीय महायुद्धानंतर जर्मनीची परिस्थिती अधिक भीषण झाली; परंतु तेथे पुन्हा नाझीवादाचा उदय झाला नाही, हे येथे लक्षात घेण्यासारखे आहे. तसेच १९२९–३२ ची आर्थिक मंदीही जागतिक होती. इंग्लंड, अमेरिका हे देशही या मंदीच्या तडाख्यातून वाचले नव्हते; पण तेथे या आर्थिक संकटातून हुकूमशाही निर्माण झाली नाही. जर्मनीत तसे घडले नाही, कारण त्यावेळी तेथे लोकशाही कमजोर होती आणि सर्वाधिकारी विचारसरणीचा प्रभाव अगोदर वाढलेला होता.

नाझीवाद हा एकाधिकारी भांडवलशाहीचा परिपाक होय असे मार्क्सवादी मानतात. जर्मनीत एकाधिकारी भांडवलशाही होती व तिचा प्रभाव उदारमतवादी लोकशाहीला अनुकूल नव्हता; परंतु या एकाधिकारी भांडवलशाहीचे कैसरच्या काळातही राष्ट्रसत्तेशी जवळचे नाते होते. इंग्‍लंड, अमेरिकेतही एकाधिकारी भांडवलशाही होती असे असूनही फक्त जर्मनीत एकाधिकारी भांडवलशाहीला नाझी हुकूमशाही का निर्माण करता आली याचा खुलासा केवळ आर्थिक कारणांनी होत नाही. समाजात दृढमूल झालेल्या राजकीय परंपरा, संकल्पना व संस्था यांचे बळ हा महत्त्वाचा घटक असतो.तो जर्मनीत नसल्यामुळेच नाझीवादाचा उदय होऊ शकला.

नाझीवादाचा उदय का झाला व त्याला जर्मन जनतेचा पाठिंबा का मिळू शकला, याची कारणे नाझीवादाच्या प्रत्यक्ष अमानुष स्वरूपाइतकीच महत्त्वाची आहेत. त्यांतून मानवाला, विशेषतः मानवतेची,व्यक्तिस्वातंत्र्याची, समानतेची, लोकशाहीची आणि मानवी प्रतिष्ठेची मूल्ये जपणाऱ्यांना एक महत्त्वाचा धडा मिळतो. नाझीवादासारख्या मानवता व माणुसकीविरोधी शक्ती सुप्तपणे सर्वच समाजात असू शकतात. वंशवाद,आत्यंतिक राष्ट्रवाद, विशिष्ट समाजगटाचा द्वेष, कल्पित वा वास्तव अन्यायाची गैरवाजवी चीड अशा अनेक प्रवृत्तींच्या रसायनांतून हे तत्त्वज्ञान निर्माण होऊ शकते.

संदर्भ :

• Bullock, A. Hitler : A Study in Tyranny, London, 1962.

• Granzow, B. A Mirror of Nazism : British Opinion and the Emergence of Hitler,1929-33 .London, 1964.

• Shirer, W. L.Rise and Fall of the Third Reich a History of Nazi Germany,New York, 1960.

• Snell, J. L.The Nazi Revolution,London, 1967.