उदारमतवाद : उदारमतवाद ही एक आधुनिक विचारसरणी आहे. परंतु तिचे एकापेक्षा जास्त अर्थ आहेत. अभिजात व आधुनिक उदारमतवाद असा फरक उदारमतवाद या विचारसरणीत आहे. (अभिजात उदारमतवाद, आधुनिक उदारमतवाद, नाव आधुनिक उदारमतवाद). उदारमतवाद स्वातंत्र्याबद्दलचे मुख्य भाष्य करतो. व्यक्तिस्वातंत्र्यास सर्वोच्च मूल्य मानणारी व व्यक्तीस जास्तीत जास्त स्वातंत्र मिळेल अशा रीतीने समाजाचे संघटन करणे हे मुलभूत ध्येय मानणारी विचारप्रणाली म्हणजे उदारमतवाद होय. तसेच उदारमतवाद सर्वसमावेशक आहे की राजकीय तत्वज्ञान आहे असे त्याचे वाद्क्षेत्र आहे. उदारमतवाद प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वाची प्रतिष्ठा व नैतिक मूल्य महत्वाचे मानतो.

व्यक्ती स्वातंत्र्यास अंतिम मूल्य मानत असल्याने सामाजिक, राजकीय व आर्थिक संस्थांशी व्यक्तीवर लादलेल्या बंधनास विरोध करतो. राज्यसंस्था, धर्मसंस्था व परंपरेच्या निरंकुश सत्तेस त्यामुळेच तो विरोध करतो. हॉब हाउसने उदारमतवादाची नऊ तत्त्वे सांगितली आहेत. (१)कायद्याचे राज्य व कायद्यासमोर समानता (२) जबाबदार शासन (३) विचार, भाषण, लेखन, संघटन व धर्म स्वातंत्र्य ( ४ ) व्यवसाय स्वातंत्र्य व समान संधींचे तत्त्व ( ५) आर्थिक स्वातंत्र्य अर्थव्यवस्थेतील शासनसंस्थेचा हस्तक्षेपास विरोध (६) अधिकारवादी कुटुंबास विरोध, स्त्री-पुरुषांना समान स्वातंत्र्य ( ७ ) राष्ट्रीय स्वातंत्र्य (८)आंतरराष्ट्रीय राजकारणात सामर्थ्याच्या वापरास व परकीय हस्तक्षेपास विरोध   (९) राजकीय स्वातंत्र्य, जनतेचे सार्वभौमत्व प्रौढमताधिकारान्वये खुल्या निवडणूकात निवडून आलेले शासन. ही उदारतवादाची तत्त्वे पायाभूत आहेत.

उदारमतवादाचा उदय रक्तहीन राज्यक्रांती नंतर सतराव्या शतकामध्ये झाला (१६८८),भांडवलशाही व्यवस्थेचे समर्थन करण्याचे व मध्यम वर्गाच्या वर्चस्वास पाठिंबा देण्याचे ऐतिहासिक कार्य १८ व्या व १९ व्या शतकात उदारमतवाद विचारप्रणालीने पार पाडले. काळाप्रमाणे व भांडवलशाहीच्या नव नवीन आवृतीप्रमाणे या विचारप्रणालीत बदल झालेले आहेत. रक्तहीन राज्यक्रांती,अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध व फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात उदारमतवादाने क्रांतिकारक रूप धारण केले होते. नैसर्गिक हक्क व सामाजिक कराराच्या सिद्धांतावर व्यक्तिस्वातंत्र्याचे मूल्य आधार केले होते. जनतेला क्रांती करण्याचा हक्क असतो असे जॉन लॉकने मानले होते. पुढे जेरिमी बेंथम व जॉन स्टुअर्ट मिलच्या काळात उदारमतवादाने मवाळ रुप धारण करून प्रातिनिधीक शासन संस्थाद्वारे व्यक्तिस्वातंत्र्याची प्रस्थापना करण्याचा प्रयत्न केला. तसेच खुल्या अर्थव्यवस्थेवा पुरस्कार केला. उपयुक्ततावादाच्या आधाराने स्वातंत्र्याचे समर्थन करण्यात आले. भांडवलशाहीतून उदयास आलेल्या मध्यमवर्गास या काळात राजकीय सत्ता प्राप्त झाली; परंतु त्याच भांडवलशाहीतून उदयाला आलेल्या कामगार वर्गाची शक्ती निर्माण झाल्यामुळे अतिरेकी व्यक्तिस्वातंत्र्याचा आग्रह करणारा हा अभिजात उदारमतवाद मागे पडला. त्यामुळे कल्याणकारी राज्याची कल्पना स्वीकारली होती. स्वातंत्र्य खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात येण्यासाठी राज्याला हस्तक्षेप करावा लागतो असे म्हणणारा आधुनिक उदारमतवाद पुढे आला. कल्याणकारी राज्यात आर्थिक नियोजन व महायुद्धामुळे जेव्हा राज्याच्या हस्तक्षेपाचा अतिरेक झाला तेव्हा नवअभिजात उदारमतवादाचा उदय झाला. तो पुन्हा खुल्या अर्थव्यवस्थेचा पुरस्कार करू लागला. भारतीय संदर्भात आर्थिक सुधारणा कार्यक्रम म्हणजेच नवअभिजात उदारतवाद होय यातून जागतिकिकरण, मुक्त अर्थव्यवस्था, खाजगीकरण अशा तत्वाचा पुरस्कार केला गेला .

संदर्भ :

• Edward N. Zalta (Principal Editor), Liberalism, (First published 1996) Stanford University,2018.

• Hobhouse, L. T,  Liberalism, UK, 1911.