उपमिती या प्रकारच्या यथार्थ अनुभवाचे साधन म्हणजे उपमान. ज्ञानप्रक्रियेसाठी आवश्यक मानलेल्या प्रत्यक्ष, अनुमान, उपमान आणि शब्द या चार प्रमाणांमधील ‘उपमान’ हे तिसरे प्रमाण होय. ‘संज्ञासंज्ञिसंबंधि ज्ञानम् उपमिति:।’ किंवा ‘उपमीयते अनेन इति उपमानम्।’ अशी उपमानाची व्याख्या केली जाते. नैयायिक संज्ञा-संज्ञि-ज्ञान ज्या साधनाने शक्य होते, त्या ज्ञानसाधनास ‘उपमान’ समजतात, तर मीमांसक सादृश्यज्ञानाचा साधनास ‘उपमान’ म्हणतात. संज्ञा आणि संज्ञी म्हणजेच एखादे नाव व त्या नावाने दाखविली जाणारी वस्तू यांच्यातील संबंधाचे जे ज्ञान, ते उपमिती किंवा उपमान होय. किंवा, एखाद्या विशिष्ट वस्तूला एखादे विशिष्ट नाव आहे, हा बोध ज्या द्वारे होतो, ते उपमान. यातील संज्ञा व संज्ञी यांच्यातील हा संबंध वाच्य-वाचक संबंध असतो.

उपमानप्रमाणामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात : १) सादृश्याचे ज्ञान – हे ज्ञान प्रत्यक्षप्रमाणाने होते. २) आप्ताने उच्चारलेले अतिदेशवाक्य – आप्त म्हणजे यथार्थवक्ता, जो एखादी गोष्ट जशी आहे, तशी सांगतो आणि अतिदेशवाक्य म्हणजे त्या यथार्थवक्त्याने उच्चारलेले मार्गदर्शनपर वाक्य.

अशा या उपमानाचे कारण अथवा साधन हे सादृश्यज्ञानावर आधारित असते. उदा.,एखाद्या मनुष्याने गवा (नीलगाय) हा प्राणी कधीही पाहिलेला नाही. त्यामुळे तो नेमका कसा दिसतो, या विषयीही त्याला काही माहिती नाही. असा हा मनुष्य एखाद्या जंगलात राहणार्‍या माणसाला भेटतो आणि त्याच्याकडून ‘गवा हा गाईसारखा दिसतो’ असे अतिदेशवाक्य ऐकतो. ते अतिदेशवाक्य लक्षात ठेवून तो वनात जातो. तेथे त्याला त्याने आजवर कधीही न पाहिलेला एक नवीन प्राणी दिसतो. हा प्राणी गाईसारखा दिसतो आहे, असे सादृश्यज्ञान त्याला प्रत्यक्षप्रमाणाने होते. मग त्याला ‘गवा गाईसारखा दिसतो’, या अतिदेशवाक्याचे स्मरण होते. हे स्मरण आणि गाईशी असलेल्या सादृश्याचे प्रत्यक्षज्ञान या दोन्ही गोष्टी एकत्रित करून त्याला समजते की, हा गवा नावाचा प्राणी आहे. म्हणजेच गवा या संज्ञेचा अर्थ/वाच्यार्थ म्हणजे हा विशिष्ट प्राणी होय. अशाप्रकारे गवा ही संज्ञा आणि तो विशिष्ट प्राणी हा संज्ञी यांच्यातील परस्परसंबंधाचे त्याला ज्ञान होते. हेच उपमिती ज्ञान किंवा उपमान होय.

हे उपमानप्रमाण खालील तीन प्रकारचे असते :

  • सादृश्यविशिष्टपिण्डज्ञान : सादृश्यावर आधारित गव्याचे ज्ञान हे सादृश्यविशिष्टपिण्डज्ञान होय.
  • असाधारणधर्मविशिष्टपिण्डज्ञान : गेंडा कसा दिसतो हे माहीत नसणारा पुरुष ‘ज्याच्या नाकावर शिंग असते तो गेंडा’ हे वाक्य ऐकल्यानंतर जेव्हा तशा प्रकारचा प्राणी पाहतो, तेव्हा नाकावरील शिंग या असाधारण धर्माच्या ज्ञानामुळे हाच गेंडा आहे, हे ज्ञान त्याला होते.
  • वैधर्म्यविशिष्टपिण्डज्ञान : उंट हा घोड्यासारखा आखूड मान असणारा व समतल पाठ असणारा नसतो, हे झाले वैधर्म्यविशिष्टपिण्डज्ञान.

उपमिती ज्ञानामध्ये अनुमानप्रमाणाचाही काही प्रमाणात सहभाग असतो आणि म्हणूनच उपमानप्रमाणाची चर्चा न्यायदर्शनाने प्रत्यक्ष व अनुमान यांच्यानंतर केलेली आहे. उप+मा म्हणजे तुलना करणे. तुलनेसाठी सारखेपणा हा आवश्यक घटक असतो. म्हणूनच सादृश्यज्ञान हे उपमिती ज्ञानाचे साधन मानले गेले आहे.

उपमानप्रमाणाला स्वतंत्र प्रमाण मानण्याबाबत दार्शनिकांमध्ये मतभेद आहेत. नास्तिक दर्शनांत गणले जाणारे चार्वाकदर्शन उपमानप्रमाण मानत नाही, तर वैशेषिकदर्शन त्याचा अनुमानात अंतर्भाव करते. मीमांसा व वेदान्त या दर्शनांनी उपमानाला स्वतंत्र प्रमाणाचा दर्जा दिलेला असला, तरी उपमानाविषयीची त्यांची संकल्पना न्यायदर्शनापेक्षा वेगळी आहे.

उपमानप्रमाणाला भारतीय ज्ञानपरंपरेमध्ये स्वतंत्र दर्जा असण्याबाबत भारतीय तत्त्वज्ञान या आपल्या ग्रंथात श्रीनिवास दीक्षित म्हणतात, “न्यायशास्त्राच्या उभारणीशी आयुर्वेदाचा काही विशेष संबंध आहे. गुरूने सांगितलेल्या सादृश्याच्या वर्णनावरून रानावनात जाऊन वनस्पतींची नावे ओळखणे, हे आयुर्वेदाच्या विद्यार्थ्याला आवश्यक असे. त्याच्या या विशिष्ट प्रकारच्या ज्ञानसाधनतेमुळे उपमानाला स्वतंत्र प्रमाणाचा दर्जा दिला गेला असावा”.

संदर्भ :

  • चाफेकर, नलिनी, अनु. अन्नंभट्टाचा तर्कसंग्रह, ठाणे, १९९४.
  • जोशी, महादेवशास्त्री, संपा. भारतीय संस्कृतिकोश : खंड १, पुणे, २०१०.
  • दीक्षित, श्रीनिवास, भारतीय तत्त्वज्ञान, कोल्हापूर, २००२.

                                                                                                                                                                                                                         समीक्षक : ललिता नामजोशी