स्त्री-कवयित्री (वैदिक वाङ्मयातील) : वैदिक वाङ्मय हे जगातील पहिले उपलब्ध वाङ्मय होय. वेद या शब्दाचा अर्थ ज्ञान, ज्ञानाचा विषय किंवा ज्ञान मिळविण्याचे साधन असा होतो. अतिप्राचीन काळामध्ये प्राचीन ऋषिंना वेदवाङ्मयाचा साक्षात्कार झाला म्हणजेच त्यांना वेद दिसले, त्याचे ज्ञान झाले असे यास्काचार्यांनी म्हटले आहे. ऋषी हे मंत्राचे द्रष्टे आहेत, कर्ते नव्हेत. म्हणूनच निरुक्तात ऋषी या शब्दाचा अर्थ ‘ऋषिर्दर्शनात्’ असा दिला आहे. अशा ऋषिंमध्ये स्त्री-ऋषिंचीही गणना केली जाते. ऋग्वेदातील काही ऋक्सूक्ते ऋषिकांनी रचलेली आहेत.

गार्गीचे कल्पनाचित्र

अगदी वेदकाळापासूनच स्त्रियांनी केलेले लेखन अल्प स्वल्प प्रमाणात का होईना पण उपलब्ध आहे. जगातल्या इतर कोणत्याही देशात इतके प्राचीन स्त्री-अभिव्यक्तीचे नमुने सापडत नाहीत. पण संस्कृत कवयित्रींनी आपली अभिव्यक्ती शब्दबद्ध करून ठेवलेली आहे. बृहद्देवता या ग्रंथामधे २७ स्त्री ऋषिकांचा उल्लेख मिळतो पण अर्थातच या सगळयाच काही खऱ्या स्त्रिया नाहीत. रात्री, उषा सूर्या, वाक् नदी, सरस्वती ह्या निसर्गस्त्रिया आहेत. अदिति, इंद्राणी, उर्वशी किंवा यमी ह्या काही पौराणिक स्त्रिया आहेत, तर अपाला, घोषा, रोमषा, लोपामुद्रा, शाश्वती या काही ऋषिका आहेत. त्यांच्या ऋचा महत्त्वाच्या आहेत. यापैकी अनेक ऋषिकांच्या ऋचा या ऋग्वेदाच्या दहाव्या मंडळात समाविष्ट केल्या आहेत. तसेच काही ऋचा विवाहसूक्तात, तर काही संवाद स्वरूपाच्या आहेत.

वेदातल्या पुरुष ऋषींनी ज्याप्रमाणे त्यांच्या मानवी इच्छा, आकांक्षा, व्यावहारीक अपेक्षा त्यांच्या सूक्तांतून मोकळेपणाने मांडल्या आहेत, तशाच ऋषिकांनीही त्यांच्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. एक चांगला नवरा, नवऱ्याचे प्रेम, चांगले स्वास्थ्य एवढीच त्यांची गरज आहे. स्त्रियांच्या या पहिल्या लिखित उद्गारांमधूनही त्यांच्या स्त्रीत्वाची झलक बघायला मिळते. तसेच ऋषिकांच्या लेखनात तत्कालिन कौटुंबिक जीवनाचे प्रतिबिंब पडलेले दिसते. विश्ववारा ही लग्न झालेली स्त्री वैवाहिक सुखासाठी आणि निंश्चित, सुरक्षित आयुष्यासाठी अग्नीची प्रार्थना करते. घोषा या राजकन्येला कुष्ठरोगाने पछाडले आहे आणि त्यामुळे तिला नवरा मिळत नाही. ती अश्विनीकुमार या दैवी वैद्यांची आरोग्यपूर्ण शरीरासाठी प्रार्थना करते आणि मग ती मागणी करते की तिचे घरी राहूनच वय वाढत आहे तर अश्विनीकुमारांनी तिला एक देखणा पती मिळण्यासाठी मदत करावी. ‘अभूतं गोपामिथुना शुभस्पती प्रिया अर्यम्णो दुंर्या अशीमहि।’ त्या घरात तिची स्तुती व्हावी, पुत्र व्हावेत आणि पुष्कळ धन असावे अशीही तिची मागणी आहे. शाश्वती ही तर एक मूर्तिमंत भारतीय स्त्री होय. आपल्या नवऱ्याने केलेल्या पापातून त्याला मोकळे होता यावे म्हणून ती तप करते आणि जेव्हा पापमुक्त होऊन त्याला पुन्हा पूर्ववत आरोग्यसंपन्न शरीराची प्राप्ती होते तेव्हा ती आनंदाने गाते. आपल्या मुला-नातवंडांची इच्छा, ते पराक्रमी आणि संपन्न असावेत अशी अपेक्षा ऋषिकांनी वेदातल्या काही सूक्तांमधून पुन्हा पुन्हा केलेली दिसते.

रोमशा, लोपामुद्रा, इंद्राणी, उर्वशी, अपाला, शाश्वती या ऋषिका त्यांनी रचलेल्या सूक्तातून मोकळेपणाने संभोगाविषयी बोलताना दिसतात. काम हा देखील आयुष्यातला महत्त्वाचा घटक आहे आणि त्याची योग्य ती पूर्ती व्हावी अशा अपेक्षांबद्दल या स्त्रिया लिहितात. आणि त्यांना वेदांमध्येही समाविष्ट केले जाते यावरून तत्कालिन समाजात हा विषय आणि स्त्रियांनी त्याविषयी बोलणे हे दोन्ही वर्ज्य नसावे असे दिसते.

अदिती, विश्ववारा, इंद्रस्नुषा अशा द्रष्टया ऋषिका आहेत. तर सिकता, घोषा, वागाम्मृणी इ. ब्रह्मवादिनी ऋषिका आहेत. ब्रह्मवादिनी ऋषिका परमात्मा-जीवात्मा, मन-शरीर संबंधी विवेचन करतात. विश्वामित्र-नदी, यम-यमी, सरमा-पणि, पुरुरवा-उर्वशी अशा संवादसूक्तांमधूनही काही ऋषिका भेटतात. यामधील बहुतांश ऋषिकांच्या काव्यातून सुरक्षित घर, सांभाळून ठेवलेले नातेसंबंध आणि पुढची पिढी याचीच त्यांना आस आहे असे दिसते. याबाबतीत त्यांचे विचार स्पष्ट आहेत. त्यांचा दृष्टिकोण निश्चित आहे. एक पत्नी आणि मातृत्वाची देणगी असलेली माता याच स्वरूपात ही प्राचीन स्त्री वेदवाङ्मयातून दिसून येते.

अनंत आळतेकर, राहुल सांकृत्यायन यांसारख्या काही अभ्यासकांनी अनेक ऋषिका कल्पित असाव्यात अशी शंका उपस्थित केली आहे. या ऋषिकांमधील काही मोजक्याच स्त्रिया मानवी स्त्रिया होत्या. तसेच अनेक ऋषिकांच्या विषयी ठामपणे सांगता येत नाही असेही काही अभ्यासकांचे मत आहे.

ऋग्वेदानंतर वैदिक वाङ्मयाच्या पुढच्या कालखंडातील म्हणजे काही शतकांनंतरच्या उपनिषद वाङ्मयात ब्रह्मवादिनी स्त्रियांचा उल्लेख येतो. त्यात ब्रह्मवादिनी गार्गी महत्वाची आहे. ब्रह्मत्व म्हणजे काय याचा शोध घेणारी ही गार्गी वेदाभ्यासात पारंगत आहे. प्रत्यक्ष याज्ञवल्क्यऋषींना प्रश्न विचारण्याचा धीटपणा आणि धाडस तिच्यात आहे. ब्रह्मतत्त्वाच्या गाभ्यापर्यंत जाणारे सखोल प्रश्न ती भर सभेत विचारते आणि सर्वांना चकित करते. आत्मविद्येचा शोध घेणारा बौद्धिक वादविवाद करण्याची तिची क्षमता वाखाणण्याजोगी आहे.

याज्ञवल्क्यांची पत्नी मैत्रेयी सुद्धा बुद्धिमान आहे .संसाराचा त्याग करत असताना याज्ञवल्क्य आपल्या मालमत्तेची दोन्ही पत्नींमध्ये वाटणी करतात तेव्हा ती विचारते ‘ह्या संपत्तीमुळे मला आत्मतत्व साध्य होईल काय?’ आणि या प्रश्नाचे उत्तर जेव्हा नाही असे येते तेव्हा वैभवाचा त्याग करत ती थेट म्हणते की मला अमृतत्त्व म्हणजे काय ते सांगा आणि त्याची प्राप्ती कशी करून घ्यायची तेही सांगा. महाभारताच्या शांतिपर्वात तत्त्वज्ञानात्मक चर्चा करणारी सुलभा आहे. जनकासारख्या विद्वत्तापूर्ण राजाच्या सभेत पंडितांसमोर त्याच्या सर्व प्रश्नांची ती उत्तरे तर देतेच आणि अखेर राजाचा पराभवही करते. त्या वादामधे ती राजाला पटवून देते की आत्म्याला लिंग, जात काहीच नसते. बुद्धिमान स्त्रीमधे असलेली तत्त्वज्ञानालाही कवेत घेण्याची कुवत अशा स्त्रियांमधून अधोरेखित होते. संस्कृत कवयित्रींचा काव्यरचनेचा अभिमानास्पद वारसा पुढे काही कवयित्रींना अभिजात वाङ्मयाच्या काळातही चालवला आहे.
पुरुषसत्ताक संस्कृतीत कदाचित स्त्री कवयित्रींना फारसे प्रोत्साहन मिळाले नसणार किंवा त्यांचे काव्य टिकवण्यासाठी कोणी विशेष प्रयत्न केले असण्याची शक्यताही कमीच. त्यामुळेच बहुधा स्त्रियांचे लेखन कमी प्रमाणात झालेले दिसते तसेच त्याला फार प्रसिद्धीही मिळालेली दिसत नाही.

अगदी ऋग्वेद काळापासून स्त्रियांनी रचलेली काव्ये उपलब्ध आहेत, गार्गी सारखी असामान्य बुद्धिमत्तेची ब्रह्मवादिनी प्राचीन भारतात होऊन गेली आहे यावरून प्राचीन काळी भारतात स्त्रियांना शिक्षण दिले जात होते. तसे संदर्भही वैदिक वाङ्मयातून मिळतात. मात्र हजारो सूक्तांमध्ये केवळ मोजकी सूक्ते ऋषिकांची आहेत आणि गार्गीसारखी ब्रह्मवादिनी तर एकमेव आहे हे लक्षात घेता, त्याकाळी सर्वसामान्य सर्व स्त्रियांना अध्ययनाचा अधिकार मिळत होता का किंवा कोणत्या कालखंडापर्यंत ही प्रथा चालू होती या संबंधी निश्चितपणे सांगता येत नाही.

संदर्भ :

• Chaudhuri, Jitindra Bimal, Sanskrit Poetesses, part A, Calcutta Oriental Press, 1939.

• Rahurkar,V. G.,The seers of the Rigveda, University of Poona, 1964.

  • http://www.vedpradip.com/articlefiles/1347009443.pdf