चौहान, देवीसिंग व्यंकटसिंग :  (२ मार्च १९११ – १० डिसेंबर २००४). ऋग्वेदाचे भाष्यकार, भाषाशास्त्राचे जाणकार, मराठी व दक्खिनी हिंदीचे भाषिक अभ्यासक आणि इराणी सांस्कृतिक संबंधाचे संशोधक, स्वातंत्र्यसेनानी. देवीसिंग चौहान यांचा जन्म औसा तालुक्यातील नागरसोगा या गावी झाला. मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी, संस्कृत, तेलगू, फारसी, कन्नड या भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. देवीसिंग गुरुजी या नावाने ते सर्वपरिचित आहेत. इ. स. १९२४ ला वयाच्या १४ व्या वर्षी प्राथमिक शिक्षणाची सुरुवात झाली. माध्यमिक शिक्षणासाठी हिप्परगा येथील राष्ट्रीय विद्यालयात प्रवेश घेतला व १९३१ ला दहावीची परिक्षा उत्तीर्ण झाले. बी. ए. ची पदवी मुंबई विद्यापीठातून १९३८ ला संपादन केली. १९४१ ला एल. एल. बी. ही पदवी नागपूर येथून संपादीत केली. १९३१ मध्ये दहावी पास झाल्यानंतर काही दिवस हिप्परगा येथे राष्ट्रीय विद्यालयात शिक्षक म्हणून काम केले.

काही दिवस नूतन मराठी विद्यालय, पुणे येथे शिक्षक म्हणून काम केले. अंबाजोगाईच्या योगेश्वरी विद्यालय शिक्षक म्हणून काम केले. १९४१ मध्ये उमरगा (जि. उस्मानाबाद)  येथे भारत विद्यालय नावाची खाजगी संस्था सुरू केली व तेथेच मुख्याध्यापक म्हणूनही काम केले. पुढे याच शाळेचे मिडल स्कूलमध्ये रूपांतर झाले. वकिली व्यवसायाचा त्याग करून शैक्षणिक कार्याला आपल्या आयुष्यात स्थान दिले. स्वतंत्र हैद्राबाद राज्याच्या पहिल्याच मंत्री मंडळात शिक्षण व सहकार मंत्री म्हणून त्यांचा समावेश झाला. राज्य पुनर्रचनेनंतर (१९५६) मराठवाडा द्विभाषिक मुंबई राज्यात विलिन झाला. द्विभाषिक मुंबई राज्यातही शिक्षण शिक्षण खात्याचे उपमंत्री या नात्याने त्यांनी काम केले. १९५९ साली देवीसिंग चौहान यांनी उमरगा येथे श्री. शिव छत्रपती शिवाजी महाविद्यालयाची स्थापना केली. मराठवाडा विद्यापीठाच्या स्थापनेनंतर (१९५८) मराठवाड्यात तालुक्याच्या ठिकाणी निघालेले हे पहिलेच संलग्न महाविद्यालय होते. मराठवाडा मुक्ती संग्रमात देवीसिंग चौहान यांनी काम केले. हैद्राबाद संस्थानावर निजाम मीर उस्मान अलीखान कहादूर नियामुद्दोला निजाम उल मुल्क आसफ जाह यांचे राज्य होते. त्यांच्या निजामांच्या राज्यातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैद्राबाद संस्थानाची  त्यावेळची लोकसंख्या एक कोटी साठ लाख होती. यात तेलंगणा, मराठवाडा आणि कर्नाटकचा काही भाग येत होता. मुक्ती संग्राम सुरू झाल्यावर निजामाचा सेनापती कासीम रझवी याने जनतेवर अनन्वित अत्याचार सुरु केले. दुसर्‍या बाजूला मुक्तीसंग्राम वेगात सुरु झालेला होता. याचं नेतृत्व स्वामी विवेकानंद तीर्थ, दिगंबरराव बिंदू, गोविंदभाई श्रॉफ, रविनारायण रेड्डी, देवीसिंग चौहान, भाऊसाहेब वैशंपायन, विजयेंद्र काबरा, बाबासाहेब परांजपे या आणि इतर अनेक नेत्यांकडे होते.

संग्राम  या पुण्याहून निघणार्‍या वृत्तपत्राचे काही काळ संपादक होते. मराठवाडा साप्ताहिकाचे उपसंपादक म्हणून त्यांनी कार्य केले. हे वृत्तपत्र व साप्ताहिक निजाम विरोधी परखड मत मांडणारे व हैद्राबाद संस्थानातील चळबळीला दिशा देणारे होते. इब्न निशातीकृत फूलबन (१९६५), हुसेनकृत जंगनामए आलिम अलीखान (१९६८), नुस्त्रतीकृत तारीखे इस्कंदरी  (१९६९), जयराम पिण्डे कृत पर्णालपर्वत ग्रहणाख्यान  (१९७०), मराठी आणि दक्खिनी हिंदी (१९७१),  अब्दुलकृत  इब्राहिमनामा (१९७३), दक्खिनी हिंदीतील इतिहास (१९७३), भारत ईराणी संश्लेषण (१९८८) या अंडरस्टँडिंग ऋग्वेद (१९८५), शूलिक आणि प्राकृत (१९८८), ऋग्वेद : समस्या आणि उकल (१९८८) इत्यादी त्यांची ग्रंथसंपदा प्रकाशित आहे.

ऋग्वेदःसमस्या आणि उकल (१९८८) या ग्रंथामुळे प्राचीन भारतातील ऋग्वेदाच्या अभ्यासकांना नवी दृष्टी प्राप्त झाली. भाषाशास्त्राच्या आधारे ऋग्वेदाच्या काळाची मिमांसा करून अनेक शब्दांच्या अर्थाची ओळख त्यांनी करून दिली. ऋग्वेदाकडे ते धार्मिक ग्रंथ म्हणून नव्हे तर आर्य संस्कृतीच्या उदयकाळातील पाऊल खुणांचा दस्तऐवज म्हणून पहात होते. आचार्य लिमये हे चौहानांचे ऋग्वेदाचे गुरु होते. ऋग्वेदाला आर्याच्या भारत प्रवेशाच्या पूर्वीचे साधन समजत असत आणि ऋग्वेदाची निर्मिती आर्याच्या भारत प्रवेशापूर्वी बल्ख प्रदेशात झाली असे त्यांना वाटते. आर्य आणि यूरोपियन जनसमूह हे एकाच युरो भारतीय जनसमूहापासून उत्पन्न झाले आहेत या मतावर हे ठाम होते.

मराठी आणि दक्खिनी हिंदी (१९७१) हा लेखसंग्रह आहे. यात दक्खिनी हिंदी १३ व्या शतकापासून ते १९ व्या शतकापर्यंत भारताची संपर्क भाषा म्हणून नांदली आहे व दक्खिनी हिंदी ही आज हिंदी व उर्दू भाषेची जनक भाषा आहे. यातील मराठी साहित्याचा दक्खिनी हिंदी साहित्यावर पडलेला प्रभाव व भाषांनी जी परस्परांशी देवाण-घेवाण केली त्यावरून भाषांच्या जडण घडणीत इतर भाषांचा कसा निकटचा संबंध होता हे स्पष्ट केले आहे. या ग्रंथाने मराठीत सर्वांना दक्खिनी हिंदीचा परिचय करुन दिला. मराठी आणि खडीबोली या दोन्हीही भाषा एकाच कुळातील असून त्यांच्यात सर्व प्रकारचे सारखेपण आहे पण दक्षिणेत दक्खिनी हिंदीच्या विकासात तेलगू आणि कानडी भाषेचे सहकार्य मिळू शकले नाही हे सप्रमाण सांगितले आहे.

भारत इरानी संश्लेषण (१९८८), या ग्रंथात भारत इरानी यांच्यातील संबंध हे अतिप्राचीन असून इ. स. ५०० पासून या दोन देशातील संबंधाला परत कनिष्काची राजधानी पिशाचूर येथून सुरुवात झाल्याचे स्पष्ट केले आहे. इरानी भाषेतील अनेक शब्द भारतातील जुन्या साहित्यात आढळतात. तसेच इरानी राजवटीची नाणी विविध वस्तू कौसंबी, पाटलीपुत्र, रांची, नाशिक या प्राचीन स्थळी मिळतात आणि इरानी भाषेच्या संपर्कातून पैशाची, प्राकृत भाषेची निर्मिती झाली हे त्यांनी सप्रमाण सिद्ध करुन दाखविले. इरानी व मराठी भाषेच्या देवाण घेवाणीचे दालन मराठी संशोधनाच्या क्षेत्रात उघडले. भारत व इराण यांच्या भाषांची जननी ही एकच असली पाहिजे. एकाच भाषेपासून या भाषांची निर्मिती झालेली आहे. पर्यायाने या दोन्ही भाषा आर्य गणातील आहेत. त्यामुळे इराणी आणि भारतीय हे आर्यच आहेत. आर्याच्या स्थलांतरात आर्यांचा एक समूह इराणात तर दुसरा भारतात आला हे सांगून भारत आणि इरान यांचे संबंध अतिप्राचीन काळापासून आहेत हे स्पष्ट केले. तसेच १५७ मराठी भाषेतील लेख व १६ हिंदी भाषेतील लेख, १३ उर्दू भाषेतील लेख, ५३ इंग्रजी भाषेतील लेख त्यांनी लिहिले. १९४९ ते १९५२ या काळात ते मराठवाडा प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस होते. तसेच नागपूर करारावर मराठवाड्याचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी स्वाक्षरी केली आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचे १९६४ ते १९७० याकाळात सदस्य होते.

जेष्ठ साहित्यिक, ध्येयनिष्ठ शिक्षक, उत्कृष्ट प्रशासक, श्रेष्ठ संशोधक, संपादक, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी व आदर्श शेतकरी म्हणून महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांनी १९९२ ला देवीसिंग चौहान यांचा मानपत्र देऊन गौरव केला. तसेच सामाजिक, राजकीय व संशोधनासारख्या क्षेत्रात केलेल्या मौलिक कामगिरीबद्दल देवीसिंग चौहान यांना मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद यांनी डी. लिट. ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला. त्यांच्या मराठी आणि दक्खिनी हिंदी (१९७१) या ग्रंथास १९७२-७३ चा महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार, तर भारत इराणी संश्लेषण (१९८८) या ग्रंथास १९७४-७५ चा महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार प्राप्त झाला आहे. शिक्षणातून संस्कार, संस्कारातून संघटन, संघटनातून राष्ट्रप्रेम ही त्रिसूत्री त्यांनी वापरली. भाषिक अभ्यास हा केवळ शब्दापर्यंतच सिमीत न ठेवता त्यांनी या भाषिक अभ्यासाच्या माध्यमाने दोन संस्कृतीचाही अभ्यास केला, भाषा-भाषांच्या इतिहासाचा अभ्यास केला.

संदर्भ :

  •  जोशी, सु. ग. (संपा.), डॉ. देवीसिंग चौहान गौरव ग्रंथ, मराठवाडा संशोधन मंडळ, लातूर, १९९९.