मृच्छकटिकम् : शूद्रकलिखित दहा अंकी संस्कृत प्रकरणनाट्य. या प्रकरणाचे कतृत्त्व विद्वानांनी शूद्रकाला दिले नाही परंतु सर्वसामान्यपणे तोच कर्ता समजला जातो. शूद्रकाच्या व्यक्तीरेखेबद्दल निश्चित माहिती उपलब्ध नसली किंवा उपलब्ध माहितीमध्ये विविधता अथवा मतभेद असले तरीही मृच्छकटिकम्मधील प्रस्तावनेच्या श्लोकावरून असे म्हणता येते की शूद्रक हा एक राजा आणि प्रख्यात कवी असावा. या प्रकरणाची बीजे आपल्याल्या गुणाढ्याच्या बृहत्कथेमध्ये बघायला मिळतात. त्याचप्रमाणे हे प्रकरण भासाच्या दरिद्र-चारुदत्त या नाटकावर आधारित आहे असेही मानले जाते. या प्रकरणातील अवतरणांच्या उल्लेखांवरून या प्रकरणाचा काळ इसवी सन् तिसरे ते सातवे शतकामधील असावा अस मत विद्वान मानतात.
दशरूपकातील प्रकरण या रूपकाचे वर्णन करताना साहित्यदर्पणकार यांनी काही लक्षणे दिली आहेत. त्यात लौकिक, कविकल्पित, शृंगाररसयुक्त इत्यादी लक्षणे आढळतात. प्रकरणाच्या या लक्षणानुसार मृच्छकटिकम् या प्रकरणातील नायक, तसेच कथानक हे लौकिक आणि कविकल्पित आहे. यातील चारुदत्त हा नायक जन्माने ब्राह्मण पण व्यवसायाने व्यापारी आहे. गणिका वसंतसेना आणि कुलस्त्री असलेली चारुदत्त पत्नी धूता ह्या नायिका आहेत. या प्रकरणाच्या विकासात नायक-नायिकेबरोबरच विचित्र हावभाव करणारा वाचाळ, खलनायक असा राजश्यालक शकार, मदनिका, चौर्यकर्म करणारा शर्विलक, रदनिका, बौद्धभिक्षु , धूर्त, विट, चेट, द्यूतकार इत्यादिंचाही महत्त्वाचा सहभाग आहे.
या प्रकरणातील प्रमुख कथानक, चारुदत्त आणि वसंतसेना यांच्या प्रेमावर आधारित आहे. पण यातील प्रणय राजदरबारातील प्रणयापेक्षा वेगळा आहे. या प्रमुख कथानकाव्यतिरिक्तही शर्विलक आणि मदनिका यांची प्रेमकथा तसेच उज्जयिनीतील राज्यक्रांती ही सुद्धा दोन उपकथानके या प्रकरणात आहेत. एकाच वेळी अत्यन्त बेमालूमपणे परस्परपूरक कथानकांच्या विविध स्तरांवर तसेच विविध सामाजिक स्तरांवर वावरणाऱ्या या प्रकरणात तीनही कथानकांचा अतिशय समंजस आणि सुंदर मेळ पहायला मिळतो.
मृच्छकटिकम्मध्ये दिसून येतात त्या वेगवान पद्धतीने घडणाऱ्या घडामोडी, मुसऴधार पावसात, लंपट शकाराचा पाठलाग चुकवत चारुदत्ताकडे येणारी वसंतसेना चारुदत्ताच्या सद्गुणांवर भाळते आणि त्याच्याकडे आकर्षित होते. स्वतःचे सुवर्णालंकार ती विश्वासाने चारुदत्ताकडे ठेव म्हणून ठेवते. वसंतसेनेकडे दासी म्हणून असणाऱ्या आपल्या प्रेयसीला मदनिकेला दास्यातून मुक्त करण्यासाठी तिचा प्रियकर शर्विलक ह्या दागिन्यांची चोरी करतो. चोरीला गेलेल्या दागिन्यांची अंशतः परतफेड म्हणून चारुदत्ताची पत्नी धूता तिची मौल्यवान रत्नहार वसंतसेनेकडे पाठवते. इकडे आपल्या प्रियकराने, शर्विलकाने चोरलेल्या वसंतसेनेच्या दागिन्यांची ओळख पटल्याने मदनिका ते दागिने वसंतसेनेला परत करायला लावते. वसंतसेना ते दागिने आणि आणि चारुदत्ताची पत्नी धूता हिने दिलेला रत्नहार घेऊन परत चारुदत्ताकडे येते.
दुसऱ्या दिवशी पुष्पकरंडक उद्यानात जाताना चारुदत्त-वसंतसेनेची दुर्दैवाने झालेली ताटातूट मिलनाच्या वाटेवरून या प्रेमी युगुलाला जरा लांब नेते आणि कथानकाला नाट्यमयरित्या वळण देते. मातीच्या गाडीशी खेळायला नाराज असणाऱ्या चारुदत्ताच्या मुलाचा रोहसेनाचा हट्ट पुरवण्यासाठी त्याच्या गाडीला वसंतसेना स्वतःचे सुवर्णालंकार देऊन सुवर्णशकट बनवते.
चारुदत्त जुलमी पालक राजाच्या तावडीतून सुटलेल्या आपल्या मित्राला आर्यकाला मदत करतो.आयत्या सापडलेल्या वसंतसेनेची प्रेमाराधना असफल झाल्याने शकार तिचा गळा दाबून खून करतो आणि त्याचा आरोप मात्र चारुदत्तावर ठेवतो. अगदी त्याच वेळी रोहसेनाला दिलेले सुवर्णालंकार परत करायला आलेल्या मैत्रेय विदूषकाकडे वसंतसेनेचे अलंकार पाहून चारुदत्ताला प्राणदण्डाची शिक्षा ठोठावली जाते. सुदैवाने काही काळानंतर मूर्छित झालेली वसंतसेना शुद्धिवर येते. तिला प्रत्यक्ष पाहून चारुदत्ताची निर्दोष सुटका होते.
या कथानकातील नायक चारुदत्त हा सत्शील आहे, तो धीरप्रशांत, संयमी आहे, कलाप्रेमी, कलांचा आदर करणारा तसेच उत्तम संगीततज्ञ आहे. तो अतिदानशील आहे आणि या दानशूरतेनेच आज तो अकिंचनावस्थेला पोचलेला आहे. यातील नायिका वसंतसेना ही उज्जयिनीतील गणिकेची मुलगी, रूपाने, गुणाने, धनाने विलक्षण समृद्ध असूनही शुद्ध मनाची, कलासक्त आणि मनस्वी आहे. ती गुणांची कदर करणारी आहे आणि म्हणूनच गुणवान पण दरिद्रि असलेल्या चारुदत्ताकडे ती आकर्षित होते आणि त्याचे प्रेम संपादन करण्यासाठी झटताना दिसते. लौकिकदृष्ट्या खरतर समाजातील खालच्या स्तरातील असलेली वसंतसेना आपल्या या अंगभूत सद्गुणांनी सर्वांच्या मनात आदराचे स्थान निर्माण करते. इतर संस्कृत नाटकांप्रमाणे येथेही विदूषक दिसतो पण तो येथे अधिक बद्धिमान आहे. चारुदत्त हा राजा नसतानाही विदूषक मैत्रेय हा त्याचा सार्वकालिक सखा आहे. त्याच्या सुखदुःखाचा वाटेकरी आहे, आणि त्याच्या निर्धनावस्थेतही चारुदत्ताची साथ देणारा आहे.
या नाटकाच्या लौकिक कथानकात समाजाचे अत्यंत स्वाभाविक प्रतिबिंब पडलेले दिसते. सर्व स्तरातील पात्रांचा तसेच त्यांच्याबरोबर घडणाऱ्या सर्वस्तरातील घटनांचा समावेश येथे केलेला आहे. यातील समाज समृद्ध आहे, वेगवेगळ्या आर्थिक सामाजिक स्तरांवरचा असला तरी एकमेकांमध्ये गुंतलेला आहे. या समाजात कलांना वाव दिसतो. संगीत, वादन, नृत्यकलेला मान्यता होती. त्याची प्रशंसाही केली जात असे. कला हे उपजीविकेचे साधन होऊ शकत होते. समाजात द्यूतक्रीडा प्रचलित होती, जुगारात हरणे-जिंकणे होते आणि त्याला कायद्याचे संरक्षण होते. समाजात चातुर्वर्ण्य अस्तित्वात होते. पण ब्राह्मण असलेला चारुदत्त व्यवसायाने व्यापारी होता. वैदिक आणि बौद्ध धर्मांच्या अस्तित्वाच्या खुणा दिसून येतात. शांततेच्या शोधात बौद्धधर्माचा स्वीकार केला जात असे. सवर्ण विवाह मान्य नसला तरी तो निषिद्धही नव्हता.समाजात दासदासींची प्रथा जशी अस्तित्वात होती तशीच सतीची प्रथाही अस्तित्वात आणि सर्वमान्य होती. राज्यातील मोडकळीला आलेली राज्यव्यवस्था, राजाच्या जीवावर लोकांना उपद्रव देणारा विचित्र स्वभावाचा राजश्यालक शकार, तत्कालीन कायदा, दंडविधानाचे प्रतिबिंब आणि बळी तो कान पिऴी हा न्याय या साऱ्यांचे वास्तव आणि सजीव चित्रण या नाटकात केलेले आढळते.
मृच्छकटिकम् हे या प्रकरण नाट्याचे नाव हे या प्रकरणातील एका घटनेशी जोडलेले नाव आहे. मृच्छकटिकम् म्हणजे मातीची गाडी. ही गाडी येथे जणु पात्ररूपाने येथे दिसते आणि कथानकाच्या विकासाला हातभार लावते. चारुदत्त पुत्र रोहसेनाचा मातीची गाडी खेळण्यास दिलेला नकार, अतिदानामुळे चारुदत्ताला आलेल्या निर्धनत्वाचे सूचकत्व, वसंतसेनेने स्वतःच्या आभूषणांनी बनवलेला सुवर्ण शकट आणि त्यामुळे पुढे घडलेले सर्व प्रसंगनाट्य, या सर्व बाबीमुळे या प्रकरणाला मृच्छकटिकम् हे नाव दिल्याचे लक्षात येते.
नाटक,प्रकरण यातील भाषा, त्यातील वाक्ये त्यातील शब्द आणि त्यातील भाव अभिनयाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असतात. भाषेच्या दृष्टीनेही हे प्रकरणही वैशिष्ट्यपूर्ण आहे. यातील पात्रे संस्कृत बरोबरच शौरसेनी,मागधी अशा विविध प्राकृत भाषांचाही सहज वापर करताना दिसतात. यात माणसांच्या मनोवृत्तीवर प्रकाश टाकणारी, जीवनावर भाष्य करणारे मार्मिक वाक्ये खुसखुशीत संवाद रंजकता आणि भाषेचा प्रवाहीपणा टिकवून ठेवतात.
चारुदत्त आणि वसंतसेनेच्या प्रेमावर,त्यांच्या वियोगावर आणि त्यांच्या पुनर्मिलनावर आधारित असलेल्या या प्रकरण नाट्यात शृंगार ह्या प्रधानरसाबरोबरच हास्य, वीर, करुण, बीभत्स, अद्भूत अशा भावनांचा परिपोष करणारे गौण रस आहेत. यामध्ये नाटकात हिंसा दाखवू नये इत्यादी नाटकातील काही संकेत येथे झुगारून लावलेले दिसतात. अन्य संस्कृत कलाकृतीत अभावानेच आढळणारा कधी हसवणारा तर कधी अंतर्मुख करणारा प्रसंगनिष्ठ विनोदही या प्रकरणात पहायला मिळतो.
मृच्छकटिकम् ही शूद्रकाची वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती असून त्याच्या असामान्य प्रतिभेचे आणि बुद्धिमत्तेचे दर्शन ह्या प्रकरणातून होते. निश्चितपणे अनेक अंगांनी स्वतःचा ठसा उमटवणारे, विविधतेने आणि विरोधितेने नटलेले, असे हे एक दृक्श्राव्य प्रकरणनाट्य आहे. भासाच्या दरिद्र चारुदत्त या अपूर्ण कलाकृतीला शूद्रकाने आपल्या विलक्षण प्रतिभेने एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवत समाजातील ऐहिक जीवनाचा सुरेख विणलेला जीवनपटच येथे आपल्या समोर मांडून ठेवतो असे दिसते.
संदर्भ : १. भट,गो.के., संस्कृत नाट्यसृष्टी, कौन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे,१९६४. २. जोशी, विजया रामचंद्र, (सुंवादित आणि अनुवादित) मृच्छकटिक, सुयोग प्रकाशन, अमरावती.