अविमारकम् : भासलिखित संस्कृत नाटक. भासाची बहुतांश नाटके रामायण व महाभारत ह्या उपजीव्य महाकाव्यांमधील कथांवर आधारित आहेत.ह्या नाटकाची कथा मात्र वेगळी आहे. अविमारकम्ची मूळ कथा परंपरेने चालत आलेली आख्याने, पुराणकथा किंवा दंतकथा अशा स्वरूपाची असावी. बृहत्कथामंजरी आणि कथासरित्सागर या आख्यान कथासंग्रहांमध्ये तसेच जातक कथासंग्रहातील ‘एळकमारक’ अविमारकम्च्या कथेशी जुळणारी कथा आहे. वात्स्यायनाच्या कामसूत्रात व त्यावरील जयमंगल टीकेत या कथेचा उल्लेख आहे व अविमारकम् शब्दाची व्युत्पत्तीही दिली आहे. यावरून ही कथा जनमानसात बरीच रुळलेली असावी.

कथेचा नायक अविमारक हा कुन्तिभोजाची बहीण, काशिराजाची राणी सुदर्शना हिला अग्नीपासून झालेला पुत्र. चण्डभार्गव नावाच्या ऋषींच्या शापामुळे त्याचे पिता सौवीरराज यांना चांडालत्व आले आहे. ते आपल्या परिवारासह गुप्त वेषात कुन्तिभोजाच्या नगरीत राहात आहेत. सौवीरराज यांच्या मुलाचे नाव विष्णुसेन.अविरूपधारी राक्षसाचा वध केल्याने लोक त्याला अविमारक (अवी म्हणजे बोकड. बोकडाचे रूप घेतलेल्या असुराचा मारक या अर्थाने) म्हणू लागले. अविमारक मुळात अग्निपुत्र असल्यामुळे त्याने बालपणी अद्भुत पराक्रम केले आहेत. त्याच्या पराक्रमांमुळे हे नाव त्याला प्राप्त झाले आहे.

पहिल्या अंकात घडणारा कथाभाग असा – एक दिवस कुन्तिभोजाची मुलगी कुरंगी उद्यानातून परत येत होती. वाटेत एका पिसाळलेल्या हत्तीने धुमाकूळ घातला होता. कुरंगी घाबरली. योगायोगाने अविमारक तेथे आला. त्याने पराक्रमाने हत्तीला ताब्यात आणले. त्याचा पराक्रम बघून कुरंगीचे त्याच्यावर प्रेम जडले. आणि तिचे रूप बघून तोही तिच्यावर लुब्ध झाला. राजानेही त्याचा पराक्रम जाणून त्याचा शोध घेतला. तेव्हा त्याला कळले की तो चांडाल आहे.त्याचवेळी काशिराजाने आपल्या मुलाचा कुरंगीशी विवाह निश्चित करण्यासंबंधी प्रस्ताव पाठवला. कुन्तिभोज काळजीत पडला कारण यापूर्वीच सौवीरराजाने आपल्या मुलासाठी कुरंगीला मागणी घातली होती. परंतु आता सौवीरराजाचा शोध लागत नव्हता. असे असताना काशिराजाला काही उत्तर कळवणे कुन्तिभोजाला योग्य वाटले नाही. दुसऱ्या अंकात कुरंगी आणि अविमारक हे प्रेमात पडले आहेत. त्यामुळे त्या दोघांचीही मनःस्थिती अधीर झाली आहे.कुरंगीच्या ह्या अधीरपणावर उपाय म्हणून तिच्या दासी तिची अविमारकाशी भेट घडवण्याचे ठरवतात. त्याचे घर शोधतात. तिची धात्री आणि एक दासी नलिनिका अविमारकाला गुप्तपणे कन्यापुरात येण्याचे निमंत्रण देतात. अविमारकाला आनंद होतो.

तिसऱ्या अंकात धात्री आणि नलिनिका अविमारकाच्या गुप्तप्रवेशाची सगळी तयारी करतात. चोराचे रूप घेऊन अविमारक तिच्या कन्यापुरात प्रवेश करतो व तिच्या बरोबर राहू लागतो. चौथ्या अंकाला सुरुवात होते तेव्हा कुरंगी आणि अविमारक एकत्र राहत आहेत ह्याला एक वर्ष झालेले आहे. योगायोगाने ही गोष्ट राजाच्या कानावर जाते. पकडले जाण्याच्या भीतीने अविमारक तेथून निसटतो. परंतु कुरंगीचा विरह त्याला असह्य होऊ लागतो व तो आत्महत्या करण्याचे ठरवतो. पाण्यात बुडून, अग्नीत प्रवेश करून आणि उंच डोंगरकड्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचे तो प्रयत्न करतो; परंतु त्याचे हे सर्व प्रयत्न फसतात. तेव्हा तिथे एक विद्याधर प्रगट होतो व त्याला एक अद्भुत अंगठी देतो. ती अंगठी घातल्यावर अविमारक अदृश्य होऊ शकतो. अंगठीचा वापर करून तो पुन्हा कुरंगीच्या कन्यापुरात जाण्याचे ठरवतो.

पाचव्या अंकात अविमारकाच्या विरहाग्नीत जळणारी कुरंगी देखील स्वतःच्या गळ्यात फास अडकवून आत्महत्या करायला सज्ज होते. अंगठीच्या मदतीने अविमारक तिथे पोहोचतो.ह्यावेळी त्याच्या बरोबर विदूषकही असतो.सहाव्या अंकात कुन्तिभोज राजा ठरवतो की आता सौवीरराजा व त्याचा पुत्र विष्णुसेन यांचा ठावठिकाणा लागत नाही तर काशिराजाचा मुलगा जयवर्मा ह्याच्याशी कुरंगीचा विवाह निश्चित करतो. तो दूत पाठवून जयवर्माला बोलावूनही घेतो. जयवर्माच्या पित्याने म्हणजे काशिराजाने यज्ञाची दीक्षा घेतलेली असल्याने तो येत नाही. जयवर्माबरोबर त्याची आई सुदर्शना येते. विवाहाचा दिवस निश्चित होतो. तेव्हाच सौवीरराजा तिथे येतो आणि अविमारक नाहीसा झाल्याने खिन्न असल्याचे सांगतो. त्याच्या तोंडून अविमारकाच्या पराक्रमाच्या हकिकती ऐकून कुन्तिभोजाची खात्री पटते की त्या दिवशी हत्तीला ताब्यात आणणारा हा अविमारकच आहे.तो अविमारकाला शोधण्याचा आदेश देतो. पण त्याचा शोध लागत नाही.

विवाहाच्या ऐन प्रसंगी नारदमुनी उपस्थित होतात. ते सौवीरराजा व कुन्तिभोजाला सांगतात की, अविमारक कुन्तिभोजाच्या अंतःपुरात असून त्याने व कुरंगीने गांधर्व विवाह केला आहे. नारदमुनी अविमारकाच्या जन्माची कथाही स्पष्ट करतात. सुदर्शनेची बहीण सुचेतना ही सौवीरराजाची पत्नी. तिचा मुलगा जन्मतःच मृत झाल्याने सुदर्शनेने आपला मुलगा तिला दिला आहे. त्यामुळे अविमारक सौवीरराजाचा पुत्र म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. हे सगळे समजल्यावर सर्वजण संतुष्ट होतात. जयवर्मा व कुरंगीची धाकटी बहीण सुमित्रा यांचा विवाह करण्यात येतो.लोकप्रसिद्ध कथानक, संवादाला योग्य अशी लहान वाक्ये, सोपी भाषा या वैशिष्ट्यांमुळे अविमारक नाटक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे.

संदर्भ : आचार्य श्रीरामचन्द्रमिश्र, अविमारक, वाराणसी,१९७३.

समीक्षक : सुनीला गोंधळेकर