मूलाचार : श्री वट्टकेराचार्य या जैन रचनाकारांनी शौरसेनी प्राकृत भाषेत रचलेला बोधप्रद ग्रंथ. १२ विभागात व १२४३ गाथांमध्ये छंदबद्ध असलेला हा काव्यमय ग्रंथ दिगंबर जैन आम्नायातील मुनिगणांसाठी उत्कृष्ट चर्यापालनाकरिता सर्वाधिक प्राचीन ग्रंथ मानला गेला आहे. सदर ग्रंथात अथवा त्याच्यावर लिहिलेल्या टीका-ग्रंथातही रचनाकाळ व रचनाकारांविषयी कोणतीही माहिती प्राप्त होत नाही. ग्रंथाचा व ग्रंथातील गाथांचा उल्लेख तिलोयपण्णत्ती (इ.स. २००), भगवती आराधना (इ.स. ७००), षट्‌खंडागम-धवला टीका  (इ.स. ७८०),वसुनंदी सैद्धांतिक (इ.स. ११००) इत्यादी ग्रंथांतून आला आहे.

ग्रंथाच्या भाषेवरून वर्णन केलेल्या भाव-चित्रणावरून वट्टकेर हेच कुंदकुंद आचार्य असावेत असे काही जणांचे मत आहे. आचार्य कुंदकुंदांच्या समयसार, नियमसार, भावपाहुड, चारित्रपाहुड, प्रतिक्रमणमधील तसेच श्वेतांबर आम्नायातील आवश्यक निर्युक्तीमध्ये काही गाथा जशाच्या तशा प्रसंगानुरूप आल्या आहेत. तत्कालीन भाषा साम्यावरून आणि इतर ग्रंथांतील उल्लेखांवरून हा ग्रंथ इ. सनाच्या प्रथम शतकातील असण्याची शक्यता आहे.

या ग्रंथातील मूलगुण, बृहत्प्रत्याख्यान, संक्षेप प्रत्याख्यान, समयाचार, पंचाचार, पिण्डशुद्धी, षडावश्यक, द्वादशानुप्रेक्षा, अनगारभावना, समयसार, शीलगुणप्रस्तार आणि पर्याप्ती इ. विभागांद्वारे मुनिपदातील २८ मूलगुणांचे वर्णन आले आहे. उत्कृष्ट चरित्रपालनाद्वारे मोक्षसाधना कशी करावी याचे क्रमबद्ध वर्णन या अधिकारांमध्ये आले आहे.

प्रथम मूलगुण अधिकारामध्ये साधूंची महाव्रते – अहिंसा, सत्य, अचौर्य, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह, समिती – ईर्या, भासा, एषणा, आदाननिक्षेपण आणि उत्सर्ग, पंचेद्रियनिरोध, षडावश्यक आणि सप्तशेषगुण – केशलोच, आचेलक्य, अस्नान, क्षितिशयन, अदन्तधावन, स्थितीभोजन आणि एकभक्त या मूलगुणांचे क्रमाने वर्णन आले असून याच्या पालनाने फलप्राप्ती कशी होते याचे वर्णन आले आहे. या अधिकारात ३६ गाथा आहेत.

द्वितीय बृहत्प्रत्याख्यान अधिकारामध्ये पापयोगाचे तसेच संन्यास मरणाचे भेद व त्याचे लक्षण यांचे वर्णन आले आहे. तृतीय संक्षेपप्रत्याख्यान अधिकारामध्ये संक्षेप रूपाने पापत्याग तसेच १० प्रकारच्या मुंडनाचेही भेद सांगितले आहेत. चतुर्थ समयाचार अधिकारामध्ये प्रात:काल ते रात्रीपर्यंत अहोरात्र साधूंच्या चर्येचे वर्णन आले आहे. पंचम पंचाचार अधिकारामध्ये दर्शनाचार, ज्ञानाचार, चारित्राचार, तपाचार व वीर्याचार याचे सुंदर विवेचन आले आहे. सहाव्या पिण्डशुद्धी अधिकारामध्ये साधूंच्या १६ उद्गम, १६ उत्पादन, १० आसन, ४ संयोजन अशा एकूण ४६ दोष आणि ३२ अंतरायांचे वर्णन आले आहे. आहारचर्येची विधी विस्तृतपणे यात आली आहे. साधूने आहार ग्रहण का करावे याचे विश्लेषण करताना आचार्य वट्टकेर म्हणतात, वेदना, वैयावृत्त्य, क्रियार्थ, संयमार्थ, प्राणचिंता आणि धर्मचिंता ही सहा कारणे आहेत. शरीराची वेदना शमन व्हावी, वैयावृत्त्य करता यावे, नित्य क्रिया सहज साधता याव्यात, संयम धारण करताना बाधा येऊ नये, अकाली प्राण जाऊ नये तसेच धर्मसाधना व श्रावकांनाही धर्म कथनात सहयोग व्हावा या दृष्टीने साधूंनी आहार करावा असे कथन यात आले आहे. यामध्ये भोज्य, खाद्य, लेह्य आणि पेय या चार प्रकारच्या आहाराचे शास्त्रीय वर्णन आले आहे. साधूने सहज सुखासाठी नव्हे तर संयमपूर्वक आत्मसाधनेसाठी हा मार्ग पत्करावा असे अनेक उदाहरणातून सांगितले आहे.

सातव्या षडावश्यक अधिकारामध्ये आवश्यकांचे कथन करून समता चतुर्विंशतिस्तव, वंदना, प्रतिक्रमण, प्रत्याख्यान आणि कायोत्सर्ग या क्रियांचे विस्तारपूर्वक वर्णन केले आहे. आठव्या द्वादशानुप्रेक्षा अधिकारामध्ये १२ अनुप्रेक्षांचे वर्णन आहे.नवव्या अनगारभावना अधिकारामध्ये लिंग, व्रत, वसती, विहार, भिक्षा, ज्ञान, शरीरसंस्कारत्याग, वाक्य, तप, ध्यानसंबंधी १० शुद्धींचे वर्णन आहे. योग आदिचेही विश्लेषण यात आहे. दहाव्या समयसार अधिकारामध्ये चारित्रशुद्धीसाठी ४ प्रकारचे लिंग व १० प्रकारच्या स्थितीकल्पांचे वर्णन आहे.

अकराव्या शीलगुणप्रस्तार अधिकारामध्ये १८ हजार शीलभेदांचे तसेच ८४ लाख उत्तरगुणांचेही कथन आहे. बाराव्या पर्याप्ती अधिकारामध्ये सांसारिक जीवांच्या अनेक भेदांचे वर्णन आहे. कर्मप्रकृती, तपश्चरण, ध्यान आदिद्वारे कर्म नष्ट करणे हे या ग्रंथाच्या स्वाध्यायाचे फळ आहे. साधूंनी संपूर्णत: परिग्रहत्याग करून आत्मसाधनेत तल्लीन रहावे असा संदेश यात देण्यात आला आहे.

मनुष्य जीवनाचे अंतिम लक्ष्य मुक्तीपथ साध्य करायचे असेल तर संपूर्ण परिग्रह त्याग असलेली दिगंबर अवस्था धारण केलीच पाहिजे याचे उत्कृष्ट वर्णन सदर ग्रंथात आहे. दिगंबर आम्नायातील मुनिचर्या व क्रमाने मोक्षपद प्राप्त करण्यासाठीची साधना याचे शास्त्रशुद्ध विश्लेषण सदर ग्रंथात आले आहे. सदर ग्रंथावर वसुनंदी सिद्धांतचक्रवर्ती यांची संस्कृतामध्ये व मेघचंद्राचार्य यांची कन्नड भाषेतील टीका आहे. वसुनंदी आचार्यांच्या टीकाग्रंथानुसार त्यात १२५२ गाथा आहेत तर मेघचंद्राचार्यांच्या टीकेत १४०३ गाथा आहेत. या मूळ प्राकृत ग्रंथाची संस्कृत टीका तसेच हिंदी, मराठी, कन्नड, इंग्रजी इ. भाषांमधून भाषांतर झालेले आहे.

संदर्भ :  शास्त्री,पं. कैलाशचंद्र (संपा), मूलाचार (श्रीमद्‌वट्टकेराचार्य, श्रीवसुनंदी सिद्धांतचक्रवर्ती विरचित आचारवृत्ती), भारतीय ज्ञानपीठ प्रकाशन, १९८४.

समीक्षक : कमलकुमार जैन