भाषांतर : केवळ संस्कृतीच्या अंगाने विचार केला तर भाषांतर म्हणजे दुसरी भाषा.प्रत्यक्षात मात्र भाषांतर ही संज्ञा एका विशिष्ट प्रकारच्या संप्रेषणाकरिता वापरण्यात येते. ज्यामध्ये एका भाषेमध्ये निर्मिलेल्या संहितेचा ग्रहणकर्ता दुसर्‍या भाषेमध्ये त्याच आशयाच्या संहितेची पुनर्निर्मिती करतो व संप्रेषण पूर्ण करतो. थोडक्यात म्हणजे एका भाषेच्या सहाय्याने निर्माण झालेल्या आशयाची पुनरावृत्ती दुसर्‍या भाषेत करणे याला भाषांतर म्हणता येईल. संप्रेषण ज्या भाषेमध्ये होते. त्यातील भाषिक द्रव्य, जसे शब्द, रूप, वाक्यरचना इत्यादी, यांच्या साहाय्याने संप्रेषणाचे प्रयोजन व अर्थ निश्चित करणे व ज्या भाषेत संप्रेषणाची पुनरावृत्ती करायची असेल तिच्यातील समकक्ष पर्यायांचे उपयोजन करून तोच आशय पुनरावृत्त करणे असे भाषांतराचे स्वरूप असते. मूळ संहिता बाजूला काढून भाषांतराचा विचार करता येत नाही. मूळ संहितेचा आशय थोडक्यात कथन करणे म्हणजे भाषांतर नव्हे. भाषांतरालाच मराठीमध्ये ‘अनुवाद’ ही पर्यायी संज्ञा वापरण्यात येते. भाषांतराचे स्वरूप लिखित किंवा मौखिक अशा दोनही प्रकारचे असू शकते.

भाषांतर ही संज्ञा दोन परस्परावलंबी गोष्टींचा निर्देश करते. एक म्हणजे पुर्नर्निर्मितीची प्रक्रिया आणि या प्रक्रियेचे फलस्वरूप म्हणून निर्माण झालेली दुसर्‍या भाषेतील संहिता. प्रक्रिया आणि तिचे फल ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांशी अतूटपणे संलग्न आहेत. दोन्ही गोष्टींचा संबंध अर्थ निर्णयनाशी आहे.

भाषांतर आणि अर्थनिर्णयन

दोन भाषांमधील भिन्नत्त्व आपल्याला जाणवते, ते भाषेच्या ध्वनी, शब्द, रूप, अर्थ आणि व्याकरण या अंगांवरून पैकी ध्वनी, शब्द, रूप ही तीन अंगे व्यक्त आाहेत तर अर्थ आणि व्याकरण ही अंगे अव्यक्त आहेत. पहिली तीन अंगे वापरून अर्थाची निर्मिती होते, तर व्याकरणामुळे तर्‍हेतर्‍हेच्या अमूर्त व गुंतागुंतीच्या विचारव्यूहरचना तयार करता येतात. कोणत्याही भाषेतला संदेश ग्रहण करणार्‍याला अगोदर संदेशाची अर्थनिश्चिती करावी लागते. कोणत्याही शब्दाचा अर्थ वज्रलेप, घट्ट, अपरिवर्तनीय किंवा एकमेव कधीच नसतो. शब्दाचा अर्थ हा संदर्भ व्याकरण आणि आजूबाजूच्या शब्दांचे अर्थ यांनुसार सतत बदलत असतो. शब्दाचा अर्थ लागतो, तो वाक्याच्या चौकटीत. वाक्य चांगले समजते, ते परिच्छेदाच्या संदर्भात आणि परिच्छेदाची संगती लागते ती संपूर्ण संहिता समजल्यानंतर. तसेच उलट्या बाजूने बघायचे तर संहितेचे प्रयोजन, तिचे उपयोजन क्षेत्र या गोष्टींची समग्र जाणीव असेल तर परिच्छेदाची संगती लागते, त्याच्या आधाराने वाक्याचा अर्थ लागू शकतो आणि वाक्याच्या संदर्भ-चौकटीत शब्द सुचवित असलेल्या अर्थाच्या अनेक शक्यतांपैकी नक्की कोणता पर्याय सुसंगत आहे याची संगती लागते. आतून बाहेर आणि बाहेरून आत अशा दोन्ही बाजूंनी चालणारीही अर्थनिर्णयनाची प्रक्रिया आहे.

भाषेमधील शब्दांना आणि वाक्यरचनांना अनेक ऐतिहासिक, धार्मिक, भौगोलिक, सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भ चिकटलेले असतात. एकभाषीय संप्रेषणात हे संदर्भ अनुच्चारित असतात; परंतु संदेश निर्मिती करणारा आणि संदेश ग्रहण करणारा, या दोघांना हे संदर्भ माहित आहेत हे गृहीत असते. दुसर्‍या भाषेत संहितेची पुनर्निर्मिती करताना हे संकेत अथवा हे संदर्भ उघड करून दाखवावे लागतात. सर्वच संदर्भ स्पष्ट करणे काही वेळा शक्य नसते. दुसर्‍या भाषेतील संहिता समजून घेताना ग्रहणकर्ता सुद्धा अर्थ निर्णयनाच्या प्रक्रियेतून जातो. संहिता ग्रहण करताना संस्कृतिसापेक्ष रचना त्याच्या मनात कुतहूल निर्माण करतात. ते कुतूहल विविध संहिताबाह्य मार्गांनी शमविण्याचा तो प्रयत्न करतो,ज्यायोगे त्याचे संहितेचे आकलन अधिक सखोल होते.

प्रत्येक भाषा आपल्या भोवतालचे, भूगोलाचे, दैनंदिन अनुभवास येणार्‍या वस्तूमात्रांचे एका विशिष्ट प्रकारे वर्गीकरण करत असते. कोणत्याही दोन भाषांचा हा वर्गीकरणाचा प्रकार एकसारखा नसतो. त्यामुळे एका भाषेतील आशयद्रव्य दुसर्‍या भाषेत आणताना दुसर्‍या भाषेच्या व्यवस्थेची मोडतोड अपरिहार्य असते. ही मोडतोड विधायक स्वरूपाची असते. भाषेच्या अभिव्यक्तीकक्षा रुंदावण्याची क्षमता या मोडतोडीमध्ये असते.

ध्वनींपासून शब्द आणि शब्दांपासून अर्थपूर्ण रचनांची निर्मिती करणे ही समस्त मानवजातीला मिळालेली देणगी आहे. भाषा ही एकाच वेळी व्यक्तीची आणि समूहाची असते. भाषेचे अस्तित्व समूहामध्ये व समुहामूळेच असते. जितके निरनिराळे मानव समूह तितक्या निरनिराळ्या भाषा. ज्या ज्या वेळी या भिन्न भिन्न भाषा बोलणार्‍या समूहांमध्ये परस्परसंपर्क आला. त्या त्या वेळी भाषांतरही घडून आले.

भाषांतराचा इतिहास  

वर उल्लेख केल्याप्रमाणे भाषांतराचा इतिहास भाषेइतकाच जुना असला, तरी एकोणिसाव्या शतकात खऱ्या अर्थाने औद्योगिक क्रांती,वसाहतवाद,धर्म प्रसार अशा अनेक कारणांमुळे भाषांतराला चालना मिळाली. एकोणिसाव्या शतकाअगोदर झालेले काही भाषांतराचे प्रमुख प्रयत्न पुढीलप्रमाणे:-

१.अभिजात ग्रीक तत्त्वज्ञांच्या लेखनाची (उदा. प्लेटो, ॲरिस्टॉटल इ.) अरबी भाषेमध्ये झालेली भाषांतरे (अंदाजे इ. स. ९ – १० वे शतक)

२.पाली भाषेतील तसेच संस्कृत भाषेतील बौद्ध तत्त्वज्ञानविषयक ग्रंथांची तिबेटी व चिनी भाषेतील भाषांतरे

३.मुघल दरबारात, तसेच कुतुबशाही दरबारात साधारणत: इ. स. १५८० पासून झालेली संस्कृत धार्मिक व तत्त्वज्ञानात्मक संहितांची भाषांतरे.

४.मध्ययुगाच्या अस्तानंतर प्रबोधन काळामध्ये लॅटीन व ग्रीक भाषांमधून अर्वाचीन यूरोपीय भाषांमध्ये झालेली बायबलची भाषांतरे.

याखेरीज अस्तित्वात असणारा एक भारतीय भाषांतर प्रकार म्हणजे भाष्य.मध्ययुगीन भारतात मार्गी परंपरेकडून देशी साहित्याकडे जाताना आपल्याला भेटणारा हा एक अर्थनिर्णयनाचा प्रकार आहे. रामायण, महाभारत  यांसारखी महाकाव्ये किंवा भागवतासारखा पौराणिक ग्रंथ किंवा भगवद्गीतेसारखा धर्मग्रंथ यावर आधारित अनुकृतींची निर्मिती या काळात झाली. रूढ अर्थाने ही भाषांतरे नाहीत; परंतु मूळ संहितेतील आशय द्रव्याची पुनरावृत्ती करण्याचे, नव्हे तर त्याला नवसंजीवन देण्याचे काम या अनुकृतींनी अतिशय चोखपणे बजावलेले आहे.

भाषांतराची अचूकता व योग्यायोग्यता

मूळ संहितानिष्ठ भाषांतराचे जनकत्व बायबलच्या भाषांतरांकडे जाईल असे मानण्यास वाव आहे. बायबल हा देवाचा शब्द असल्या कारणाने त्याची मोडतोड होऊ नये याची कटाक्षाने काळजी घेण्यात आली. ज्या तर्‍हेने आशयाला प्राधान्य देत मध्ययुगीन भारतात तत्त्वज्ञानात्मक आणि धार्मिक संहितांच्या अर्थनिर्णयनात्मक आवृत्ती अस्तित्वात आल्या. तसा प्रकार बायबलच्या बाबतीत फारसा झाला नाही.बायबलचे भाषांतरकार अथवा तत्त्वज्ञानविषयक संहितांचे भाषांतरकार मूळ संहितेच्या रूपाची प्रतिकृती काढण्याला प्राधान्य देत राहिले; परंतु रूप आणि आशय या गोष्टी परस्परावलंबी असल्या तरी भिन्न आहेत. आशय सहसा रूपातून सिद्ध होतो. म्हणून रूपाची प्रतिकृती अथवा नक्कल केल्याने त्यामध्ये तोच आशय गवसेल असे नाही. आशय आणि रूप यांमध्ये असणार्‍या गुंतागुंतीच्या संबंधांनी भाषांतरकारांपुढे नेहमीच तिढा उत्पन्न केलेला आहे. एकोणिसाव्या शतकातील जर्मन तत्त्वज्ञ फ्रीड्रिख एर्न्स्ट श्लायरमाखर याने ‘शब्दश: ’भाषांतराचा पुरस्कार केलेला आहे. थोडक्यात ग्रहणकर्त्याला भाषांतरित संहितेकडे घेवून जाणे असे याचे स्वरूप आहे. परकेपणा टिकवून ठेवणाऱ्या संहितेचे ग्रहण करण्यासाठी ग्रहनकर्त्याने थोडे कष्ट घेणे अपेक्षित आहे. याउलट भाषांतरित संहिता ग्रहणकर्त्याकडे घेऊन येणे, शब्दशः भाषांतरात जाणवणारा परकेपणा काढून टाकणे यावरही अनेक भाषांतरकारांनी भर दिला आहे. एकोणिसाव्या शतकातील जर्मन लेखक ग्योथे याने या पद्धतीचा पुरस्कार केलेला आहे. भाषांतराची प्रक्रिया बहुधा या दोन चरम बिंदुंमध्ये सामावलेली आहे.

वरील दोन भूमिका डोळ्यांसमोर ठेवून भाषांतरांचे वर्गीकरण पुढील प्रकारे करता येते.मूळ संहितेच्या जवळ जाणारे भाषांतर, मूळ संहितेपासून दूर जाणारे भाषांतर, विश्लेषणात्मक भाषांतर आणि पुनर्घटनात्मक भाषांतर. मूळ संहितेच्या जवळ जाणारे भाषांतर हे शब्दश: भाषांतर असते तर मूळ संहितेपासून दूर जाणारे भाषांतर हे शब्दापेक्षा संपूर्ण वाक्य अथवा वाक्यांश कोणता आशय व्यक्त करते याकडे लक्ष पुरविते. विश्लेषणात्मक भाषांतर मूळ संहिता काय म्हणते यावर लक्ष केंद्रित करते, तर पुनर्घटनात्मक भाषांतर तोच आशय नव्या भाषेत कसा घटित करता येईल यावर भर देते.

कोणता पर्याय निवडायचा याचा निर्णय प्रत्येक भाषांतरकार मूळ संहितेचे प्रयोजन, उपयोजन, भाषांतरित संहिता ग्रहण करणार्‍याचे स्वरूप, संहितेचा प्रकार (उदा. काव्य, प्रयोगशील  नाट्य इ.) व संहिता पार पाडत असलेले भाषिक कार्य – (उदा. संप्रेषण, सौंदर्यनिर्मिती, प्रचार इ.) या सर्व गोष्टी विचारात घेऊन करत असतो. त्यामुळे भाषांतराची अचूकता जोखताना वरील सर्व बाबी विचारात घेणे आवश्यक ठरते.

विसाव्या शतकातील भाषांतर व्यवहार

झपाट्याने झालेल्या जागतिकीकरणामुळे विसाव्या शतकातील भाषांतर व्यवहार हा एक फार मोठा व्यवसाय झालेला आहे. एकोणिसाव्या शतकात अथवा त्याअगोदर भाषांतरव्यवहार हा प्रामुख्याने तत्त्वज्ञान, धर्मप्रसार, वासाहतिक धोरणांचा प्रचार व प्रसार यांच्याशी निगडित होता. त्यामुळे भाषांतरित होणार्‍या संहिता ह्या प्रामुख्याने तत्त्वचिंतनात्मक, धर्मग्रंथ अथवा ललित साहित्य इत्यादी प्रकारात मोडणार्‍या होत्या. विसाव्या शतकात मात्र व्यापारविषयक करार मदार, आंतरराष्ट्रीय न्यायालयात चालणार्‍या खटल्यातील कागदपत्रे, जाहिराती, चित्रपट, दूरदर्शनावरील कार्यक्रम, माहितीपत्रके, तर्‍हेतर्‍हेचे अहवाल, विमाविषयक कागदपत्रे, वैद्यकीय तपासणीचे अहवाल, औषधांवरील व इतर वस्तूंच्या वेष्टनावरील सूचना, तंत्रज्ञानविषयक माहिती अशा अनेक अंगांना भाषांतर वेढून आहे.

साधारणत: भाषांतराचा ओघ पाहिला तर तो ज्ञानसंपन्न, विकसित, श्रीमंत समाजांच्या भाषांकडून मागास, आर्थिकदृष्ट्या दुर्बळ व अप्रगत समाजांच्या भाषांकडे जाणारा आहे. त्यामुळे पूर्वी भाषांतर प्रक्रियेवर अवलंबन राहून भाषांतराचे सिद्धांतन करण्याचा प्रयत्न होत असे. त्याऐवजी भाषांतरामागची उद्दिष्टे, भूराजकीय समीकरणे, दुर्बल भाषिक समूहांच्या लुप्त होत जाणार्‍या भाषा, भाषांतरकाराची भूमिका या गोष्टींना आता सिद्धांतनात स्थान मिळालेले दिसते.

भाषांतर व्यवहार हा इतक्या मोठ्या प्रमाणावर पसरलेला आणि सर्वव्यापी झाल्यामुळे भाषांतरासाठी संगणकाचा वापर विसाव्या शतकात सूरू झाला. फक्त संगणकीय किंवा संगणकाने केलेले भाषांतर हे अचूकतेच्या कसोटीवर संपूर्णपणे उतरत नसल्याने संगणकाच्या मदतीने भाषांतर हा पर्याय बर्‍यापैकी रूढ झाला आहे. भाषांतरासाठी आवश्यक असणार्‍या ऑनलाईन कोशांची उपलब्धता वाढली आहे. निरनिराळे कोश ऑनलाईन स्वरूपात आणण्याचे कामही चालू आहे. उपयोजित क्षेत्रांतील भाषांतरांच्या बाबतीत मानवी भाषांतरकारांची जागा भविष्यात संगणकीय भाषांतरकार घेतील अशी दाट शक्यता आहे.

भाषांतरातील काही नमुनेदार संज्ञा

मूळ भाषा : ज्या भाषेमधून संहिता भाषांतरित करावयाची ती मूळ भाषा होय. मूळ भाषेलाच स्रोत भाषा असेही संबोधण्यात येते. इंग्रजीमधील Source Language किंवा SL या संज्ञेचे हे मराठी रूप आहे.

लक्ष्य भाषा : ज्या भाषेमध्ये संहिता भाषांतरित करावयाची ती भाषा म्हणजे लक्ष्य भाषा होय. इंग्रजीमधील      Target Language अथवा TL यासाठी मराठीत लक्ष्य भाषा ही संज्ञा वापरली जाते. साधारणपणे भाषांतर व्यवहारात भाषांतरकाराची मातृभाषा अथवा त्याला मातृभाषेइतकीच चांगली अवगत असणारी भाषा लक्ष्य भाषा असते. जिच्यामध्ये स्रोत भाषेतून संहिता भाषांतरित केल्या जातात.

मूळ संहिता किंवा स्रोत संहिता : मूळ संहिता किंवा स्रोत संहिताम्हणजे भाषांतरित केली जाणारी संहिता. इंग्रजीमधील Source text अथवा St साठी मूळ संहिता अथवा स्रोत संहिता ही संज्ञा मराठीमध्ये वापरली जाते.

लक्ष्यसंहिता : लक्ष्यसंहिता जी संहिता लक्ष्य भाषेमध्ये भाषांतरित होऊन अस्तित्वात येते ती संहिता म्हणजे लक्ष्य संहिता होय. इंग्रजीमधील Target text अथवा Tt यासाठी मराठीत लक्ष्य संहिता ही संज्ञा वापरली जाते.

साधारणपणे असे अनुभवास येते, की स्रोत भाषा व लक्ष्य भाषा या एकाच भाषाकुळातील असतील अथवा त्या बोलणारे भाषक समाज जर ऐतिहासिक, सामाजिक अथवा भौगोलिक दृष्ट्या निकट असतील तर भाषांतरकाराला समकक्ष पर्याय तुलनेने सहज मिळण्याची शक्यता दुणावते. ऐतिहासिक, राजकीय अथवा भौगोलिक दृष्ट्या भाषक समाज जितके भिन्न तितके भाषांतरकाराला समकक्ष पर्याय शोधण्यासाठी करावे लागणारे कष्ट अधिक असतात.

संदर्भ :

• वरखेडे,रमेश (संपा.),भाषांतर स्वरूप आणि समस्या, खैरे, विश्वनाथ, भाषांतर : भाषाविकासाची दोरवाट (लेख), १९९७.

• Kelkar, Ashok, To translate or not to translate, Meta, Translators’ Journal, vol. 30, No. 3, University of Montreal Press,Sept. 1985.

• Lawrence,Venuti (ed.),The translation Studies Reader (online version),Routledge,2000.

• Nida, Eugene & Taber Charles, The Theory and Practice of Translation, United Bible Societies, Leiden, 1974.