भगवती आराधना : आचार्य शिवार्य विरचित शौरसेनी प्राकृत भाषेतील जैनग्रंथ. जैनमुनींसाठी आवश्यक आचारसूत्रे आणि सल्लेखना या जैन धर्मातील जीवनविधीचे सांगोपांग वर्णन या ग्रंथात आहे. मूलत: या ग्रंथाचे नाव आराधना आहे ; परंतु आराधनेच्या प्रती आदरभाव प्रकट करण्यासाठी भगवती विशेषण लावण्यात आले आहे. तसेच मूलाराधना ह्या नावानेही हा ग्रंथ प्रसिद्ध आहे.आचार्य शिवार्य यांनी गाथा क्र. २१६२ मध्ये ‘आराहणा भगवदी’ असा उल्लेख करून आराधनेच्या प्रती पूज्यभाव व्यक्त करून याचे नामकरण केले आहे, यामुळेच हा ग्रंथ भगवती आराधना या नावाने प्रसिद्ध झाला.आर्यजिन नंदिगणी,सर्वगुप्तगणी व आचार्यमित्रनंदी ही आचार्य शिवार्य यांची गुरुपरंपरा होय. आचार्य शिवार्य यांनी अचेलकत्व अर्थात्‌ दिगंबरत्वाचे गुणगान केल्याने हे आचार्य दिगंबर जैन मान्यतेतील असावेत असा निष्कर्ष निघतो.आचार्य शिवार्य यांचे जन्मस्थान व अन्य माहिती उपलब्ध नाही. आचार्य जिनसेनांच्या महापुराणाच्या पूर्वी या ग्रंथाची रचना झाली आहे, कारण यामध्ये प्रस्तुत ग्रंथाचा उल्लेख आला आहे.आचार्य शिवार्य हे आचार्य कुंदकुंद तसेच मूलाचारचे रचयिता वट्टकेरांच्या समकालीन असावेत,कारण या तीनही आचार्यांच्या ग्रंथांतील भाषा,रचना शैली व कथनपद्धतीमध्ये अनेक प्रकारचे साम्य आहे. यावर झालेल्या टीकाग्रंथावरून भगवती आराधना तिसऱ्या-चौथ्या शतकातील रचना असावी असा तर्क बांधता येतो.

उपलब्ध प्रतीचे मुखपृष्ठ

जीवन जगण्याची जशी कला आहे तशीच मृत्यू नंतरची गती सुधारण्याचीही एक कला असू शकते ही संकल्पना जैनदर्शनात स्पष्ट केली आहे. विधिपूर्वक मृत्यूस सामोरे जाणे याला जैनदर्शनात सल्लेखना मरण असे म्हटले आहे. या विधीचाच विस्तृतपणे वर्णन करणारा जैनदर्शनातील अत्यंत महत्त्वपूर्ण ग्रंथ म्हणजे भगवती आराधना होय. ग्रंथातील द्वितीय गाथेत सम्यग्दर्शन, सम्यग्ज्ञान, सम्यक्‌चारित्र आणि तपाच्या विविध प्रकारच्या साधनांना आराधना असे म्हटले आहे. तृतीयगाथेमध्ये सम्यकत्त्व आराधना आणि चरित्र आराधना असे भेद सांगितले आहेत. चतुर्थ गाथेमध्ये दर्शन आराधना केल्यास ज्ञानाची आराधना आपोआप होते तसेच संयमाची आराधना केल्यास तपाची आराधना नियमाने होते याचे कथन आहे. मृत्यूसमयी भाव उत्तम असल्यास पुढे सद्‌गती प्राप्त होते. याकरिता पूर्वीपासूनच आराधना उत्तम असावी,कारण जो पूर्वाभ्यासी असतो त्याचीच आराधना सुखपूर्वक होते. मृत्युसमयी अचानक सत्‌ आराधना केल्यास अनभ्यासामुळे ती उत्तम होईलच याचा निश्चय नाही, म्हणूनच जीवनभर आराधना करावी. अशाप्रकारे प्रथम चोवीस गाथांमध्ये आराधना या विषयाचे कथन आहे. पुढे रचनाकाराने मृत्यूचे १७ भेद सांगून त्यापैकी ५ उत्तम मरणाचे भेद विस्तृतपणे सांगितले आहेत. पंडितपंडितमरण, पंडितमरण, बालपंडितमरण, बालमरण आणि बालबालमरण हे मरणाचे उत्तम प्रकार आहेत. उत्कृष्ट श्रावकाला बालपंडितमरण तसेच केवली भगवंतांना पंडितपंडित मरण प्राप्त होते. मिथ्यादृष्टीस बालबालमरण प्राप्त होते.

पुढे सम्यक्त्त्व आराधना व त्याचे विविध प्रकार विस्तृतपणे सांगितले आहेत. ज्याला असाध्य रोग झाला असेल, मुनिधर्माचे पालन अशक्य असेल, देव-मनुष्य अथवा अन्यप्राण्यांद्वारे उपसर्ग निर्माण झाल्यावर, चरित्राचा विनाश करणारे शत्रू अथवा मित्र असतील, दुर्भिक्ष झाल्यास,भयानक वन अथवा अन्य ठिकाणी भटकल्यास, डोळ्याचे तेज अत्यंत कमी झाल्यास,ऐकू येत नसल्यास,पायात चालणे-फिरण्याची शक्ती न राहिल्यास तसेच अन्यही कोणते अपरिहार्य कारण निर्माण झाल्यास नियम सल्लेखना घेण्याचा उपदेश देण्यात आला आहे.जीवनाच्या अंतिम समयी सर्वपरिग्रह, ममत्व यांचा त्याग करून दिगंबर वेष धारण करून आत्मसाधनेद्वारे मरण साधना करणे सल्लेखना होय. सल्लेखनेचे दोन भेद सांगितले आहेत. 1. बाह्य 2. अभ्यंतर. सर्व बाह्यपदार्थ त्यागून शरीराला कृश करणे बाह्य सल्लेखना आहे. मनातील सर्व कषायांचा प्रयत्नपूर्वक त्याग करणे अभ्यंतर सल्लेखना आहे. जो योग्य काळ साधून सल्लेखनेसाठी प्रवृत्त होतो त्याला क्षपक व त्याकाळात सर्वप्रकारे योग्य मार्गदर्शन करून त्याची सल्लेखना साधण्यासाठी मदत करतो त्याला निर्यापक असे म्हटले जाते. निर्यापकाचार्यांच्या विविध भेदांचेही वर्णन या ग्रंथात आले आहे. सल्लेखनेमध्ये यम आणि नियम असे मुख्य दोन भेद करण्यात आले आहेत. अंतिम सल्लेखना साधण्यासाठी अभ्यासरूप आचरण करणे आवश्यक आहे. यासाठी या ग्रंथात बारा वर्षांची नियम सल्लेखना सांगितली आहे. जीवनातील काही विशिष्ट संकेतानुसार जीवनाचा अंतिम काळ जाणून उत्कृष्ट सल्लेखनाविधी साधण्यासाठी, प्रयत्नरत राहण्यासाठी बारा वर्षांच्या नियम सल्लेखनेचा उपदेश यात सांगितला आहे. या काळात क्रमाने नियमावली तसेच त्याग-तपस्येत वाढ करून अंतिमसमयी आकुलता येवून मृत्यू येण्यासाठी पूर्वीपासूनच प्रयत्नरत राहण्याचा उपदेश देण्यात आला आहे. मृत्यू निकट आल्यानंतर सर्वपरिग्रहांचा व क्रमाक्रमाने आहाराचा त्याग करून मृत्यूला सहज साधणे याला यम सल्लेखना असे म्हटले आहे.सल्लेखना म्हणजे आत्महत्या नव्हे तर योग्यकाळी केलेली उत्कृष्ट मरणसाधना आहे.१९६८ पासून पुढील गाथांमध्ये मरणोत्तर विधीचेही आद्योपांत वर्णन आले आहे.तत्कालीन मुहूर्त व त्याचे फलित, विधिविधान यांचे वर्णन यामध्ये आले आहे. अचानक एकांतामध्ये मरण निकट आल्यास कशी साधना करावी, निश्चय व व्यवहाराचे उत्कृष्ट तौलनिक कथन या ग्रंथात आले आहे. अन्य धर्मशास्त्रांप्रमाणे प्रकृती विरूद्ध मरणसाधने संबंधी वैज्ञानिक विश्लेषण यात आले आहे.

पुढील अनेक गाथांमध्ये कथारूप उत्कृष्ट उदाहरणासहित सल्लेखनेची भावना दृढ करण्यात आली आहे तसेच धर्मध्यान, शुक्लध्यान यांचे उत्कृष्ट वर्णन आले आहे. अहिंसा, सत्य, अचौर्य, अपरिग्रह, ब्रह्मचर्य या सिद्धांतांचे विस्तृत विवेचन आहे. अहिंसा ह्या सिद्धांताचे विश्लेषण करत असताना सुमारे ३०० पेक्षा अधिक गाथांमध्ये त्याचे सूक्ष्मवर्णन आले आहे.आळशी, एकलविहारी, कुशील, नाटकी अशा अनेक ढोंगी साधूंचेही भेद सांगितले आहेत.

कथासाहित्याचा विकास होण्यामध्ये या ग्रंथाचे मौलिक स्थान आहे. हरिषेणांनी संस्कृतमध्ये १२५ कथांचा संग्रह केला. याच्याच आधारे आराधना कथाकोश, पुण्याश्रव कथाकोश तसेच अपभ्रंश प्राकृतात श्रीचंद्रकृत कहाकोसु हे कथासंग्रह रचले गेले आहेत.या ग्रंथाचे महत्त्व जाणून अनेक आचार्यांनी यावर विश्लेषणात्मक टीका लिहिल्या आहेत. विजयोदयाटीका याचे टीकाकार अपराजितसूरी यांनी सुलभ भाषेत या ग्रंथाचे विश्लेषण संस्कृत भाषेत केले आहे.मूलाराधनादर्पण,विजोदयाटीका व पूर्वी प्रकाशित झालेल्या प्राकृतटीका ग्रंथांना महत्त्व देत पं. आशाधरसूरी यांनी टीका लिहिली आहे. मूलाराधनादर्पणावरून कोणी अज्ञात मुनींनी प्राकृत भाषेत टीका लिहिली आहे. ही टीका दिगंबराचार्यांनी लिहिलेली असावी कारण यामध्ये आचार्यांच्या ३६ गुणांमध्ये २८ मूलगुण सांगितले आहेत आणि हे केवळ दिगंबर परंपरेतच आहे. या टीकेत अनेक कथाही होत्या. पंडित आशाधरजींच्या मते त्यांच्या समक्ष अन्य एक संस्कृतटीका उपलब्ध होती. गद्यात्मक संस्कृत टीकांशिवाय काही संस्कृत पद्यात्मक अनुवाद ग्रंथांचाही उल्लेख पं. आशाधरजी यांनी केला आहे. विदग्ध प्रीतिवर्धनी असा याचा उल्लेख केला आहे. आशाधरजींनी चंद्रकृत व जयनंदीकृत टिपण या दोन टिपणांचा उल्लेख केला आहे. आराधनापंजिका आणि भावार्थदीपिकाटीका या टीकांचे हस्तलिखित भांडारकर इन्स्टिट्यूट-पुणे येथे उपलब्ध आहे. संस्कृत,हिंदी, मराठी, कन्नड, गुजराथी, इंग्रजी अशा अनेक भाषांमध्ये या ग्रंथाचे अनुवाद झाले आहेत.

संदर्भ : आचार्य अमितगती, भगवती आराधना:संस्कृतपद्यटीका,सोलापूर १९८४.

समीक्षक : कमलकुमार जैन