प्रहसन : नाट्यशास्त्राच्या अठराव्या अध्यायात नाट्याच्या लक्षणांद्वारे होणारे दहा प्रकार भरताने सांगितले आहेत. त्यांनाच दशरूपक अशी संज्ञा आहे. काव्याच्या केवळ पठणाने नव्हे, तर प्रत्यक्ष प्रयोगाने निर्माण होणाऱ्या रसाच्या आवेशामुळे उत्पन्न होणारा आनंद हे दशरूपाचे सार होय. भरतानेही दशरूपकांत प्रहसनाला स्वतंत्र स्थान दिले आहे. प्रहसन हा सुखात्मिकेचाच एक प्रकार होय. सुखात्मिकेत ठसठशीत व्यक्तिचित्रण असते. विनोद निर्मितीचा एकमेव हेतू डोळ्यांपुढे ठेवून निर्माण केलेल्या प्रहसनाची प्रकृती मात्र सुखात्मिकेपेक्षा बरीचशी वेगळी असते. प्रहसन हे घटनाकेंद्री असते. घटना अतिरंजित व असंभाव्य असतात, त्या वेगाने घडतात व त्यातून मौज निर्माण होते. प्रहसनातील व्यक्ती उथळ, तऱ्हेवाईक व विक्षिप्त स्वभावाच्या आणि साचेबंद व्यक्तिमत्त्वाच्या असतात. विविध क्लृप्त्या योजून हास्य निर्माण करणारे प्रहसन सुखात्मिकेसारखे प्रेक्षकाला अंतर्मुख करीत नाही. सामान्यपणे कनिष्ठ दर्जाचा विनोद त्यात ठासून भरलेला असतो. प्रहसनात समाजातील खालच्या स्तरातील लोकजीवन दाखवलेले असते. त्यात उपहासात्मक अनिर्बंध वागणूक असते. पात्रांच्या उक्तिकृतींत अतिशयोक्ती, असंबद्धता, विसंगती, मूर्खपणा, वेडाचार यांचा मालमसाला असतो. ढोंग, भडक व उच्छृंखल अभिनय यांनी युक्त असते. तसेच एऱ्हवी ज्या घटना असंभाव्य किंवा अवास्तव वाटतील, त्या प्रहसनात गुंफलेल्या असतात. प्रहसनात काहीही घडू शकते आणि कसेही घडू शकते हे जरी खरे असले, तरी सुखात्मिकेप्रमाणेच प्रहसनालाही स्वतःचा असा सुसंगत रचनाबंध असतो.
भरताने प्रहसनाबद्दल सांगताना ते भाण या रूपक प्रकाराप्रमाणे असावे असे सांगितले आहे. वाग्व्यापाराला प्राधान्य असल्याने ‘भारती’ वृत्तीने युक्त, मुख व निर्वहण असे दोन संधी असलेले व हास्यरसप्रधान असे प्रहसन असावे. त्याचा आकृतीबंध एकांकी असेल किंवा अनेक प्रवेशयुक्त एकांकी असेल किंवा एकापेक्षा जास्त अंकही असू शकतील. कथावस्तू व विषयानुसार भरताने प्रहसनाचे शुद्ध व संकीर्ण असे दोन प्रकार मानले आहेत. शुद्धप्रहसन एकांकी तर संकीर्ण प्रहसन अनेकांकी असे काहींचे मत आहे तर काहींच्या मते एकच अंक असावा. एकंदर अंकांच्या संख्येबाबत नियम नाही.
शुद्ध व संकीर्ण यांतील फरक स्पष्ट करताना अभिनवगुप्त सांगतो – कोणा एकाच्या चरिताला ते दूषित असल्याने लोक हसतात ते शुद्धप्रहसन; शुद्धप्रहसनात एकाचेच चरित्र हास्यास्पद, तर संकीर्ण प्रहसनात अनेकांचे चरित्र हास्यास्पद असते. दशरूपक (३.५४, ५५, ५६), भावप्रकाशन (२४७.२, अधिकार ८), रसार्णवसुधाकर (३.२७८) या ग्रंथांमध्ये शुद्ध, संकीर्ण व विकृत प्रहसनाचे असे तीन प्रकार सांगितले आहेत.
सामान्यतः शुद्ध प्रहसनात भागवत; तापस, भिक्षू, श्रोत्रिय व विप्र यांची गंमतीची भाषणे असावीत व कथानक विशिष्ट ध्येयाकडे प्रगत होईल असे रचावे, अशी अपेक्षा असते. संकीर्ण प्रहसनात वेश्या, चेट, नपुंसक, धूर्त, विट, बंधकी म्हणजे व्यभिचारिणी इ. नीच पात्रे असतात आणि कथानक लोकप्रिय कथेच्या आधारे रचलेले असते. षंढ, कामुक, इत्यादींनी युक्त व वीथी या रूपक प्रकाराशी संकर होत असेल तर ते विकृत प्रहसन असे दशरूपककार सांगतात. वीथी या प्रकारात शृंगाररस व कैशिकीवृत्ती सांगितली आहे.
भावप्रकाशन या ग्रंथात शारदातनय प्रहसनाच्या आकृतीबंधाबद्दल म्हणतो, की प्रहसनात एक अंक, मुख व निर्वहण दोन संधी, सहा रस असावेत. त्याने सैरन्ध्रिका हे संकीर्ण प्रहसनाचे, सागरकौमुदी हे शुद्ध तर कलिकेलिप्रहसन हे वैकृत प्रहसनाचे उदाहरण (२४७.१३, अधिकार ८), दिले आहे. रसार्णवसुधाकरात (३.२७०) प्रहसनाचे विस्तृत वर्णन करताना ग्रंथकाराने प्रहसनाची दहा अंगे सांगितली आहेत – अवगलित, अवस्कन्द, व्यवहार, विप्रलम्भ, उपपत्ती, भय, अनृत, विभ्रांती, गदगद्वाक् आणि प्रलाप.
संस्कृतात दामक, भगवदज्जुक, हास्यार्णव, मत्तविलास यांसारखी प्रहसने प्रसिद्ध आहेत. पाश्चात्य रंगभूमीवर फार्स हा जो नाट्यप्रकार आहे, त्याला मराठीत प्रहसन म्हटले जाते. पण भरताची संकल्पना व आधुनिक फार्स (प्रहसन) वेगळे आहे. पाश्चात्त्य फार्सचा उगम इ. स. पू. पाचव्या शतकात झाला, असे मानले जाते. जुन्या ग्रीक सुखात्मिकेबरोबर रचलेले हास्योत्पादक लघुनाटक म्हणजे ‘फार्स’ ‘Farcire’ (कोंबून भरणे) या लॅटिन शब्दापासून फार्स ही संज्ञा सिद्ध झाली. ‘Mystere’ म्हणजे बायबलमधील नव्या व जुन्या करारांतील कथांवर आधारलेली नाटके. धार्मिक स्वरूपाच्या या गंभीर नाटकात फार्स घुसडले जात. यूरोपमधील प्रबोधनानंतर फार्सच्या निर्मितीला बहर आला. इटलीमधील फार्स या प्रकारात साचेबंद स्वरूपाची पात्रे असत. मोल्येरच्या फार्समध्ये व्यंगचित्रे असत आणि मानवी जीवनातील विसंगतीचे भेदक दर्शनही असे. एकोणिसाव्या शतकात फार्सला पुन्हा बहर आला तो फ्रान्समध्ये. त्याबरोबरच जर्मनी, रशिया, ब्रिटन इ. देशांतही तो अवतरला. रुचिपालट म्हणून योजिण्यात आलेल्या प्रहसनांचे स्वरूप पुढे पालटत चालले. असभ्य व ग्राम्य विनोदाने भरलेली प्रहसने १८७० ते १९०० पर्यंत निर्माण झालेली दिसतात. जवळजवळ परकीय कथावस्तू घेऊन बेतलेले आणि नाट्यप्रयोग संपल्यावर किंवा एखाद्या नाटकाच्या दोन अंकांच्या दरम्यान सादर केलेले लघुनाट्य (इंटरल्यूड) असेही तत्कालीन प्रहसनांचे स्वरूप होते. फार्समधील विनोद हा नेहमीच वरकरणी वाटतो तितका उथळ नसतो. कित्येकदा त्याला कारुण्याची झालरही असते. चार्ल्स चॅप्लिनचे मूकपट व मार्क्स बंधू यांचे चित्रपट याच फार्सच्या प्रकारात मोडतात.
मराठी रंगभूमीवर फार्सचा अवतार झाला, तो इंग्रजी नाट्यप्रयोगांच्या अनुकरणामुळे. पौराणिक नाटकाच्या जोडीला फार्स सादर करण्याची युक्ती अमरचंद वाडीकर नाट्यमंडळीने १९ जानेवारी १८५६ रोजी केला. हा फार्स हास्यकारक व लौकिक जीवनाचे चित्रण करणारा असा होता. बासुंदीपुरीचा मनोरंजक फार्स हे प्रहसन आणि नारायणराव पेशवे यांच्या मृत्यूचा फार्स हे देखील प्रहसनच. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळात मात्र व्यक्तिजीवनातील अगर आपल्या समाजातील वैगुण्ये अथवा उणिवा धारदारपणे मांडण्याचे माध्यम म्हणून प्रहसनाचा उपयोग होऊ लागला.
प्रहसनातील व्यक्ती व घटना अस्वाभाविक वाटल्या, तरी त्यातून मानवी जीवनातील वास्तवावर प्रकाश पडतो. विसंगतीचे चित्र रंगवितानाच प्रहसन संगतीची जाणीव करून देते. त्यात एकाच वेळी गांभीर्य आणि गंमत यांचा प्रत्यय येतो. प्रहसन हे काही अंशी मुक्त नाट्य म्हणता येईल, किंवा जीवनाकडे पाहण्याची ती एक रीत असेही म्हणता यईल.
संदर्भ :
- भट्टाचार्य, बी.(संपा.), नाट्यशास्त्र (भरतमुनी), बडोदा, १९९५.
- गणपतीशास्त्री, त. (संपा.) , रसार्णवसुधाकर (श्रीशिंगभूपाल),अनन्तशयन, १९१६.
- परब, काशिनाथ पांडुरंग (संपा.), दशरूपक (धनंजय),मुंबई, १९४१.
समीक्षक : मंजुषा गोखले