कानेटकर, वसंत शंकर : (२० मार्च १९२२ – ३० जानेवारी २००१). लोकप्रिय मराठी नाटककार, लेखक, कादंबरीकार आणि विचारवंत. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील, कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर या गावी झाला. ते चार भावंडांपैकी दुसरे होते. प्रसिद्ध कवी शंकर केशव कानेटकर हे त्यांचे वडील. ते “गिरीश” या टोपणनावाने महाराष्ट्रात ओळखले जात. वसंतरावांच्या आई, उमा शंकर कानेटकर, ह्या बुधगाव संस्थानचे मुन्सफ गोविंद विनायक श्रीखंडे यांच्या कन्या होत.

वसंत कानेटकर यांचे सुरुवातीचे आयुष्य पुण्यात गेले. त्यांचे वडील, कवी गिरीश, हे रविकिरण मंडळाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. वडिलांच्या आणि रविकिरण मंडळातील इतर कवी यांच्या सहवासातून वसंत कानेटकरांना साहित्यात रस निर्माण झाला. कवी गिरीश हे महाराष्ट्रभर काव्यगायनासाठी जात. तेव्हा त्यांच्या कार्यक्रमात अनेक वेळा वसंतराव आणि त्यांची भावंडे सहभागी होत असत. याचा उपयोग त्यांच्या साहित्यिक जडणघडणीत झाला. ते लहानपणी नाटिका लिहीत आणि त्यांच्या बालमित्रांसोबत त्यांचे सादरीकरणही करीत.

कानेटकरांनी १९४२-४३ मध्ये पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून बी.ए.ची पदवी संपादन केली. उच्चशिक्षण घेत असताना कानेटकरांना वि. स. खांडेकर आणि कन्नड साहित्यिक, आणि तत्कालीन विलिंग्डन महाविद्यालयाचे प्राचार्य वि. कृ. गोकाक दोन ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या साहित्यिकांचे मार्गदर्शन लाभले. कानेटकरांच्या मते, त्यांच्या लेखन व शैक्षणिक कारकीर्दीसाठी आवश्यक असलेली जिज्ञासू वृत्ती, अनुशासन आणि चिकाटी ही त्यांना खांडेकरांकडून मिळाली. कानेटकरांनी सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजमधून एम.ए.ची पदवी संपादन केली (१९४६). गोकाक यांनी त्यांना शेक्सपियरच्या साहित्यातील अंतरंग शिकवले. या काळात मराठीतील गडकरी, फडके, खांडेकर, आपटे, केतकर या लेखकांच्या साहित्याचा आणि पाश्चात्त्य जगातील इब्सेन, शॉ आणि शेक्सपियर या नाटककारांचा कानेटकरांवर खोलवर प्रभाव पडला. साहित्यिक श्री. के. क्षीरसागर यांचादेखील त्यांना या वेळेस सहवास लाभला. क्षीरसागरांकडून कानेटकरांना मराठी रंगभूमीबद्दलचे सखोल ज्ञान मिळाले आणि त्यांच्या सहवासातून कानेटकरांचा बौद्धिक दृष्टीकोनही रुंदावला.

१९४६ मध्ये कानेटकर नाशिकमधील गोखले एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या एच. पी. टी. आर्टस् कॉलेजमध्ये मराठी व इंग्रजीचे व्याख्याते म्हणून रुजू झाले. पुढे त्यांना प्राध्यापक म्हणून बढती मिळाली आणि या संस्थेचे ते आजीव सदस्यदेखील झाले. शिकवत असतानाच त्यांनी लघुकथा लेखक आणि कादंबरीकार म्हणून आपली लेखन कारकीर्द सुरू केली. मनोहर आणि सत्यकथा यांसारख्या नियतकालिकांमधून त्यांनी लिहिलेल्या लघुकथा प्रसिद्ध झाल्या.  १९५० ते १९५७ याकाळात त्यांच्या घर, पंख आणि पोरका या तीन कादंबऱ्या प्रकाशित झाल्या.

१९५७ मध्ये कानेटकरांनी आपले पहिले नाटक वेड्याचे घर उन्हात लिहिले. हे नाटक भालबा केळकर यांनी दिग्दर्शित केले, तर पुण्यातील प्रोग्रेसिव्ह ड्रामाटिक असोसिएशनने त्याची निर्मिती केली. नाटकातील मध्यवर्ती भूमिका श्रीराम लागू यांनी निभावली होती. कालबाह्य रूढी-परंपरा आणि कर्तव्य यांच्या ओझ्याखाली दबलेल्या एका मनस्वी, कलासक्त, संपन्न व्यक्तिमत्त्वाची ही शोकांतिका. हे नाविन्यपूर्ण नाटक समीक्षकांना तर आवडलेच, पण व्यावसायिकदृष्ट्याही यशस्वी ठरले. याच्या यशानंतर कानेटकरांचे दुसरे मानवतेच्या भवितव्याबद्दल आणि अस्तित्वाबद्दल चिंतन करणारे कल्पनारम्य नाटक देवांचे मनोराज्य आले; मात्र या नाटकास तितकेसे व्यावसायिक यश मिळाले नाही. त्यांचे तिसरे नाटक प्रेमा, तुझा रंग कसा?, ही एक हलकी-फुलकी विनोदी, खेळकर सुखात्मिका होती. पुन्हा एकदा त्यांनी वेगळा विषय आणि शैली निवडली होती. या नाटकास अभूतपूर्व व्यावसायिक यश मिळाले व आजही ते त्यांच्या सर्वांत लोकप्रिय नाटकांपैकी एक म्हणून गणले जाते.

कानेटकरांनी रायगडाला जेव्हां जाग येते या ऐतिहासिक नाटकात छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यातील पिता-पुत्राच्या संबंधांचे अंतरंग मांडले. या नाटकाच्या लेखनतयारीसाठी त्यांना दोन वर्षे लागली. त्यांनी स्वतः रायगड किल्ल्याला भेट दिली, इतिहासकार सेतुमाधवराव पगडी आणि शाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी चर्चा केल्या, ऐतिहासिक नोंदी वाचल्या. ऐतिहासिक मराठी भाषा अंगवळणी पडण्यासाठी प्राध्यापक म्हणून बखरदेखील शिकवायला घेतली. हे नाटक मराठी रंगभूमीवर एक मैलाचा दगड ठरले. या नाटकातील काशिनाथ घाणेकर यांची संभाजी महाराजांची भूमिका विशेष गाजली.

कानेटकरांचे पुढचे नाटक अश्रूंची झाली फुले हे त्यांचे सर्वांत यशस्वी नाटक. हे एक सामाजिक, भावनाप्रधान नाटक होते. या नाटकाची निर्मिती व दिग्दर्शन प्रभाकर पणशीकर यांनी केले, तसेच त्यांनी या नाटकात “प्रा.विद्यानंद” ही मुख्य भूमिकादेखील निभावली. चित्तरंजन कोल्हटकर यांची “शंभू महादेव” आणि काशिनाथ घाणेकर यांची “लाल्या” या भूमिका विशेष गाजल्या. हिंदी चित्रपट अभिनेते आणि निर्माते अशोककुमार यांनी या नाटकावर आधारित आंसू बन गये फूल हा हिंदी चित्रपट बनविला. या चित्रपटासाठी कानेटकरांना सर्वोत्कृष्ट कथेसाठीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला (१९७१).

१९७३ मध्ये कानेटकरांनी अध्यापनातून स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि ते पूर्णवेळ व्यावसायिक नाटककार बनले. ५४ वर्षांच्या लेखन कारकीर्दीत त्यांनी ४२ तीन अंकी नाटके, ४ कादंबर्‍या आणि अनेक एकांकिका, लघुकथा, चिंतनपर लेख, चित्रपट आणि टीव्ही मालिकांसाठी पटकथा लिहिल्या. त्यांची अनेक नाटके हिंदी व गुजराती भाषांमध्ये रूपांतरित झालेली आहेत.

कानेटकरांचे लेखक म्हणून अनेक शैलींवरील प्रभुत्व, विषयांचे वैविध्य, नाट्यतंत्रावरील पकड, भाषासौंदर्य आणि संस्मरणीय संवाद यांकरिता ते प्रख्यात होते. १९५० च्या दशकात व्यावसायिक मराठी रंगभूमीचे पुनरुज्जीवन करण्याचे आणि पुढची चार दशके एकापाठोपाठ एक सरस आणि यशस्वी नाटके देऊन तिला समृद्ध करण्याचे श्रेयही मोठ्या प्रमाणात त्यांना जाते. वेड्याचे घर उन्हांत या नाटकापासून त्यांची नाटककार म्हणून वाटचाल सुरू झाली आणि पुढची चाळीस वर्षे त्यांनी मराठी रंगभूमी गाजवली. या त्यांच्या पहिल्या नाटकाच्यावेळी संगीत नाटकांचे युग नुकतेच संपले होते. व्यावसायिक मराठी रंगभूमीची अवस्था बिकट होती. त्यांच्या नाटकांच्या व्यावसायिक यशाने संपूर्ण नाट्यव्यवसाय पुनः बहरला. कलावैभव, नाट्यसंपदा, चंद्रलेखा अशा अनेक नाटक कंपन्यांना कानेटकरांच्या नाटकांमुळे मोठ्या प्रमाणात यश मिळाले. अभिनेते श्रीराम लागू, काशिनाथ घाणेकर, वंदना गुप्ते असे अनेक कलाकार त्यांच्या नाटकांमधून पुढे आले. भारतीय रंगभूमीच्या इतिहासातील महत्त्वाच्या, प्रतिभावंत आणि यशस्वी नाटककारांपैकी एक म्हणून त्यांची गणना होते. पारंपरिक मराठी नाट्यशैली समजल्या जाणाऱ्या ऐतिहासिक आणि संगीत नाटक अशा दोन शैली त्यांनी नव्या, आधुनिक रूपात सादर करून पुनरुज्जीवित केल्या.

कानेटकरांनी आपल्या ऐतिहासिक नाटकांमध्ये महापुरुषांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि संवेदनांचा शोध घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या उदयापासून ते छत्रपती संभाजी राजेंच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने महाराष्ट्रावर केलेली स्वारी या कालखंडावर आधारित पाच ऐतिहासिक नाटकांचे “नाट्यपंचक” त्यांनी साकारले. ही पाच नाटके म्हणजे – रायगडाला जेव्हां जागे येते, इथे ओशाळला मृत्यू, तुझा तू वाढवी राजा, आकाशमिठी आणि जिथे गवतास भाले फुटतात ही होत. संगीत नाटकातदेखील त्यांनी क्रांती घडवून आणली. शेक्सपिअरच्या शोकांतिका, आधुनिक संवेदनशीलता आणि महाभारतातील पौराणिक कथा एकत्र करून त्यांनी संगीत मत्स्यगंधा हे नाटक लिहिले. लेकुरे उदंड जाली यामध्ये त्यांनी चौथी भिंत तोडली आणि नायकाला थेट प्रेक्षकांशी संवाद साधायला लावला. या नाटकात त्यांनी माय फेअर लेडी नाटकाप्रमाणे पद्य आणि गद्य गीतांच्या मिश्रणाचा अनोखा प्रयोग यशस्वी रित्या केला. त्यांच्या सर्व संगीत नाटकांसाठी पंडित जितेंद्र अभिषेकींनी उत्तम संगीत दिले.

महाराष्ट्रातील अनेक प्रख्यात व्यक्तींच्या आयुष्यावर कानेटकरांनी चरित्रनाटके लिहिली. या चरित्रनाटकांचे वर्णन कानेटकरांनी स्वतः “कर्मयोगी शोकात्मिका” असे केलेले आहे. हिमालयाची सावली (धोंडो केशव कर्वे), वादळ माणसाळतंय (बाबा आमटे), विषवृक्षाची छाया (इतिहासाचार्य वि. का. राजवाडे), कस्तुरीमृग (हिराबाई पेडणेकर) आणि तू तर चाफेकळी (बालकवी ठोंबरे) ही ती नाटके आहेत.

कानेटकर यांच्या प्रेमा, तुझा रंग कसा?, प्रेमाच्या गावा जावे, लेकुरे उदंड जाली, मदनबाधा, छू मंतर! आणि सूर्याची पिल्ले इत्यादी हलक्याफुलक्या विनोदी सुखात्मिका अत्यंत लोकप्रिय ठरल्या. शेक्सपियरच्या नाटकांचा कानेटकरांवर विशेष प्रभाव होता. त्यांच्या मते शेक्सपियरच्या सर्व महान शोकांतिकांचा विषय म्हणजे एका मनस्वी स्वभावाच्या नायकाने त्यासमोर नियतीने मांडलेल्या आव्हानाशी दिलेली झुंज आणि त्या संघर्षात झालेल्या त्याचा सर्वनाश. गगनभेदी या त्यांच्या प्रख्यात नाटकात त्यांनी एकाच नायकाच्या आयुष्यातील तीन वेगळ्या टप्प्यांमध्ये शेक्सपियरच्या हॅम्लेट, ऑथेल्लो आणि किंग लियर या तीन महान शोकांतिका एकत्र केल्या. तसेच झां-पॉल सार्त्र, सीमॉन द बोव्हार, आल्बेअर काम्यू आणि आर्थर यांसारख्या अस्तित्ववादी तत्वज्ञांचादेखील त्यांच्या विचारांवर व लेखनावर विशेष प्रभाव होता. सार्त्रच्या Les Jeux Sont Faites या पटकथेचे त्यांनी तेथे चल राणी या नावाखाली कादंबरीत रूपांतर केले.

वसंत कानेटकर यांच्या कलाकृतींना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. वेड्याचे घर उन्हात या त्यांच्या पहिल्या नाटकाने महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेतील बहुतांशी बक्षिसे जिंकली (१९५८). देवांचे मनोराज्य, प्रेमा, तुझा रंग कसा? आणि रायगडाला जेव्हां जाग येते यांना महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेतील पहिले पारितोषिक मिळाले. संगीत नाटक अकादमीने रायगडाला जेव्हां जाग येते या नाटकाला “बेस्ट इंडियन प्ले” पुरस्काराने सन्मानित केले (१९६४). या पुरस्काराचा भाग म्हणून या नाटकाचे १४ भारतीय भाषांमध्ये भाषांतर झाले आणि आकाशवाणीच्या राष्ट्रीय कार्यक्रमात प्रसारण झाले. हे नाटक मुंबई विद्यापीठाच्या पदवीपूर्व कला अभ्यासक्रमातही सामील झाले आणि यामुळे अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून स्वत:चे नाटक शिकवण्याचा मान कानेटकरांना मिळाला. १९७१ मध्ये ते कुर्ला, मुंबई येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले. १९७७ मध्ये त्यांना कस्तुरीमृग या नाटकासाठी सर्वोत्कृष्ट नाटक व सर्वोत्कृष्ट नाटककार असे कलादर्पण पुरस्कार मिळाले. त्यांना संगीत नाटक अकादमीने सर्व भारतीय भाषांमधील सर्वोत्कृष्ट नाटककार म्हणून गौरविले आहे (१९८४). ठाणे येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली (१९८८). त्यांना महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्र गौरव (१९९०) आणि भारत सरकारतर्फे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले (१९९२).

वसंत कानेटकरांचा सिंधूताई यांच्याशी विवाह झाला (१९४२). या दांपत्यास चंद्रलेखा (कन्या) आणि प्रियदर्शन (पुत्र) ही दोन अपत्ये.

वसंत कानेटकर यांचे नाशिक येथे निधन झाले.

संदर्भ : 

  • कानेटकर, वसंत, कवी आणि कवित्व, मुंबई, २००५.
  • कानेटकर, वसंत, नाटक : एक चिंतन, मुंबई, १९७४.
  • कानेटकर, वसंत, फुले आणि फळे : चिंतनाची, मुंबई, २०००.
  • कानेटकर, वसंत, मी…माझ्याशी, मुंबई, १९८६.
  • कानेटकर, वसंत, रसिक मित्रहो!, मुंबई, १९८८.
  • भार्गवे, वृंदा; पाठक, किशोर; कुलकर्णी, प्रमोद, प्रा. वसंत कानेटकर साहित्य वेध, नाशिक, १९९९.
  • श्रीखंडे, शशिकांत, नाटककार वसंत कानेटकर: एका युगकर्त्याचा प्रवास, पुणे, २०१४.