ही संकल्पनात्मक संज्ञा भरतमुनींनी त्यांच्या नाट्यशास्त्र  या ग्रंथात मांडलेली आहे. या ग्रंथात भरतमुनींनी स्त्री-पुरुष पात्रांच्या निवडीसंदर्भात अनुरूपा, विरूपारुपानुसारिणी या तीन पद्धतींबद्दल सांगितले आहे. त्यातील एक पद्धत म्हणजे अनुरूपा होय.

ही संज्ञा सुयोग्य स्त्री-पुरुष पात्रांच्या निवडी संदर्भात भरतमुनींनी वापरली आहे. नाटकातील देश, काल, वय, अवस्था आणि भाषेस अनुसरून तरुणाच्या भूमिकेकरिता तरुण, वृद्धाच्या भूमिकेकरिता वृद्ध, स्त्री पात्राकरिता स्त्री व पुरुष पात्राकरिता पुरुष अशी भूमिकेला अनुरूप व्यक्तींची निवड करणे हा उद्देश या पद्धतीत आहे; कारण ती त्या भूमिकेची नैसर्गिक गरज असते. अशा भूमिका वठविणाऱ्या स्त्री-पुरुष पात्रांना भरतमुनींनी अनुरूपता ही संज्ञा दिलेली आहे. त्याचे विवेचन नाट्यशास्त्र  या ग्रंथातील पुढील श्लोकात आहे.

स्त्रियस्तु स्त्रीगते भावे पुरुषा: पौरुषे तथा ।

यथावयस्तथा तस्मिन्ननुरूपेति सा स्मृता ।। अध्याय ३५, श्लोक २९

नायिकेची निवड करताना भरतमुनी असे म्हणतात की, ती सुस्वरूप, तरुण, विनयशील स्वभावाची असावी व तिला सुरांचे ज्ञान असावे. तर नटाच्या वा नायकाच्या बाबतीत ते म्हणतात की, नाटकातील पात्रांच्या शारीरिक गुणांना अनुरूप अशी भूमिका नटाला देणे योग्य आहे. त्याचे अंग, प्रत्यंग व्यवस्थित असतील. त्याला रोग नसेल, तो खूप अशक्त किंवा खूप लठ्ठ नसेल, खूप उंचही नसेल आणि खूप ठेंगणाही नसेल. दिसायला तेजस्वी, सुरांचे ज्ञान असणारा, सुंदर व प्रिय वाटावा असा असेल, अशा नटाला देवाची भूमिका योग्य होय आणि धिप्पाड, उंच, विशालकाय, गंभीर स्वराचा, रौद्र स्वभावाचा,  भीतिदायक दिसणारा नट राक्षसाच्या भूमिकेसाठी निवडावा असे म्हटले आहे. म्हणजेच नटाच्या-नटीच्या नैसर्गिक गुणांना समोर ठेवून केलेली पात्र निवड ही अनुरूपा पद्धती होय. वर्तमानात ज्याला आपण शारीरिक निवड पद्धती ( physical casting ) म्हणतो तीच ही अनुरूपा पद्धती होय.

संदर्भ :

  • त्रिपाठी, राधावल्लभ, संक्षिप्तनाट्यशास्त्रम्,  वाणी प्रकाशन, नवी दिल्ली,  द्वितीयावृत्ती – २००९.
  • शुक्ल, बाबूलाल शास्त्री, हिंदी नाट्यशास्त्र, चौखंबा संस्कृत संस्थान, वाराणसी, प्रथमावृत्ती – १९८५ .

समीक्षक – सु. र. देशपांडे

प्रतिक्रिया व्यक्त करा