वर्धमान पार्श्वनाथ शास्त्री : (२७ मार्च १९१९- २८ डिसेंबर १९८१) जैन धर्म आणि साहित्यातील तत्वचिंतक, संपादक लेखक. त्यांचा जन्म कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील पुण्यक्षेत्र वेणूर येथे माता अमृतमती यांच्या उदरी झाला. त्यांचा परिवार दिगंबर जैन धर्माचा अनुयायी होता. त्यांचे पिता पार्श्वनाथ शास्त्री तसेच ज्येष्ठ बंधू पंडित लोकनाथ शास्त्री वेणूर येथील विद्वान पंडित होते. जन्माच्या काही महिन्यांपूर्वीच वर्धमान यांना पितृवियोग झाला. वर्धमानचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मूडबिद्री जैन पाठशाळेत झाले. संस्कृत अध्ययनासाठी वयाच्या आठव्या वर्षी ते मोरेना महाविद्यालय, मध्यप्रदेश येथे दाखल झाले. इंदौर येथून त्यांनी शास्त्री पदवी प्राप्त केली. यानंतर कोलकाता येथून न्यायकाव्यतीर्थ उपाधी प्राप्त करून ते निष्णात पंडित झाले.

अध्ययन पूर्ण केल्यानंतर अखिल भारतीय दिगंबर जैन महासभेच्या पुरातत्त्व विभागासाठी त्यांनी काही काळ संशोधकाचे कार्य केले व काही वर्षे सचिव म्हणून कार्यभारही सांभाळला. बिजोलिया, राजस्थान येथील शिलालेखांचे संशोधनही वर्धमान शास्त्री यांनी केले. त्यानंतर अजमेर येथील महावीर महाविद्यालयात प्राचार्यपद भूषविले. स्याद्वादमार्तंडजैन सिद्धांत या पत्रिकांचे संपादनही येथे त्यांनी केले. त्यांची विद्वत्ता पाहून सोलापूर येथे धर्मवीर रावजी सखाराम दोशी यांनी त्यांना सोलापुर येथे आमंत्रित केले व जैनबोधकाचे संपादन तसेच मुंबई येथील जैन परीक्षालयाचा कार्यभार सोपविला. यानंतर शास्त्रीजी जीवनाच्या अखेरपर्यंत सोलापूर येथेच सुमारे ५० वर्षे राहिले.

सोलापूर येथे आल्यानंतर त्यांनी सुमारे ५० संस्कृत आणि प्राकृत ग्रंथांचा अनुवाद व संपादन केले. उग्रादित्याचार्यांचा दहाव्या शतकातील कल्याणकारक हा वैद्यकीय ग्रंथ, भरतेश वैभव, दानशासन, शतकत्रय, तत्त्वार्थश्लोकवार्तिक अशा अनेक ग्रंथांचे हिंदी व मराठीत भाषांतर केले. जैन तीर्थस्थळांचे श्रीक्षेत्र सावरगाव परिचय, आदिनाथ जैन मंदिर परिचय, सम्मेदशिखरजी महात्म्य, तसेच विधिविषयक पंचामृत अभिषेक, पंचकल्याणकाचे महत्त्व, क्रियामंजिरी अशा अनेक मराठी पुस्तकांचेही लेखन केले.

अनेक महत्त्वाच्या जैन संस्थांचे ते पदाधिकारी होते. आचार्य कुंथुसागर ग्रंथमाला- विश्वस्त व सचिव, मुंबई जैन परीक्षालय-सचिव, वीरवाणी विलास भवन-मूडबिद्री-विश्वस्त, अखिल भारतीय शास्त्री परिषद व महासभा पुरातत्त्व विभागाचे सचिव म्हणून त्यांनी काम केले. अखिल भारतीय धर्मसंरक्षिणी महासभा, तीर्थक्षेत्र कमिटी, रावजी सखाराम स्मारक संघ, मोरेना विद्यालय, जंबूसागर ग्रंथमाला इ. संस्थांमध्ये कार्यकारिणी सदस्य राहिले. कुंदकुंद विद्यापीठ हुमचा-कर्नाटक याचे संस्थापक  ते सचिव होते.

वर्धमान शास्त्री यांनी आपल्या जीवनकाळात जैनबोधक (मराठी, हिंदी), जैनदर्शन (हिंदी), वीरवाणी (कन्नड), विश्वबंधू (कन्नड, मराठी, हिंदी), स्याद्वादमार्तंड (हिंदी), जैन सिद्धांत (हिंदी), रत्नत्रय (मराठी, हिंदी, कन्नड), जैनमित्र (हिंदी), जैनगजट (हिंदी) अशा अनेक पत्रिकांचे संपादक म्हणून कार्य केले. संस्कृत, प्राकृत, मराठी, हिंदी व कन्नड अशा अनेक भाषांत सुमारे एक हजारापेक्षा अधिक जैन तत्त्वज्ञान व अन्य दर्शनातील विषयासंबंधी तौलनिक संशोधनपर त्यांचे लेख प्रसिद्ध झाले.

वर्धमान शास्त्री लेखनाबरोबरच शुद्ध मंत्र-तंत्र उच्चारण व व्याख्यानासाठी प्रसिद्ध होते. सोलापूर, मुंबई -काळबादेवी, पोदनपूर, शिरडशहापूर, भीमपूर, लोहारिया, मुंगाणा, हथाई, दिल्ली अशा सुमारे ७० ठिकाणी मूर्ती व मंदिर प्रतिष्ठापनेमध्ये ते प्रतिष्ठाचार्यत्वात होते. अनेक विधी-विधाने करून त्यांनी समाजावर प्रभाव टाकला. मराठी, हिंदी व कन्नड भाषांत ते अत्यंत प्रभावपूर्ण व्याख्यान देत असत व अनेक सर्वधर्मसंमेलनात त्यांनी जैनधर्माचे प्रतिनिधित्व केले. धर्म व लेखनसेवेबरोबरच ते एक सफल उद्योजक होते. त्यांनी मुद्रण व्यवसाय, चादर कारखाना, साबण कारखाना अशा विविध उद्योगात प्रथितयश प्राप्त केले.

वर्धमान शास्त्रींच्या विविधांगी कार्यकुशलतेमुळे त्यांना विद्यावाचस्पती (शाहपुरा), व्याख्यानकेसरी (सूरत-गुजरात), धर्मालंकार (सुजानगढ-राजस्थान), समाजरत्न (वाग्वर-प्रांत), विद्यालंकार (बेळगाव-कर्नाटक), सिद्धांताचार्य (वीरनिर्वाणभारती), पंडितरत्न (अ.भा.दि. जैन शास्त्री परिषद), श्रावकशिरोमणी (दिल्ली) इ. अनेक पदव्यांनी जैन समाजाकडून सन्मानित करण्यात आले. सोलापूर येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ  : भंवरलालजी, धर्मनिष्ठ, सम्मेद शिखरजी माहात्म्य, बाकलीवाल प्रकाशन, मणीपूर,१९७८.

समीक्षक : कमलकुमार जैन