निशीथसूत्र : निशीथसूत्र हा छेदसूत्रातील अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ आहे. याची भाषा अर्धमागधी प्राकृत. प्राकृतमध्ये या ग्रंथाचे नाव निसीहसूत्ताणि असे आहे. याला आचारांगाची पाचवी चूला (निषिद्ध शब्दांचा अर्थसंग्रह करणारी ग्रंथपद्धती) मानले जाते. तसेच याला स्वतंत्र अध्ययन मानले जाते. निसीहचे संस्कृत रूप निशीथ होते, ज्याचा अर्थ अंधकार, गोपनीय, रहस्यमय असा होतो व निसिहियचे निषिधक हे रूप होते ज्याचा अर्थ निषिद्ध किंवा निषेध असा होतो. छेदसूत्रात ज्या गोष्टी निषिद्ध आहेत त्या सांगितल्या आहेत व त्या गोष्टींकरता कोणते प्रायश्चित आहे व ते देण्याचा कुणाला अधिकार आहे हे स्पष्ट केले आहे.

निशीथसूत्राची रचना दृष्टिवाद नामक बाराव्या अंग आगमाचे चौदा पूर्वांमधील नवव्या पूर्वातून म्हणजे प्रत्याख्यानामधून झाली आहे (प्रत्याख्यान – भविष्यात दोष उत्पन्न न होऊ देण्यासाठीचे नियम). याला आचारप्रकल्प असे म्हणतात. आचारांगापेक्षा याची शैली व रचना वेगळी आहे. या ग्रंथाचे रचनाकार श्रुतकेवली भद्रबाहू आहेत. मुनी कल्याणविजयगणी यांच्या मतानुसार आर्यरक्षितसूरी हे निशीथ सूत्राचे रचनाकार आहेत. या ग्रंथाची रचना श्वेतांबर व दिगंबर हे भेद होण्यापूर्वीची आहे व याचा काल अंदाजे महावीरांच्या निर्वाणाच्या नंतर १५० वर्षे आहे.

निशीथसूत्रांत २० उद्देश, १५०० सूत्रे आणि ६७०३ भाष्य आहेत. यामध्ये चार प्रकारच्या प्रायश्चित्तांचे वर्णन आहे. प्रथम उद्देशात गुरुमासिकप्रायश्चित आहे. २, ३, ४, ५ मध्ये लघुमासिक, ६-११ मध्ये गुरुचातुर्मासिक, १२-१९ मध्ये लघुचातुर्मासिक व विसाव्यात आलोचना व प्रायश्चित घेताना लागणारे दोष या विषयांची व्याख्या आहे. त्याकरिता विशेष प्रायश्चित्तांची व्यवस्था सांगितली आहे.

प्रथम उद्देशात खालील क्रियांकरता गुरुमास (उपवास) हे प्रायश्चित सांगितले आहे. हस्तकर्म व त्यासंबंधीच्या कृती, जननेद्रिंयासंबंधीच्या वर्ज्यक्रिया, सचित्त फुलाचा वास घेणे, पायाला चिखल लागू नये म्हणून दुसऱ्यांकडून तेथे दगड ठेवायला लावणे, पाणी काढून टाकण्याकरता नाली बनवणे, पडदा बनवून घेणे, कात्री, सुई वगैरेला धार लावणे, कान कोरणे, दात कोरणे, नखे कापणे इत्यादीसाठीच्या वस्तू गरज नसताना जवळ बाळगणे, त्या स्वच्छ करणे अशा प्रकारच्या अनेक गोष्टी वर्ज्य सांगितल्या आहेत.

दुसऱ्या उद्देशात लघुमास (एकाशन) या प्रायश्चित्ताकरता खालील गोष्टी सांगितल्या आहेत. दारुदंड म्हणजे लाकडी दांड्याचे (पायपुसणे) पादप्रोंछन बनवणे, ते मागून घेणे, स्वतःजवळ जास्त दिवस ठेवणे, वस्त्रासंबंधी नियम, गृहस्थाघरचे आहार व पाणी घेणे वगैरे गोष्टी वर्ज्य आहेत. तिसऱ्या उद्देशात धर्मशाळा व सार्वजनिक ठिकाणी जाऊन खाण्या-पिण्याची याचना करणे, गृहस्थांच्या घरात जबरदस्तीने प्रवेश करणे, स्वतःच्या देहाची खूप काळजी घेणे, स्वतःचेच पाय दाबणे, तेल मालीश करणे वगैरे अनेक गोष्टींसंबंधी नियम  सांगितले आहेत. चौथ्या उद्देशात राजाला व नगरसेवक वगैरेंना वश करणे, त्यांची पूजा-अर्चा करणे, साध्वीच्या उपाश्रयात साधुने जाणे, मोठमोठ्याने हसणे बोलणे, नवीन भांडणे उकरणे, सचित्ताने व्याप्त हाताने आहार घेणे, मलमूत्र त्याग इ.विषयीचे विचार आहेत. पाचव्या उद्देशात वृक्षाजवळील सचित्त जमिनीवर उभे राहणे, बसणे, निजणे वगैरे, मलमूत्र त्यागासंबंधी, स्वाध्याय करण्याविषयी, अंथरुण पांघरुणासंबंधी सांगितले आहे. यांचे लघुमासिक प्रायश्चित्त आहे. सहाव्या उद्देशात संभोगाकरता स्त्रीला विचारणे किंवा संभोग करणे, स्त्रीशी अश्लीलवर्तन वगैरे दोषांना गुरुचौमासी प्रायश्चित्त आहे. सातव्यात उद्देशातही पुढे मैथुनसेवना संबंधीचे विचार आहेत. आठव्या उद्देशात धर्मशाळा, उद्यान वगैरे ठिकाणी साधुने एकट्या स्त्रीबरोबर राहू नये, जेवणखाण घेऊ नये वगैरे गोष्टी सांगितल्या आहेत. नवव्या उद्देशात राजपिंड व राजा संबंधीच्या अनेक गोष्टी आल्या आहेत. दहाव्या उद्देशात आचार्य किंवा रत्नाधिक श्रमणाला कठोर बोलल्यास त्याचे प्रायश्चित्त गुरुचातुर्मासिक सांगितले आहे. अकराव्या उद्देशात निषिद्धपात्रग्रहण, धर्मनिंदा, अधर्मप्रशंसा, लोभ मनात ठेवून इतरांची सेवा, इतरांना घाबरणे किंवा चकित करणे किंवा चकित होणे वगैरे क्रियांना गुरुचातुर्मासिक प्रायश्चित्त आहे. बाराव्या उद्देशात प्राण्यांना त्रास देणे, त्यांची हिंसा करणे, प्रत्याख्यान भंग करणे, मिश्रित आहार घेणे, सरोमचर्माचा उपयोग करणे वगैरे करिता लघुचातुर्मासिक प्रायश्चित्त सांगितले आहे. तेराव्या उद्देशात सचित्त जमिनीवर धुळीने भरलेल्या ठिकाणी उभे राहाणे, बसणे, निजणे वगैरे कृती, तसेच गृहस्थांबरोबर जास्त संबंध ठेवणे, त्यांच्याकरिता स्वप्नफल सांगणे, विद्या किंवा मंत्र देणे किंवा प्रयोग करणे, गुप्तधन दाखविणे, ज्योतिष सांगणे वगैरे कृतींकरिता लघुचातुर्मासिक प्रायश्चित्त सांगितले आहे. चौदाव्या उद्देशात पात्रांसंबंधीचे सर्व प्रकारचे विचार व त्याचे प्रायश्चित्त, पंधराव्या उद्देशात कठोर वचन, आशातना, सचित्त खाद्य खाणे, गृहस्थांबरोबर आहार-वस्त्रादिंची देवाणघेवाण करणे, शरीराला सजवणे वगैरेचे विवेचन व प्रायश्चित्ता त्यासंबंधीची माहिती दिली आहे. सोळाव्या उद्देशात जलयुक्त, अग्नियुत व गृहस्थ असलेल्या घरात राहणे, सचित्त फलाहार करणे वगैरे गोष्टी करण्याचे प्रायश्चित, सतराव्या उद्देशात स्वतःचे चोचले पुरवणे, सेवा करवून घेणे, जमिनीवर, मातीत ठेवलेला आहार घेणे, गाणे बजावणे वगैरे करिता प्रायश्चित्त आहे. अठराव्या उद्देशात अत्यावश्यक कारणाशिवाय नौकाविहार किंवा इतर वाहनातून प्रवास करणे या संबंधीची सविस्तर माहिती आहे. एकोणीसाव्या उद्देशात सुरुवातीला औषधविषयक वर्णन आहे व अध्ययन व अध्यापनासंबंधीचे वर्णन आहे, त्याचे दोष  व प्रायश्चित्त लघुचातुर्मासिक सांगितले आहे. विसाव्या उद्देशात सर्व प्रकारच्या प्रायश्चित्ताची माहिती दिली आहे. तसेच आरोपणाचे वर्णन आहे.

निशीथसूत्रावर भद्रबाहूंची निर्युक्ती, संघदासगणींचे भाष्य, जिनदासगणी महत्तर यांची विशेष चूर्णी आहे. प्रद्युम्नसूरींच्या शिष्याची अवचूरी, चंद्रसूरीची निशीथ चूर्णिदुर्गपदव्याख्या आहे.अमरमुनी व कन्हैयालालमुनींनी संपादित केलेली चार खंडांची भाष्य व चूर्णि, शुब्रिंग यांचे निशीथ : एक अध्ययन, अमोलकऋषींचा हिंदी अनुवाद,  घासीलालजींची संस्कृत टीका व हिंदी अनुवाद, फुलचंद पुप्फभिक्खू याचे निशीथसूत्र व युवाचार्य महाप्रज्ञ यांच्या नवसुत्ताणिमधील निशीथ सूत्र हे साहित्य उपलब्ध आहे.

संदर्भ ग्रंथ :  जैन,जगन्नाथ; मेहता, मोहनलाल, जैन साहित्यका बृहद् इतिहास – भाग २, पार्श्वनाथ विद्याश्रम शोध संस्थान, वाराणसी, १९६६.

समीक्षक : कमलकुमार जैन